विश्वाचे गूढ उलगडताना..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 06:05 AM2019-05-05T06:05:00+5:302019-05-05T06:05:09+5:30
अंड्यातून विश्वनिर्मिती झाली इथपासून ते पृथ्वी एका दैवी केंद्रीय अग्निभोवती फिरते इथपर्यंत अनेक संकल्पना आजवर मांडल्या गेल्या. काळाच्या ओघात आणि वैज्ञानिक कसोट्यांवर अनेक गोष्टी सिद्ध झाल्या. तरीही विश्वातील अनेक गुपिते आजही अज्ञात आहेत. आज ना उद्या, विज्ञानाच्या आधारेच ही सर्व कोडी सुटतील.
- डॉ. जयंत नारळीकर
(वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वतीने पुण्यात घेतल्या जाणार्या वसंत व्याख्यानमालेचे यंदाचे विक्रमी 145वे वर्ष आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी सन 1875 मध्ये ही व्याख्यानमाला सुरू केली. या व्याख्यानमालेत यंदा ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर यांना ‘न्यायमूर्ती रानडे स्मृती’ पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी विश्वाच्या उत्पत्तीविषयी त्यांनी मांडलेल्या विचारांचा हा संपादित सारांश.)
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्याबद्दल लोकमान्य टिळक म्हणाले होते, पेशवाई बुडाल्यानंतर थंड गोळ्याप्रमाणे पडलेल्या महाराष्ट्राला चेतना आणण्याचे काम रानडे यांनी केले. अटकेपार आपले कर्तव्य बजावणारे मराठे किंककर्तव्यमूढ अवस्थेत होते. त्या अवस्थेत रानडे हे समाजसुधारक आणि मार्गदर्शक म्हणून आपल्याला लाभले ही जमेची गोष्ट आहे. समाजसुधारकांना नेहमीच विरोध सहन करावा लागतो, ही वस्तुस्थिती आहे. समाजाला आजही वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज आहे. ही गरज किती आणि केवढी महत्त्वाची आहे, हे विज्ञानाच्या क्षेत्रात आल्यावरच मला कळले. वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजवण्यासाठी तरुण पिढीचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी रानडे यांचे चरित्र सक्रिय मार्गदर्शक ठरेल.
विश्वाच्या उत्पत्तीबद्दल आपल्याला काही माहिती समजलेली आहे. आणखी काही माहिती घ्यावी लागेल. पूर्वीच्या पुराणांमध्ये ब्रrांडाची कल्पना दिसते. अंडे फोडल्यावर त्यातून सबंध विश्व बाहेर आले, ब्रrांड आणि अंडे यांचं मिर्शण म्हणजे विश्व. अशा कल्पना अनेक देशांत सापडतात. युरोपात तर अशीही कल्पना होती, की संपूर्ण विश्व एका जैविक झाडावरती आहे. त्याला ‘वल्र्ड ट्री’ म्हणत. पृथ्वीला चार हत्ती धरून आहेत. ते हत्ती एका कासवावर उभे आहेत,’ ही कल्पनाही एकेकाळी खूप प्रचलित होती. हळूहळू विज्ञानाचा आणि प्रचार आणि प्रसार होऊ लागला. त्याचा परिणामही दिसू लागला आणि लोक विचारू लागले, तुम्ही ब्रrांड, विश्व वगैरे म्हणता हे कशावरून? ते सिद्ध करून दाखवा. पुरावा द्या.
ग्रीसमधून पायथागोरस आणि त्याच्या अनुयायांनी शोध लावण्यास सुरुवात केली होती. त्या सर्वांना ‘पायथागोरीयन्स’ म्हणत. त्यांनी एक कल्पना मांडली, आपला सूर्य अमुक ठिकाणी कोपर्यात आहे. पृथ्वी ही गोल फिरत असून, ती सूर्याभोवती न फिरता एका दैवी केंद्रीय अग्नीभोवती फिरते आहे. ग्रीसमधल्या काही चिकित्सकांनी त्यांना विचारले, केंद्रीय अग्नी अमुक ठिकाणी आहे, त्याच्याभोवती पृथ्वी फिरते, तर मग आपल्याला तो दिसत का नाही? हा केंद्रीय अग्नी कुठे आहे? लोकांचे हे प्रश्न ऐकून पायथागोरीयन्स यांना काय उत्तर द्यावे, लोकांचे समाधान कसे करावे, हा प्रश्न पडला. पायथागोरीयन्सनी सांगितले, केंद्रीय अग्नी आणि पृथ्वी यांच्यात एक प्रतिपृथ्वी आहे. ती गोल फिरत असल्याने केंद्रीय अग्नी दिसू शकत नाही. हे ऐकल्यावर लोकांचे काहीकाळ समाधान झाले; पण लोक पुन्हा प्रश्न विचारू लागले, प्रतिपृथ्वी फिरते तर ती आपल्याला दिसत का नाही? ती दिसायला पाहिजे. कशी दिसेल?.
