जनमन: दहीहंडीच्या उत्सवाला खेळाचा दर्जा देणे हानिकारक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 07:55 AM2022-08-22T07:55:16+5:302022-08-22T07:55:56+5:30
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदा पथकाला खेळाचा दर्जा देऊन टाकला आहे. भारतीय समाजामध्ये उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदा पथकाला खेळाचा दर्जा देऊन टाकला आहे. भारतीय समाजामध्ये उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तो भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. मात्र, सार्वजनिक किंवा धार्मिक उत्सव याला खेळाचा दर्जा देणे, त्यामध्ये पाच टक्के आरक्षणाची घोषणा करणे ही गोष्ट क्रीडा क्षेत्रासाठी हानिकारक आहे.
१) कोणत्याही खेळाचे सामने आयोजित करण्यासाठी त्या संघटनेचे कामकाज किमान १२ जिल्ह्यांत असणे आवश्यक आहे.
२) महाराष्ट्र राज्य शासनाच्या क्रीडा प्रकारात आंतरशालेय सामन्यांमध्ये १४, १७ आणि १९ वर्षाखालील मुला-मुलींचे संघ असतात. विद्यापीठ स्तरावरील सामन्यांसाठी वयाची अट २५ आहे.
३) गोविंदा खेळामध्ये खालच्या दोन मनोऱ्यांमध्ये २५ ते ३५ वर्षांचे गोविंदा उभे राहतात. त्यानंतर तिसरा, चौथा थर चढविला जातो. यामध्ये वेगवेगळ्या वयाचे खेळाडू सहभागी होतात. अशा स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय किंवा तृतीय क्रमांक कशाच्या आधारावर काढले जातील? गुजरातसह संपूर्ण देशामध्ये गरबा हा सांस्कृतिक खेळ खेळला जातो. पुढे जाऊन गरबा या खेळाचा समावेशही क्रीडा क्षेत्रात करणार का? गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात ढोल वाजविण्यात येतात. ढोल वाजविण्याच्या प्रकाराला भविष्यात क्रीडा प्रकाराचा दर्जा देणे योग्य ठरेल का? ग्रामीण भागात श्रावण महिन्यात टिपऱ्या हा खेळ खेळला जातो. याला आपण बोली भाषेत खेळ म्हणतो. शासनाच्या क्रीडा धोरणामध्ये उत्सव आणि खेळ यामध्ये फरक करणे आवश्यक आहे.
४) मुंबई उच्च न्यायालयाने १४ वर्षाखालील गोविंदांना चौथ्या मनोऱ्यावर चढण्यास बंदी घातली आहे.
५) सर्वच राजकीय पक्षांनी उत्सवाला इव्हेंटचे स्वरूप दिलेले आहे. यामुळे उत्सव कमी आणि प्रदर्शन, प्रचार जास्त असेच चालले आहे. राजकीय पक्षांना आपली व्होट बँक मजबूत करण्यासाठी असे प्रयत्न करावेच लागतात. कोणत्याही धार्मिक किंवा सांस्कृतिक उत्सवाला विरोध असण्याचे कारण नाही. मात्र, त्याला खेळाचा दर्जा देणे चुकीचे वाटते.
- प्रशांत साठे, औरंगाबाद
(या आशयाची पत्रे शंभू रोकडे, दत्तप्रसाद शिरोडकर, टिळक उमाजी खाडे यांच्यासह अनेक वाचकांनी पाठवली आहेत.)