यवतमाळचे ‘पाहुणपण’.. - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 06:00 AM2019-01-06T06:00:00+5:302019-01-06T06:00:07+5:30

येत्या आठवड्यात अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचा बेत ठरलेल्या यवतमाळवर सरस्वती प्रसन्न आहे. इथला माणूस आपल्या पद्धतीने भाषा वाकवतो, आईच्या मायेने मराठीशी खेळतो. इथे केवळ लिहिते साहित्यिक घडले नाही, तर कर्ते लेखक निपजले. इथली वैशिष्ट्ये दिसणारी नाहीत, जाणवणारी आहेत. त्यासाठी संमेलनाला येणाऱ्या लिहित्या माणसांना इथल्या पेरत्या आणि कर्त्या माणसांना भेटावे लागेल. तेच या महाराष्ट्रातले पहिले उत्पादक, पहिले निर्माते अन् म्हणूनच पहिले साहित्यिक आहेत...

Uniqueness of Yavatmal On the occasion of Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan | यवतमाळचे ‘पाहुणपण’.. - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने..

यवतमाळचे ‘पाहुणपण’.. - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने..

Next
ठळक मुद्देविदर्भाची सारी गुणवैशिष्ट्ये एकत्र पाहायची असतील तर यवतमाळसारखे गाव म्हणजे हुकमाचे पान. याच हुकमाच्या पानावर अखिल मराठी सारस्वतांच्या नजरा सध्या खिळल्या आहेत.

