अमित शाह यांचा करिश्मा आणि भाजपची वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 06:01 AM2019-09-22T06:01:00+5:302019-09-22T06:05:01+5:30

अमित शाह यांचं व्यक्तिमत्त्व केवळ निवडणुकीतील  जय-पराजयानं समजून घेता येत नाही.  त्यांनी भाजपची नव्याने केलेली शिस्तबद्ध बांधणी,  पक्षात तळापर्यंत रुजविलेले संघाचे संस्कार,  पक्षविस्तारासाठी केलेली देशभरची भ्रमंती,  कार्यकर्त्यांशी सतत संवाद यांसारखे अनेक कंगोरे  ‘अमित शाह अँण्ड द मार्च ऑफ बीजेपी’  या पुस्तकातून लोकांसमोर आले आहेत. 

The unknown story of Amit Shah's political life, struggles, rise and triumph through the book 'Amit Shah and the March of BJP' by Anirban Ganguly | अमित शाह यांचा करिश्मा आणि भाजपची वाटचाल

अमित शाह यांचा करिश्मा आणि भाजपची वाटचाल

googlenewsNext
ठळक मुद्देअमीत शाह यांच्याविषयी वृत्तपत्रांतून झालेले लिखाण, त्यातून लोकांनी काढलेले अर्थ एवढीच माहिती लोकांना आहे. आता ही उणीव ‘अमित शाह अँण्ड द मार्च ऑफ बीजेपी’ या अनिर्बान गांगुली आणि शिवानंद द्विवेदी यांनी लिहिलेल्या पुस्तकातून भरून निघाली आहे.

- दिनकर रायकर
(सल्लागार संपादक, लोकमत वृत्तपत्र समूह) 

