वसुबारस आणि वाघबारस
By admin | Published: November 8, 2015 06:06 PM2015-11-08T18:06:51+5:302015-11-08T18:06:51+5:30
हरातल्या काही लोकांना वाटतं, दिवाळीत आदिवासींना फराळ वाटावा म्हणून मग ते कृत्रिम हास्य आणि
Next
शहरातल्या काही लोकांना वाटतं,
दिवाळीत आदिवासींना फराळ वाटावा
म्हणून मग ते कृत्रिम हास्य आणि
टेम्पोत प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये बांधलेले
निष्प्रेम लाडू आणि चिवडा घेऊन येतात, वाटपाचे फोटो काढतात, आणि
समाजोद्धार केल्याचे, मदत केल्याचे समाधान मिरवतात. पण त्यातून आदिवासींना काय फायदा होतो?
- काहीच नाही!
मग या दिखाऊ मदतीचा काय उपयोग?
दिवाळी तोंडावर आली आहे. या सुमारास अनेक लोकांचे आम्हाला फोन येतात. ‘‘आदिवासी पाडय़ात आम्हाला फराळ वाटायचा आहे. त्यांना बिचा:यांना फराळ कधी खायला मिळणार? आमचा आनंद त्यांच्यासोबत वाटून घ्यायचा आहे इ. इ.’’ हेतू स्तुत्य असतो. भावना प्रामाणिक असते, पण चुकीच्या गृहीतकावर आधारित असते. आदिवासी भागातली दिवाळी वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते, पण मोठय़ा आनंदात साजरी केली जाते. शहरातले भिकारी जसे व्यवसायाची गरज म्हणून करुण चेहरे आणि फाटके कपडे घालून बसतात, तशी आदिवासी भागातली परिस्थिती नसते. कपडे कमी असतात, पैसेही कमी असतात, पण माणसं गरीब आणि करुण नसतात.
अरण्यानी आणि वसुंधरा या दोन्ही देवता उर्वरा असतात, भरभरून प्रसवत असतात. ऋग्वेदात अरण्यानीचे स्तवन आहे, ‘‘आम्ही तुङयावर नांगर धरत नाही, तरीही तू बहुत प्रकारचे अन्न देतेस, असंख्य सुगंध देतेस, अनेक खाण्यायोग्य प्राणी आणि वनस्पती तू धारण करतेस, अशा अरण्यानीचे आम्ही स्तवन करतो’’. अरण्यानीची उपासना नाना नावांनी आणि रूपांनी आदिवासी समाज करतो. दिवाळीच्या चतुर्दशीच्या आधी दोन दिवस ‘वाघबारस’ हा सण येतो. बारस म्हणजे बारावी तिथी म्हणजे द्वादशी. वाघबारस ही वाघदेवाची तिथी. त्या दिवशी वाघदेव किंवा वाघोबा देवाची पूजा करायची. त्याला कोंबडय़ा-बक:याचा नैवेद्य द्यायचा. गावातल्या माणसांचे आणि गुरांचे जंगलातल्या संकटांपासून रक्षण कर असे म्हणायचे. गायी पाळणारा समाज ‘वसुबारस’ नावाचा दिवस पाळतो, तसेच जंगलात राहणारा समाज ‘वाघबारस’ पाळतो. ही वाघबारस ठाणो जिल्ह्यापासून उत्तरेला गुजरातच्या डांग व तापी जिल्ह्यांत आणि तिथून पूर्वेकडे नर्मदेच्या दोन्ही बाजूंस मध्य प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांत पाळली जाते. आदिवासी ही काही एक जात किंवा एक समाज नाही. वनांत आणि डोंगरात राहणा:या भिल्ल, वारली, कातकरी, कोरकू, गोंड अशा महाराष्ट्रातल्या 48 जमातींचे लोक यात येतात. त्यांची आपापली भाषा, काही रीती आणि सण साजरे करण्याच्या पद्धती आहेत. वाघबारशीप्रमाणोच नवीन अन्नाची पूजा हाही सण सर्वांमध्ये आहे. वारली समाजात पाळ धरण्याची किंवा वर्जायची पद्धत आहे. ठरावीक महिन्यांमध्ये निसर्गातले आणि शेतातले काहीही नवीन उगवलेले खायचे नाही - असे हे व्रत असते. नवीन उगवलेल्या सगळ्याचा नैवेद्य निसर्गातल्या देवांना दाखवून मग दिवाळीच्या सुमारास या व्रताची सांगता होते. एकमेकांना नवी चवळी आभु करंद (कांदफळे) भेट देऊन लोक दिवाळीपहाट साजरी करतात. काकडीच्या रसात पीठ भिजवून हळदीच्या पानात शिजवून केलेली गोड सावळी भाकरी हे दिवाळीतले पक्वान्न असते. एक दिवस गोड दिवाळी झाली, की दुस:या दिवशी तिखट दिवाळी होते. छान कोंबडीचे जेवण असते. माणसाला जे आवडते तेच तो देवाला देतो.