- अविनाश साबापुरे

तुम्ही म्हणाल, किती प्रचंड गारठा !, पण यवतमाळचा माणूस म्हणेल, आंगभर ठंडी हाय राज्या ! - भाषेला आपल्या पद्धतीने वाकवून वागविणारा हा जिल्हा आहे. महाराष्ट्राला प्रिय असलेलीच मराठी यवतमाळकर माणसालाही प्राणप्रिय आहे. पण लेकराने आईला हक्काने एकेरी हाक मारावी, तेवढ्याच हक्काने इथला माणूस मराठीशी खेळतो. तिच्या पुस्तकी चेहºयाला आपल्या गावच्या मातीचा दरवळ देतो. यवतमाळच्या माणसाचे जगणे जसे अघळपघळ, तशीच भाषाही ऐसपैस. पुण्यातला माणूस ज्या वाहनाला टमटम म्हणेल, त्याच वाहनाला यवतमाळचे लोक ‘डुक्कर’ म्हणणार. ‘काळीपिवळी’ हे एखाद्या वाहनाचे संबोधन असेल, असे मुंबईच्या माणसाला सांगूनही खरे वाटणार नाही. भाषेची ही अनोखी अभिवृद्धी घडविणाºया यवतमाळकरांसाठी ‘काळीपिवळी’ हा रोजचा शब्द आणि रोजची सोयही आहे.
कोकण, खान्देश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र अशा तुकड्यांमध्ये विखुुरलेल्या महाराष्ट्राचा विदर्भ हाही एक भलामोठा तुकडा. उर्वरित महाराष्ट्रापेक्षा अगदीच तुुटलेला, खचलेला. या विदर्भाची सारी गुणवैशिष्ट्ये एकत्र पाहायची असतील तर यवतमाळसारखे गाव म्हणजे हुकमाचे पान. याच हुकमाच्या पानावर अखिल मराठी सारस्वतांच्या नजरा सध्या खिळल्या आहेत. कारण अवघ्या महाराष्ट्रात मराठीची सेवा करणाºयांचा सोहळा यंदा अस्सल गावरान मरर्राठी बोलणाºया यवतमाळनगरीत होत आहे. येत्या ११, १२ आणि १३ जानेवारीला यवतमाळात ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा बेत ठरलाय. ही घोषणा होताच पुण्या-मुंबईतल्याच नव्हे, तर अनेक जिल्ह्यांतल्या साहित्यिकांना अचंबा वाटला. यवतमाळ नेमके आहे कसे? या गावाचा चेहरा कसा? स्वभाव कसा, असे प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाले. अनेकांनी तर आजवर यवतमाळ हा शब्दही फारसा ऐकलेला नाही. एखाद्या खेड्यात जाताना जशी चौकशी सुरू होते, तशीच यवतमाळची आता विचारपूस सुरू झाली आहे. अशी चर्चा होणेही स्वाभाविकच आहे म्हणा. महाराष्ट्राच्या अस्खलीत साहित्यक्षेत्राने आजवर क्वचितच यवतमाळचा नामोल्लेख केला.
पण या गावावर सरस्वती प्रसन्न आहे. इथे केवळ लिहिते साहित्यिक घडले नाही, तर कर्ते लेखक निपजले. कविवर्य शंकर बडेंनी या मातीचा वºहाडी सुवास अवघ्या महाराष्ट्राच्या काळजात पेरला, तर मिर्झा रफी अहमद बेग यांची पेरणी सुरूच आहे. नावांची जंत्री पेश करण्यात यवतमाळला रस नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यापूर्वीही ४५ वर्षांपूर्वी यवतमाळकरांनी सजविले होतेच. आता २०१९मध्ये दुसºयांदा इथे यजमानपद मिळाले, ते येथील आतिथ्यशील स्वभावाच्या लोकांमुळेच.
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक साहित्यिक आणि रसिक आयुष्यात पहिल्यांदाच यवतमाळ शहरात पाऊल ठेवणार आहेत. एकतर यवतमाळ हे गाव महाराष्ट्राच्या अगदीच काठावर. मुंबईपासून ८०० किलोमीटर. महाराष्ट्राच्या राजधानीपेक्षाही तेलंगणाच्या सीमेशी अधिक लगट. कागदावर शब्द पेरण्याइतकाच मातीत बी टोबण्याचे कसब अधिक कमावलेले. मुंबई म्हटले की राजधानी, नागपूर म्हटले तर उपराजधानी, पुणे म्हटले की सांस्कृतिक राजधानी, अमरावती म्हटले तर विदर्भाची सांस्कृतिक राजधानी... अनेक शहरांची नावे घेताच ओठांवर येणारी वैशिष्ट्ये असतात. पण यवतमाळची वैशिष्ट्ये दिसणारी नाहीत, जाणवणारी आहेत. त्यामुळे काहीशा नवख्या वाटणाºया या गावात येणारा प्रत्येक रसिक दरवेळच्या शाब्दिक अनुभवापेक्षाही मोठी अन् वेगळी बिदागी निश्चितच घेऊन जाणार आहे.
सर्जनशीलता केवळ कागदावर नसते. ती आधी मेंदूत जन्मते. अवघ्या जगाला कापूस निर्यात करणाºया भारतात कापसाचा शोध लागला तो यवतमाळ जिल्ह्यात. कळंब हे गाव जसे श्री चिंतामणीचे तीर्थस्थळ तसेच कापसाचे जननक्षेत्रही आहे. प्राचीन काळात वत्सगुल्म ऋषींनी येथेच कापूस पिकाचा शोध लावल्याचे सांगितले जाते. आज कळंबच नव्हेतर वणी, पांढरकवडा, राळेगाव, घाटंजी, आर्णीसारख्या गावातला कापूस अवघ्या विश्वात सर्वात दर्जेदार म्हणून गणला जातो. साहित्यिकांनी हा कापूस कधी आपल्या पुस्तकात लिहिला नाही, अन् मातीवर मेहनत लिहिणाºयांच्या व्यथाही मांडल्या नाही. पण आता संमेलनासाठी येणाºया लिहित्या माणसांनी अशा पेरत्या आणि कर्त्या माणसांना भेटावे, ही अपेक्षा आहे.