गेल्या पाच-सहा वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर देशपातळीवर चर्चेत असलेले राजकीय नेते म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविला. त्याचे बरेचसे र्शेय अमित शाह यांचेच. या विजयानंतर अमित शाह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला अभूतपूर्व यश मिळवून दिले. अमित शाह म्हणजे निवडणुकीत हमखास यश, हे समीकरण सध्या मानले जाते. पक्षवाढीसाठी अमित शाह यांनी पूर्ण देश पिंजून काढला. पक्षाचा शहरी तोंडावळा बदलून आज भाजप गावोगावी खंबीर पायावर उभा आहे यामागेही अमित शाह यांनीच आखलेली धोरणे व मेहनत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाला प्रचंड यश मिळवून दिल्यानंतर व केंद्रात गृहमंत्री झाल्यावर भाजपच्या धोरणानुसारच काश्मीरबाबतचे 370 व 35-अ कलम रद्दबातल करण्यातही त्यांचाच पुढाकार होता. या निर्णयाचे काही पक्ष वगळता राष्ट्रीय स्तरावर स्वागतच झाले आहे. भारतीय राजकारणातील ‘चाणक्य’, पंतप्रधानांचे ‘संकटमोचक’ म्हणूनही त्यांची ओळख आहे. पक्षाचा एक कार्यकर्ता ते राष्ट्रीय अध्यक्ष व गृहमंत्री हा त्यांचा प्रवास जेवढा वेधक आहे तेवढेच त्यांचे व्यक्तिमत्त्व मात्र सर्वसामान्यांसाठी गूढच आहे. त्यांची आत्तापर्यंतची एकूणच राजकीय वाटचाल, त्यांच्या वादग्रस्त भूमिका, त्यांच्याविरुद्ध लावलेले विविध खटले; परिणामी त्यांच्यावर कर्मभूमी असलेल्या गुजरात राज्याबाहेर हद्दपार होण्याची आलेली वेळ असे संमिर्श व्यक्तिमत्त्व म्हणूनच त्यांची देशवासीयांना ओळख आहे. परंतु या नेत्याचा राजकीय उत्कर्ष कसा झाला? हा नेता खरा कसा आहे? त्यांचा स्वभाव कसा आहे? त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांच्या आवडीनिवडी, मित्रपरिवारात कोण कोण आहेत? याची फारशी माहिती जनसामान्यांना नाही. वृत्तपत्रांतून झालेले लिखाण व त्यातून लोकांनी काढलेले अर्थ अन् काहींना त्यांच्याविषयी असलेला आकस एवढीच माहिती लोकांना आहे. मात्र आता ही उणीव ‘अमित शाह अँण्ड द मार्च ऑफ बीजेपी’ या अनिर्बान गांगुली आणि शिवानंद द्विवेदी यांनी लिहिलेल्या पुस्तकातून भरून निघाली आहे. त्यांच्या एकंदर जीवनशैलीचा व कार्यपद्धतीचा आलेख या पुस्तकात मांडण्यात आला आहे. पत्रकार रजत शर्मा यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे. 
मुंबईतील एका यशस्वी उद्योजकाच्या कुटुंबात जन्म झालेले अमित शाह यांचे शिक्षण मात्र त्यांच्या गुजरातमधील मूळ गावी अत्यंत पारंपरिक पद्धतीने झाले. त्यांचे आजोबा कडक शिस्तीचे भोक्ते होते. पहाटे चार वाजता शाह यांचा दिवस सुरू व्हायचा. आचार्य आणि शास्त्री यांच्याकडून त्यांना भारतीय परंपरा, संस्कृती, रामायण-महाभारत व विविध ग्रंथ तसेच ऐतिहासिक लढे यासह इतिहासाचे शिक्षण मिळाले. त्यांना आईच्या संस्कारांचीही शिदोरी मिळाली. र्शी. अरबिंदो हेदेखील त्यांच्या आजोबांच्या घरी येऊन गेले होते. राजाचा प्रत्येक निर्णय हा जनतेच्या हिताचा असावा. कोण्या एका व्यक्तीसाठी नसावा, ही र्शी. अरबिंदो यांची शिकवण त्यांच्यावर आजोबा व आईने बिंबवली. त्यांच्या सांगण्यानुसार र्शी. अरबिंदो ज्या खुर्चीवर बसले होते ती खुर्ची शाह यांनी अजूनही आपल्या वडिलोपार्जित घरी जपून ठेवली आहे. 
आणीबाणीला विरोध करण्यापासून शाह यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. स्वयंसेवक, जनसंघाचा कार्यकर्ता ते भाजपमध्ये बूथ कार्यकर्ता, शहर सचिव, जिल्हास्तरावरील पद आदी विविध जबाबदार्‍या सांभाळत त्यांनी आत्ताचे पक्षाचे सर्वोच्च पद मिळविले आहे. 
वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी ते आमदार झाले. एकतिसाव्या वर्षी गुजरात स्टेट फायनान्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष झाले. छत्तिसाव्या वर्षी अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपद मिळवून 20 कोटी रुपये तोट्यात असलेली बँक एका वर्षात त्यांनी नफ्यात आणली. सहकार क्षेत्रातही त्यांनी भाजपचा पाया मजबूत केला. परिणामी, पक्षाच्या राष्ट्रीय सहकार विभागाचे राष्ट्रीय निमंत्रक म्हणून त्यांची निवड झाली. पुढे पाच वेळा आमदार म्हणून ते निवडून आले. ते मोदींच्या गुजरात सरकारमध्ये गृह राज्यमंत्री असताना अतिरेकी कारवाया नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी कठोर पावले उचलली. पोलीस तपास अधिक परिणामकारक व्हावा म्हणून त्यांनी जगातील पहिली ‘फॉरेन्सिक युनिव्हर्सिटी’ स्थापन केली. पुढच्या वर्षी लगेच त्यांनी ‘रक्षाशक्ती युनिव्हर्सिटी’ स्थापन केली. ते देशातील पहिले विद्यापीठ होते. त्यात पोलीस तपास व अंतर्गत सुरक्षा याचे पदवी अभ्यासक्रम सुरू केले. शाह हे उत्कृष्ट बुद्धिबळपटू आहेत. 2006 साली ते गुजरात राज्य बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष झाले. त्यांच्याच काळात राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा गुजरातमध्ये झाली. त्यात 20 हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. पुढच्याच वर्षी काँग्रेसचे वर्चस्व मोडून काढत गुजरात क्रिकेट असोसिएशनचे ते उपाध्यक्ष बनले. त्या काळात त्यांनी संघटनेची गंगाजळी 22 कोटींहून 162 कोटींवर नेली. 24 रणजी सामने खेळलेल्या क्रिकेटपटूला तेव्हा निवृत्तिवेतन मिळायचे. शाह यांनी या योजनेत आमूलाग्र बदल करत एक रणजी सामना खेळलेल्या क्रिकेटपटूलाही निवृत्तिवेतन देण्याचा निर्णय घेतला. वाचनाची प्रचंड आवड असलेल्या शाह यांनी मंत्रिपदाच्या काळात ‘वाचे गुजरात’ हा उपक्रम सुरू केला. त्यासाठी वाचनालयांना प्रोत्साहन दिले. दीनदयाळ रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीने नानाजी देशमुख यांनी सुरू केलेल्या ‘मंथन’ मासिकाचे शाह हे नियमितपणे वाचन करायचे. त्यामुळे पक्षाची ध्येय-धोरणे व नेत्यांनी केलेली कामे कळायची. कालांतराने बंद पडलेल्या या मासिकाचे जुने अंक कार्यकर्त्यांसाठी त्यांनी पुन्हा छापले. 
एवढेच नव्हेतर, पक्षाच्या प्रत्येक कार्यालयात ग्रंथालय असावे, त्यात नवनव्या पुस्तकांची भर पडावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत. अमित शाह यांच्याकडेही मोठा ग्रंथभंडार आहे.   
गुजरातमधील गृह मंत्रिपदाच्या काळात ‘पोटा’ कायद्याची अंमलबजावणी करत असताना मानवी हक्क संघटनांचा विरोधही त्यांनी पत्करला. दहशतवादाबाबत त्यांनी ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबविले; पण त्यांच्या राजकीय विरोधकांनी मात्र त्यांच्याविरुद्ध काहूर उठविले. गोध्रा हत्याकांडामुळे त्यांचे राजकीय जीवन ढवळून निघाले. त्यातून एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची प्रतिमा देशात उभी राहिली. ती त्यांना अजूनही चिकटून आहे. 2012 मध्ये सीबीआय कोर्टाने त्यांची निदरेष मुक्तता केली; आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेले नाही. त्याच वर्षी झालेल्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी पुन्हा विजय मिळविला. तेव्हाच देशपातळीवरही आता आपले सरकार आणायचे असल्याचे शाह यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. 2014 च्या लोकसभेच्या निवडणुकीआधी त्यांची नेमणूक पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी झाली व त्यांना उत्तर प्रदेश प्रभारी नेमले. गुजरातमधून हद्दपार झाल्यानंतर शाह यांनी उत्तर प्रदेश पिंजून काढला होता. त्याचा त्यांना उत्तर प्रदेश प्रभारी झाल्यानंतर मोठा उपयोग झाला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात पक्षाने केलेल्या कामगिरीचे सर्वांना आश्चर्य वाटले होते. मात्र अमित शाह यांनी अगोदर केलेल्या पायाभरणीचा तो परिपाक होता, हे फारच थोड्या लोकांना माहिती आहे. मोदी यांनी वाराणसीतून लढावे, हा त्यांचाच आग्रह होता. कारण उत्तर प्रदेश जिंकले की दिल्ली जिंकता येते हे त्यांचे ठाम मत होते. त्यानंतरचा इतिहास सर्वर्शुत आहे. 
