एकाच वृक्षाच्या दोन फांद्या

By admin | Published: November 29, 2014 02:46 PM2014-11-29T14:46:40+5:302014-11-29T14:46:40+5:30

राजश्री आणि जयश्री, एकाच घरातील मुली. दोघींनाही शिक्षण पूर्ण होण्याआधीच विवाह करावा लागला. अशा परिस्थितीमध्ये पुढे काय वाढून ठेवलेलं असेल, याचा अंदाज कुणालाच आलेला नसतो. अशाच या दोन मुलींचं काय झालं पुढे? कुणाच्या नशिबात काय लिहिलेलं होतं?

Two branches of one tree | एकाच वृक्षाच्या दोन फांद्या

एकाच वृक्षाच्या दोन फांद्या

Next

- प्रा. डॉ. द. ता. भोसले

 
गणपतराव पाटलांना दोनच मुली. थोरली राजश्री,  धाकटी जयश्री. वंशाला दिवा हवा म्हणून त्यांच्या आईसाहेबांनी खूपदा सांगितले. नव्हे त्यांचं डोकं खाल्लं, पण त्यांनी ऐकलं नाही. या दिव्याची खात्री नाही.. आणि तो भडकला तर सुखाचा जीव दु:खात कशाला घालायचा असा त्यांनी विचार केला. त्यांनी आपल्या मुलींनाच मुलासारखं वागवलं- शिकवलं. दोघीही वागायला-बोलायला चांगल्या. दिसायलाही सुंदर. घरची सांपत्तिक स्थिती चांगली असल्यानं दहावीनंतर त्यांनी या दोघींनाही  पुढील शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी ठेवले. धाकटी बारावी सायन्सला जाताच आणि थोरली बी.ए.च्या दुसर्‍या वर्षात पदार्पण करीत असतानाच जुन्या वळणाची बायको आणि खानदानाचा अभिमान असलेली हट्टी आई-त्यांनी ‘पोरींची लवकर लग्नं करून टाका. आपल्या खानदानात इतक्या वयापर्यंत मुली ठेवत नाहीत. प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळेला झालेली बरी. शहरातलं वातावरण चांगलं नसतं. एखादीचं चुकून वाकडं पाऊल पडलं, तर कुळाला बट्टा लागेल. तुम्हाला तोंड दाखवता यायचे नाही. लोक तोंडात शेण घालतील.’ अशी उपदेशाची तबकडी दिवसातून दहा वेळा वाजवायला सुरुवात केली. एकदा-दोनदा त्यावरून घरात भांडणेही झाली. जुन्या वळणाच्या अडाणी नातेवाइकांनी त्यात भर घातली. शेवटी स्वत:च्या मताला मुरड घालून त्यांनी राजश्रीचं लग्न उरकले. खानदानी मराठा- घरची श्रीमंती असलेल्या, शेतीवाडी, बैलबारदाना व नोकर-चाकर असलेल्या आणि राजकारणात वावर असलेल्या एका प्रतिष्ठित घराण्यात तिला दिली. थाटामाटात तिचा विवाह करून दिला. राजश्रीला पुढे शिकायचे होते. करिअर करायचे होते. तिने त्यासाठी या विवाहाला विरोध केला होता. पण तिची ही उत्कट इच्छा लक्षात घेऊन गणपतरावांनी लग्नाआधी आणि लग्नानंतरही तिला पुढे शिकवावे याची अट पाहुण्यांना घातली होती. जावयालाही सांगितले होते. तद्नंतर एका वर्षाच्या आतच जयश्रीचाही  विवाह त्यांनी करून टाकला. सुखवस्तू घर, शिकलेला मुलगा, प्रगत विचार आणि सुस्वभावी माणसे यांचा विचार करून त्यांनी हे स्थळ पसंत केले होते. या पाहुण्यांनाही गणपतरावांनी, मुलीला पुढे शिकायचे आहे, ती अभ्यासात हुशार आहे. शिक्षण पूर्ण करण्याच्या अटीवरच तिने या विवाहाला होकार दिलेला आहे. तेव्हा तुम्ही तुमच्या या खानदानी वाड्यात केवळ धाकटी मालकीण म्हणून ठेवू नका. तिचं आयुष्य चिंध्यांच्या बोचक्यासारखे अडगळीत टाकू नका, अशी परोपरीने विनंती केली होती. त्या वेळी दोन्हीही व्याह्यांनी होकार दिला होता.
परंतु काही दिवसांतच गणपतरावांना वेगळाच अनुभव आला. खानदानीपणाचा वांझ अभिमान, निर्थक प्रथा आणि परंपरांचे जोखड, स्त्रीकडे आणि स्त्रीशिक्षणाकडे पाहण्याचा अडाणी दृष्टिकोन, सरंजामी वृत्तीची नातेवाईक मंडळी यामुळे राजश्रीला पुढे शिकवावे असे कुणालाच वाटेनासे झाले. एकदा-दोनदा तिने पतीसह सर्वांनाच आग्रहाने सांगितले, पण कुणीच मनावर घेतले नाही. तिची सासू फणकार्‍यानं म्हणाली, ‘‘तू पोटापुरती शिकली, तेवढं बास झालं. बाईच्या जातीला कशाला पाहिजे शिक्षण? तुला कुठं मामलेदार व्हायचं हाय? का वकील व्हायचं हाय? बसून खाल्लं तरी चार पिढय़ा पुरेल एवढी इस्टेट हाय घरात. तू आपलं घर सांभाळ. आला-गेला, पै-पावणा यांचं कर. आपल्या खानदानाला जप. आमी शाळचं तोंडसुदिक बघितलं न्हाय, पण आमचं काय अडलं का? उद्या लेकरंबाळं झाली, की त्यांचं केलं तरी बास झालं. आन् लगीन झालेल्या बाईनं शिकायसाठी लांब एकटं राहणं शोभतं का? लोक काय म्हणतील आमाला?’’ तरीही राजश्रीनं रात्री पती एकटा असताना हात जोडून विनंती केली. म्हणाली, ‘‘मला तालुक्याला पाठवू नका. मी बाहेरून परीक्षा देते. हाता-तोंडाशी आलेली पदवी सोडायला नको वाटते. अन् शिक्षण कधी वाया जात नाही. माणसाचं नुकसान करीत नाही. शिकलेली बाई सार्‍या घरादाराला उजेड देई. हे तुम्ही जाणताच. मी घरच्या सार्‍या जबाबदार्‍या आणि कामं करून अभ्यास करीन. शिक्षणामुळे माणसाला प्रतिष्ठा तर मिळतेच, पण हाती आलेला पैसा कसा खर्च करावा, कशासाठी खर्च करावा, याचं ज्ञान मिळतं. घरच्या लोकांना सांगून माझी एवढी इच्छा पूर्ण करा तुमी.’’ तो गप्प बसला. त्यालाही आपल्या बायकोनं पुढं शिकावं असं वाटत असलं, तरी घरच्या लोकांच्या समोर त्याचं काहीच चालत नव्हतं. त्यानं सांगूनही पाहिलं, पण पालथ्या घड्यावर पाणी अशी स्थिती झाली. मनात खूप झुरत असलेल्या राजश्रीनं आपल्याच नशिबाला दोष दिला आणि काळोखानं आतून-बाहेरून माखलेल्या व ढासळलेल्या वाड्यात तुरुंगातल्या कैद्याप्रमाणे आलेलं आयुष्य स्वीकारलं.
जयश्रीच्या बाबतीत मात्र गणपतरावांना नेमका उलटा अनुभव आला. त्यांनी किंवा जयश्रीनं सांगण्याआधीच घरातल्या सार्‍यांनी तिच्या शिक्षणात पुढाकार घेतला. आजच्या जगात कशाला महत्त्व आहे, आपण त्यानुसार बदललं पाहिजे. शिक्षणानं माणूस कर्तृत्ववान होतो. सुसंस्कृत होतो. जगण्याच्या लढाईत तो हार जात नाही. तो आपल्याबरोबर घराला-समाजाला अधिक सुंदर करतो याची चांगली समज तिच्या सासू-सासर्‍यांना जगण्याच्या शहाणपणातून आलेली होती. तिचा नवराही नवा विचार, नवा आचार स्वीकारणारा होता. सुशिक्षित स्त्री ही घराची शोभा आहे. नुसती शोभा नव्हे, तर ती लक्ष्मीला कडेवर घेतलेली शारदा आहे. तिच्यामुळे घराची स्वच्छता, बाळाचे संगोपन, सर्वांचे आरोग्य, खर्चाचे नियोजन, मुलांवर संस्कार, मूल्यांची रुजवण आणि आनंदी संसार या सार्‍या गोष्टी उत्तम प्रकारे होऊ शकतात यावर तिच्या सासू-सासर्‍यांची अढळ निष्ठा होती. आपल्या अपुर्‍या शिक्षणाचे स्वप्न आपल्या पत्नीच्या रूपाने तरी पूर्ण करावे असे तिच्या पतीलाही वाटत होते. म्हणून विवाहानंतर चार-पाच महिन्यांनी मे-जूनच्या दरम्यानच एके दिवशी घरातले सारे एकत्र बसले. जयश्रीला बोलावले. तिची इच्छा विचारली. तिने आनंदानं होकार देताच तिची सासू म्हणाली, ‘‘जयू, तुला आम्ही तुझी इच्छा असेल तितके शिकवू. बाई शिकल्याशिवाय जग सुधारत नाही. पण ‘काय करायचं बाईच्या जातीला शिकवून’ असा विचार करून तिला घरात डांबलं जातं. ढोरासारखं राबवून घेतलं जातं. त्यातही पुढाकार असतो आम्हा बायकांचाच. बाईच बाईची वैरी होते. बाईच बाईला गुलाम करते. बाईच तिच्या जिभेत काटा टोचते. खरंतर गडी-माणसांइतकीच नव्हे थोडीशी जादा ती कष्टाळू असते. जिद्दी असते. समंजस असते. हुशारही असते. माझ्याकाळी मला इच्छा असूनही पुढं शिकता आलं नाही. कुणी शिकवलं नाही. आता मला वाटतं, की घरातली लक्ष्मी आणि तुझ्यातली सरस्वती यांनी आता एकत्र आलं पाहिजे. एकत्र नांदलं पाहिजे. तू भरपूर शिक.तुझी सारी हौस भागवू. शिक्षण सुरू असताना दिवस जाणार नाहीत याचीही काळजी घे. पोरं काय नंतरही होतील. पण परीक्षा द्यायला नंतर जड जातं. आणि त्यातूनही घरात आला बाळकृष्ण तर त्याला आम्ही सांभाळू. बाईला स्वातंत्र्य दिल्याशिवाय जगाला स्वातंत्र्य मिळणार नाही. आणि जगाला स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय जगणं सुंदर होणार नाही. जगाला सुंदर करण्यासाठी तू शिकावंस असं आम्हाला वाटतं.’’ आणि जयश्रीचा अश्रूंनी चिंब झालेला चेहरा तिने आपल्या छातीशी धरून थोपटला.
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, मराठी भाषा, लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासक व निवृत्त प्राचार्य आहेत.)

Web Title: Two branches of one tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.