अफगाणिस्तानातून अमेरिकेचा काढता पाय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 07:58 AM2021-07-11T07:58:46+5:302021-07-11T08:00:38+5:30
American army Going Back From Afghanistan : तब्बल २० वर्षे अफगाणिस्तानात राहून आता अमेरिकेने तिथून आपला गाशा गुंडाळायला सुरुवात केली आहे.
महम्मद अली नाईक
तब्बल २० वर्षे अफगाणिस्तानात राहून आता अमेरिकेने तिथून आपला गाशा गुंडाळायला सुरुवात केली आहे. हे आपणा सर्वांना माहीतच आहे. मुळातच अमेरिका वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्याला जबाबदार अल-कायदा संघटनेची पाळेमुळे खणून काढण्याच्या उद्देशाने अफगाणिस्तानात आला होता. अल-कायदा अफगाणिस्तानातून आपल्या कारवाया करते म्हणून तिथेच जाऊन त्यांचा नायनाट करावा हा हेतू होता.
कधी स्वतःच्या ताकदीवर तर कधी पाकिस्तानसारख्या मित्र देशांच्या मदतीने अमेरिकेने अल-कायदा आतंकवाद्यांना मारले तरी किंवा पकडून गवन्तानामो बे सारख्या तुरुंगात तरी टाकले. त्यासाठी त्यांनी अफगाणिस्तानात आपला सैनिकी सरंजाम आणला, संबंध अफगाणिस्तानात आपल्या सैनिकी चौक्यांचे जाळे बसवले आणि जवळ जवळ संपूर्ण देशावर आपला कब्जा बसवला. हे करताना आपण लोकशाही सरकार अफगाणिस्तानात आणत आहोत जेणेकरून सगळ्या आतंकवादी संघटनांना लोकशाही पद्धतीने जेरबंद केले जाऊ शकेल हे त्यांचे धोरण होते. त्यासाठी त्यांनी अफगाणी लोकांचे सैन्य उभारले, त्यांना सैनिकी प्रशिक्षण दिले, दारूगोळा, रणगाडे इत्यादी सर्व काही देऊन जवळ जवळ साडेतीन लाख सैनिकांची फौज उभी केली.
याउलट तालिबान सप्टेंबर ११ नंतरही आपली ताकद शाबूत ठेवून होते. त्यात त्यांना डबल गेम खेळणाऱ्या पाकिस्तानची प्रचंड मदत झाली. संबंध २० वर्षांत तालिबान्यांचे हल्ले कधी सरकारी सैन्यावर तर कधी अमेरिकन आणि नाटो सैनिकांवर चालूच होते. परिणामी झाले काय? जवळ जवळ ३७०० अमेरिकन आणि नाटो सैनिक मारले गेले, जवळ जवळ २.६ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स खर्च झाले व हाती काय उरलं? तर एक ओसामा बिन लादेन. त्याची खबरसुद्धा अमेरिकेला म्हणे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयने दिली होती. या सगळ्या काळात जरी तालिबान्यांनी आपली सत्ता कायदेशीररीत्या अफगाणिस्तानात प्रस्थापित केली नव्हती तरी गावोगावांत, तालुक्या-तालुक्यांत अफगाणी जनता तालिबानधार्जिणीच होती व त्या प्रदेशांत तालिबान्यांचीच मर्जी चालायची. शिवाय पाकिस्तानची पाठराखण होतीच. परिस्थिती अशी निर्माण झाली की अमेरिकन सैन्याचे अफगाणिस्तानात राहण्याचे प्रयोजनच उरले नाही.
करारानुसार अमेरिका १ मे २०२१ पासून अफगाणिस्तानातून आपल सगळे सैनिकी अस्तित्व काढून घेईल असे ठरले. त्याप्रमाणे अमेरिका आणि नाटो सैनिकांची ‘घर वापसी’ सुरू झाली. या पार्श्वभूमीवर थोडक्यात काय तर अमेरिकेसाठी ‘तेलही गेले, तूपही गेले व हाती राहिले फक्त ओसामा नावाचे धुपाटणे’ असे झाले.
दोहा समझोता
अमेरिकेला अफगाणिस्तानातून काढता पाय घेण्याशिवाय पर्यायच उरला नाही. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही गोष्ट जाणली व त्यांनी तालिबान्यांशी माघार घेण्यासंदर्भात करार केला. यालाच दोहा समझोता म्हणतात.
(लेखक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विषयांवरील अभ्यासक आहेत.)