गणपतीपासून म्हणजे भादव्यापासून शेतीतल्या कामाचा ताण कमी झालेला असतो. तिथपासून गावात तारप्याचे सूर घुमायला लागतात. तारपा हे दुधीचा तुंबा, बांबूच्या दोन नळ्या आणि शिंदीच्या पानांचा कर्णा हे भाग मेणाने चिकटवून केलेले पुंगीसारखे वाद्य. तारप्याचे सूर अचाट असतात. तारपकर वाजवायला लागला की सहा सहा तास अखंड वाजवतो. सतत गाल फुगवलेले असतात आणि त्याच वेळी तो श्वासही घेत असतो. एक वेगळाच प्राणायाम असतो तो! लोकही नाचायचे थांबत नाहीत. ढोल किंवा डफासारखे कोणतेही तालवाद्य नसताना केवळ सुरांवर अख्खे गाव हातांची साखळी धरून नाचते. हे कुठल्याही संगीतकाराला अचंबित करणारे दृश्य गावगन्ना कॉमन असते. जमिनीकडे पाहून नम्रपणो नाचण्याची आदिवासी रीत आहे. फक्त सुरावर नाचायचे तर एकाग्रता लागते. ती एकाग्रता एका शांत जीवनशैलीतून आलेली असते. दसरा ते दिवाळी या काळात तर नाच अखंड होत असतात. (ज्या गावांमध्ये टीव्ही आले आहेत आणि लोक संध्याकाळी मालिका बघत बसतात किंवा जिथे डीजे लावून एकसुरी गरबे नाचण्याचा मूर्खपणा सुरू झाला आहे, तिथे मात्र तारपा लोपत चालला आहे.)
आपल्याला आवडणारे जेवण, आपल्या शेतातल्या उत्तमोत्तम पदार्थांची देवाणघेवाण, आप्तांच्या भेटी आणि धमाल नाच - अशी सुखे आदिवासी दिवाळीत हात जोडून उभी असतात. यात मधेच शहरातले काही लोक कृत्रिम हास्य आणि टेम्पोत भरून प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये बांधलेले निष्प्रेम लाडू आणि चिवडा घेऊन येतात, वाटपाचे फोटो काढतात, आणि समाजोद्धार केल्याचे समाधान घेऊन परत जातात.. कसा बेरंग होतो ना दिवाळीचा?
आपण ज्यांना मदत करू इच्छितो, त्यांची जीवनशैली कशी आहे, त्यांना कोणत्या गोष्टींमुळे अधिक सुखात जगता येते याचा विचार संवेदनशील मंडळींनी केला पाहिजे. आपण करतो त्या मदतीतून तात्पुरते समाधान (तेही त्यांना नाही, स्वत:ला) मिळणो हाच आपला आनंद आहे काय? याचाही विचार केला पाहिजे. ज्या गोष्टी बीप्रमाणो वाढता फायदा करून देतील, त्याच गोष्टींची मदत देणो सर्वोत्तम. शेतक:याला रोपे द्यायला अनेक लोक उत्सुक असतात. प्रत्यक्षात रोपांची किंमत फार नसते, शेतकरी स्वत:ही रोपे विकत घेऊ शकतो, पाणी नसल्यामुळे तो झाडे लावायला धजावत नसतो. अशा वेळी पाण्याची सोय करून देणो ही उत्तम मदत आहे. रोपे देणो हे तर दिखाऊ झाले. शाळेत जाणा:या आदिवासी मुलांना दप्तरे देणो हे वरवरचे झाले, त्यांना अभ्यासात मदत करणो किंवा त्यांना त्यातली तंत्रे शिकवू शकतील अशा शिक्षकांना प्रायोजित करणो हे अधिक मोलाचे ठरते. आपल्याला खरी मदत करायला जमत नसेल, तर तसे करणा:यांना आर्थिक मदत द्यावी हे उत्तम. स्वत: दिखाऊ मदत करण्यापेक्षा त्यातून समाजाचे जास्त हित साधते. या दिवाळीत हा विचार मंथनच्या वाचकांनी अवश्य करावा.
आमच्या गावांमध्ये लोकांना गोड खायची फारशी सवय नसते. एकदा कोणीतरी पाहुण्याने प्रेमाने बुंदी वाढली सर्वांना. त्याच्यासमोर कोणी काही बोलले नाही. नंतर म्हणाले, पाहुण्याने जेवण ‘बुंदाळले’! तसे आपण कोणाचे जेवण बुंदाळत तर नाही ना, याचे भान ठेवावे म्हणजे झाले.