अलौकिक राजाच्या कार्याला अनोखी सलामी
By अतुल कुलकर्णी | Published: February 10, 2018 06:55 PM2018-02-10T18:55:20+5:302018-02-11T07:15:04+5:30
बडोदे येथील अ. भा. मराठी साहित्य संमेलनात महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जीवनचरित्रावरील १२ खंडांचे प्रकाशन होत आहे. त्यानिमित्त...
- अतुल कुलकर्णी
आजच्या काळात कोणी चांगले काम केले तरी त्यावर आधी विश्वास बसत नाही आणि बसला तरी त्या कामापेक्षा त्यामागच्या हेतूविषयीच्या शंकाच जास्ती येऊ लागतात. मात्र ज्याने त्याने त्यांना वाटतील ते अर्थ काढत जावे, आपण मात्र काम करत राहावे या सद्हेतूने महाराष्ट्र शासनाने आणि महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधना प्रकाशन समितीचे सदस्यसचिव बाबा भांड यांनी एक महत्वपूर्ण काम उभे करून दाखवले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात जनकल्याणाचा ध्यास घेत आदर्श सुप्रशासनाचे उदाहरण घालून देणा-या सयाजीराव गायकवाड यांचे काम पाहिले तर त्यांना कोणतेही क्षेत्र वर्ज्य नव्हते हे लक्षात येते. हिंदुस्थानातील व महाराष्ट्रातील तत्कालिक बहुतेक युगपुरुषांना त्यांनी केवळ मदतच केली नाही तर सुशासन, साहित्य, कलांचे ते खरे पोशिंदे होते. इ.स. १८८२ साली अंत्यजांसाठी, आदिवासींसाठी हुकूम काढून शिक्षण सुरू करणारे ते द्रष्टे महाराज होते. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यसंग्रामात एकट्या महाराजांनी देशभरातील क्रांतिकारकांना मदत करून ब्रिटिश सरकारशी आयुष्यभर संघर्ष केला, असा नवा इतिहास पुढे आलाच आहे. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी त्यांनीच प्रथम मोठी मदत केली. पितामह दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे, नामदार गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी या राष्ट्रपुरुषांना मदत करून त्यांनी पाठिंबाही दिला होता. चौसष्ट वर्षे राज्य करणारे हिंदुस्थानातील ते पहिले राजा होते आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीस ते जगातील आठव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. त्यावेळी श्रीमंतीत पहिला नंबर फोर्ड यांचा होता.
प्रशासनात सयाजीरावांनी सुरू केलेल्या पहिल्याच प्रयोगाची यादी भली मोठी आहे व आजही ती तेवढीच विलक्षणपणे स्वत:चे पहिलेपण टिकवून आहे.
१८७५ साली स्वतंत्र शिक्षण विभागाची स्थापना, १८८२ साली आदिवासींना सरकारी खर्चाने मोफत प्राथमिक शिक्षण व वसतिगृह देण्याचा जगातला पहिला हुकूम त्यांनी काढला. १८९० साली महसूल विभागातून स्वतंत्र शेती खाते त्यांनी सुरू केले. १८८५ मध्ये आशियातला पहिला सहकारी साखर कारखाना त्यांनी गणदेवी येथे काढला. भारतातील ग्रंथालय चळवळीचेही ते पितामह आहेत. त्याकाळी ८७० ग्रंथ प्रकाशनात लेखक, प्रकाशकांना मदत करून ते त्यांचे आधारस्तंभ बनले.
अशा या अलौकिक व्यक्तिमत्त्वाच्या जीवनचरित्राचा, असामान्य कार्याचा अभ्यास, संशोधन व्हावे म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांच्या अक्षरधनाचा वारसा एका जाणिवेतून आणि जिद्दीने जपलाच नाही, तर १२ खंडांच्या माध्यमातून तो जनतेसमोर आणला आहे. यासाठी गेल्या दोन- अडीच वर्षांत झपाटल्यासारखे काम ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांनी केले. त्यांच्या समितीने पहिल्या वर्षी पंधरा हजार पानांच्या २५ खंडांची तयारी केली. पहिल्या टप्प्यातील जवळपास साडेसहा हजार पृष्ठांचे बारा खंड त्यातून तयारही झाले. येत्या १६ फेब्रुवारी रोजी
अ. भा. मराठी साहित्य संमेलनात त्याचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि राजमाता शुभांगिनी राजे गायकवाड यांच्या उपस्थितीत होत आहे. साहित्य संमेलनात यापेक्षा मोठे कार्य दुसरे कोणते असणार?..
(लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत वरिष्ठ सहाय्यक संपादक आहेत.)