साहित्य संमेलनासाठी यवतमाळकर प्रचंड उत्सुक आहेत. पाहुण्यांच्या स्वागतासाठीही सज्ज आहेत. चतकोरातली चतकोर दुसºयासाठी राखून ठेवणे, हा या गावचा स्वभावच आहे. पण यावेळी येणाºया पाहुण्यांनी केवळ कौतुक करू नये, केवळ सहानुभूती दाखवू नये, तर यवतमाळचे काळीज समजून घ्यावे. महाराष्ट्राच्या नकाशावर या गावाचे स्थान ओळखावे. ब्रिटिशांनी या गावाचे महत्त्व ओळखले होते. इथला दर्जेदार कापूस परदेशात नेण्यासाठी त्यांनी ‘शकुंतला’ रेल्वे सुरू केली. ब्रिटिशांची राजवट संपली, तरी शकुंतलेच्या रुळांची मालकी आता-आतापर्यंत ब्रिटिश कंपनीने सोडली नव्हती. या रेल्वेने शंभरी पार केली आहे. संमेलनस्थळापासून अर्धा किलोमीटरवरच शकुंतलेचे रेल्वेस्थानक आहे. साहित्यिक तेथे डोळे उघडे ठेवून गेले तर एका कादंबरीचे जाज्ज्वल्य कथानक नक्कीच सापडेल.
यवतमाळात ब्रिटिशांनीच बांधून ठेवलेल्या ‘नगरभवना’नेही शतकी प्रवास केलाय. ही देखणी वास्तू आजही यवतमाळचा ‘कारभार’ बघते. येथील आझाद मैदानाने (३४ कलम) अनेक आंदोलने पाहिली. नावातच ‘आझाद’ हे बिरूद मिरवणारे मैदान स्वातंत्र्यानंतरही विविध राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक चळवळींचे साक्षीदार ठरले. याच मैदानातील ‘गांधी भवना’ची वास्तू साहित्यिकांच्या शब्दांना नवी धार देईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे अनेक ठिकाणी पाहिले असतील; पण यवतमाळात बाबासाहेबांसोबतच संविधानाचा पुतळा आहे. नव्या प्रेरणेने झोळी भरायची असेल, तर साहित्यिकांनी एकदा तेथे जावेच. पारतंत्र्याच्या काळात यवतमाळ हे गाव स्वातंत्र्यशूरांचेही केंद्र बनले होते. येथील रुक्मिणी पांडुरंग संस्थानात त्यावेळी थोरांच्या बैठका व्हायच्या. चळवळीची दिशा ठरविली जायची. शेवटी ब्रिटिशांनी या संस्थानापुढेच एक पोलीस चौकी उभारली होती. पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधींचा पदस्पर्श लाभलेले अमोलकचंद महाविद्यालय पाहण्यासारखेच आहे. विठ्ठल मकेसर नावाच्या माणसाने मागासवर्गीयांच्या मुलांसाठी पारतंत्र्याच्या काळात येथे संत चोखामेळा वसतिगृह सुरू केले. या वसतिगृहाला महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भेट दिली होती. त्यांचे हस्तलिखित संदेश या वसतिगृहात जपून आहेत. मातीतल्या कुस्तीचे महत्त्व आजही टिकवून ठेवणारा हनुमान आखाडा हे यवतमाळचे वेगळे वैशिष्ट्य आहे. या आखाड्याने २०१८मध्येच शंभर वर्षे पूर्ण केली, तर यवतमाळच्या समृद्ध नगर वाचनालयाने शतकी प्रवास पूर्ण केला आहे. अशीच वाचनालये वणी, पुसदसारख्या शहरांनीही जपली आहेत. यवतमाळच्या ‘शारदाश्रमा’नेही अमूल्य साहित्य संपदा जोपासली आहे.
यवतमाळचा दुर्गोत्सव अवघ्या देशात प्रसिद्ध आहे, तो इथल्या मूर्तिकारांमुळे. मूर्तिकारांनी घडविलेल्या ‘जिवंत’ मूर्ती पाहण्यासाठी लाखो भाविक दुर्गोत्सवात येथे येतात. शब्दांचे सर्जन करणाºया साहित्यिकांनी मातीतून देव जिवंत करणाºया या कलावंतांशीही हितगुज साधावे. जगभरात मराठी संगीत लोकप्रिय करणारे गायक दरवर्षी स्वातंत्र्यसंग्राम सेनानी बाबूजी उपाख्य जवाहरलाल दर्डा यांची समाधी असलेल्या दर्डानगरस्थित ‘प्रेरणास्थळ’ येथे हमखास येतात. हे स्थळ म्हणजे अनेक महनीय व्यक्तिमत्त्वांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले स्थळ आहे.
स्मृतिपर्व, समतापर्व अशा आयोजनांतून यवतमाळकर दरवर्षी साहित्य संमेलनाइतकाच मोठा सोहळा करतात. या सोहळ्यांनी यवतमाळच्या वैचारिक जडणघडणीला नवा आयाम दिला आहे. माणसांपासून, देवालयांपर्यंत, प्राण्यांपासून नदी-जगलांपर्यंत आणि इतिहासापासून वर्तमानापर्यंत समृद्ध असलेले यवतमाळ पाहण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पाहुणे येणार आहेत. या पाहुण्यांनी यवतमाळच्या सामान्य माणसाला भेटावे, राबणाºया शेतकºयांशी बोलावे, तेच या महाराष्ट्रातले पहिले उत्पादक, पहिले निर्माते अन् म्हणूनच पहिले साहित्यिक आहेत.