त्यावर पायथागोरीयन्स उत्तरले, ग्रीस देश पृथ्वीच्या उलट्या बाजूला असल्याने दिसणार नाही. अशा प्रकारे या सिद्धांतानुसार लोकांचे तात्पुरते समाधान केले गेले. काहीकाळाने लोकांनी समुद्रमार्गे सर्व बाजूंनी प्रवास केला; पण त्यांना काहीच आढळले नाही. यावर पायथागोरीयन्स गप्प बसले.
विज्ञानाची एक शास्त्रीय पद्धत आहे. तुम्ही एखादे विधान केले तर ते सिद्ध करावे लागते, त्यासाठी पुरावा लागतो.
कोपर्निकसने सांगितले होते, पृथ्वी स्थिर नसून ती सूर्याभोवती फिरते. त्यामुळे सूर्य स्थिर आहे असा लोकांचा समज झाला. अँरिस्टॉटलने म्हटल्याप्रमाणे पृथ्वी स्थिर असून, बाकीचे ग्रह पृथ्वीभोवती फिरत असतात. मात्र ही कल्पना मोडून काढली गेली. गॅलिलिओने पुढे कोपर्निकसचा पाठपुरावा केला. त्याने सिद्ध केले की, अँरिस्टॉटलपेक्षा कोर्पनिकसचा सिद्धांत जास्त चांगला आहे; परंतु गॅलिलिओचा पाठपुरावा लोकांना आवडला नाही. त्याकाळी विज्ञानाच्या रूपावर एक धार्मिक पगडा होता. प्रस्थापित विज्ञानापासून लोक लांब जाऊ शकत नव्हते. कारण ते धर्मविरोधी असल्याचे म्हटले जाई. गॅलिलिओच्या म्हणण्यावर पोपने एक कमिशन नेमले. त्यांनी गॅलिलिओची उलटतपासणी केली. गॅलिलिओचे म्हणणे विश्वासार्ह आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला. शेवटी गॅलिलिओचे अनुमान धर्मविरोधी मानून त्याला कठोर शिक्षा करण्याचे ठरले. कमिशनने गॅलिलिओला सांगितले, तू चूक कबूल केलीस तर आम्ही तुला त्रास देणार नाही. गॅलिलिओचे मतपरिवर्तन झाले. त्याने चूक कबूल केली.
शेवटी गॅलिलिओला एक प्रश्न विचारण्यात आला. पृथ्वी सूर्याभोवती फिरते याचा पुरावा आहे का? गॅलिलिओ म्हणाला, आपली पृथ्वी फिरते, कारण त्यावरील समुद्राचे पाणी हिंदकाळते. पाण्याच्या लाटा तयार होतात; पण ते चुकीचे होते. समुद्राचे पाणी उसळी मारते, याचे कारण गुरुत्वाकर्षण आहे, हे न्यूटनच्या सिद्धांतामुळे लोकांना कळले. पोपने गॅलिलिओच्या सिद्धांताविषयी नवीन कमिशन नेमले. गॅलिलिओला योग्य न्याय मिळाला नव्हता, हे कमिशनला कळले. त्यामुळे कमिशनने त्याला न्याय देण्याचे ठरवले.
सूर्य स्थिर आहे. पृथ्वी आणि इतर ग्रह फिरतात हे गॅलिलिओ सांगत सुटला. यामध्ये सूर्यमाला महत्त्वाची ठरली. गॅलिलिओने काहीकाळाने दुर्बिणीचा शोध लावला. त्यावरून कळले की, सूर्य एका आकाशगंगेत आहे. एकोणिसाव्या शतकात कोपर्निकसने एक कल्पना मांडली होती. आकाशगंगेत अब्जावधी तारे असतात. सगळ्या तार्यांमध्ये आपली सूर्यमाला केंद्रस्थानी आहे. विसाव्या शतकात नवीन दुर्बिणीचा शोध लागला. त्यानुसार लोकांना कळले की, आपली सूर्यमाला केंद्रस्थानी नसून ती दोन तृतीयांश बाजूला आहे. अशावेळी सूर्यमालेचे महत्त्व कमी होऊन आकाशगंगा महत्त्वाची ठरली. अवकाशात एकच आकाशगंगा आहे असे मानले गेले. आपल्या आकाशगंगेव्यतिरिक्त अजूनही काही आकाशगंगा असतील असा शोध पुढे वैज्ञानिकांनी लावला. नव्या अत्याधुनिक दुर्बिणीच्या साह्याने अवकाशात एकापेक्षा अधिक आणि बर्याच आकाशगंगा आहेत हे सिद्ध झाले.
