‘साखरे’ची शाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 06:02 AM2019-05-19T06:02:00+5:302019-05-19T06:05:04+5:30

वाशिम जिल्ह्यातील साखरा गावातील  जिल्हा परिषदेची शाळा. दहा वर्षांपूर्वी चौथीपर्यंतचे वर्ग, चार खोल्या,  तीन शिक्षक आणि पटसंख्या होती बावन्न. याच शाळेत आज आठवीपर्यंत प्रत्येकी दोन तुकड्या,  तेरा वर्गखोल्या, सोळा शिक्षक आणि पटसंख्या आहे 628 !  यातील केवळ शंभर मुले गावातली ! शाळेने लोकसहभागातून 37 एकर जमीन मिळवलीय आणि पाच हजार मुलांसाठी शंभर कोटींचा प्रकल्प प्रस्ताव तयार केलाय !

Unique example of zp school in Sakhara of Washim district | ‘साखरे’ची शाळा!

‘साखरे’ची शाळा!

googlenewsNext
ठळक मुद्देसारेच शिक्षक शिकवताना आधुनिक तंत्नज्ञानाचा वापर करतात. आठवीच्या विद्यार्थ्यांना पाच प्रकारे गणित शिकवले जाते आणि विद्यार्थ्याला त्याच्या आवडीच्या पद्धतीने ते सोडविण्याची मुभा आहे. पहिली ते तिसरीतील मुलांना मराठी, इंग्रजी व संस्कृत या भाषा शिकविल्या जातात.

