वर्मी बसलेला घाव
By Admin | Published: October 1, 2016 04:19 PM2016-10-01T16:19:36+5:302016-10-01T16:19:36+5:30
भारतीय सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून तिथल्या दहशतवादी तळांवर हल्ला केला. सात तळ नेस्तनाबूत केले आणि अनेक अतिरेक्यांचाही खातमा केला.हे सत्य पचवता न आल्याने पाकिस्तान फारच सैरभैर झाला आहे. यावर नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी हे तर त्यांना कळलेले नाहीच, पण ‘आता काय करावे?’ यासाठीही त्यांची पळापळ सुरू झालेली आहे.
दिलीप फडके
भारतीय सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून तिथल्या दहशतवादी तळांवर हल्ला केला. सात तळ नेस्तनाबूत केले आणि अनेक अतिरेक्यांचाही खातमा केला.हे सत्य पचवता न आल्याने पाकिस्तान फारच सैरभैर झाला आहे. यावर नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी हे तर त्यांना कळलेले नाहीच, पण ‘आता काय करावे?’ यासाठीही त्यांची पळापळ सुरू झालेली आहे.एकीकडे ते भारताला धमक्या देताहेत, ‘बदल्या’ची भाषा करताहेत. दुसरीकडे युनोकडे तक्रार करताहेत.तिसरीकडे संयुक्त संसदीय समितीची बैठक बोलवताहेत..घाव अगदीच जिव्हारी लागलेला आहे..पाकमध्ये आता चर्चा मोदींच्या नेतृत्वशैलीची आणि इस्लामाबादच्या कचखाऊ परराष्ट्र धोरणाची..
एकाकी एकटेपण..
मोदींनी सूत्रे हाती घेतल्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणांमध्ये उघड बदल झालेला आहे. पाकिस्तानातही त्यासंदर्भात तुलना होतेय.तिथली माध्यमे पाकच्या धोरणावर खडसून टीका करताहेत. जागतिक स्तरावर एकटेपणाचा अनुभव पाकिस्तानला आता येतो आहे हे तिथल्याच तज्ज्ञांचे मत आहे. भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकचे चीनसारख्या त्याच्या नव्या मित्रानेसुद्धा उघड समर्थन केलेले नाही. या हल्ल्यामुळे पाकला जेवढी जखम झालेली असेल त्यापेक्षाही जास्त जिव्हारी लागणारे असे हे एकटेपण आहे. पाकच्या राज्यकर्त्यांना तर ते विलक्षण खुपणारे असेच आहे.
पठाणकोट आणि त्यानंतर उरीमध्ये थेट सैन्यतळांवर हल्ले झाल्यानंतर गल्लोगल्लीच्या नेत्यांनी आणि स्वत:ला संरक्षणतज्ज्ञ समजणाऱ्या लोकांनी स्वत:कडे मोदींच्या सल्लागाराची भूमिका घेत त्यांनी काय करावे याचे सल्ले द्यायला सुरुवात केली होती. मग त्यापैकी काहीजणांनी छप्पन इंच छातीचा संदर्भ देत मोदींमध्ये आणि मनमोहनसिंगांमध्ये फारसा फरक नाही अशी टीका करायला सुरु वात केली होती. त्यात मोदींचे विरोधक होतेच, पण सध्या सरकारी विरोधक अशी नवी आणि अजब भूमिका करणारे आणि स्वत:ला कडेकोट बंदोबस्तात ठेवणारे नेतेदेखील होते. ह्या सगळ्या गदारोळात मोदी स्वत: मात्र शांत होते. भाजपाच्या अधिवेशनाच्या वेळी कोझिकोडेला केलेल्या त्यांच्या भाषणातदेखील त्यांची भाषा नरमाईचीच होती. मात्र, सैन्य बोलत नाही ते योग्यवेळी योग्य कृती करण्याचे काम करते, असे सूचक विधान त्यांनी केले. मग सध्या बोकाळलेल्या सोशल मीडियात मोदींच्या पूर्वीच्या एका मुलाखतीची क्लिप फिरायला लागली. ‘पाकिस्तान को उसीकी भाषा में जबाब देना चाहिये’ असे ते त्यावेळी म्हणाले होते आणि मग आता ते नरमाईची भाषा का बोलत आहेत याची चर्चा सुरू झाली होती. आणि अखेरीस परवा आपल्या सैन्यदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून तिथल्या अतिरेक्यांच्या तळांवर हल्ला केला आणि ते तळ नेस्तनाबूत केले. आपल्याकडे लोकांचे मत बदलायला वेळ लागत नाही. जे कालपर्यंत मोदींवर टीका करीत होते त्यांनीच आज त्यांच्या अभिनंदनाचे फोन करायला सुरु वात केली होती. हे जणू ‘आपणच मोदींना सांगितलेले होते’ अशा थाटात चर्चा सुरू झाल्या. पण हे असे होणारच.
