ट्रम्प- एका वादग्रस्त व्यक्तिमत्त्वाचा गुंतागुंतीचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 06:05 AM2020-02-09T06:05:00+5:302020-02-09T06:05:09+5:30

एकेकाळी अमेरिकेतील एक रंगेल ‘बिल्डर’ एवढीच या गृहस्थांची ओळख होती. त्यानंतर ते आश्चर्यकारकरीत्या  अमेरिकेचे थेट राष्ट्राध्यक्षच झाले. महाभियोगाच्या सोपस्कारातून तरून गेलेले हे गृहस्थ आता 2020च्या निवडणुकीत काय करतात याकडे जग चिंताक्रांततेने पाहते आहे.

Trump - the complicated journey of a controversial personality | ट्रम्प- एका वादग्रस्त व्यक्तिमत्त्वाचा गुंतागुंतीचा प्रवास

ट्रम्प- एका वादग्रस्त व्यक्तिमत्त्वाचा गुंतागुंतीचा प्रवास

googlenewsNext
ठळक मुद्देसार्‍या जगाचे लक्ष आता एकाच गोष्टीकडे लागून राहिलेय. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे ‘विल अमेरिकन्स गिव्ह ग्रीन कार्ड टू ट्रम्प?’..

- अनंत गाडगीळ 

‘माय टॅक्स रिटर्न्‍स? इट्स नन ऑफ यूवर बिझनेस. माझ्या प्राप्तिकर भरण्याबाबत विचारता? तुमचा त्याच्याशी काय संबंध?’ - 2016 साली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढणार्‍या डोनाल्ड ट्रम्प यांना एबीसी या टीव्ही चॅनलेचे प्रसिद्ध पत्रकार जॉर्ज स्टेपनोपोलूस यांनी एका मुलाखतीदरम्यान विचारलेल्या प्रश्नावर ट्रम्प यांनी फटकळपणे दिलेले हे उत्तर. भारतात निवडणूक लढविणार्‍या प्रत्येकास आपली संपत्ती जाहीर करावी लागते. अमेरिकेत जरी असा नियम नसला तरी गेल्या 60-70 वर्षांपासूनची प्रथा आहे. आपल्याकडे एखाद्या नेत्याने असे उत्तर दिले असते तर पत्रकारांनी त्याचे वाभाडेच काढले असते.
राजकीय पटावर अवतरल्यानंतर ट्रम्प यांची अनेक स्वभाववैशिष्ट्ये समोर आली. ट्रम्प यांच्या फटकळपणाची  अनेक उदाहरणे आहेत. बाल्टीमोर शहरातील कृष्णवर्णीय नेते एलिजाह कमिंग्स यांनी ट्रम्प यांच्या धोरणावर टीका केल्याने त्वरित ‘कमिंग्स म्हणजे जणू उंदीर झुरळांनी भरलेले विर्शामगृह आहे’, इतकी भयानक उलट टीका  ट्रम्प यांनी केली. अमेरिकेच्या काँग्रेसवर (लोकसभा) निवडून आलेल्या चार महिला प्रतिनिधीही ट्रम्प यांच्या तडाख्यातून सुटल्या नाहीत. मूळच्या अमेरिकन वर्णाच्या नसलेल्या या चौघींनी आपल्या मूळ देशाला परतावे, असे वक्तव्य ट्रम्प यांनी करताच अमेरिकेत एकच गदारोळ झाला. यंदाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या एक इच्छुक उमेदवार एलिझाबेथ वॉरेन यांनी तर ट्रम्प हे वर्णभेद करीत अमेरिकेत दुफाळी माजवत आहेत, असा प्रत्यारोपही केला. तुमच्या आयुष्यात काही बिघाड झाला तर दोष स्थलांतरिताना द्या हे तर ट्रम्प यांचे ब्रीदवाक्यच झाले आहे.
 1973 साली त्यावेळी बिल्डर असलेले ट्रम्प अल्पसंख्याकांना सदनिका विकत नाहीत, असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. त्यांचे विश्वासू वकील रॉय कोहन यांनी अत्यंत हिरिरीने हा खटला लढवून ट्रम्प  यांना सरकारकडून 70 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळवून दिली. दुर्दैवाने याच कोहन यांनी अमेरिकेतील एक अब्जाधीश तिवीस रोझनस्टिल मृत्युशय्येवर असताना कोहन यांना वारसदार नेमले आहे, असे घोषित करणार्‍या ‘अँफिडेव्हिट’वर बळजबरीने सही घेतली. मात्र कोर्टाने सही मान्य करायला नकार दिला आणि प्रख्यात वकील म्हणून कोहन यांची कारकीर्द तिथेच संपुष्टात आली.