यवत्याची भाषा, अन् यवतमाळचा भाश्या !
सतीशच्या दोस्तांनी त्याला हक्काने सत्या म्हणावे, तसेच जुनेजाणते लोक यवतमाळला लाडाने यवतं म्हणतात. मराठीचा आम्ही खूप अभिमान बाळगतो, या तोºयात अजिबात न वावरता इथला प्रत्येक माणूस मराठीच बोलतो. फक्त त्या मराठीची चव हटके आहे. तेलंगणाच्या जवळ असलेल्या पट्ट्यातील मराठीचा हेल तेलुगूशी जुळणारा आहे, तर कुठे हिंदीने मराठीशी गट्टी केली आहे. ‘भाचा’ हा मराठीतला नातेसंबंधवाचक शब्द यवतमाळात ‘काय म्हणतंस गा भाश्या?’ असा बदलून येतो. पुण्या, मुंबईची माणसं एकमेकांना आदरपूर्वक रसिकहो, प्रेक्षकहो म्हणत असतील. पण यवतमाळचा माणूस वाक्या-वाक्यागणिक ‘राजेहो’ म्हणत पुढच्या माणसाला थेट राजेपद बहाल करत असतो. इंग्रजीचा द्वेष करण्यापेक्षा इंग्रजीला मराठीत बुडवून टाकण्याची किमया यवतमाळकरांनीच केली आहे. एसटी बसला ‘येस्टी’ म्हणून ते एसटीतली इंग्रजी हद्दपार करतात. तसंच ‘ड्रायव्हर’ला ड्रावर म्हणत त्याचे मराठीकरण केले जाते. डालं, शिबलं, गोठाण, खारी असे शेकडो मराठीच; पण महाराष्ट्राला ठाऊक नसलेले शब्द यवतमाळच्या शेतकऱ्यांनी निर्माण केले आहेत. ही भाषा जाणून घेण्यासाठी यवतमाळच्या खेड्यापाड्यातून साहित्यिकांनी फिरलेच पाहिजे.
(लेखक लोकमतच्या नागपूर आवृत्तीत उपसंपादक आहेत.)

manthan@lokmat.com

Web Title: Uniqueness of Yavatmal On the occasion of Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.