मानवतेसाठी विवेकवाद..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 06:04 AM2019-08-18T06:04:00+5:302019-08-18T06:05:11+5:30
विवेकवाद; जो मानवतावादाशी बांधलेला आहे, विश्वकल्याणासाठी त्याचा उपयोग आपण करू शकतो. आपली तर्काची शक्तीही दोषपूर्ण असेल; पण एकत्रित प्रय}ांनी व्यक्तिगत पूर्वग्रह व उणिवांवर आपण मात करू शकतो. आपण कदाचित ‘विवेकी प्राणी’ नसू, परंतु विवेकी जागतिक संस्कृतीचा आपण भाग बनू शकतो. विवेकवादाचा कैवार आपण कसा घेतो, यावर केवळ मानवप्राणीच नव्हे, तर संपूर्ण जीवसृष्टीचे भवितव्य अवलंबून असेल.
- बॉब चर्चिल
सध्या जगातल्या बहुतेक सर्व भागात दोन प्रकारचे दावे सहसा ऐकायला मिळतात.
एक : विवेकवादाची कधी नव्हे एवढी आज गरज आहे.
दोन : ज्यांच्याविषयी तत्त्वज्ञानात बोलले जाते तो ‘विवेकी पशू’ मानवप्राणी खात्नीने नाही आणि ‘विशुद्ध विवेक’ ही निव्वळ दंतकथा आहे.
या दोनही दाव्यांच्या बाजूने काही ना काही तरी बोलता येईलच. तरीही अर्थातच, या दोहोंत कटुभाव/तणाव आहेच.
गेल्या कित्येक शतकातल्या अनुभवावरून आता आपल्याला कळून चुकले आहे की आपण काही निर्ममपणे विशुद्ध विवेकी विचार करू शकणारे अमूर्त आत्मे नाही आहोत. उलट आपण भिन्न संदर्भ, विविध भावनोद्रेक, बोधनात्मक पक्षपात, गृहीतके आणि पूर्वगृह या सार्या घटकांमुळे सतत प्रभावित होत असतो. बर्याच वेळा आपण स्वत:च्या उत्तम निर्णयांविरु द्ध व आपल्याच हिताविरु द्ध कृती करत असतो. आपला वस्तुनिष्ठपणा आपल्याच व्यक्तिनिष्ठतेपुढे लोटांगण घालतो. म्हणूनच विशुद्ध विवेकवादाचा दावा करणे हे बालिश आहे, असा प्रतिवाद केला जातो.
आपण सारे ‘विवेकवाद व मानवतावाद’ यावरील या संमेलनात सहभागी होत असल्याने आपण पहिल्या दाव्याशी सहमत होणारे आहोत. त्यामुळे (आपण सर्व) अधिक विवेकीपणा हा सगळ्या जगाकरिता चांगला ठरेल, या मताचे असू. पण मला अशी शंका येते की वेगळ्या संदर्भात, विवेकी असल्यामुळेच, दुसर्या दाव्यात अनुस्यूत असलेली टीका आपण मान्य करू. विवेकवादात भाबड्या विशुद्ध विवेकीपणाची कल्पना अंतर्भूत असण्याची गरज नाही. सरते शेवटी विज्ञान व विचारीपणाच आपल्याला सांगतो की, आपण म्हणजे विशुद्ध आत्मे नसून कडक कवटीतले सच्छिद्र मेंदू आहोत. मानसशास्रज्ञ, समाजशास्रज्ञ व इतर तज्ज्ञ मंडळी आपल्या विवेकाचा चंचलपणा तपासू व मोजूही शकतील. त्यांना असे आढळून येईल की आपण तर्कविसंगत निष्कर्ष काढतो आणि निर्णय घेताना आपण विवेकहीन गोष्टींनी बहकतो. आपल्या विवेकीपणाची स्खलनशीलता न स्वीकारणे हेच आपल्या विवेकीपणाचे अपयश असेल.
मग ‘जगाला अधिक विवेकीपणाची गरज आहे’, आणि ‘आपला विवेकीपणा हा अनेक उणिवांनी भरलेला आहे’, या परस्परविरोधी विधानांवर आपण विश्वास ठेवायला तयार आहोत का?
