सातपाटील कुलवृत्तांत - रंगनाथ पठारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 06:00 AM2019-10-27T06:00:00+5:302019-10-27T06:00:05+5:30

‘मला माझ्या पूर्वजांविषयी कुतूहल होतं.  त्याचा धागा धरून मी लिहायला सुरुवात केली.  साधारण पंधरा वर्षांपूर्वी काही पानं झाल्यावर  माझ्या लक्षात आलं की, आपण  पूर्वजांची स्तुती वगैरे बरीच करतोय,  हे काही आपल्याला करायचं नाहीये.  आपल्याला शोध घ्यायचाय.’

Veteran witer Rangnath Pathare expresses process bout his new book 'Satpatil Kulvruttant | सातपाटील कुलवृत्तांत - रंगनाथ पठारे

सातपाटील कुलवृत्तांत - रंगनाथ पठारे

googlenewsNext
ठळक मुद्देगेली चार दशकं मराठी साहित्यक्षेत्नास रंगनाथ पठारे या नावाने आयाम दिला आहे. इतिहासाच्या खोलात उतरून समाजजीवनाच्या पाळामुळांचा शोध घेत ‘सातपाटील कुलवृत्तांत’ (शब्दालय प्रकाशन) ही त्यांची कादंबरी आकारास आली आहे. त्यानिमित्त लेखकाशी साधलेला संवाद.

