...पुढे हे संपलेच!!!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 06:04 AM2019-04-21T06:04:00+5:302019-04-21T06:05:09+5:30
पूर्वी निवडणुकांच्या जाहीर सभांसाठी लोक नटूनथटून स्वत:हून जायचे. त्यांना गाड्या, घोडे पाठवून आणावे लागत नसे. खाण्यापिण्याची सोय करण्याचीही गरज नसे. बाकी आमिषांचा तर प्रश्नच नव्हता ! पक्ष कोणताही असो, नेत्यांनी सभ्यतेची मर्यादा ओलांडल्याचे दिसत नसे. एकमेकांचे मुद्दे खोडत असताना परस्परांच्या चांगल्या गोष्टींची दखल घेण्याचा खिलाडूपणा आणि जिंदादीली सर्वपक्षीय नेत्यांमध्ये पहायला मिळत होती.
- दिनकर रायकर
सध्या देशात लोकसभा निवडणुकीचा माहौल आहे. विविध पक्षांचे राजकीय नेते देशात भाषणे देत फिरत आहेत. जाहीर सभांच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्याचे काम करत असताना आपल्या पक्षाने सत्तेत असताना काय केले आणि पुन्हा संधी मिळाली तर आपला पक्ष जनतेसाठी, देशासाठी काय करेल हे सत्तेवर असणाऱ्या नेते मंडळी सांगणे अपेक्षित असते तर विरोधकांनी या सरकारने कोणत्या चुका केल्या व त्यात सुधारणा करून देशासाठी आपण काय करू शकतो हे विरोधकांनी सांगणे अपेक्षित असते. यासाठीच तर जाहीर सभांचे आयोजन केले जाते. निवडणुकीच्या तोंडावर विविध पक्ष आपापले जाहीरनामे प्रकाशित करतात, मात्र गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहिला तर जनता अशा जाहीरनाम्यांवर फारसा विश्वास ठेवेनाशी झाली आहे. कारण निवडून आल्यानंतर हे जाहीरनामे बाजूला राहतात. सत्तेवर येणारा पक्ष स्वत: त्यावेळी असणारी राजकीय परिस्थिती पाहून आपला अजेंडा ठरवतो आणि तो राबवतो. त्यामुळे जाहीर केलेल्या अशा संकल्पपत्रांना किंवा घोषणापत्रांना नंतरच्या पाच वर्षात फारसे महत्त्व राहात नाही. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत तशीही जाहीरमान्यात मांडलेल्या विषयांपेक्षा वेगळ्याच विषयांवर चर्चा रंगते. भाषणेदेखील जाहीरनाम्याला सोडून, जात, धर्म, देश आणि फसव्या भूलथापांभोवती फिरताना गेल्या काही वर्षातल्या निवडणुकांच्या काळातील जाहीर सभा पाहिल्या की जाणवते.
एक काळ असा होता की, निवडणुकांच्या जाहीर सभांसाठी लोक नटून-थटून स्वत:हून जायचे. जाताना सभेसाठी येणारा नेता कोणत्या विषयावर बोलणार आहे, अमुक शहरात त्यांनी कोणते मुद्दे मांडले आहेत, आपल्याकडे ते काय बोलतील याची चर्चा होत असे. सभा संपल्यानंतरदेखील त्या वक्त्यांनी केलेल्या भाषणातील मुद्द्यांवर लोक चर्चा करायचे. माध्यमांमधून त्यावर स्फुटे, लेख लिहिले जात असत. एवढा त्या सभेचा सर्वत्र परिणाम दिसून येत असे. वक्त्यांमध्ये एकमेकांचे मुद्दे खोडत असताना एक दुसऱ्यांच्या चांगल्या गोष्टींची नोंददेखील घेतली जात असे. हा खिलाडूपणा आणि जिंदादीली त्यावेळी सर्वपक्षीय नेत्यांमध्ये पहायला मिळत होती.
याचे अगदी समर्पक उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यानंतर दिल्लीत उसळलेल्या दंगलीच्या दरम्यान, सरसंघचालक गोळवळकर गुरुजी आणि महात्मा गांधी यांच्या भेटीचे देता येईल. दंगलीत मुस्लीम लोकांवर अत्याचार होत होते तेव्हा महात्मा गांधी यांनी गोळवलकर गुरुजींकडे तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यावर गुरुजी म्हणाले होते, आम्ही मुस्लिमांना मारण्याच्या विरोधात आहोत, तुम्ही माझी भूमिका सगळ्यांना सांगू शकता ! या संवादानंतर सायंकाळच्या प्रार्थना सभेत महात्मा गांधी यांनी गोळवलकर गुरुजींची ही भूमिका मांडली होती. कालांतराने पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना लिहिलेल्या पत्रात या घटनेचा उल्लेख केला. गांधी यांनी गोळवलकरांचे म्हणणे मला पूर्णत: पटलेले नव्हते, असे आपल्याला सांगितल्याचेही नेहरुंनी त्यात म्हटले होते. हा प्रसंग जरी निवडणुकांच्या जाहीर सभांशी संबंधित नसला तरीही तो येथे सांगण्याचा मतितार्थ एवढाच की, देशासमोरील कोणत्याही प्रश्नावर विरोधकांमध्ये भेटीगाठी होत असत व त्यात विचारांचे आदानप्रदानही होत असे. ती निखळता आता राहिलेली नाही.
