एकोणिसाव्या शतकातला ट्रॅव्हल ब्लॉगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 10:44 AM2018-04-01T10:44:58+5:302018-04-01T10:44:58+5:30
पायाला भिंगरी लागावी तसा जॉन सिंगर सार्जण्ट भटकला. त्याने केलेल्या प्रवासाचे प्रतिबिंब त्याच्या चित्रांतही उमटले. प्रवासात झटपट काढलेली असूनही प्रत्येक चित्रातले रचनेचे कौशल्य, रंगांचा कुशल मेळ, रेषेवरची हुकमत, निरीक्षणशक्ती आणि तंत्र थक्क करून सोडणारे आहे. त्याच्या प्रवासाचा आनंद थेट आपल्यापर्यंत पोहोचतो !..
- शर्मिला फडके
जॉन सिंगर सार्जण्टची प्रवासी चित्रं पहाताना एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे मनापासून प्रवास आवडणारा हा चित्रकार आहे. चित्रं काढण्याकरता सार्जण्टने मनसोक्त प्रवास केला आणि प्रवासात मनसोक्त चित्रं काढली. त्याचा हा प्रवासही रसिक युरोपियन ट्रॅव्हलरला साजेल असा मजेत आणि थाटात, एक्झॉटिक साइटसिइंगचा भरपूर आनंद लुटत, निसर्गरम्य, प्रेक्षणीय स्थळांना न्याय देत हौशीने केलेला. प्रवासात लुटलेल्या मजेचं प्रतिबिंब सार्जण्टच्या चित्रांमध्येही पडलं. व्हेनिसच्या गोंडोलाची सैर, कोर्फूची अद्वितीय बेटं, मध्य-पूर्वेचं अद्भुत जग, टायरॉल, मोण्टाना, फ्लोरिडा.. प्रत्येक सुंदर स्थळ पहाताना आपल्या कलासक्त, सौंदर्यवादी मनाला होणारा आनंद त्याने लगेच त्या जागी जलरंगांच्या माध्यमातून कागदावर रिता केला. लोभस रंगछटा, सूर्यप्रकाशाचा नयनरम्य खेळ, मनमोहक रेषांमधून साकारलेली आनंदी, फिलगुड धर्तीची सार्जण्टची तरल, देखणी वॉटरकलर्स पहाताना त्याच्या मनातला प्रवासाचा आनंद आपल्यापर्यंत आपसूक पोहचतो.
विशेष म्हणजे झटपट केलेली असूनही त्या प्रत्येक चित्रातलं रचनेचं कौशल्य, रंगांचा कुशल मेळ, रेषेवरची हुकमत, निरीक्षणशक्ती, तंत्र थक्क करून सोडणारे आहे.
प्रवासी चित्रकारांचा विषय निघाल्यावर एकोणिसाव्या शतकातल्या या महत्त्वाच्या चित्रकाराचं जॉन सिंगर सार्जण्टचं नाव अपरिहार्यपणे समोर येतं.
१८५६मध्ये फ्लोरेन्सला, उच्चशिक्षित अमेरिकन आईबापाच्या पोटी जन्मलेला सार्जण्ट अक्षरश: पायाला भिंगरी लागावी तसा फिरला. त्याच्या वॉटरकलर्समध्ये उमटलेल्या पाऊलखुणांवरून आपल्याला त्याच्या या प्रवासाचा मागोवा घेता येतो. इंग्लंड, इटाली, टॅन्जियर्स, मोरोक्को, कैरो, सिरिया, पॅलेस्टिन, स्पेन, पोर्तुगाल, ग्रीस, स्वित्झर्लण्ड आणि आॅस्ट्रिया, आल्प्स पर्वतराजी. नॉर्वे, स्वीडन आणि अर्थातच अमेरिका (नायगाराची सार्जण्टची चित्रे आज, डिजिटल फोटोग्राफीच्या युगातही आपल्याला त्यातल्या प्रत्यक्षदर्शी सौंदर्याने चकित करून सोडतात.), व्हेनिसला तर तो पुन्हा पुन्हा गेला. कधी तिथले कालवे, कधी वास्तुवैभव, कधी माणसे.. दरवेळी नव्या चित्रमालिका. शक्य असतं तर सार्जण्ट जगभरातल्या त्याने भेट दिलेल्या प्रत्येक ठिकाणी परतून गेला असता. प्रवास आणि चित्रं रंगवणं या दोनही गोष्टींवर त्याचं जिवापाड प्रेम होतं. अर्थात, मजा म्हणजे हा सगळा प्रवास सार्जण्टने केला आपलं अर्धं वय उलटून गेल्यावर, कारण आपल्याला प्रवास आवडतो हे त्याला समजलंच उशिरा.
चाळिशी उलटून जाईपर्यंत सार्जण्ट आपल्या स्टुडिओमध्ये सुखाने ऑइलमध्ये पोर्ट्रेट पेंटिंग करत होता. प्रसिद्धी, पैसा सगळं होतं. इंग्लंड, अमेरिकेच्या उच्चभ्रू चित्रवर्तुळात सार्जण्टचं नाव आदराने घेतलं जात होतं. पण मग मिडलाइफक्र ायसिस म्हणा किंवा व्यावसायिक साचलेपण, अचानकच त्याला आपल्या मोने आणि पिसारो या मित्रांसारखी फ्रेन्च इम्प्रेशनिझम शैलीमध्ये चित्रं रंगवाविशी वाटू लागली. कलेत काहीतरी वेगळं, मनासारखं करण्याची आस त्याला स्वस्थ बसू देईना. त्या भरात त्याने त्याच्या प्रवृत्तीला न साजेशी नग्न, उन्मादक चित्रंही रंगवली, आपल्या चाहत्यांची नाराजी ओढवून घेतली.
