पुन्हा अघोषित युद्ध?
By admin | Published: October 11, 2014 07:18 PM2014-10-11T19:18:23+5:302014-10-11T19:18:23+5:30
पाकिस्तानचा कुरापती स्वभाव पुन्हा एकदा उफाळून वर आला आहे. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन करून गोळीबार सुरू केला आहे. यात जवानांसह निष्पाप नागरिकही मारले गेले आहेत. ही कृती करून पाकिस्तानने नेमकी वेळ साधली आहे का? नक्की काय आहेत त्यांचे यामागचे मनसुबे?..
Next
- दत्तात्रय शेकटकर
सीमेवर भारतीय सैन्याच्या कुरापती काढण्याचे पाकिस्तानचे सत्र अद्याप सुरू आहे. त्यामध्ये भारतीय जवानांसह आता काही निष्पाप नागरिकांचेही प्राण गेलेले आहेत. जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानी सैनिक जोरदार गोळीबार सातत्याने करीत आहेत. पाकिस्तानने प्रामुख्याने बीएसएफच्या
जवानांना लक्ष्य केले होते. पाकिस्तानच्या उखळी तोफांच्या मार्यामध्ये काही निष्पाप भारतीय नागरिकांनाही त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता, पाकिस्तानने तब्बल १२हून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. इतके असूनही भारतच गोळीबार करीत असल्याचा कांगावा पाकिस्तानकडून केला जात आहे.
पाकिस्तान नेमके आत्ताच इतक्या मोठय़ा प्रमाणावर भारतीय सीमांवर गोळीबार का करीत आहे, हे प्रथमत: आपण समजून घेणे गरजेचे आहे. त्यातून पाकिस्तानच्या सीमेवरील कुरापतींची आगळीक सातत्याने वाढत का आहे? त्याची तीव्रता का वाढते आहे? त्यांना नक्की त्यातून काय साधायचे आहे, हे लक्षात येऊ शकेल.
काही दिवसांपूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष आले होते, तेव्हा चीननेही घुसखोरी केलेली होती. आत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जेव्हा अमेरिका दौरा सुरू होता तेव्हापासून पाकिस्तानने सीमेवर गोळीबार सुरू केला आहे. याची विविध कारणे जी असू शकतात, ती प्रथमत: जाणून घेऊ या.
भारताच्या अवकाश मोहिमांमध्ये मंगळ मोहिमेला मिळालेले अभूतपूर्व यश हे एक कारण असू शकते, कारण अवघ्या जगाने भारताच्या अवकाश मोहिमेचे कौतुक केले आहे आणि त्याद्वारे हे साध्य करू शकणार्या अगदी मोजक्या देशांच्या पंक्तीत भारत जाऊन बसलेला आहे. त्यातुलनेत पाकिस्तानची अंतरिक्ष स्थिती फारच वाईट आहे. त्यामुळे ती खदखद या माध्यमातून काढली जात असावी.
काश्मीर प्रश्नामध्ये कोणत्याही तिसर्याचा हस्तक्षेप नको; हा मुद्दा भारत आणि पाकिस्तान यांनीच आपसात सोडवावा, असे भारताने स्पष्ट केले आहे. परंतु, पाकिस्तानची अस्वस्थता त्यामुळे वाढलेली आहे. त्यातूनच काश्मीरमध्ये निवडणुका होणार आहेत; त्यामुळे त्याअस्वस्थतेतून हे गोळीबार केले जात असावेत, असा एक अंदाज आहे.
युद्धशास्त्रामध्ये लो कॉस्ट - नो कॉस्ट या नावाचे एक तंत्र असते. त्याचा वापर करून पाकिस्तान भारताच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करू पाहत आहे. कमीत कमी गुंतवणूक करून हल्ला करावा, भारताला प्रत्त्युत्तर देण्यास प्रवृत्त करावे आणि एकदा भारताने उत्तर देण्यास सुरुवात केली, की मग आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतच आम्हाला कसा त्रास देत आहे, याची ओरड सुरू करावी, हेदेखील या सातत्याने सुरू असलेल्या गोळीबाराचे आणखी एक कारण असू शकते.
आणखी एक शक्यता आहे. ती म्हणजे, सीमेवरील भागामध्ये अशांतता निर्माण करण्याचे पाकिस्तानचे ध्येय असू शकते. भारतात सध्या महाराष्ट्र आणि हरियाणा या ठिकाणी निवडणुका आहेत. त्यामुळे सर्व राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांचे लक्ष निवडणुकांवर केंद्रित झालेले आहे. त्यांना सीमेवर लक्ष देण्यास भाग पाडणे हादेखील गोळीबारामागील योजनेचा एक भाग असू शकतो.
भारतात भारतीय जनता पक्षाचे जेव्हा शासन आले, तेव्हा जम्मूचे ऑब्झर्व्हर म्हणून युनायटेड नेशन्सची आम्हाला गरज नाही; त्यांच्याशी चर्चा करणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठणकावून सांगितले. परंतु, पाकिस्तानला मात्र द्विपक्षीय चर्चा नको तर अमेरिका, यूके, ब्रिटन यांचा हस्तक्षेप हवा आहे. त्यामुळे हा विषय त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायचा आहे. त्यामुळे त्यांच्या हल्ल्यांचे तेदेखील एक उद्दिष्ट असू शकते.