निवडणूक काळात होणाºया जाहीर सभांसाठी लोकांना कधीही गाड्या, घोडे पाठवून आणावे लागत नसे. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करण्याचीही गरज नसायची. लोक स्वत:हून यायचे. त्यांना कसल्या आमिषांची गरज नसायची. नेते देशासाठी काय करणार आहेत हे ऐकायला लोक स्वत:हून येत असत. पंडित जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण, मोरारजी देसाई, अटलबिहारी वाजपेयी, एस.एम. जोशी, मधू लिमये, मधू दंडवते, श्रीपाद अमृत डांगे, जॉर्ज फर्नांडिस, बाळासाहेब ठाकरे, वसंतराव नाईक या नेत्यांच्या सभा श्रोत्यांसाठी पर्वणी असायच्या. नेहरूंच्या काळात कधीही काँग्रेसचा पराभव झाला नाही. पण नेहरूंनी किंवा त्या काळातल्या कोणत्याही काँग्रेसी नेत्यांनी कधी विरोधकांचा पाणउतारा करणारी भाषणे केली नाहीत. आपल्याला काय करायचे आहे, देशाची प्रगती कशी करायची आहे हेच सांगण्यावर त्यांचा भर असायचा. विरोधी पक्षांनीही काँग्रेसवर टीका करताना सभ्यतेची पातळी कधीही सोडलेली पहायला मिळाली नाही. पुढे इंदिरा गांधींचा काळ आला, त्याहीवेळी त्यांना कधी विरोधकांवर जहरी टीका करावी लागली नाही. १९७१ साली गरिबी हटाव आणि बँकांचे राष्ट्रीयीकरण या दोन मुद्द्यांवर त्यांना प्रचंड बहुमत मिळाले. पण आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत त्यांच्या भाषणांची गर्दी ओसरली मात्र त्यांनी त्याहीवेळी आपल्या भाषणातून विरोधकांवर जहरी टीका कधीच केली नाही. सभ्यतेच्या मर्यादेत त्यांची भाषणे होत असत.
पुढे राजीव गांधी यांच्या राजकीय सभांना अलोट गर्दी होऊ लागली. त्यांच्या अपघाती निधनानंतर सोनिया गांधी यांच्या सभांना गर्दी पहायला मिळू लागली. एका सभेत तर प्रचंड पाऊस पडत असताना लोक खुर्च्या डोक्यावर घेऊन भाषणे ऐकत उभे राहिलेले मी पाहिलेले आहेत. त्याहीवेळी लोकांना आणावे लागत नसे. त्याच काळात अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्याही सभांना गर्दी होत असे; पण वाजपेयी यांनी कधी दुसºयांना कमी लेखणारी भाषणे केली नाहीत.
अडवाणींच्या काळात मात्र हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरपणे पुढे आणला गेला. रथयात्रा काढली गेली. याचवेळी शिवसेना आणि भाजपची युती झाली. टोकाची भाषणे सुरू झाली आणि निवडणुकांच्या सभांचा नूर तेथून पालटण्यास सुरुवात झाली. पुढे बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्वत:च्या भाषणांमधून विरोधकांची यथेच्छ निंदानालस्ती सुरू केली. त्यांच्या शेलक्या विशेषणांनी अनेकांना घायाळ केले तर अनेक नेत्यांना त्यांनी दिलेली विशेषणे कायमची चिकटली. त्याच सभेत त्यांनी विरोधकांच्या नकला करून दाखवणे सुरू केले. तो प्रकार त्यावेळी नवीन होता. लोकांना काय दिले म्हणजे लोक उत्स्फूर्त प्रतिसाद देतात याची नाडी बाळासाहेबांना सापडली होती. ज्या टोकाला जाऊन त्यांनी भाषणे केली त्याची बरोबरी त्यावेळी अन्य कोणत्याही नेत्याला कधीच करता आली नाही.
याच काळात शरद पवार, प्रमोद महाजन, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, आर.आर. पाटील हे नेते क्राउड पुलर म्हणून ओळखले जाऊ लागले. स्वत:च्या ताकदीवर लाखाची सभा घेणारे नेते अशी त्यांची ओळख झाली. पण शरद पवार वगळता उरलेले नेते दुर्दैवाने अकाली काळाआड गेले.