आणि मग १९०७ मध्ये त्याने अखेर आपल्या पोर्ट्रेट स्टुडिओचा गाशा पूर्णपणे गुंडाळून ठेवला आणि इझल, रंग, स्केचबुक आणि ब्रशसहित सामानाची पिशवी पाठुंगळीला मारून तो प्रवासाला निघाला.
खरा, जातिवंत चित्रकार कधीच स्टुडिओच्या चार भिंतींमध्ये बांधलेला राहू शकत नाही. बाहेरच्या जगात मुक्तपणे फिरण्याची ओढ त्याच्या रक्तात रंगांइतकीच भिनलेली असते.
इटालियन व्हिलांच्या आलिशान बागा, व्हेनिसचे गोंडोले रंगवत सुरू झालेला सार्जण्टचा चित्रप्रवास मग इटालियन संगमरवरी खाणींमधले कामगार, मध्य-पूर्वेतल्या बदाऊनी टोळ्या, जंगल, पर्वतराजींमधले भटके, अनोळखी पौर्वात्य जगातले रस्त्यांवरचे मुसाफिर चितारत चित्रागणिक स्वैर, मुक्त होत गेला. अनेक वर्षं पोर्ट्रेट पेंटिंग करताना बोटांत भिनलेली रेषा, रचनेची शिस्त, सूक्ष्म निरीक्षणाची देण आणि त्याला मिळालेली खुल्या निसर्गातल्या रंगांची, प्रकाशाची, आकारांची जोड. सार्जण्टच्या उत्स्फूर्त निसर्गचित्रांना परफेक्शनिझमची चौकट आहे. तपशील परिपूर्ण आहेत. मग तो तुर्की पोषाख असो, काश्मिरी शालीवरचा कशिदा असो किंवा इटालियन बगिच्यातल्या कारंज्याचा चौथरा, मोरोक्कोतल्या मशिदीचा मिनार. सूर्योदय आणि सूर्यास्ताचे रंग तर त्याच्या प्रत्येक चित्रातून जाणवतातच. बघताना जलद आणि सोपे वाटणारे सार्जण्टच्या चित्रातल्या रंगांचे फटकारे अचूक, योग्यजागी योग्य तेवढ्याच ताकदीचे आहेत. त्याला आवडलेल्या, तो प्रेमात पडलेल्या ठिकाणांची त्याने मनस्वीपणे चितारलेली ही नेचर पोर्ट्रेट्स होती.
अशी तब्बल दोन हजार वॉटरकलर्स सार्जण्टने आपल्या सफरीमध्ये चितारली. स्केचेस आणि त्यावरून नंतर केलेली आॅइल पेंटिंग्ज अजून वेगळीच.
हे प्रत्येक चित्र मास्टरपिस आहे.
सातत्याने भटकंती सुरू असताना हे साध्य करणे सोपे नाही. त्याकरता सार्जण्टने खास स्वत:चे असे वॅक्स टेक्निकही विकसित केले. प्रचलित चित्रकलेतले सगळे प्रयोग त्याने या काळात करून पाहिले. प्रवासातल्या आपल्या प्रत्येक मुक्कामी सार्जण्ट आपल्या समकालीन चित्रकारांना भेटे, चित्रकलेतल्या नव्या तंत्रांना जाणून घेई, अनुभवाची देवाण-घेवाण होई. हास्यविनोदाच्या मैफली, मेजवान्या झडत. सार्जण्टचा प्रवास एकट्याने केलेला असला तरी एकाकी नव्हता.
प्रवासात तो सातत्याने आपल्या नातेवाईक, परिचितांना पत्रे पाठवी, आपल्या ट्रॅव्हल जर्नलमधल्या नोंदी त्यांना वाचायला पाठवी. प्रत्येक वेळी ‘बाहेर पडा, भटका, सूर्याचा प्रकाश अंगावर घ्या.. आयुष्य जगा’ असं तो आवर्जून सांगे. प्रवासाला ते उद्युक्त व्हावेत म्हणून सोबत स्केचेस, झटपट चितारलेली वॉटरकलर्सही त्यांना आपल्या पत्रांसोबत पाठवे. आजच्या काळातल्या एखाद्या मनमौजी ट्रॅव्हल ब्लॉगरच्या स्टाइलला साजेसा त्याचा हा प्रवास होता.
सार्जण्टचा प्रवास काही फार वेगळ्या, खडतर वाटांवरून केलेला नव्हता. त्याने पाहिलेली ठिकाणे, चित्रांचे विषय यात चकित करून सोडणारा वेगळेपणा, युनिकनेस नाही. त्याचा प्रवास दीर्घ होता मात्र डेस्टिनेशन्स रूळलेलीच होती ती. यात महत्त्वाचा ठरला त्याने प्रवासातल्या प्रत्येक क्षणी लुटलेला आनंद आणि मजा, जी त्याच्या चित्रांमध्ये उमटली. सूर्योदय, सूर्यास्ताच्या रंगांइतक्याच खरेपणाने.
(लेखिका ख्यातनाम कला समीक्षक आहेत)
sharmilaphadke@gmail.com