या सर्वांच्या पलीकडे आणखी एक दाट शक्यता आहे, ती म्हणजे पाकिस्तानचे सैन्य चार महिन्यांपासून खैबर पख्तूनख्वा या भागामध्ये सक्रिय आहे. तेथील दहशतवादी संघटनांचा खातमा करण्यामध्ये त्यांना कोणतेही यश आलेले नाही. कारण तेथील सार्या दहशतवादी संघटनांना पाकिस्तानचाच छुपा पाठिंबा आहे. त्यामुळे सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण करायची आणि दहशतवाद्यांना मारण्यासाठी पाठविलेल्या सैन्याची कुमक इतके वळवायची. यासाठी भारताचे हल्ले हे निमित्त दाखवायचे, अशी एक योजना असू शकते. त्याचप्रमाणे भारत कसा अन्याय करतो, हे दाखवून आयएसआयएस आणि अल्-कायदा या दोन्ही दहशतवादी संघटनांची दया मिळवून त्यांचा पाठिंबा मिळवावा, हेदेखील कारण असू शकते.
या सर्वांच्या पलीकडची एक दाट शक्यता अशी आहे, ती म्हणजे भारतात दहशतवादी घुसवण्याची काही योजना असू शकते. कारगिल जेव्हा घडले होते, तेव्हा याच स्वरूपात सीमेवरील काही भागांत जोरदार गोळीबार केला होता. येत्या काही दिवसांत बर्फ पडायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे त्याअगोदर काही घुसखोरांना भारतात घुसवण्याची योजना असू शकते. त्याला अर्थातच पाकिस्तानी लष्कराचा पूर्ण पाठिंबा असतो. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, भारतात २,000 घुसखोर घुसण्याच्या तयारीत असल्याचे भारतीय लष्कराने जाहीर केले आहे. त्यामुळे हा आणखी एक धोका भारतासाठी असू शकतो.
पाकिस्तानचा भारतीय सीमेवर होत असलेला गोळीबार आणि शस्त्रसंधीचे सातत्याने होत असलेले उल्लंघन ही काही आकस्मिक, अनवधानाने घडत असलेली घटना अजिबात नाही. जेव्हा-जेव्हा अशी काही आगळीक, कुरापत केली जात असते, तेव्हा-तेव्हा त्याचा मास्टर प्लॅन पाकिस्तानी लष्कराच्या सर्वोच्च स्तरावर ठरत असतो. मुख्यत: आपण एक लक्षात घ्यायला हवे, की पाकिस्तानी लष्कर ज्या भागांमध्ये सातत्याने गोळीबार करते आहे, तो भाग दहशतवादी हाफीज सईदचा भाग आहे. हिज्बुल मुजाहिदीनचा सय्यद सलाउद्दिन हा कारगिलसमोरच्या भागात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत त्या बाजूनेही काही लष्करी कारवाया पाकिस्तानकडून होण्याची दाट शक्यता आहे.
आता या सार्या शक्यतांच्या पार्श्वभूमीवर भारताची भूमिका काय असावी, याविषयी देशभरात विविध लोक चिंतन करीत आहेत. पाकिस्तानला आता तरी धडा शिकवावा, असेही आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले जात आहे. ज्या काही गोळीबाराच्या व पाकिस्तानी कारवाईच्या घटना घडत आहेत, त्या आकस्मिक नाहीत आणि त्यामागे त्यांची काहीएक निश्चित योजना आहे, हे प्रथमत: आपल्याला समजून घ्यावे लागेल. एक मात्र नक्की, की पाकिस्तानने भारताविरुद्ध एक अघोषित युद्ध पुकारलेले आहे आणि आता आपल्यालाही त्यांना त्याचे तसेच प्रत्युत्तर द्यावे लागेल. मात्र, पाकिस्तानविरुद्ध थेट युद्ध पुकारणे, असा त्याचा अर्थ अजिबात नाही; परंतु भारतीय सार्मथ्य दाखवून देण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानला अशी कोणतीही आगळीक करताना त्याच्यावर वचक बसणे आवश्यक आहे. पाकिस्तान प्रामुख्याने भारतीय सीमेवरील बीएसएफच्या जवानांना लक्ष्य करीत आहे व निष्पाप भारतीय नागरिकांवर हल्ले करीत आहे. त्यामुळे आपल्या सैन्यविषयक निर्णयांमध्ये तत्परता आणि निर्णयप्रक्रियेत समन्वय अपेक्षित आहे.
मुशर्रफचे दिवस भरले
मुशर्रफ भारताला धमकी देण्याचा प्रयत्न करीत आहेत; परंतु ज्या मुशर्रफनी कारगिल घडवून आणले, त्यांना त्यांच्याच देशाने बाहेर ठेवले. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांना फारसे गांभीर्याने घेऊ नये. पाकिस्तानी लष्कराच्या वतीने त्यांची केवळ निर्थक बडबड सुरू आहे. मात्र, माणसाच्या सहनशक्तीची जशी एक सीमा असते, तशीच राष्ट्राच्याही सहनशक्तीची एक सीमा असते, हे पाकिस्तानला ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे.
(लेखक निवृत्त लेफ्टनंट जनरल असून, दहशतवाद विषयाचे गाढे अभ्यासक आहेत.)