मला वाटते हे दोनही दावे आपण विशिष्ट प्रकारे समजून घेतले तर आपण असा विश्वास ठेवू शकू.
सर्वप्रथम आपण हे मान्य करू या की, मी वर नमूद केलेले दोनही दावे अतिरंजित असू शकतील.
मला ठामपणे वाटते की, विवेकवादाची आपल्याला कधी नव्हे एवढी गरज आहे, असे म्हणणे व्यापक अर्थाने बरोबर आहे; पण या विधानाला मला मुरड घालायची आहे. जर हे विधान अतिरंजित वाटत असेल, तर हे जग भूतकाळात अधिक विवेकी होते व आज अधिक विवेकशून्य आहे, असे चित्न कुणीही व्यक्ती रंगवू शकेल. एवढे असूनही आपल्यात बर्याच काळापासून फार मोठय़ा प्रमाणात विवेकशून्यता वसत राहिली आहे. आणि काही वेळा याचे भयानक परिणामही आपल्याला भोगायला लागलेले आहेत. उदा. अंधर्शद्धा व अविवेकी समजांमुळे बर्याच लोकांना द्वेषाचा व हिंसेचा सामना करावा लागलेला आहे. अपघाताने घडलेल्या घटनांनाही लोकांनी कारस्थानाचे फलित व दुष्टशक्तींचा खेळ, अशी चुकीची दूषणे दिलेली आहेत, की ज्यामुळे निर्थक र्शद्धेय मतांमध्ये वाया घालविलेली शतकानुशतके, मानवी हक्कांची पायमल्ली, युद्धे आणि अमानुष नरसंहार यांसारखे भीषण परिणाम घडून आले आहेत. एक वैश्विक समाज म्हणून आपण करत असलेल्या सगळ्याच गोष्टी योग्य नसतात. परंतु थोडा वेळ अशी कल्पना करा की, आज आपल्यापाशी असलेले लष्कर व अण्वस्रे मध्ययुगीन युरोपियन सम्राटाच्या, चंगीज खानाच्या किंवा इतिहासातल्या अन्य कोणत्याही जुलूमशहाच्या हातात पडली आहेत. किंवा अशीही कल्पना करा की, या (विध्वंसक) शक्ती सर्व जगातील लोकसंख्या हसत हसत नष्ट करू शकणार्या हल्लीच्या मूलतत्त्ववादी अतिरेक्यांच्या हाती पडल्या आहेत. याचे परिणाम सर्वनाशीच होणार ! परंतु एवढे सारे (विनाशकारी) तंत्नज्ञान अनेक देशांच्या सरकारांपाशी असूनही आपण अद्याप आपला सर्वनाश केलेला नाही.
असे असेल तर चंगीज खानाने ही अण्वस्रे जशी हाताळली असती व आपण ती प्रत्यक्षात जशी हाताळत आहोत, यात फरक तो काय आहे? कदाचित आपल्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये तसेच जागतिक आर्थिक धोरणांमध्ये सामुदायिक विवेक भरला असावा, ज्यामुळे आपण वाईटातला वाईट घटनाक्र म अजूनपर्यंत तरी टाळलेला आहे. या दरम्यान सामाजिक उदारमतवादी नीतिमत्ता व वैद्यकशास्रातील जागतिक प्रगती अविश्वसनीय वाटावी एवढी प्रशंसनीय आहे. ती परिपूर्ण नाही, हे खरेच. शिवाय त्यात बराच आर्थिक अन्यायही आहे. तरीही काही दृष्टींनी तरी आपण अधिक प्रगत झालो आहोत यात अधिक चांगल्या संस्था, चालीरीती व धोरणे समाविष्ट आहेत.