राजकीय कार्यकर्त्याने प्रवास करावा, लोकांना भेटावे. कार्यकर्त्यांच्या घरीच मुक्काम करावा, त्यांच्याशी अधिकाधिक संवाद साधावा ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संस्कृती त्यांनी भाजपमध्ये खर्‍या अर्थाने रुजविली. त्यामुळे पक्षात आज कार्यकर्त्यांचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी सदस्यता नोंदणी महाअभियान राबविले. एकेकाळी 10 लोकांच्या पाठिंब्यावर सुरू झालेला पूर्वार्शमीचा जनसंघ आता भाजपच्या रूपाने 11 कोटी सदस्य असलेला जगातील सर्वांत मोठा पक्ष झाला आहे. त्याअगोदर हा विक्रम 6 कोटी 88 लाख सदस्य संख्या असलेल्या चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या नावावर होता. भाजप एवढय़ावर थांबलेला नाही. यापुढे अजून 7 कोटी सदस्य नोंदणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. अध्यक्ष झाल्यावर अमित शाह यांनी पहिल्या चार वर्षांंत 7.90 कोटी किमी प्रवास करीत गावोगावी भेटी देत पक्षसंघटना मजबूत करण्यावर अधिक लक्ष दिले. केवळ निवडणुका जिंकणे हे ध्येय न ठेवता पक्षसंघटना अधिक मजबूत कशी करता येईल, यावर त्यांचा कटाक्ष आहे. पूर्वी काँग्रेस पक्षाने सेवा दल, युवक काँग्रेस, एनएसयूआय, महिला काँग्रेस या संघटनांच्या ताकदीवर जवळपास 70 वर्षे राज्य केले. मात्र मध्यंतरीच्या काळात पक्षसंघटनेकडे कोणीही लक्ष दिले नाही; परिणामी काँग्रेस खिळखिळी झाली आणि दारुण पराभवास त्यांना सामोरे जावे लागले. विरोधी पक्षनेतेपद मिळविण्याएवढय़ा जागाही या पक्षाला लोकसभेत मिळाल्या नाहीत. अमित शाह यांनी मात्र जवळपास प्रत्येक निवडणुकीत विजय मिळवत असताना पक्ष कार्यकर्त्यांकडे कधीच दुर्लक्ष केलेले नाही.   
त्याचे एक उदाहरण म्हणजे अमेठीच्या दौर्‍यात अचानक त्यांनी रात्री कार्यकर्त्यांंची एक बैठक लावली होती. जागा मिळेना म्हणून ती एका गुदामात झाली, ती रात्री तब्बल दोन वाजता संपली. कार्यकर्त्यांंना वाटले आता शाह परत जातील; मात्र ते त्याच गुदामात मुक्कामी राहिले. आपला अध्यक्ष असे काही करू शकतो, हे कार्यकर्त्यांंनाही वाटले नव्हते. आईच्या आग्रहाखातर त्यांनी खादीचा वापर सुरू केला. ते सतत खादी वापरतात. मित्रपरिवारालाही ते खादी वापरण्याचा आग्रह धरतात. प्रत्येकाने वर्षाला 5 हजार रुपयांचे खादीचे कपडे वापरले तर या देशात कोणीही उपाशी किंवा बेरोजगार राहणार नाही, हे त्यांचे यामागचे गणित आहे. प्रसारमाध्यमे हे केवळ निवडणुकीतील जय-पराजय याचेच वृत्तांकन करतात; यापलीकडे भारतीय जनता पक्ष म्हणून समजून घेण्यात ते कमी पडले आहेत, असे शाह यांचे मत आहे.     
लक्ष्य अंत्योदय, प्राण अंत्योदय आणि पथ अंत्योदय ही त्रिसूत्री ते नेहमी कार्यकर्त्यांंवर बिंबवित आले आहेत. समाजातील शेवटचा घटक या पक्षाचा केंद्रबिंदू असला पाहिजे, यावर त्यांचा भर आहे. 
भाजपचे 49 व्या वर्षी झालेले सर्वांंत तरुण राष्ट्रीय अध्यक्ष हीसुद्धा त्यांची वेगळी ओळख आहे. आव्हानांचे संधीत रूपांतर करण्याचे अनोखे कसब शाह यांच्याकडे आहे. त्याची असंख्य उदाहरणे या पुस्तकात दिली आहेत. 
------------------------------------
अमित शाह अँण्ड द मार्च ऑफ बीजेपी
लेखक - अनिर्बान गांगुली आणि शिवानंद द्विवेदी
प्रकाशक - ब्लुम्सबरी इंडिया 
------------------------------------

Web Title: The unknown story of Amit Shah's political life, struggles, rise and triumph through the book 'Amit Shah and the March of BJP' by Anirban Ganguly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.