- प्रिया खान

मागील अनेक वर्षे कामाच्या निमित्ताने ग्रामीण भागात फिरताना अनेक चांगल्या जिल्हा परिषद शाळा पाहिल्या. मात्न एखादी जिल्हा परिषद शाळा पाच हजार मुलांसाठी शैक्षणिक केंद्र उभारण्याचा विचार करतेय, त्यासाठी शाळेने सदतीस एकरांची जमीन मिळवलीय आणि शंभर कोटींचा प्रकल्प प्रस्ताव तयार केलाय असे जर मला कोणी सांगितले असते तर मी काही विश्वास ठेवला नसता. मात्न गेल्या आठवड्यात वाशिम जिल्ह्यातील साखरा गावातील जिल्हा परिषद शाळेस दिलेली भेट सुखद धक्का देऊन गेली. 
दहा वर्षांपूर्वी साखर्‍याच्या शाळेत एखाद्या शिक्षकाची बदली झाली की, इतर शिक्षक त्याला चिडवीत. शाळेला लागूनच असलेल्या मोकळ्या जागेचा उपयोग गावकरी शौचास जाण्यासाठी करीत. शाळेत दिवसभर थांबणेही दुरापास्त. पहिली ते चौथीच्या या शाळेचा पट त्यावेळेस बावन्न होता. गावातील मुले गावाबाहेरील शाळेत जात. त्यावर्षी राजू महाले या शिक्षकाची बदली या शाळेत झाली. ते शाळेतील तिसरे शिक्षक. पाचवीचा एक वर्ग वाढविल्यामुळे राजू सर या शाळेत आले. मुख्याध्यापक भालेराव सर आणि त्यांनी या गावाचे, शाळेचे भाग्यच उजळले.
ग्रामपंचायतीच्या मदतीने त्यांनी पहिले काम केले ते गावकर्‍यांना घरोघरी शौचालय बांधण्यास प्रवृत्त करण्याचे. तुमची मुले जिथे खेळतात, जेवतात तेथेच तुम्ही अस्वच्छता करताय आणि त्याचा मुलांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतोय हे गावकर्‍यांना पटवून देण्यात ते यशस्वी ठरले. हळूहळू गावकरी व मुलांच्या मदतीने या शिक्षकांनी शाळेच्या परिसराचा कायापालट घडविला.  
शाळेची गोष्ट सुरू करण्यापूर्वी गावाचा कायापालट कसा झाला हे समजून घेणेही महत्त्वाचे आहे. अस्वच्छतेसाठी बदनाम असलेल्या या गावाने कालांतराने निर्मलग्राम स्वच्छता अभियानाचा पुरस्कार मिळविला. आज गावात दारूबंदी आहे. गाव तंटामुक्त झाले आहे. ग्रामपंचायत निवडणूक न होता, एकमताने पंचायत निवडून दिली जाते. शाळेच्या विकासातही गावकर्‍यांचे मोठे योगदान आहे. ग्रामीण भागात चांगल्या शिक्षकांचा गावावर प्रभाव असल्याचे नेहमीच जाणवते. चांगले शिक्षक शाळेसोबत गावाचाही कायापालट करू शकतात याचे साखरा म्हणजे जिवंत उदाहरण.
शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे फळ म्हणून वर्षागणिकशाळेचा पट वाढत गेला. गावकरी आपल्या मुलांना या गावातल्याच शाळेत पाठवू लागले. भालेराव सरांच्या मार्गदर्शनाखाली राजू सर व इतर शिक्षकांनी मेहनतीने अमलात आणलेल्या आनंददायी व कल्पक शिकवण्याच्या पद्धतीतून मुलांची शिक्षणातील गोडी वाढू लागली. पालकांचा शाळेवरचा विश्वास वाढू लागला. आजूबाजूच्या गावातील लोकांनाही साखर्‍याच्या शाळेतील मुलांची हटके कामगिरी लक्षात येऊ लागली आणि गावाबाहेरील मुलांनीही या शाळेत प्रवेश घेण्यास सुरुवात केली. 
दहा वर्षांपूर्वी चौथीपर्यंतचे वर्ग, चार वर्ग खोल्या, तीन शिक्षक आणि बावन्नचा पट असलेल्या या शाळेत आज प्रत्येकी दोन तुकड्या असलेले आठवीपर्यंतचे वर्ग, तेरा वर्गखोल्या (पक्क्या इमारतीत + तात्पुरत्या शेडमध्ये), सोळा शिक्षक आणि सहाशे अठ्ठावीसचा पट आहे. विशेष म्हणजे यातील केवळ शंभर मुले साखरा गावातील आहेत. पाचशेहून अधिक मुले आसपासच्या गावातून येतात. 
मूळच्या वर्गखोल्या कमी पडल्या तेव्हा शाळेने काही वर्गखोल्या बांधल्या. शाळेमागची एका गावकर्‍याची वीस गुंठे जमीन शाळेने वीस लाखात विकत घेतली. तेथे तात्पुरती शेड उभारली. एका वर्गात अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा उभी केली. हे सर्व लोकसहभागातून. शासनाने चार वर्गखोल्यांची दोन मजली पक्की इमारत दोन वर्षांपूर्वी बांधून दिली. महाराष्ट्र शासनाने गेल्या वर्षीपासून महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना करून राज्यातील निवडक तेरा शाळांना या शिक्षण मंडळांतर्गत आणले आहे. साखरा शाळेतही आता तिसरीपर्यंतच्या वर्गांना आंतरराष्ट्रीय मंडळाच्या निकषांप्रमाणे शिक्षण दिले जाते.
कीर्तनकार असलेल्या भालेराव सरांचे आणि शिक्षकांचे ध्येय केवळ चांगले विद्यार्थी घडविण्याचे नाही तर सुजाण नागरिक घडविण्याचे आहे. 
आम्ही शाळेत असतानाच मुलांची मधली सुट्टी झाली. मोकळ्या जागेत गटागटाने मुले खिचडी खाण्यासाठी बसली होती. अध्र्या तासाने जेव्हा त्याच मोकळ्या जागेत आम्ही बसलो तेव्हा खिचडीचे एक शीतही आम्हाला दिसले नाही. शाळेच्या आवारात ठिकठिकाणी तीन रंगांचे कचर्‍याचे डबे ठेवलेले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला कोणत्या डब्यात कोणता कचरा टाकायचा हे पक्के माहीत आहे. आवारातील झाडाच्या एकही पानाला किंवा फुलाला गरजेशिवाय विद्यार्थी हात लावत नाहीत. विद्यार्थ्यांंमधील विधायक प्रवृत्ती जोपासताना त्यांच्यात किंचितही विध्वंसक वृत्ती राहणार नाही यासाठी शिक्षक वर्ग जागरूक आहे.