असे असूनही ‘आपल्याला कधी नव्हे एवढी विवेकवादाची गरज आहे’ या मताशी आपणाला का सहमत व्हायला हवे? याचे नेमके कारण असे आहे की, आज आपल्या हाती पूर्वीपेक्षा कित्येक पटीने अधिक शक्ती आल्या आहेत. काही शतकांपूर्वीचे विवेकशून्य व बहुप्रसव जुलूमशहा काही हजार लोकांना नियंत्नणात ठेवू शकायचे किंवा ठार मारू शकायचे. अपप्रचार, सैन्यबळ व संघटनांच्या जोरावर ते एखादी संस्कृती नष्ट करू शकण्याएवढी अरिष्टे प्रयत्नपूर्वक साध्य करू शकले. सध्या काही सैन्य दलांच्या व सरकारांच्या हातात जी तंत्नशक्ती आहे ती एका फटक्यात (पृथ्वीवरील) सर्व संस्कृत्यांचा अंत करण्यास पुरेशी आहे. माणसांचा एक छोटा गटसुद्धा अणुयुद्ध सुरू करू शकतो किंवा सर्व मानवजातीचा नि:पात करू शकेल असे जीवाणू निर्माण करू शकतो. अर्थात, हे सांगणे न लगे, की सामूहिकरीत्या आपण हवामानाचे असे एक संकट उभे करत आहोत की दूषित वायू उत्सर्जनाने पृथ्वीवरील उष्णता अनियंत्रितपणे वाढू देण्याचे भीषण परिणाम आपण मोकाट सोडू. किंवा विस्तृत प्रदेशांतील समुद्रकिनारे प्रलयाने बुडवून टाकू अथवा प्रचंड मोठय़ा जनसंख्येच्या विनाशाचा असा एखादा अपघात घडवून आणू की जो पृथ्वीच्या आतापर्यंतच्या संपूर्ण इतिहासात झालेल्या महाकाय उल्कापातापेक्षाही जलदगतीने पृथ्वीवरील जीवसृष्टीचा विनाश करेल. कल्पांताची भीती माणसांना नेहमीच वाटत आली आहे. पण आजच्या काळात प्रथमच स्वत:च्या हातांनी आपण आपल्या अस्तित्वाला अनेक गंभीर संभाव्य धोके निर्माण केले आहेत. त्यांना योग्यप्रकारे नियंत्नणात ठेवण्याचे मार्ग आपण शोधून काढले नाहीत तर आपण आपला सर्वनाश तर करूच, पण पृथ्वीच्या संपूर्ण वातावरणाचाच विनाश करू.
म्हणून आपल्याला ‘कधी नव्हे एवढी विवेकवादाची गरज आहे’, कारण प्रचंड मोठे सकारात्मक तसेच नकारात्मक बदल घडवून आणण्याच्या शक्ती, जगाच्या इतिहासात कधीच नव्हत्या एवढय़ा शक्ती, आज आपल्या हाती आल्या आहेत.
दुसर्या दाव्याचा (की मानव हे फार ‘विवेकी प्राणी’ नाहीत)सुद्धा थोडा अतिरेक होऊ शकतो; पण त्यातही थोडेफार तथ्य आहे.
बरेच लेखक व विचारवंत (ज्यांना बर्याचदा ‘पोस्ट मॉडर्निस्ट’ असे संबोधले जाते) मानवाच्या अविवेकीपणाबद्दल एवढय़ा थराला जाऊन बोलतात की जगात काही वस्तुनिष्ठता आहे, हेच ते नाकारतात. असे लोक सर्वच गोष्टी संस्कृतिसापेक्ष किंवा व्यक्तिगत मतसापेक्ष आहेत अशी मांडणी करतात. त्यामुळे ‘सत्य’ संकल्पनेबद्दल बोलू गेले तर त्याची परिणती ‘‘माझे सत्य’’ आणि ‘तुझे सत्य’ यात होते. तर्कशुद्ध विचार व विवेक, किंवा प्रमाणे व तज्ज्ञता यांच्याकडे संशयाने पाहिले जाते, जो एक प्रकारचा (अप)प्रचारच असतो. बौद्धिक सापेक्षतावादाचे हे एक चित्न आहे. आणि उपरोधिकपणे म्हणायचे तर ते काळजीपूर्वक केलेल्या छाननीत टिकू शकत नाही. आपल्या विचारात तर्कदोष असतो, आपण पूर्वग्रहदूषित किंवा चुका करणारेही असू शकतो, याचा अर्थ असा नव्हे की (आपल्या) काही कल्पना, काही वादाचे मुद्दे, काही प्रमाणे व काही प्रक्रि या इतरांहून अधिक विवेकी नसतात.
