घाबरलेल्या मुलांना सावरण्याच्या युक्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 06:04 AM2021-05-30T06:04:00+5:302021-05-30T06:05:08+5:30

तुमच्या मुलांच्या मनात सध्या काय चाललंय याकडे तुमचं लक्ष आहे का? मुलं टीव्हीसमोर बसून एकेकटी, एकाकी होत चालली नाहीत ना?

Tricks to handle frightened children.. | घाबरलेल्या मुलांना सावरण्याच्या युक्त्या

घाबरलेल्या मुलांना सावरण्याच्या युक्त्या

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

सध्याच्या भयकारी वातावरणात सर्वांत दुर्लक्षित कोण असेल, तर ती आपली मुलं!! मोठ्या माणसांना पडलेला चिंतांचा फेराच इतका गंभीर; की घरात आपल्यासोबत आपली मुलंही राहतात, त्यांच्याही मनावर आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम होतो आहे, हे बहुतेकांच्या लक्षातच येत नाही. तुम्ही तुमच्या मुलांसाठी मॉडेल असता. कुठल्याही संकटावर किंवा ताणावर तुम्ही किती आरोग्यपूर्ण प्रतिक्रिया देता त्यावर मुलांची वर्तणूक ठरत जाते याचा विसर पडता कामा नये.

‘रोजचं सामान तरी पुढे मिळणार आहे की नाही कुणास ठावूक?...’‘आज निवांत बसलोय, उद्याचं काय?’, ‘महागाई वाढणार आणखी’, ‘दोन वर्षांपूर्वी आज इथं होतो, आता संपलं ते फिरणं आणि हवापालट’ - ही अशी वाक्यं घरात सतत उच्चारली जात असतील, तर जरा सावध व्हा... तुमच्या मुलांचे कान तुमच्याचकडे लागलेले असणार आहेत !!

पण हेही खरं, की सगळी कामंधामं सांभाळताना मुलांकडं बारीक लक्ष राहाणं शक्य नसतं. त्यामुळं मुलं घाबरी झालेली असतात, अस्वस्थ असतात तेव्हा प्रत्येकवेळी मोठ्यांच्या ते लक्षात येतंच असं नाही. मुलांनाही बोलून दाखवता येत नसतं.

मुलंघाबरलेली, बेचैनआहेत, हेकसंओळखावं?

1. मुलं सारखी सारखी चौकशी करताहेत का? आजी बरी होईल का? मावशीचा खोकला कोरोनामुळे आहे का? खालच्या फ्लॅटमधले काका हॉस्पिटलमधून घरी येतील का? - या चौकशीतून मुलं ‘सगळं काही ठीक आहे. कंट्रोलमध्ये आहे’ अशी खात्री तुमच्याकडून मागत असतात.

2. मुलं सतत तुमच्या आगेमागे घोटाळताहेत का? - म्ह्णजे एकटं, वेगळं राहण्याची त्यांना बहुदा भीती वाटतेय.

3. पोट दुखतंय, डोकं दुखतंय किंवा ‘कसंतरी होतंय’ या तक्रारी वाढल्यात का? - त्यांना तुमचं लक्ष हवं आहे कदाचित.

4. मूड चटकन बदलतोय का? घटकेत चिडणं, घटकेत खूष होणं चाललंय का? लहरीपणा वाढलाय का? - हे त्यांच्या अस्वस्थतेचं बाह्य रूप असू शकेल.

5. झोपण्याचं गणित बिघडलंय का? मुलं लवकर झोपतात किंवा झोपतंच नाहीत... फार लवकर उठून बसतात किंवा बारा बारा वाजेपर्यंत उठत नाहीत याचा अर्थ तोल बिघडलेला आहे. त्याचं मूळ त्यांच्या अस्वस्थतेत असू शकतं.

मगकायकरायचं?

1. ‘कसंतरी वाटतंय’ म्हणजे नेमकं कसं वाटतंय या भावना शब्दांत सांगायला मुलांना शिकवा. त्याचा एक चार्ट करा. इंटरनेटवर तो सहज मिळू शकेल. राग आल्यावर एक ते दहा अंकात मोजायचं ठरवलं तर किती राग आलाय? हे ठरवता येईल. आपल्या राग, आनंद, चिंता या भावनांमध्ये नेहमीच एकसारखी तीव्रता नसते हे तुम्ही यातून त्यांना सांगू शकाल. अस्पष्ट व अंधूक उत्तरातून जरूर पडेल तेव्हा मदत करता येत नसते हेही त्यातून मुलांना कळेल. पालक जितकं सुस्पष्ट विचारू शकतील मुलंही तितकंच सुस्पष्ट उत्तराकडे जातील.

2. नेमकं काय होतंय हे स्पष्ट कळलं की तुम्ही मुलांना त्याबद्दल वाचलेलं, पाहिलेलं काही सांगू शकाल. एकत्र काही बघणं, वाचणं, त्यावर बोलणं यातून चिंतेची पातळी कमी होईल.

3. सतत अस्वस्थ असणार्‍या मुलांना कधीकधी "तुम्ही असं करा, तसं करा" हे सांगून चालत नाही. त्यांना दिनक्रम आखून द्यावा लागतो. मुलांच्या आतल्या ऊर्जेला वाहण्यासाठी रस्ते करण्याचं काम सतत करावं लागतं. ती ऊर्जा ओळखणं जरुरीचं.

4. मुलं स्वत:ला टीव्ही समोर किंवा अन्य कशात गुंतवून एकटीएकटी होत नाहीयेत ना, यावर लक्ष देणं जरुरीचं. सध्या बाहेर जाता येत नाही, पण तरीही मुलं आपल्या मित्रांच्या संपर्कात आहेत ना, आवडती आजी, आत्या, ताई-दादा यांच्याशी बोलत राहाताहेत ना हे बघायला हवं. एकटं राहण्याची सवय एकटं पडण्याकडे जाता उपयोगी नाही.

5. मुलांना तुमच्याकडून सगळ्या गोष्टी ‘रिअ‍ॅश्यूअर’ करून घ्यायची, त्यावर विसंबून राहायची सवय होता कामा नये. अनिश्‍चितता असणारच आहे, पण आपण सगळ्या चांगल्या सवयी फॉलो करूया, स्वत:ला गुंतवून ‘आज व आत्ता’ मध्ये जगूया असं सांगत राहण्यानं त्यांची मानसिक तयारी होऊ शकेल.

6. भीतीशी, अस्वस्थतेशी कसं डील करायचं याचे सराव आता लॉकडाऊनमध्ये जितके उपयोगी होणार आहेत त्याहून कोविड संपल्यावर बाहेर पडताना उपयोगी होणार आहेत. मुलांना जगात परत पाऊल ठेवायची भीती वाटता कामा नये.

7. प्रत्येक संकटात एक संधी असते. त्यातली चांगली बाजू बघणं, ती मांडणं यातून मुलं जास्त आश्‍वस्त होतील. रोजच्या धावपळीत आपण एकमेकांसोबत हसाखेळायचं राहून गेलं होतं व आता केवढं छान वाटतंय या साध्या भावनेसारख्या अनेक भावना एकमेकांना सांगून त्या लिहून व रेकॉर्ड करून ठेवण्याचा खेळही करता येईल. या सकारात्मकतेचं महत्त्व खूप आहे.

Web Title: Tricks to handle frightened children..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.