सारेच शिक्षक शिकवताना आधुनिक तंत्नज्ञानाचा वापर करतात. आठवीच्या विद्यार्थ्यांना पाच प्रकारे गणित शिकवले जाते आणि विद्यार्थ्याला त्याच्या आवडीच्या पद्धतीने ते सोडविण्याची मुभा आहे. पहिली ते तिसरीतील मुलांना मराठी, इंग्रजी व संस्कृत या तीन भाषा शिकविल्या जातात. एक थीम ठरवून त्या थीमभोवती भाषा, गणित, परिसर अभ्यास असे सर्व विषय शिकविले जातात.
आम्ही भेट दिली तेव्हा एका वर्गाची ‘वाहन’ ही थीम होती. तीनही भाषांमध्ये विद्यार्थी छोटीछोटी वाक्ये बनवत होते. कोणत्याही एका भाषेत विचारलेले प्रश्न समजून घेत उत्तरे देत होते. गेल्या शैक्षणिक वर्षी आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची पाठ्यपुस्तके नव्हती अशावेळी शिक्षकांनी स्वत: शिकत, संशोधन करीत शिकविण्यासाठी मजकूर तयार केला. मातृभाषेत घेतेलेले ज्ञान इतर भाषेत उद्धृत करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचे ध्येय शाळेने साध्य केलेले आहे.
अलीकडे शाळा डिजिटल करण्याचा सगळीकडेच फार अट्टाहास दिसून येतो. शिक्षकांना यावर छेडले तेव्हा ते म्हणाले, शाळेत इंटरनेट, स्क्र ीन असणे केव्हाही चांगलेच. अनेकदा शिक्षकांना पाठ्यपुस्तकांपलीकडे जाऊन विषय समजावून सांगताना व विशेषत: ज्याची कल्पना करता येत नाही असे विषय शिकविताना डिजिटल माध्यमांचा उपयोग आवश्यक ठरतो. मात्न ही माध्यमे केव्हा व कशासाठी वापरायची हे समजण्यासाठी शिक्षकाला स्वत: तेवढीच पूर्वतयारी करावी लागते. टीव्ही लावून दिला म्हणजे मुले शिकली असे होत नाही. 
येणार्‍या सर्व अर्जांचा विचार करीत जर प्रवेश द्यायचा झाला तर या शाळेचा पट नक्कीच दोन हजाराच्या घरात जाईल. पण सध्या उपलब्ध असलेल्या सुविधा पाहता शाळेला आता पट वाढविणे शक्य नाही असा विचार करून हे ध्येयवादी शिक्षक थांबले असते तरच नवल. गावाच्या हद्दीतील सदतीस एकर ई वर्ग जमीन शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकर्‍यांच्या मदतीने शाळेने मिळविली आहे. या जमिनीवर पाच हजार विद्याथ्यार्ंसाठी शैक्षणिक संकुल, वाशिम व आसपासच्या जिल्ह्यातील शाळांसाठी साधन केंद्र उभारण्याचे नियोजन आहे. 
नाशिक येथील स्थापत्यविशारद र्शी. जयंत कोलते यांनी शाळेला आराखडा बनवून दिलेला आहे. त्यासाठी लागणारा जागेचा कंटुर सर्वे पुण्यातील रामेलेक्स कंपनीचे अविनाश जोंगदंड यांनी करून दिला आहे . पूर्व प्राथमिक वर्गांपासून ते आठवीपर्यंतची शाळा, नववी व दहावीसाठी निवासी शाळा, शिक्षकांसाठी निवास, कार्यालय, अद्ययावत प्रयोगशाळा, ग्रंथालये, संशोधन केंद्र, प्रशिक्षण केंद्र येथे असेल. विद्याथ्यार्ंसाठी पोहण्याचा तलाव व विविध खेळांसाठी आवश्यक क्र ीडांगणे व साधने नियोजित आहेत. जागेचे नैसर्गिक चढउतार लक्षात घेऊन पावसाचे पाणी साठविण्यासाठीचे नियोजन आहे. जिल्हा परिषदेच्या आर्थिक मदतीतून सध्या जागेला कुंपण घालण्याचे व फाटक बांधण्याचे काम सुरु  आहे. 
हा संपूर्ण प्रकल्प उभा राहण्यासाठी शंभर कोटींची आवश्यकता आहे. आजच्या घडीला काही निधी हातात आहे का, असे विचारले असता सरांनी नकारार्थी मान हलविली. मात्न आमच्या मनातील शंका ओळखत ते म्हणाले, ‘कशातच काही नसताना आम्ही सदतीस एकराची जागा मिळविली, जिल्हा परिषदेने पन्नास लाख मंजूर करून कामाची सुरु वात करून दिली आहे. या जागेपर्यंत पोहोचण्यासाठीचा रस्ता मुख्यमंत्नी ग्राम सडक योजनेत मंजूर आहे आणि लवकरच बनेल. र्शी. जोगदंड व र्शी, कोलते यांच्यासारख्या व्यावसायिकांनी विनामोबदला कंटूर सव्र्हे आणि आराखडा तयार करून दिला. जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. हरिष बाहेती आम्हाला वेळोवेळी सहकार्य करतात. आमची इच्छाशक्ती दुर्दम्य आहे. शंभर कोटीसुद्धा नक्कीच उभे राहतील!’ 
भालेराव सरांचे हे उत्तर ऐकले, त्यांचा आत्मविश्वास पाहिला आणि आम्हालाही परिस्थिती आश्वासक भासू लागली. साखरा येथील शाळेला मोठं करण्याची जबाबदारी केवळ गावकरी, ग्रामपंचायत, शिक्षक किंवा विद्याथ्यार्ंची नाही. ही जबाबदारी केवळ प्रशासनाचीही असू शकत नाही. प्रगतीशील आणि संवेदनशील समाज नेहमीच आपल्यामधील उत्तमोत्तमाला जपण्याचे आणि जोपासण्याचे काम करीत असतो. या शाळेला जोपासण्यासाठीही अनेक मदतीचे हात सरसावतील आणि अनेक माणसे जोडली जातील यात शंका नाही.