बिल्डर ट्रम्प यांच्या व्यवसायाच्या सुरुवातीला ज्या कंपनीची ‘कॉँक्रीट मिक्स’ मशीन ते वापरायचे ती कंपनी अंथनी सॅलेनो या माफिया टोळीच्या म्होरक्याची निघाली. तर ट्रम्प यांच्यासाठी सुतारकाम करणारी कंपनीसुद्धा जेनोवेसेस या दुसर्‍या एका माफियाच्या मालकीची निघाली. ब्रिघटन बिच येथील आपल्या हॉटेलसाठी ट्रम्प  यांनी सेमयॉन किसलीन या रशियन स्थलांतरितांकडून 70 साली शेकडो टीव्ही विकत घेतले. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या एका मोठय़ा दुकानाचे किसलीन व दुसरे एक रशियन तमीर सापीर हे भागीदार होते. मात्र हे दुकान रशियन हेरांचा छुपा अड्डा होता हे कालांतराने उघड झाले.  ट्रम्प यांचे बेरॉक नावाच्या एका कंपनीसोबत व्यावसायिक संबंध. सदर कंपनीचे दोन अब्जाधीश संचालक मूळच्या रशियन वाणिज्य मंत्रालयाचे तेवफिक अरीफ व माशकेविच दोघांनी ‘सावरोना’ नावाचे जहाज 2010 साली भाड्याने घेतले. जहाजामध्ये ‘मौजमजा’ चालल्याची खबर पोलिसांना लागली. पोलिसांच्या धाडीत मौजमजेसाठी आणलेल्या नऊ तरुणी सापडल्या.
‘अमेरिका फस्र्ट’ - प्रथम माझा देश! ट्रम्प यांचे हे घोष वाक्य. राष्ट्रप्रेम जागे करून ट्रम्प यांनी अनेकांना भुरळ घातली; पण अनेक मित्रराष्ट्रांना ओघाने दुखावले.  थोडीशी कमी दर्जाची, शरीरकष्टाची कामे अमेरिकन मंडळी सहसा करायला तयार होत नाहीत तीच कामे हिस्पॅनिक-मेक्सिकन लोक कमी पैशात करायला तयार असतात. मेक्सिकोतून बेकायदेशीरपणे अमेरिकेत येणार्‍या लोकांची यामुळे संख्या प्रचंड. या मेक्सिको-अमेरिकेमध्येही कोट्यवधी खर्च करून भिंत बांधण्याची  ट्रम्प यांची मनीषा. मग अशी कामे करायला उरणार कोण? हाही प्रश्न अमेरिकेत कुजबुजला जातो आहे. चीन सोबतही व्यापारी मतभेद सध्या गाजत आहेत. भारतातून विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी अमेरिकेत स्थायिक होतात. हे प्रमाण रोखण्यासाठी एच-1 पद्धतीचा व्हिसा यावरही  ट्रम्प यांनी बंधने आणली. परिणामी अमेरिकन विद्यापीठातील परदेशी विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी होण्याचा धोका वर्तविला जात आहे. यामुळे अमेरिकेतल्या मोठय़ा कंपन्याही काळजीत आहेत. 
अमेरिका-रशियांमध्ये वर्षानुवर्षे शीतयुद्ध मात्र ट्रम्प यांचा रशियन उद्योगजगताशी घनिष्ट संबंध ! किंबहुना राजकारणात आणि व्यवसायात रशियन संबंधानीच  ट्रम्पना तारले, असे म्हटले जाते.