आता काळ बदलला आहे. भाषणांची पातळी दिवसेंदिवस घसरत चालली आहे. एकमेकांची निंदानालस्ती करणे, खालच्या पातळीवर जाऊन कोणताही पुरावा नसताना वाट्टेल ते आरोप करणे, समोरच्या व्यक्तीने उपस्थित केलेल्या प्रश्नांचे उत्तर आपल्याकडे नसले किंवा ते देता येणे शक्य नसले की त्या नेत्यावर व्यक्तिगत निंदा नालस्तीचे हल्ले चढवणे असे प्रकार सुरू झाले आहेत.
या निवडणुकीत क्राउड पुलर नेता अशी ओळख फक्त राज ठाकरे यांना मिळवता आली. त्या खालोखाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा नंबर. नव्या पिढीत धनंजय मुंडे हे सभा गाजवणारे नाव म्हणून पुढे आले. काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये सगळ्यात जास्त मागणी असणाºया नेत्यात धनंजय यांचे नाव आहे. आता आयाराम गयारामांचा जमाना आहे. राजकीय स्वार्थ हेच ध्येय ठेवून नेते कपडे बदलण्याप्रमाणे पक्ष बदलू लागले. त्यामुळे भूमिका, विचार यांना महत्त्वच उरले नाही. त्यामुळे सभांना होणारी गर्दी ही कमी होऊ लागली.
...आता सगळा जमाना परसेप्शनचा आला आहे. आपली सभा किती चॅनलवर लाइव्ह दाखवली जाते याला महत्त्व येऊ लागले. त्यासाठी लोकांना पैसे देऊन सभेसाठी आणण्याची वेळ आली. भाषणांची पातळी एवढी खालावली की त्यात निवडणूक आयोगाला दखल घेऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी, माजी मुख्यमंत्री मायावती, केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांना सभा घेण्यावर, भाषणे देण्यावर बंदी आणावी लागली, ही लोकशाहीची अधोगती नाही तर दुसरे काय?
राज ठाकरे यांचा ‘टेक्नोसॅव्ही’ प्रयोग
या लोकसभा निवडणुकीच्या जाहीर सभांमध्ये एक नवीन पायंडा पाडला तो मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी. एकही उमेदवार न उभा करता त्यांनी निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करा हे सांगण्यासाठी सभा घेणे सुरू केले आहे. या सभांमध्ये मोदी आधी काय बोलले होते आणि नंतर काय बोलले किंवा कसे वागले याचे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, त्याच्या आॅडिओ व्हिडीओ क्लीप दाखवून त्यांनी जाहीर सभांची व्याख्याच बदलून टाकली आहे. आजची पिढी टेक्नोसॅव्ही झाली आहे. त्यांना पटेल, रुचेल अशा पद्धतींचा वापर करून राज ठाकरे सभा घेत आहेत. त्यांच्या आरोपांना खोडून काढणारे मुद्दे नसल्याने सभेसाठी पैसा कोठून आणला, कोणाच्या लग्नात नाचतंय खुळं, अशा शब्दात टीका करून भाजपचे नेते त्यातून स्वत:ची सुटका करून घेताना दिसत आहेत. राज यांच्या सभांना त्याच पद्धतीने उत्तरं देण्याची आज तरी अन्य कोणत्याही पक्षात क्षमता नाही; पण येणाऱ्या काळात निवडणुकांच्या प्रचारसभा कोणत्या पद्धतीने होऊ शकतात याची नांदी राज यांनी केली आहे.
माणसे येतील कशाला?
आजकालच्या सभांना स्वत:हून गर्दी करणाऱ्यांचे प्रमाण कमी का झाले? याच्या कारणांचा शोध घेतला तर लक्षात येते की, नेते काय बोलणार हे सभेला जाणाºयांना आधीच माहिती झालेले असते. बरेच नेते वर्तमानपत्रे, टीव्हीवर आलेल्या बातम्या व समाजमाध्यमांत पसरवली जाणारी माहिती यावर आधारित आपली भाषणे करतात, त्यात नावीन्य काहीच नसते. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाशिवाय दुसरे काही बोलले जात नाही. कोणता नवीन विचार मिळत नाही, प्रत्येक नेता मी कसा ग्रेट हेच सांगत रहातो. हेच ऐकायला सभेला कशासाठी जायचे, असे म्हणत लोकांनी सभांकडे पाठ फिरवणे सुरू केले आहे.
(लेखक लोकमतचे सल्लागार संपादक आहेत.)
dinkar.raikar@lokmat.com