इथे असलेल्यांपैकी कुणीही किंवा आतापर्यंत जन्माला आलेल्यांपैकी कुणीही, एक पेन घेऊन (केवळ हाताने) परिपूर्ण असे भूमितीय वर्तुळ काढू शकलेले नाही. आपण हे मान्यच केले पाहिजे की (त्यापैकी) काही आकार इतर आकारांपेक्षा अधिक गोलाकार असतात. एखाद्या जिवंत आदर्श माणसापेक्षा मी बोधनात्मक पक्षपात दाखवितो, कधी तरी माझे वर्तन स्व-हितातून किंवा माझ्या हटवादातून होते. पण याचा अर्थ असा नव्हे की माझे वर्तन इतरांपेक्षा अधिक विवेकी नसते, आणि मी माझ्या व इतरांचा विवेकीपणा ओळखू शकत नाही.
सबंध मानवी समाजाने मिळून पृथ्वीचा नकाशा तयार केला आहे, रोगांचा प्रतिबंध केला आहे व जीवनमान वाढविले आहे, आंतरराष्ट्रीय संस्थांची बांधणी केली आहे, मानवी हक्कांची संहिता तयार केली आहे, संगणक, बीजगणित व शून्यासह (गणितातील) आकडे शोधून काढले आहेत, भौतिकशास्रात प्रगती करून आपण (हवेत) उड्डाणे केली आहेत, चंद्रावर पाय रोवले आहेत, विश्वात भ्रमण करणार्या गुरु त्वाकर्षण लहरींचा अभ्यास करण्याचे नवे मार्ग शोधून काढून लक्षावधीच नव्हे तर अब्जावधी प्रकाशवर्षे दूर असणार्या वस्तुमात्नांचे दर्शन घेतले आहे. हे सगळे काही अपघाताने घडलेले नाही. आपल्याजवळ व्यक्तिगतरीत्या व सामूहिकरीत्या तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता आहे म्हणून हे सारे घडले आहे. आपल्या तर्कशुद्धतेत काही कमतरता असू शकतात; पण अंतिमत: तर्कशुद्ध विचाराने चांगले फलित मिळते.
त्यामुळे मी मांडलेले दोन्हीही दावे मूलभूतपणे खरे असू शकतात :
- आपल्याला विवेकवादाची कधी नव्हे एवढी आज गरज आहे. विवेकवाद जो मानवतावादाशी अतूटपणे जोडला गेलेला आहे व जो (मानवाच्या) तातडीच्या समस्या सोडविण्याकडे वळविला जाईल व ज्याचा प्रत्येक व्यक्तीच्या सुखाकरिता व भरभराटीकरिता लाभ होईल.
- आपल्या तर्काच्या शक्ती परिपूर्ण नाहीत. पण एकत्रितपणे काम करून आपण आपल्या पूर्वग्रहांवर व उणिवांवर मात करू शकतो. आपण कदाचित (विशुद्ध) विवेकी प्राणी नसूही. पण आपण बव्हंशी विवेकी जागतिक संस्कृती बनू शकतो.
केवळ मानवी समाजच नव्हे, तर या एकमेवाद्वितीय वसुंधरेवरील संपूर्ण जीवन व तिचे भवितव्य आपण आपल्या आयुष्यात विवेकवादाचा कसा कैवार घेतो यावर अवलंबून असेल.
(महाराष्ट्र अंधर्शद्धा निर्मूलन समितीच्या त्रिदशकपूर्तीनिमित्त मुंबई येथे झालेल्या तीन दिवसीय परिषदेत ‘मानवतेच्या विकासासाठी विवेकवाद’ या आंतरराष्ट्रीय संमेलनात केलेल्या भाषणाचा संपादित सारांश.)
bob@humanists.international
(लेखक इंग्लंडमधील ‘ह्युमनिस्ट इंटरनॅशनल कम्युनिकेशन्स अँण्ड कॅम्पेन्स’ या संस्थेचे संचालक आहेत.)
अनुवाद : प्रा. अरविंद निगळे