वैशाख वैभव

By Admin | Published: May 10, 2014 05:36 PM2014-05-10T17:36:47+5:302014-05-10T17:36:47+5:30

वैशाख विखारी असूनही तो मोहक, लोभसवाणा वाटतो. वैशाख उपेक्षित असूनही तो अधिक जवळचा वाटतो. जीवनाचा सच्चा सखा-मैतर वाटतो. म्हणून तर रसिकजनांना, हळव्या मनांना वैशाखाची नेहमीच प्रतीक्षा असते.

Vaisakha Vaibhav | वैशाख वैभव

वैशाख वैभव

googlenewsNext
>
प्रा. डॉ. वर्षा गंगणे 
 
वैशाख विखारी असूनही तो मोहक, लोभसवाणा वाटतो. वैशाख उपेक्षित असूनही तो अधिक जवळचा वाटतो. जीवनाचा सच्चा सखा-मैतर वाटतो. म्हणून तर रसिकजनांना, हळव्या मनांना वैशाखाची नेहमीच प्रतीक्षा असते.
 
 
निसर्ग प्रत्येक ऋतूत विविध रंगांची उधळण अगदी मुक्तहस्ते करीत असतो. प्रत्येक ऋतूचे निरीक्षण केल्यास निसर्गाची विविध रूपे आपल्याला भूल पाडतातच! मग...ती शिशिराची पानगळ असो, जर्द पिवळे हेमंताचे सुवर्णवैभव असो, वसंताचा शृंगार साज असो किंवा श्रावणातील ऊन-सावलीचा खेळ! प्रत्येक ऋतूचे लावण्य न्याहाळताना निसर्ग एक मोठा किमयागार वाटतो. निसर्गाने उधळलेल्या या विविध रंगांपैकी कोणाता रंग अधिक मोहक किंवा कोणत्या ऋतूचे सौंदर्य अधिक श्रेष्ठ, असा प्रश्न कोणी विचारलाच तर त्याचे उत्तर अगदी अचूकपणे सांगता येणार नाही. कारण, निसर्गाचा प्रत्येक रंग सुंदर, प्रत्येक छटा मोहक, प्रत्येक रचना अप्रतिम आणि म्हणून, प्रत्येक ऋतू आणि त्याचे रंगही तेवढेच सुंदर! तेवढेच वेड लावणारे! तेवढेच अप्रतिम.
अगदी रखरखती उन्हे कोणालाच नको असतात. गुलाबी थंडी आल्हाददायक; पण... थंडीचे बोचरेपण नको असते. एकूणच काय तर आपल्या सोयीचे असणारे सगळे आवडणारे, अशी सर्वसामान्य मानवी प्रवृत्तीच आहे, असे म्हणावे लागेल. त्याला कदाचित कोणी अपवादही असणार नाहीत.
निसर्गाच्या सौंदर्याचा खराखुरा आस्वाद घेण्यासाठी, निसर्गाला अगदी जवळून बघण्यासाठी त्याचे दिमाखदार वैभव न्याहाळण्यासाठी एक रसिक हृदय, सौंदर्यपूर्ण नजर, त्याच्याशी समरस होणारे मन आणि संवाद साधणारे अंतर्मन असणे अपरिहार्य असते. इतके असले की, निसर्ग आपुला सखासोबतीचा प्रत्यय तर येतोच; पण त्याच्या वैभावाचे प्रत्येक पैलू आपल्या ऐश्वर्यपूर्ण लावण्यासह आपल्याला अनुभवता येतात. मग...एखादी वैशाखातली दुपार का असेना! वैशाखातही निसर्ग ऐन भरात असतो, आपल्या संपूर्ण लावण्यासह ऐटीत उभा असतो. विविध रंगछटांसह हसत असतो. या लावण्याचा आस्वाद घ्यायचा असेल, तर वैशाखातील तीव्र झळा सोशीत पावले जंगलाकडे वळविलीत तर वैशाखाच्या सौंदर्याने उन्हाची काहिली कुठल्या कुठे पळून जाते. वैशाखउन्हे प्राशित उभ्या असलेल्या पर्वतराजी व चटक फुलांनी डवरलेली झाडे आपल्या डोळ्यांचे पारणे फेडून जातात. पावले क्षणभर थबकतातच आणि नजर पुन्हा पुन्हा मागे पडलेल्या वृक्षांचे सौंदर्य टिपायला मागे वळते. मनाला याक्षणी एकच प्रश्न पडतो, की वैशाखाच्या विखारातही फुलण्याचे इतके सामर्थ्य या वनश्रीमध्ये कुठून येते?
