बावीस राजभाषांचे इतिहास लेखन- साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 11:21 PM2018-11-12T23:21:25+5:302018-11-12T23:25:00+5:30
भाषा, लिपीकडे लक्ष न दिल्याने अथवा त्यांचा वापर न केल्याने देशातील २०० भाषा मरून गेल्याचे एका अभ्यासातून पुढे आले आहे. भाषा, लिपी व साहित्याच्या समृद्धीकडे आपण लक्ष दिले नाही तर भारतीय भाषा व साहित्याची ओळख राहणार नाही, हा धोका ओळखून डॉ. लवटे यांनी बावीस राजभाषांचा इतिहास लेखनाचे शिवधनुष्य उचलले आहे....
भाषा, लिपीकडे लक्ष न दिल्याने अथवा त्यांचा वापर न केल्याने देशातील २०० भाषा मरून गेल्याचे एका अभ्यासातून पुढे आले आहे. भाषा, लिपी व साहित्याच्या समृद्धीकडे आपण लक्ष दिले नाही तर भारतीय भाषा व साहित्याची ओळख राहणार नाही, हा धोका ओळखून डॉ. लवटे यांनी बावीस राजभाषांचा इतिहास लेखनाचे शिवधनुष्य उचलले आहे....
भारतातील २२ राजभाषांच्या गेल्या ५० वर्षांतील इतिहासलेखनाचे काम येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी हाती घेतले आहे. भाषा, साहित्य व लिपी यांची त्या-त्या भाषांतील सद्य:स्थिती काय आहे व ती समृद्ध करण्यासाठी काय करायला हवे, अशा व्यापक परिघामध्ये हे इतिहासलेखनाचे काम होणार आहे. खरे तर ते इतिहासलेखन कमी आणि वास्तव लेखनच जास्त असणार आहे. म्हणजेच या २२ भाषांची सद्य:स्थिती काय आहे, हेच या अभ्यासातून पुढे येणार आहे.
डॉ. लवटे हे हिंदी साहित्यिक असल्याने ते हे सगळे लेखन हिंदीत करणार आहेत. दिल्लीच्या राजकमल प्रकाशन समूहाने त्याच्या प्रकाशनाचीही जबाबदारी घेतली आहे. साधारणपणे भाषा, साहित्य व लिपी यांचा प्रत्येकी सातशे पानांचा एक ग्रंथ होईल, एवढे लेखन होण्याची शक्यता आहे. त्यासाठी डॉ. लवटे यांनी सारा देश पालथा घालायला सुरुवात केली आहे. तेथील लोकांना, स्थानिक साहित्य-संस्थाना, भाषेच्या अभ्यासकांना ते भेटणार आहेत.
भाषा, लिपी व साहित्यातील स्थित्यंतरे मांडताना त्यांचे समाजजीवनावरील परिणाम मांडणे हाच या लेखनाचा मुख्य हेतू आहे. हिंदी खंडाचे काम २०२० पर्यंत पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यानंतर पुढच्या टप्प्यात २०२२ पूर्वी मराठी व इंग्रजीमध्ये त्यांचे भाषांतर करण्यात येणार आहे.
डॉ. गणेश देवी यांनी लोकभाषा सर्व्हेक्षण करून त्या आधारे भारतात भाषा, साहित्य व लिपी यांचा अभ्यास केला. त्याचे ५० खंड लिहिले. भाषा, लिपीकडे लक्ष न दिल्याने अथवा त्यांचा वापर न केल्याने देशातील २०० भाषा मरून गेल्याचे या अभ्यासातून पुढे आले; कारण इंग्रजी शिक्षणाच्या हव्यासापोटी भारतीय भाषांच्या वापराकडे व अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. आताची पिढी घरी मराठीत बोलते, शाळेत इंग्रजी शिकते व बाहेर हिंदी-इंग्रजी मिश्र बोलते. त्यांना कोणत्याच भाषेतील व्याकरण येत नाही. चिन्हांचे अर्थ कळत नाहीत. पूर्णविराम व प्रश्नचिन्ह यांतील अंतर कळत नाही. ही एका अर्थाने भाषिक आणीबाणीकडे आपली वाटचाल सुरू असल्याचे डॉ. लवटे यांचे म्हणणे आहे.
भारतीय भाषा व साहित्याचा अभ्यास करताना त्यांच्या असे लक्षात आले की, भाषा व लिपी टिकायच्या असतील तर त्या बोलल्या पाहिजेत, लिहिल्या पाहिजेत व वाचल्या पाहिजेत; परंतु नेमक्या या तिन्ही कसोट्यांवर भाषांचे मरण सुरू आहे. माणसाच्या जगण्याला मूल्यांची जोड हवी असेल तर मूल्यशिक्षण देणाऱ्या साहित्याची गरज आहे. परंतु आज तो साहित्याचा व्यवहारच राहिलेला नाही. साहित्य अकादमी व नॅशनल बुक ट्रस्टमार्फत भाषा संवर्धनाचे काम चालते; परंतु त्यावरही मर्यादा आहेत.
या आहेत २२ राजभाषा
आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, मैथिली, नेपाळी, उडिया, पंजाबी, संथाली, संस्कृत, सिंधी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू.
भारतात ८८० भाषा बोलल्या जातात. प्रत्येक जनगणनेत व भाषा सर्वेक्षणात भाषांची संख्या घटताना दिसते. गेल्या ५० वर्षांत भारतातील २२० भाषा लुप्त झाल्या आहेत. भारतात आज १० लाखांपेक्षा अधिक लोक बोलतात, अशा भाषांची संख्या २९ आहे. राज्यघटनेने आठव्या परिशिष्टात २२ भाषांना ‘राजभाषा’ म्हणून मान्यता दिली आहे.