शास्त्रज्ञांनी विश्वाचे कोडे सोडवण्यास सुरुवात केली. विश्वाची उत्पत्ती एका महास्फोटातून झाली, प्रचंड तापमानामुळे वेगवेगळे अणु-रेणू तयार झाले, महास्फोटामुळे विश्वाचे घड्याळ सुरू झाले. असे मानले गेले.
शास्त्राचा एक गुण आहे की, प्रत्येक प्रश्नाला उपप्रश्न असतात. त्यासाठीची उत्तरे मिळायला हवीत. महास्फोटाबद्दल कुठलेही भौतिक विज्ञान लागू होत नसल्याने ही कल्पना बदलावी लागली. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाच्या संदर्भात याचा अभ्यास केला. विश्वाचे गुणधर्म क्वॉन्टम ग्रॅव्हिटीने सांगता येतात; परंतु क्वॉन्टम ग्रॅव्हिटी म्हणजे काय, हे तेव्हा माहीत नव्हते.
विश्वात पृथ्वी सोडून इतर ग्रहांवर जीवसृष्टी आहे की नाही हे एक मोठेच कोडे होते. पृथ्वी सोडून इतर ठिकाणी जीवसृष्टीचा शोध मानवाला लावायचा होता. आपले शास्त्रज्ञ मागे राहिले नाहीत. दोन प्रकारात शोध लावण्यात आला. पृथ्वीपासून दहा ते वीस प्रकाशवर्ष लांब जीवसृष्टी असू शकते, कदाचित ते आपल्या पुढेही गेले असतील. त्यासाठी प्रयत्न चालू झाले आहेत. पृथ्वीवरती रेडिओ टेलिस्कोप उभारून त्यातून बाहेर सिग्नल पाठवले तर ते सिग्नल तुम्हाला काही उत्तरे आणून देतात का, हे तपासण्यासाठी अनेक प्रकारची माहिती पाठवण्यात येत आहे. अर्थात, ही माहिती कुठल्याही भारतीय अथवा इतर भाषेत पाठवली जात नाही. कारण तिथे एलियन्स (परग्रहावरील जीव) असलेच, तर आपली कुठलीही भाषा त्यांना माहीत नसणार. गणित आणि विज्ञान या भाषा मात्र त्यांना माहीत असू शकतील. या भाषांमध्ये आकडे आणि चिन्हे असल्याने समजण्यासाठी उपयोग होतो. आपण एक मेसेज पाठवला आणि त्याचे उत्तर शास्त्रीय भाषेत आले तर समजावे की त्या लोकांना विज्ञान येत आहे. सिग्नल पाठवताना दोन डॉट, नंतर तीन, पाच, सात, अकरा, तेरा पाठवले, तर हे ‘प्राइम नंबर’ असल्याने त्यांना ओळखता येतील. आजवर आपण असे सिग्नल दिलेले आहेत; पण अजून त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही.
दुसरा प्रकार म्हणजे पृथ्वीवर जीवसृष्टी कशी निर्माण झाली? एक कारण म्हणजे पृथ्वीबाहेरून मायक्रो, बॅक्टेरिया, व्हायरस मोठय़ा प्रमाणात येत असतील. यांच्यामुळं पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाली. एकेकाळी पृथ्वीतलावर व्हायरसचा वर्षाव झाला. हे वर्षाव आजही चालू असतील. आपण बघायला पाहिजे. त्या दृष्टीने प्रयोग चालू आहेत. इस्रोने यासाठी मदत केली आहे. दोनदा असे प्रयोग करून झाले आहेत. उत्तरे घेण्याचा प्रयत्न केला आहे. पृथ्वीपासून 41 किलोमीटर अंतरावर अवकाशात व्हायरस आढळले आहेत. तपासणी केल्यावर कळले की त्यातले काही व्हायरस पृथ्वीवरचे आहेत. इतर व्हायरस पृथ्वीवर सापडलेले नव्हते. त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न संशोधक करीत आहेत. व्हायरसमध्ये कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन असे गुणधर्म आहेत. ते गुणधर्म पृथ्वीवरील व्हायरसपेक्षा वेगळे असतील तर ते लांबून आले असल्याचे आपण म्हणू शकतो. अर्थात दोन-तीन वर्षांत तंत्रज्ञानाच्या मदतीने हे सिद्ध करता येईल.
(लेखक ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत.)
शब्दांकन - अतुल चिंचली