वाटेने चालताना मोहांची निष्पर्ण झालेली झाडे लालसर पालवीने आपल्या डेरेदार बांध्यांसह दिमाखात उभी असतात. पिंपळपानांची सळसळ म्हणजे हळवी स्पंदने, तर वटवृक्षाची भरगच्च सावली म्हणजे एक सुखद अनुभूती असते. पळस आणि सावरीचे रंग हरवले असले, तरी त्याची उणीव आंबा, बाभूळ, कॅशिया, बहावा, कडुनिंब यांसारख्या हिरव्यागार झाडांनी भरून काढलेली असते. आंब्याला लगडलेल्या कैºयांचे झुंबर, कडूनिंबाला झुलणाºया पोपटीसर पिवळ्या निंबोण्या, बाभळीचा हिरवागर्द जाळीदार पिसारा आणि मधून-मधून डोकावणारी तपकिरी-पिवळे तुरे खोऊन उभी असलेली कॅशियाची झाडे आपल्या नजरा खिळवून ठेवण्यास पुरेशी असतात; पण...इतके मर्यादित आणि तोकडे लावण्य असणारा..., ‘वैशाख’, विखारी कसा असू शकतो? वैशाख तर मला नेहमीच ग्रीष्मात हसणारा, उन्हांची फुले करणारा, भरभरून बहरणारा, रंगांची मुक्तहस्ते उधळण करणारा, सौंदर्याचे मुग्ध लेणे ल्यायलेला, भान विसरायला लावणारा एक श्रीमंत ऋतू वाटतो. कधी-कधी एखादा योगी-साधक वाटतो. आपल्या साधनेत मग्न असणारा, शांत, संयमी, अटळ! आपल्या ध्येयप्राप्तीसाठी जळत राहणारा, तर कधी महान त्यागी! आपले सर्वस्व देऊन पुढचे वैभव फुलविणारा, जपणारा! वसुंधरेला शीतलता प्रदान करण्यासाठी स्वत: भस्म फासणारा, सृजनाच्या शृंगारासाठी अविरत झटणारा, पांथस्थांना सावली देणारा आणि पोळलेल्या मनांना शांततेचे धडे देणारा! यातील सगळीच रूपे मनाला भावणारी आणि विचार करायला लावणारी आहेत.
लाल-पिवळ्या आणि हिरव्या रंगांशी वैशाखाचे अगदी सख्य असल्याचे नेहमीच जाणवते. कदाचित त्यालाही हे रंग अधिक आवडत असावेत आणि का आवडू नयेत? हे तिन्ही रंग सृष्टीचे मूळ रंग आहेत. आकाशाच्या निळाईला पेलण्याचे सामर्थ्य, सूर्यकिरणांच्या प्रखर झळा सोसण्याची ताकत आणि उष्ण वाºयाचे झोत झेलण्याची क्षमता कदाचित या रंगांमध्येच तर आहे. म्हणूनच हे रंग सदैव, सदाकाळ, सर्वथा, सर्वार्थाने आजतागायत टिकून आहेत. अगदी अंगाची लाही-लाही होणाºया, अंगार फुलविणाºया वैशाखातही! वैशाखाच्या लावण्यात भर पडते ती लालचुटुक गुलमोहराच्या छत्र्यांची. अगदी खेड्यांपासून शहरापर्यंत ही झाडे सर्वांनाच प्रिय, हिरव्यागर्द पानांनी गच्च भरलेला गुलमोहर आपल्या पिवळसर छटा असलेल्या लालबुंद फुलांच्या गुच्छ्यांसह फुलतो, तेव्हा इतर सगळ्या फुलांचे लावण्य थिटे वाटू लागते. माथ्यावर लाल झुबक्यांचे मुकुट मिरविणे एवढेच