मोदींच्या शपथविधीसाठी सार्कच्या राष्ट्रप्रमुखांना निमंत्रित करण्यापासून नवाझ शरीफ यांच्या लग्नघरी (त्यांच्या नातीच्या लग्नानिमित्त) अचानक त्यांना भेटण्यासाठी पाकिस्तानला जाण्याच्या निर्णयापर्यंत मोदींनी पाकच्या नेत्यांशी सलोख्याचे आणि बरेचसे वैयिक्तक स्तरावरचे संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. निदान जगाला तसे दिसावे यासाठी त्यांचा हा खटाटोप होता. हे सारे पाकच्या नेतृत्वाच्या आकलनशक्तीच्या बाहेरचे होते. मोदींच्या विदेश दौऱ्यांवर टीका होत होती; पण एका ठिकाणी त्यांनीच सांगितल्याप्रमाणे जागतिक स्तरावर ते नवे होते. त्यांची स्वत:ची ओळख निर्माण व्हायची होती. त्यामुळे मिळेल त्या प्रत्येक संधीचा फायदा घेत ते जगाच्या विविध देशांच्या प्रमुखांशी जवळीक निर्माण करायच्या प्रयत्नात होते. आज जगाच्या स्तरावर पाक एकटा पडलेला आहे अशी चर्चा आहे. ती आपल्याकडे होते आहे यात आश्चर्य नाही. पाकच्या प्रसारमाध्यमांमध्येसुद्धा अशी चर्चा सातत्याने होताना दिसते आहे.
आपण केलेल्या कारवाईच्या अगोदर नवीद अहमद या पाकच्या पत्रकाराने ‘ट्रिब्युन’मध्ये लिहिलेल्या लेखात पाकच्या परराष्ट्र धोरणावर खरमरीत टीका केलेली आहे. ‘पांगळे आणि भावनाशून्य’ अशा शब्दात पाकच्या परराष्ट्र धोरणाचा त्यांनी समाचार घेतला आहे. या हल्ल्याच्या खूप अगोदर जूनमधल्या एका लेखात ‘डॉन’च्या अब्बास नसीर यांनी पाकच्या परराष्ट्र धोरणाला ‘एक फियास्को’ असे संबोधले होते. हे धोरण ठरवणाऱ्यांचा जागतिक स्तरावरच्या आजच्या वेगवेगळ्या विचारप्रवाहांशी कोणताही संबंध नाही हे सांगतानाच सरताज अझीझ आणि राहील शरीफ यांच्यासारख्या अहंमन्य लोकांच्या हाती सत्ता असण्याचा तोटा पाकला जाणवायला लागला आहे असाच या सगळ्या चर्चेचा सूर आहे.
याउलट भारताच्या परराष्ट्र धोरणांमध्ये मोदींनी सूत्रे हाती घेतल्यानंतर उघड बदल झालेला आहे आणि त्यामुळे पाकला आता जागतिक स्तरावर एकटेपणाचा अनुभव येतो आहे हे तिथल्याच तज्ज्ञांचे मत आहे. परवाच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकला जगातल्या कोणत्याही देशाने समर्थन दिलेले नाही. अगदी चीनसारख्या त्याच्या समर्थकानेसुद्धा पाकचे उघड समर्थन केलेले नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. पाकवरच्या हल्ल्यामुळे पाकला जेवढी जखम झालेली असेल त्यापेक्षाही जास्त जिव्हारी लागणारे असे हे एकटेपण पाकच्या राज्यकर्त्यांना विलक्षण खुपणारे असेच आहे.