अमेरिकेतला एक बिल्डर अशा र्मयादित स्वरूपाची ओळख असलेले ट्रम्प हे खर्‍या अर्थाने 1987 नंतर प्रकाशझोतात आले. निमित्त झाले रशियाचे तत्कालीन अमेरिकेतील राजदूत यूरी डुबिनिन यांनी ट्रम्प यांना मॉस्को भेटीचे निमंत्रण दिले. मॉस्कोमध्ये एक भव्यदिव्य हॉटेल ट्रम्प यांनी बांधावे याची चर्चा करण्यासाठी. जपान व सौदी अरेबिया ही वास्तविक अमेरिकेची मित्रराष्ट्रे; पण या रशियन दौर्‍याहून परतताच या दोन्ही मित्रराष्ट्रावर टीकेची झोड उठविणार्‍या राजकीय स्वरूपाच्या जाहिराती त्याकळात ट्रम्प यांनी प्रमुख वर्तमानपत्रातून प्रसिद्ध केल्या. ते एवढय़ावरच थांबले नाहीत तर त्वरित न्यू हॅम्पशायर राज्याचा दौरापण केला. अमेरिकन राष्ट्राध्यक्षाची निवडणूक लढविणार्‍या प्रत्येक इच्छुक उमेदवाराला या राज्याच्या विधानभवनात जाऊन फॉर्म भरावा लागतो. शंभर वर्षांपासूनची ही प्रथा आहे. ट्रम्प यांनी यातून दुहेरी हेतू साध्य केला. एक म्हणजे भविष्यातील राजकीय महत्त्वाकांक्षेची जणू त्यांनी ओझरती सूचनाच दिली आणि दुसरीकडे रशियाला सहानुभूतीचा संदेश दिला.
90च्या दशकाच्या सुरुवातीस मात्र ट्रम्प कर्जबाजारी होऊ लागले. अमेरिकन बँका त्यांना भांडवल द्यायला तयार होईनात. मॉस्कोमध्ये सदनिका, हॉटेल वगैरे बांधायचे स्वप्नच राहते आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, रशियात राजकीय घडामोडी घडल्या. ब्लादिमीर पुतीन पंतप्रधान बनले. साधारण याच सुमारास रशियातील सेंट पिटर्सबर्ग शहरामध्ये स्थानिक संस्थेने एक सौंदर्य स्पर्धा आयोजित केली. ऑक्साना फेडोरोव्हा नावाच्या तरुणीने ती जिंकली. याच ओक्सानाने पाठोपाठ 2001 साली मिस रशिया हा किताबही जिंकला खरा; पण त्यानंतर रशियात दबक्या स्वरूपात लोकांमध्ये एक वेगळीच कुजबुज चर्चा सुरू झाली. पुतीन यांना ओक्सानाबद्दल फारच ‘आपुलकी’ निर्माण झाल्यामुळे ‘मिस रशिया’ या मुकुट गुप्तहेरांच्या सुप्त हस्तक्षेपामुळे ओक्सानाच्या डोक्यावर ठेवला गेला अशी ही कुजबूज. या स्पर्धेतील एका सौंदर्यवतीने सदर स्पर्धा नुसता देखावा होता, निकाल आधीच ठरला होता याचे पुरावेच दिले. ओक्सानाने एवढय़ावरच न थांबता 2002च्या प्युटोरिको शहरात होणार्‍या जागतिक सौंदर्य स्पर्धेवर आपले लक्ष केंद्रित केले. विशेष म्हणजे ही स्पर्धा ट्रम्प यांनीच पुरस्कृत केली होती. धक्कादायक म्हणजे स्पर्धेपूर्वी निवड सदस्यांच्या बैठकीत स्पर्धा ओक्सानाने जिंकल्यास मला आवडेल असे बेधडक विधान ट्रम्प यांनी केले. ओक्सानाने स्पर्धा जिंकली, ट्रम्प यांनी पुतीन यांचे मन जिंकले, एका नव्या पर्वाची येथून सुरुवात झाली. दिवसेंदिवस ट्रम्प यांचे रशियात हितसंबंध वाढू लागले. रशियन गुन्हेगारी जगताशी संबंध असल्याचा संशय असलेले अमेरिकेतील एका स्थलांतरित फेलिक्स सेटर यांनी ट्रम्प यांच्या प्रसिद्ध ‘सो-हो टॉवर’मधील सदनिका विकत घेण्यासाठी अनेक गिर्‍हाइके आणण्यास सुरुवात केली. सेटर यांचे रशियात राजकीय संबंध किती जबरदस्त आहेत हे जेव्हा त्यांनी ईव्हाका ट्रम्प यांना रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या वैयक्तिक कार्यालयात फिरवून आणले तेव्हाच स्पष्ट झाले. 