पुरेसे वाटत नसावे की काय, म्हणून झाडांच्या पायथ्यांशी अगदी गोलाकार पडलेला फुलांचा सडा म्हणजे आपल्या स्वागताला अंथरलेला लालसर गर्भरेशमी गालिचाच. आताच्या शब्दात सांगायचे झाल्यास विशेष पाहुण्यांसाठी असलेली ‘रेड कार्पेट ट्रिटमेंट’़ दमलेल्या वाटसरूंचे मनापासून स्वागत करण्यासाठी असणारी तत्परता याचे जणू ते प्रतिकच. फुललेला गुलमोहर बघितला, की मला हॉटेलच्या लॉनवरील रंगीबेरंगी कापडी छत्र्या आणि त्याखाली बसून चहा-कॉफी-कोल्डिंÑक्सचा आस्वाद घेणारे पर्यटक आठवतात. ज्यासाठी त्यांनी पैशात किंमत मोजलेली असते. पैशाअभावी सगळ्यांनाच या छत्र्यांखाली बसून आनंद लुटता येत नाही, असे वाटून जाते; पण...दुसºया क्षणीच ही कल्पना विरून जाते आणि खुजी वाटू लागते. कुठे लॉनवरील कृत्रिम छत्र्या आणि कुठे गुलमोहराची लालचुटुक डेरेदार छत्री! कुठे ते बेगडी आणि उसना आनंद उपभोगणारे चेहरे आणि कुठे घामेजलेल्या अंगावरून जाणारी वाºयाची झुळूक आणि त्यातील गारव्यामुळे चेहºयावर उमटलेला आनंद! छे...तुलनाच होऊ शकणार नाही. 
जंगलातून भटकंती करताना जरा पुढे गेलं, की सोनपिवळ्या झुबक्यांनी बहावा अंगभर फुललेला असतो. पातळ पारदर्शक पिवळ्याधम्म पाकळ्या उन्हे पिऊन-पिऊन इतक्या तेजस्वी आणि उजळून सुंदर झालेल्या असतात, की या लावण्याचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात. संपूर्ण झाडाला लगडलेली पिवळी फुले आणि टोकाला पोपटीसर कडा असलेल्या पिवळसर गोल-गोल मण्यांसारख्या कळ्या असलेली झुंबरे म्हणजे आपल्या स्वागतासाठी बांधलेले आकाशकंदीलच, नव्हे प्रकाशकंदील म्हणणे अधिक सार्थ ठरेल. बहावाचे लावण्य म्हणजे वैशाखाच्या लावण्याचा पूर्ण साज असे मला नेहमीच वाटते. केदारनाथाच्या मंदिराजवळून पाहिलेला, पहिल्या सूर्यकिरणांनी चमकणारा हिमालयाचा माथा आणि रानातील फुललेला बहावा यात मला नेहमीच का कोण जाणे...पण खूप साधर्म्य वाटते. फरक इतकाच, की हिमालय खूप लांब, तर बहावा अगदी माझ्या समोर उभा असतो. फुललेल्या बहाव्याचे पूर्ण सौंदर्य बघण्यासाठी मान उंच करून बघताना ती खाली आणूच नये, असे वाटत राहत ओठांवर एक मंदस्मित आपोआप उमटते, नजरेत तृप्ततेची चमक आणि तोंडातून अस्फुट शब्द निघतात वाह... बहावा...!
वैशाखाच्या भरासह बहाव्याच्या फुलण्याची जणू पैज लागली असते. सूर्याला आव्हान देत तो फुलतो आणि म्हणतो टाक किती अंगार टाकतोस, त्या आगीची मी सुवर्णफुले करून टाकीन आणि बरेचदा तसे घडते. हळूहळू बहाव्याला हातभर लांब, काळ्या रंगाच्या शेंगा लागतात आणि पुढच्या ऋतूपर्यंत बहावा संन्यस्त होतो. पांढुरका चंदेरी रंग लेवून येनाची झाडे नव्याने यौवनात आल्यासारखी दिमाखात उभी असतात. त्याची चटक हिरवी पाने सुंदर चित्राप्रमाणे नेहमी ताजी आणि टवटवीत वाटणारी. 