 - रंगनाथ पठारे 

* ‘सातपाटील कुलवृत्तांत’ आकाराला येण्यासाठी वीस वर्षं लागली !
हो, इतका काळ कादंबरी मनात होती; पण ती मनात असण्यातून कागदावर उतरण्यात अनेक अडचणी असतात, त्यात लिहिणारा म्हणून भवतालच्या परिस्थितीपेक्षा स्वत:चेच प्रश्न असतात. तेव्हा जशी मनात होती ती आज आकाराला आलीय तशी खचितच नव्हती. सुरुवात करताना तिचं स्वरूप वेगळं होतं. साधारणत: लिहिणारे लोक बरंच आत्मपर लिहितात, खरं तर सगळं आत्मपरच असतं; पण थेट आत्मपर म्हणतो. मी तसं फारसं लिहिलेलं नाही. मला माझ्या पूर्वजांविषयी कुतूहल होतं. त्याचा धागा धरून मी लिहायला सुरुवात केली. साधारण पंधरा वर्षांपूर्वी पन्नाससाठ पानं झाल्यावर माझ्या लक्षात आलं की, आपण पूर्वजांची स्तुती वगैरे बरीच करतोय, हे काही आपल्याला करायचं नाहीये. आपल्याला शोध घ्यायचाय. मुळामध्ये कादंबरी लिहिणं हाच जगण्याच्या वेगवेगळ्या अंगांचा घेतलेला शोध असतो. दोन वेळा लिहून मी ते अर्ध सोडलं गेलं. शेवटी 2006-07 च्या सुमाराला मला शेतकर्‍याच्या घरातल्या चार पिढय़ांच्या जगण्याच्या पार्श्वभूमीवर लिहिणं जमलं. तोवर मी वहीवर हातानं लिहीत असे, तर ती दोनेकशे पानं लिहून झाली. दरम्यानच्या काळात मी घरगुती तीव्र प्रश्नांमध्ये अडकलो. भवतालची परिस्थिती व मन:स्थिती यांचा काहीएक संबंध व परिणाम होत असतो कादंबरीवर. तेव्हा ते थांबून गेलं. 2016 साली मी पुन्हा या लेखनाचा विचार करायला लागलो.  वाटलं, आपण सगळाच नव्याने विचार केला पाहिजे. त्यावेळी जे वाचन चालू होतं त्यादरम्यान चमकून गेलं की वि.का. राजवाड्यांनी संपादित केलेल्या ‘महिकावतीच्या बखरी’चा जो काळ आहे तो रामदेवराव जाधव व अल्लाउद्दिन खिलजी यांच्यामधील युद्धाचा आहे, तिथूनच सुरुवात करायची ! सुरुवात करण्याचं कारण असं होतं की, रामदेवराव जाधव, महानुभाव चक्रधर हे समकालीन. त्या काळात रामदेवरावचा सेनापती किंवा प्रधान हा हेमाद्री नावाचा होता. हेमाद्रीनं ‘चतुर्वर्गचिंतामणी’ नावाचा एक ग्रंथ लिहिला होता. त्याकाळात सामान्य माणसाचं जगणं कठीण झालेलं होतं. रामदेवरावाकडून ब्रrाहत्या वगैरेसारख्या खूप गोष्टी घडल्या म्हणून ब्राrाण, क्षत्रिय सगळे त्यांना सोडून गेले. पण राज्यशकट तर चालला पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं की पाठारे जातीचे क्षत्रियच; पण सर्वसामान्य, म्हणजे आपले पोलीस, पहारेकरी या दर्जाचे लोक. त्यांना घेऊन त्यांनी राज्य चालवलं. अल्लाउद्दिन खिलजीला ही बातमी लागल्यावर त्याच्या लक्षात आलं की, इथं आपल्याला हल्ला करणं शक्य आहे. कारण रामदेव हा दक्षिणपंथाचा सम्राट असला तरी लढण्याचं प्रशिक्षण असणारे लोक याच्याकडे नाहीत. रामदेवरावांनी चार मुलांपैकी एक मुलगा बिंबदेव जाधव कोकणात पाठवला. त्याच्याबरोबर जे लोक गेले ते पाठारे क्षत्रिय होते. हे सगळं मुंबईच्या परिसरात. तिथल्या उपनगरांची नावं त्यात येतात. तो प्रदेश त्यांनी जिंकला, ते सोपंच होतं. ते जे पाठारे ते हल्लीचे पाठारे प्रभू. उरलेले जे पाठारे होते ते मराठय़ांमध्ये मिसळून गेले. हे मला समजल्यानंतर मी म्हटलं कादंबरीची सुरुवात तिथून करणं योग्यच. मग मी सात टप्प्यांची कल्पना केली. त्यात हा पहिला टप्पा, दुसरा अहमदनगरच्या निजामशाहीच्या काळातला, मलिक अंबरच्या थोडा आधीचा. तिसरा टप्पा पानिपतच्या युद्धाचा. चौथा टप्पा दुसरा बाजीराव म्हणजे मराठय़ांच्या हरण्याचा जो काळ तो. पाच, सहा व सात हे सलग अव्वल इंग्रजी आमदानीपासून ते वर्तमानापर्यंत. प्रत्येक टप्पा साधारण छापील शेसव्वाशे पानांचा. ही सलग गोष्ट नाही; पण जोडलेली आहे.
* कथात्म लिहिण्यासाठी इतका काळ धीर धरणं कठीण..
‘ताम्रपट’ या प्रकारचंच लेखन होतं. काळाचा दीर्घ पट असलेलं. त्यामुळं इतका लांबलचक काळ थकवणारा नसतो. लेखक म्हणून अनुभव सांगतो की, एकदा तुम्ही कथानकात शिरलात की तुम्ही प्रत्यक्ष लिहिता तेव्हा कादंबरीत असता व लिहित नसता तेव्हाही कादंबरीत असता. लिहित राहाणं हा त्या सगळ्यातून सुटण्याचा एकमेव मार्ग असतो. प्रत्यक्ष काम करताना त्यामुळं त्नासदायक, जड असं होत नाही. लिहिणार्‍याच्या मनाचं व शरीराचंही उष्णतामान सरासरीपेक्षा अर्धा डिग्री जास्तच असतं. लिहिण्याच्या काळातलं तरी ! कारण पेशींच्या सगळ्या हालचाली व त्यातली आंतरिक ऊर्जा अफाट असते. शिवाय नंतर मी लॅपटॉपवर लिहायला लागलो त्यामुळं कथानकात वेगाने मागेपुढे जाणे, संपादन हे जलद झाले.
* आठशे वर्षांच्या या कालपटात माणसांबद्दल, निर्भयपणाबद्दल सापडलं? काय बदल झाले?