उरी हल्ल्यानंतर भारतानं झपाट्यानं प्रतिकारवाई केली. पाकच्या लष्करशहांना आपला हा अनुभव वेगळाच वाटला असेल हे नक्की. त्यामुळेच आता तिथे जी चर्चा सुरू झालेली आहे त्यात याअगोदर म्हटल्याप्रमाणे पाकच्या परराष्ट्र धोरणाच्या अपयशाची चर्चा जशी सुरू आहे तशीच मोदींच्या नेतृत्वशैलीची, त्यांच्यावर असणाऱ्या चाणक्याच्या प्रभावाची आणि त्यांच्या मानसिकतेची चर्चादेखील सुरू झालेली आहे.
‘नेशन’मध्ये साजिद झिया यांनी लिहिलेल्या यावरच्या लेखात मोदींची मानसिकता समजून घेण्याची गरज सांगितलेली आहे. आजवरच्या भारताच्या नेत्यांपेक्षा ‘हा माणूस’ वेगळा आहे हे आता पाकमधल्या नेत्यांना आणि इतरांना लक्षात यायला लागलेले आहे. आपल्या विश्लेषणात झिया म्हणतात की, भारताचा ‘डाव’ मोडून काढण्यासाठी पाकच्या राज्यकर्त्यांनी राजनैतिक आणि सामरिक आघाडीवर अधिक जोरकसपणाने काम करण्याची गरज आहे. मोदींच्या कारनाम्यांमुळे पाक-चीन यांच्यात नव्याने होत असलेल्या आर्थिक नातेसंबंधांवर विपरीत परिमाण होऊ शकतो हे सांगत असतानाच, हे असे होणे पाकला परवडणारे नाही हेदेखील तिथले विचारवंत पाकच्या राज्यकर्त्यांना बजावत आहेत असे दिसते आहे. मोदींनी केरळमधल्या आपल्या भाषणात उरीच्या घटनेनंतर पहिल्यांदाच जाहीरपणाने व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवर ‘डॉन’ने अग्रलेख लिहिला आहे. त्यात आजच्या पाकच्या अनेक गफलतींबद्दल या अग्रलेखात स्पष्टपणाने लिहिलेले आहे. मुंबई किंवा पठाणकोट हल्ल्यांच्या सूत्रधारांवरच्या कारवाईला होणारा विलंब किंवा अशी कारवाई करायची टाळाटाळ केली जाण्याबद्दल टिपण्णी करतानाच भारत आणि पाक या दोन्ही देशांनी गरिबीच्या विरोधात लढण्याची मोदींनी आपल्या भाषणात सांगितलेली गरज ‘डॉन’ने विशेष महत्त्वाची मानलेली आहे. अर्थात पाकच्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित होणारी चर्चा ‘पाकच्या’ माध्यमांमधली आहे त्यामुळे त्याची भाषा आणि रोख तसाच असेल हे लक्षात घेऊन त्याचा अर्थ लावला जाणे आवश्यक आहे.
आपल्या कमांडोंनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून कारवाई केल्याच्या घटनेनंतर परिस्थिती बदलणार आहे. आता भारताला पूर्वीसारखे गृहीत धरता येणार नाही हे पाकला लक्षात घ्यावेच लागेल. आपण भारतावर हल्ले करीत राहू आणि भारत शांतपणाने ते सहन करीत राहील हे यापुढे शक्य होणार नाही हे कदाचित पाकच्या राज्यकर्त्यांना लक्षात येईल. पण पाकचे लष्करशहा हे इतक्या सहजपणाने स्वीकारतील असे मानणेदेखील चुकीचे ठरणार आहे.
आता खरी लढाई युद्धभूमीपेक्षा राजनैतिक स्तरावरच होणार आहे हेदेखील लक्षात घेतले पाहिजे. पाकची आर्थिक आणि राजनैतिक कोंडी करणे हे आवश्यक आहेच. भारताशी पंगा घेणे आपल्याला ‘परवडणारे’ नाही हे पाकच्या लक्षात येणे गरजेचे आहे. पण हे काम भारताला एकट्याच्या बळावर साधता येणार नाही. त्यासाठी जगातल्या इतर देशांचा यासाठी सहयोग मिळणे आवश्यक आहे. सार्कच्या बैठकीवरच्या बहिष्कारात ज्या सहजपणाने आपल्याला बांगलादेश, अफगाणिस्तान यांचे सहकार्य मिळाले आहे त्यातच उद्याच्या प्रश्नांची उत्तरे सामावलेली आहेत.