वैशाखाच्या वैभवात आणखी भर पाडण्यासाठी करंजाची झाडे आपल्या वेगळ्या लावण्यासह फुललेली असतात. वैशाखात या झाडांना येणारी भोवºयासारखी पांढरी टोपी घातलेली तपकिरी नाजूक फुले आणि त्यांचे भूईसडे म्हणजे रस्त्यांची व रानाची शोभा वाढविणारी अनोखी आरासच असते. सोबतीला असतात ती रानभर फुललेली पांढºया गुच्छांची 
कुडाची फुले, जणू कुणीतरी जागोजागी पुष्परचना करून ठेवली की काय? दूर टेकडीवर नजर टाकताच विविध रंगाच्या छटांनी वेगवेगळी झाडे आपले स्वतंत्र अस्तित्व दर्शविण्याचा पूर्ण प्रयत्न करीत असतात. ही रंगसंगती बघण्याचा मोह आवरता येत नाही. निसर्गपटलावर स्वत: विश्वकर्त्याने चितारलेले एक अद्भुत चित्रच, ज्याचे सौंदर्य व जिवंतपण उन्हात आणखी सजीव झाल्यासारखे वाटते. 
उन्हाच्या काहिलीत हिरवाइचा साज लेवून उभी असलेली झाडे म्हणजे डोळ्यांना लाभणारा एक सुखद गारवाच असतो, थकलेल्या मनांना उभारी देणारा एक आशेचा किरण! रानात मुक्तहस्ते उधळलेल्या लाल-पिवळ्या रंगांची उधळण म्हणजे चैतन्याचा बहरच! प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत अथक चालण्याचा जणू मूक पण प्रेम संदेश. 
माध्यान्हकाळी झाडांच्या बुंध्यांशी लीन होणाºया सावल्या म्हणजे मनाचा मनाशी होणारा संवादच! लीनतेचा जिवंत साक्षात्कार उष्ण झळा सोसूनही अंगभर फुलण्याचे सामर्थ्य ठेवणारी वनश्री म्हणजे पुढच्या ऋतूच्या शृंगारासाठी केलेली धडपड व तयारी असेच म्हणावे लागेल.  मधूनच कानावर पडणारे कोकिळेचे कूजन या वैशाख वैभवात गोड सुरांची भर पाडणारे असते. 
वैशाखातील दुपार म्हणजे अद्भुत लावण्याचा साक्षात्कार करून देणारा प्रहर, जीवनाचा खºया अर्थाने जवळून परिचय करून देणारी घटिका, निसर्गाच्या सामर्थ्याचा मूर्तिमंत साक्षात्कार, दिव्यत्वाची दिव्य प्रचिती, आत्मचिंतनाचे बळ देणारा योगगुरू आणि जळतानाही हसण्याचे बळ देणारी क्षमता! वैशाखाची दुपार म्हणजे लावण्याची उत्कट सीमा, सोसण्याच्या कळा प्राशून फुललेले यौवन, मनभर फुलण्याचे संकेत देणारा देवदूत, उष्ण वाºयासह आपल्या अस्तित्वाचा बोध करून देणारा मादक फुलोरा त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे म्हणजे जीवन सुंदर आहे म्हणायला लावणारी भावना फुलविणारे क्षण आणि म्हणूनच की काय, वैशाख विखारी असूनही तो मोहक, लोभसवाणा वाटतो. वैशाख उपेक्षित असूनही तो अधिक जवळचा वाटतो. जीवनाचा सच्चा सखा-मैतर वाटतो. म्हणून तर रसिकजनांना वैशाखाची नेहमीच प्रतीक्षा असते.
(लेखिका प्राध्यापिका आहेत.)

Web Title: Vaisakha Vaibhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.