एका मिठीचं मोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 06:02 AM2021-05-16T06:02:00+5:302021-05-16T06:05:06+5:30
त्या दिवशी एड्रियाना सिल्व्हा डी कोस्टा नावाच्या नर्सला आजींचा सक्तीचा एकांतवास पाहावला नाही. म्हणून तिने एक प्लास्टीकचा पारदर्शक पातळ पडदा पैदा केला.. हग कर्टन! आणि कोरोनाच्या भीतीला दूर ठेऊन एकेकट्या, उदास रोझा आजींना त्या पडद्याआडून घट्ट मिठी मारली.
(संकलन : शर्मिष्ठा भोसले)
५ ऑगस्ट, २०२०. ब्राझीलच्या साओ पाअलो शहरातलं व्हिव्हा बेम केअर होम. रोझा लुझिया लुनार्डी या ८५ वर्षांच्या कोरोनाग्रस्त आजी इथे राहात होत्या. रोझा आजींना तब्बल पाच महिने मानवी स्पर्श आणि उबदार मिठीविना काढावे लागले. कारण मार्चमध्ये कोरोनाने रुद्रावतार धारण केल्यानंतर ब्राझीलमधील सरकारने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ज्येष्ठ नागरिकांच्या केअर होम्सचे दरवाजे नातेवाईक आणि व्हिजिटर्ससाठी बंद केले होते.
त्या दिवशी एड्रियाना सिल्व्हा डी कोस्टा नावाच्या नर्सला आजींचा हा सक्तीचा एकांतवास पाहावला नाही. म्हणून तिने एक प्लास्टीकचा पारदर्शक पातळ पडदा पैदा केला.. हग कर्टन! आणि कोरोनाच्या भीतीला दूर ठेऊन एकेकट्या, उदास रोझा आजींना त्या पडद्याआडून घट्ट मिठी मारली.
मृत्यूच्या भीतीशी झगडणाऱ्या जगाच्या सुदैवाने हा अमूल्य क्षण विरून गेला नाही, कारण एक डॅनिश फोटोग्राफर तिथे उपस्थित होता : मॅड्स निसेन. त्याने चपळाईने हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपला! किती काही आहे या गोठलेल्या क्षणात! आजच्या निर्दय, असुरक्षित आणि अधांतरी काळात दिलासा देणारं.. सगळं काही कधीच संपत नसतं, याची उमेद देत भांबावल्या मनाला हळुवार स्पर्श करणारं असं काहीतरी.. शब्दात सांगता न येणारं!
‘द फर्स्ट एम्ब्रेस’ असं शीर्षक असलेल्या मॅड्स निसेनच्या या छायाचित्राला २०२१चा ‘वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर’ हा सन्मान मिळाला आहे. जागतिक स्तरावर सन्मानाच्या या स्पर्धेच्या ज्यूरीजपैकी एक असलेले केविन ली म्हणतात, ‘या फोटोकडे तुम्ही टक लावून पाहाल, तर तुम्हाला त्यात फुलपाखराचे पंख दिसतील. हे पंखच आज आपल्याला हवे आहेत.’