दरम्यान, ट्रम्प यांचे निवडणूक प्रचारप्रमुख पॉल मॅनाफोर्ट यांनी युक्रेन देशातील काही प्रभावशाली राज्यकर्त्याकडे एक प्रस्ताव मांडला. पुतीन सरकारला फायदेशीर ठरेल, असे धोरण आखणे, प्रसिद्धिमाध्यमांवर त्यासाठी टाकायचा दबाव इ. गोष्टींचा अंतर्भाव असलेला असा हा प्रस्ताव. मॅनाफोर्ट यांना 2006मध्ये सदर प्रस्तावासाठी 70 कोटी रुपये मोबदलाही दिला गेला.
मॅनाफोर्ट यांनी पाठोपाठ ‘ट्रम्प टॉवर’मध्ये 20 कोटी रुपयांच्या सदनिका विकत तर घेतल्याच; पण पुतीन यांचे स्नेही ओलीग देरीपास्का यांनाही एक सदनिका घेऊन दिली. बघता बघता ‘ट्रम्प टॉवर’मधील शेवटचे 7 मजले रशियन लोकांनी विकतही घेऊन टाकले.
बांधकाम क्षेत्रात अमाप यश मिळविणार्‍या ट्रम्प यांना ‘टोरान्टो’ प्रकल्पात मात्र फटका बसला. दरम्यान, रशियाच्या गुप्तचर कॉलेजचे पदवीधर सेरगेई गोरकोव्हा यांनी ट्रम्प यांचे जावई जेराड कूशनर यांची ‘ट्रम्प टॉवर’मध्ये भेट घेतली खरी मात्र रशियन सरकारच्या व्हीइबी बँकेचे अध्यक्ष या नात्याने म्हणे. पुढे याच बँकेने टोरान्टो प्रकल्पात 70 कोटी रुपये गुंतवत ट्रम्प यांना धंद्यात सावरले हे अनेक वष्रे गुपीतच राहिले. 
ट्रम्प यांचा व्यवसाय म्हणजे रशिया मैत्री संघच होऊ लागला होता. ‘पेन्शनर्स पॅरॅडाइस’ अशी ओळख असलेल्या फ्लोरिडा राज्यातील सनी आयल येथे ट्रम्प यांनी अमेरिकन पर्यटकांसाठी भव्य रिसॉर्ट बांधले; पण मौज करायला रशियन लोकांचीच गर्दी वाढू लागली. उपरोधाने लोक त्याला ‘लिटल मॉस्को रिसॉर्ट’ म्हणायला लागले. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची सुरक्षा व्यवस्था ही जगात सर्वोत्कृष्ट मानली जाते. एखाद्याला राष्ट्राध्यक्षांच्या जवळपासही फिरकू देत नाहीत. असे असताना 2016 च्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणूक प्रचार दौर्‍यात रिबोलोवलेव यांनी आपले विमान ट्रम्प यांच्या विमाना बाजूलाच दिवसभर उभे केले हेही थोडके नसे.
ट्रम्प यांची माणसांची पारख कायम अडचणीचीच ठरली. त्यांची सेटर यांच्यासोबत व्यावसायिक मैत्री होती सेटर यांच्यावर आर्थिक गुन्हेगारीचा आरोपही ठेवण्यात आला होता. याच सेटर यांनी 2018च्या मार्चमध्ये एबीसी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तर आपण एफबीआयचा ‘खबर्‍या’ असल्याचा गौप्यस्फोटच केला. (सेटर कसा दिसतो मला आठवत नाही असे 2015 साली ट्रम्प एका मुलाखतीत म्हणाले होते.)