आपण ज्या प्रकारे आज दुनिया बघतो त्यामानाने विसाव्या शतकातल्या आरंभापर्यंत खेड्यातल्या लोकांचं जगणं हे बहुअंशी स्थिर असं होतं. म्हणजे पिढय़ान्पिढय़ा त्यात फारसे काही बदल होत नव्हते. दुसरी गोष्ट खेडी स्वायत्त होती. चार-दोन गोष्टी लागल्या तरी शेजारच्या गावांमधून ती गरज भागवली जायची, यापलीकडे काही नव्हतं. कोण राजा, कुणाची सत्ता, राजा हिंदू की मुसलमान या सगळ्याशी या माणसांना काही घेणं नसायचं. लढायांचा त्नास काय तर एखाद्या राजाचं सैन्य आलं व त्यांनी लुटलं एवढंच. ही थोडीफार जी लुटालूट; ती वगळता लोकजीवन स्वायत्त नि शांत होतं. हे सगळं बदलायला सुरु वात झाली ती विसाव्या शतकाच्या मध्याशी. त्यानंतर मात्न फार वेगाने आपल्या जगण्यात बदल होत गेलेले आहेत. या बदलाचा स्थिर असा साक्षीदार खर्‍या अर्थानं माझीच पिढी आहे. म्हणून हे लिहिण्याची मला संधी होती व जबाबदारीही. 
* हा बदल राष्ट्रवादासारख्या भावना प्रखर होण्यातही झालाय..
एका चर्चेत मी म्हटलं होतं, राष्ट्रवाद ही एका र्मयादेनंतर आपल्या विचारांचा संकोच करणारी गोष्ट आहे. राष्ट्रवादाने भिंती निर्माण केल्या आहेत. त्या बांधून लोकांचं स्थलांतर थांबवता येत नाही, तर राष्ट्रवाद वगैरे या युरोपियन कल्पना काही फार जुन्या नाहीत. आपल्याकडे आलेल्या व्हिसा, पासपोर्ट वगैरे भानगडी अलीकडे आल्या आहेत. आपल्या हद्दी या कायम मोकळ्या होत्या. तुम्ही इतर कुठं जाऊन राहाणं व चरितार्थ चालवणं ही आम रीत होती. अफगाणिस्तान, र्शीलंका, बांगलादेश, थायलंड, ब्रrादेश या सगळ्या देशात कुणीही कुठेही जाऊ येऊ शकत होता. राष्ट्रवादी भावनेनं काय केलं, मुळात प्रत्यक्ष व्यवहारात तो वंशवादच, तर त्यामुळे देशादेशांच्या भिंती तयार झाल्या. शत्नूस्थान तयार झालं. शत्नूला आयडेण्टिफाय करण्यासाठी ढांचे तयार झाले. आपण सगळ्या मानवी प्रजाती आहोत ही भावना जाऊन आपण अमुक वंशाचे आहोत असं म्हणणं सुरू झालं. विशेषत: भारतीय उपखंडात फक्त वंशानं भागत नव्हतं, तिथं जाती आल्या. धर्म नि पोटजात आली. अशा प्रकारची सगळी फ्रॅग्मेंटेशन यातून उद्भवतात असं माझं म्हणणं होतं. काहीएका र्मयादेपर्यंत ज्या दुनियेत राष्ट्रवाद मानतात तिथं माझं काही म्हणणं नाही; पण ज्या गोष्टीमुळं तुम्हाला काहीएक शत्नू डिफाईन करायला लागतात त्याबाबतच्या सं™ोची, व्याख्येची पुनर्तपासणी करणं आवश्यक आहे. मूलत: बुद्धांपासून गांधींपर्यंत आपल्या पूर्वजांनी मानवी प्रजाती ही एक आहे असं सांगितलं. अगदी मार्क्‍सनीसुद्धा या विश्वातलं जगणं अधिक चांगलं करणं शक्य आहे असंच म्हटलेलं आहे. अमक्या देशाचं, तमक्या राष्ट्राचं असं नाही म्हटलेलं, एकूण मानवी प्रजातीचं म्हटलंय. हा विचार राष्ट्रवादासारख्या गोष्टीमुळे दुय्यम स्थानी जातो, तो जाऊ नये असं माझं म्हणणं आहे. काळा, गोरा, पिवळा सगळी आपण माणसंच!
* या बदलात माणसाच्या हिंसेच्या प्रेरणा बदलल्या?
मला असं वाटतं, एकप्रकारचा रांगडेपणा ज्यात असतो त्यातली हिंसा व क्रौर्य आपल्याला नेहमीच क्रूर वाटत आलंय. समजा सातशे-पाचशे वर्षांपूर्वीचा काळ घेतला तर शत्नूला मारल्यावर त्याचं रक्त पिणं किंवा उकळत्या तेलात टाकणं, तापल्या धातूवर उभं करणं हे आपल्याला खूप जास्ती क्रूर वाटतं; पण त्याच्या तुलनेत आजचं क्र ौर्य जास्ती विक्र ाळ आहे असं मला वाटतं. त्या क्रौर्यामध्ये एकप्रकारचं सोफिस्टिकेशन आहे. त्यामुळे वर चेहरा मऊ दिसतो; पण हा मानवी समूहाचे जास्ती हाल करणारा माग आहे. जाणवतं. आज पृथ्वीवर जगताना येणारी जी धास्ती आहे, भय आहे असुरक्षितता आहे त्यातून ही हिंस्रता उफाळते. एक व्यक्ती म्हणून, एक समूह म्हणून ती जन्मापासून मृत्यूपर्यंत एकप्रकारे सारखीच अनुभवास येते. या भावनेपोटी आपण व्यक्तिगत व सामूहिक पातळीवर शक्य होईल त्या प्रकारे जास्तीत जास्त बळ मिळवण्याचा प्रयत्न करतो. जास्तीत जास्त सुरक्षित होण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी प्रसंगी इतरांची हत्याही करतो. त्यांना गुलाम करतो. दाबून ठेवतो. या सगळ्यांनी खरं तर प्रश्न सुटत नाही. त्यातूनही तुम्ही असुरक्षित उरता, ते संपत नाही. म्हणून मला वाटतं, माणसांमध्ये सुरक्षिततेची भावना यावी म्हणून बुद्धांपासून गांधींपर्यंंत माणूस म्हणून पाळण्याच्या ज्या प्रकारच्या जगण्याच्या काहीएक रीती, जगण्याचा धर्म आपल्याला सांगितलेला आहे, ते याच्यावरचं सगळ्यात चांगलं उत्तर आहे. जगभरात दिवसेंदिवस जी परिस्थिती आपण पाहतो आहोत, गांधीजी सगळ्यात जास्त सुसंगत व प्रस्तुत ठरत व उरत आहेत.
मुलाखत, शब्दांकन : सोनाली नवांगुळ

Web Title: Veteran witer Rangnath Pathare expresses process bout his new book 'Satpatil Kulvruttant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.