अमेरिकेच्या निवडणुकीत तिथे क्लिंटन यांचा विजय होतो की ट्रम्प जिंकतात यालादेखील याबाबतीत महत्त्वाचे स्थान द्यावे लागणार आहे. ह्या सगळ्या गदारोळात पाकबरोबरच रशियाचा लष्करी अभ्यासाचा कार्यक्रम सुरू राहिला होता हे नजरेआड करता येण्यासारखे नक्कीच नाही.
आता मोदींच्या रूपाने धाडसी पण विचारी नेतृत्व आपल्याकडे आहे हेदेखील दुर्लक्ष करण्यासारखे नक्कीच नाही. त्यामुळे उद्या अनेक नव्या समस्या घेऊन येणार आहे हे जसे खरे आहे तसेच त्या समस्या सोडवण्याची धमक असणारे राजकीय आणि लष्करी नेतृत्व आपल्याकडे आहे इतकी खात्री सामान्य भारतीयाला परवाच्या हल्ल्यांमधून मिळाली असेल हे नक्की.
‘दात’ काढलेत, आता ‘नखे’ दाखवतील!
भारताबरोबर एक हजार वर्षे लढण्याची भाषा काल जसे पाकचे राज्यकर्ते करीत होते तशाच प्रकारे परवाच्या हल्ल्यानंतर त्याचा बदला घेण्याची भाषा आजच पाकचे लष्करशहा करीत आहेतच. पण आपला हा उद्देश साध्य करण्यासाठी ते कोणत्या थराला जातील ते सहज सांगता येण्यासारखे नाही. ‘आपली अण्वस्त्रे शोभेसाठी नाहीत’ अशी दर्पोक्ती त्यांनी केलेली आहेच. लगेचच अण्वस्त्रांचा वापर केला जाईल असे नाही, पण पाकची अण्वस्त्रे दहशतवादी अतिरेक्यांच्या हाती पडू शकतात. पाकचे लष्करशहाच तशी ‘व्यवस्थादेखील’ करू शकतात. पण पाक आपल्यावर हल्ला करेल किंवा ‘एक विचारी राष्ट्र’ या आपल्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होईल या भीतीग्रस्त मानसिकतेमधून आपण बाहेर आलो आहोत हे नाकारता येणार नाही.
जिव्हारी बोचलेला पराभव
पाकच्या अंतर्गत राज्यव्यवस्थेत लष्कराचे स्थान सर्वात महत्त्वाचे आहे. भारताबरोबरच्या आजवरच्या युद्धांमध्ये ‘आपण पराभूत झालोच नव्हतो, उलट आपणच भारताला पराभूत केलेले होते’ अशा मिथकावर आताआतापर्यंत पाकचे प्रशासन विसंबून होते. पण परवा भारतीय फौजांनी चक्क आपल्या हद्दीच्या बाहेर जात अतिरेक्यांचा खातमा केला हे सत्य सहज पचवणे पाकिस्तानला शक्य नाही. ‘असा कोणताही हल्ला झालाच नव्हता’ इथपासून सुरु वात करून नवाझ शरीफ यांनी आपल्या देशावर असा हल्ला केल्याबद्दल संताप व्यक्त करण्यापर्यंतच्या पाकच्या बदलत्या प्रतिक्रिया पाहता राजनैतिक पराभवाबरोबरच पाकला जिव्हारी लागेल असा लष्करी पराभव झाल्याचा अनुभव येणे हेदेखील लक्षणीय आहे. विशेषत: ज्या अचूकपणाने आणि तडफेने, अत्यंत त्वरेने ही मोहीम अंमलात आणली गेली त्याची तुलना केवळ मोसादसारख्या संघटनेच्या आजवरच्या कामाशी होऊ शकते.
(लेखक ज्येष्ठ विश्लेषक आहेत.)