ट्रम्प यांच्या कोलांटउड्यांची असंख्य उदाहरणे आहेत. 2013 साली एनबीसी चॅनलच्या लोकप्रिय असलेल्या डेव्हिड लेटरमन कार्यक्रमात ‘पुतीनना मी चांगला ओळखतो, एकदम फक्के आणि कणखर आहेत ते’, असे विधान ट्रम्प यांनी केले होते. तर 2015ला रेडिओ चॅनलचे पत्रकार मायकेल सॅवेज यांच्याशी बोलताना, ‘पुतीन यांना मी कित्येक वर्षांपूर्वी तेसुद्धा एकदाच भेटलो आहे’, असे वक्तव्य केले होते. त्याचवर्षी दुसर्‍या एका मुलाखतीत ‘पुतीन माझे चांगले मित्र आहेत’ म्हणत गुगली टाकली. कहर म्हणजे 2016च्या निवडणूक प्रचारादरम्यान जुलैमध्ये एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ‘छे, पुतीनना मी कधी भेटलेलोही नाही. त्यांच्याशी कधी बोललेलोही नाही,’ असे म्हणत शब्दांचे षट्कारच ट्रम्पनी लगावले.
2016 साली ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले. आजपर्यंतच्या त्यांच्या गेल्या चार वर्षांतील कार्यशैलीचे निरीक्षण जर केले तर त्यांच्या सरकारमधील सहकार्‍यांची अवस्था म्हणजे आपल्याकडे ‘लिव्ह अँण्ड लायसेन्स’वर सदनिका 11 महिन्यांच्या करारावर लोक घेतात तशी झाली आहे. वर्षभराच्या पुढे सहकारी टिकला तर नशीब.
राष्ट्राध्यक्ष बनताच अवघ्या 3-4 महिन्यांत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची स्थापना केली. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार यावरील नेमणुका या त्यांनी ‘विचारपूर्वक’ केल्या आहेत. वस्तुस्थिती मात्र उलट आहे. बहुतांशी सदस्यांचा या क्षेत्रातील अनुभव शून्यच. यातील एक सदस्य जॉर्ज पादादोपोउलास हे इस्राइलचे छुपे दलाल असल्याचा संशय खुद्द म्हूलर चौकशी समितीनेच व्यक्त केला. गेल्या वर्षी कोर्टाने त्यांना 14 दिवसांचा तुरुंगवासही सुनावला. दुसरे सदस्य कार्टर पेज, एफबीआयच्या म्हणण्याप्रमाणे ते तर रशियाचे दलाल, तिसरे सदस्य स्मित्झ, यांचा तर म्हणे सिरीयाला रशियन लष्करी सामुग्री अवैधपणे विकण्याच्या करारात हात होता. 
ट्रम्प यांचे जावई जराद कूशनर यांचे सहकारी मायकल फ्लाइन यांना एका प्रकरणामुळे वर्षभरातच ट्रम्प यांनी बाहेरचा रस्ता दाखविला तर एफबीआय प्रमुख जेम्स कोसी यांनी ट्रम्प यांना ‘क्लीन-चिट’ द्यायला नकार देताच त्यांना पदच्युत करण्यात आले. पाठोपाठ महाधिवक्ता जेफ शेषन यांनी आपणहून राजीनामा दिला. ट्रम्प यांच्या रशियन संबंधांची चौकशी करणार्‍या लिसा पेज यांनी गेल्यावर्षी मध्येच पद सोडले तर एफबीआयचे चौकशी अधिकारी जेम्स बेकर यांना पदावनत केल्यामुळे त्यांनीही नोकरीचा राजीनामा दिला. 
वादग्रस्त आणि फटकळ अशी प्रतिमा असूनही पक्षांतर्गत 16 इच्छुकांवर मात करीत ट्रम्प उमेदवार झाले. शिवाय राष्ट्राध्यक्षपदाची 2016ची निवडणूकही जिंकले, आता 2020ची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक अवघ्या 7-8 महिन्यांवर आली असताना त्यांच्या डोक्यावर टांगली गेलेली महाभियोगाची तलवारही बहुमताच्या अभावी दूर झाली आहे. अमेरिकन सेनेटमधील रिपब्लिकन सदस्यांच्या बहुमतामुळे ट्रम्प आत्तातरी तरून गेले आहेत, तरीही फुटबॉलच्या भाषेत बोलायचे तर सभागृहांनी त्यांना ‘यलो कार्ड’ दाखविले आहेच. सार्‍या जगाचे लक्ष आता एकाच गोष्टीकडे लागून राहिलेय. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे ‘विल अमेरिकन्स गिव्ह ग्रीन कार्ड टू ट्रम्प?’.

(लेखक काँग्रेसचे प्रवक्ते आणि आमदार आहेत.)

Web Title: Trump - the complicated journey of a controversial personality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.