चालता-बोलता, जिवंत भूगोल!
अनेक नावाजलेल्या शाळांमध्येही भूगोलासारखा विषय निरस पद्धतीने, घोकंपट्टी करीत शिकविला जातो. साखरा येथील शाळेत मात्न तो अतिशय रंजक पद्धतीने शिकविला जातो. मुलांनी आम्हाला त्याचे प्रात्यक्षिकही दाखवले. काही विद्यार्थी राज्यातील जिल्हे बनली. त्यांनी आपापली जागा घेत मैदानात महाराष्ट्राचा नकाशा साकारला. काही विद्यार्थी पर्वतरांगा बनली आणि त्यांनी आपली जागा घेतली. काही थंड हवेची ठिकाणे बनली तर काही अभयारण्ये. काही नदी बनले. शिक्षकाने गोदावरी नदी कोठून वाहते विचारले की गोदावरी बनेलेला विद्यार्थी तसा पळत जायचा. सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील घाटांची नावे आणि कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्यात जाण्यासाठी कोणता घाट लागतो हे विदर्भातील या मुलांना तोंडपाठ होते. कोणताही जिल्हा, त्याची वैशिष्ट्ये, तेथील प्रसिद्ध ठिकाणे, भौगोलिक परिस्थिती, पर्जन्यमान, तेथील पिके, घरांचे प्रकार सर्व काही ही मुले झटपट सांगत होती. जसा महाराष्ट्र शिकवला जातो तसाच भारत आणि तसाच जगाचाही भूगोल या मुलांना शिकविला जातो. आठवीच्या एका विद्यार्थिनीने आम्हाला नकाशावर भारतातील सर्व राज्ये, त्यांच्या राजधान्या आणि त्यांचे स्थापना दिवस घडाघडा बोलून दाखिवले. 

kpriya2910@gmail.com
(लेखिका मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी आहेत.)

Web Title: Unique example of zp school in Sakhara of Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.