बळी शासकीय बेपर्वाईचे

By admin | Published: June 22, 2014 01:48 PM2014-06-22T13:48:17+5:302014-06-22T13:48:17+5:30

पोलीस भरतीची प्रक्रिया चालू असताना ५ युवकांचा बळी जावा, ही अत्यंत शरमेची आणि धक्कादायक गोष्ट आहे. मुळात भरतीसाठी युवकांना ५ किलोमीटर धावायला लावण्याची कल्पना कोणाच्या सुपीक डोक्यातून निघाली, ते तपासून पाहायला हवे.

The victim's government's neutrality | बळी शासकीय बेपर्वाईचे

बळी शासकीय बेपर्वाईचे

Next

भीष्मराज बाम

 
पोलीस भरतीची प्रक्रिया चालू असताना ५ युवकांचा बळी जावा, ही अत्यंत शरमेची आणि धक्कादायक गोष्ट आहे. मुळात भरतीसाठी युवकांना ५ किलोमीटर धावायला लावण्याची कल्पना कोणाच्या सुपीक डोक्यातून निघाली, ते तपासून पाहायला हवे. मी नाशिकमध्ये राहतो. इथे देवळालीत शिपायांसाठी सैन्य भरती होते, तिच्यामध्येसुद्धा फक्त १६00 मीटर म्हणजे १.६ किलोमीटर धावावे लागते. आपली शासकीय खाती मुळीच विचार न करता परदेशी वापरले जाणारे निकष आपल्याकडे लावून टाकतात. युवा वर्गाचा आरोग्याचा निर्देशांक कसा वाढेल याची गेल्या ५0/६0 वर्षांत कोणीही काहीही चिंता केलेली नाही. योगाकडे संपूर्ण दुर्लक्ष! खेळांचा विकास तर सोडाच; पण खेळाडूंना खेळणे, सराव करणे, स्पर्धेतील भाग अवघड करण्याकडेच कल जास्त. जीवघेण्या महागाईमुळे सकस आहारही उपलब्ध नाही. अशा स्थितीत युवकांची तंदुरुस्ती राहणे कसे शक्य आहे? मग पोलीस भरतीसाठी लावलेले निकष इतके अवघड करण्याची काय गरज?
पोलिसांकडे परेड करायलाच पुरेशी मैदाने नाहीत; तिथे धावण्याचे ट्रॅक कोठून असणार? मग भरतीसाठी धावण्याच्या चाचण्या रस्त्यावरच घेतल्या गेल्या. रस्त्यांची हालत नेहमीसारखीच खराब आणि पायात घालायला अनेकांजवळ बूटसुद्धा नाहीत. मग त्यांनी तसेच धावायचे. पहाटे चार वाजता आलेले लोक आठ-दहा तास ताटकळत बसलेले. त्यांना प्यायला पाणी नाही की संडास/लघवीची सोय नाही. खाण्या- पिण्याचा तर प्रश्नच नाही. उन्हात उघड्यावर बसून राहायचे, आणि मग नाव पुकारले गेले, की स्पर्धा सुरू होण्याच्या रेषेवर जाऊन उभे राहायचे. इतके लांबचे अंतर धावायचे असतानासुद्धा वॉर्मअप वगैरे काही न करता सरळ धावायला सुरुवात. चांगले तयार असलेले खेळाडूसुद्धा पार आडवे होतील. मग बिचार्‍या भरतीसाठी आलेल्या पोरांची वाट लागली तर त्यात काय नवल?
मुंबईच्या एरवीच्या साध्या उकाड्यात, न धावणार्‍यांच्यासुद्धा घामाच्या धारा वाहून डिहायड्रेशन होत असेल. मग आता मॉन्सूनपूर्वीच्या जबरदस्त वाढलेल्या तापमानात भर उन्हात धावावे लागले तर त्यांची काय अवस्था झाली असेल? प्रतिकूल हवामानाशी जुळवून घ्यायला आपल्या शरीरयंत्रणेला बराच वेळ लागतो. आपण या हवामानातून हिमालयात गेलो तर प्रत्येक टप्प्यावर त्या-त्या हवामानाची सवय होईपयर्ंत विश्रांती घ्यायला लावतात. इथे बरोबर उलट परिस्थिती होती. पाणीसुद्धा न देता उन्हातान्हातून या पोरांना धावायला लावण्याचा काय उद्देश असावा? जगले वाचले तर मायबाप सरकार जी नोकरी देणार, ती याच प्रकारच्या छळणुकीची असेल हे त्यांना जाणवून द्यावे, असा विचार होता काय? आता ५ बळी गेल्यावर पुढल्या भरती प्रक्रिया या हिवाळ्यात घेतल्या जातील, असे जाहीर करणे म्हणजे त्या बळींच्या नातेवाइकांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे आहे.
हवामानातले बदल सहन करता येण्यासाठी शरीर प्रकृती उत्तम असायला हवी. जे दुबळे असतील ते असे बदल सहन करू शकत नाहीत. म्हणून तर दर वेळी थंडीची किवा उष्माघाताची लाट आली तर त्यात अनेक बळी जातात. पण ते बहुतेक सगळे रुग्ण किंवा म्हातारेकोतारे असतात. हे बळी युवकांचे होते, आणि भरती वेळच्या वेळी झाली असती तर इतक्या घाईत मोठय़ा प्रमाणावर करावी लागली नसती. राज्यात सगळीकडे मॅराथॉन धावण्याच्या स्पर्धा होतात. त्या वेळी जागोजागी पिण्याच्या पाण्याची आणि वैद्यकीय पथकाची व्यवस्था असते, तशी या भरतीच्या वेळी का केली गेली नाही?
या पाच बळींमुळे होणार्‍या जनक्षोभाला घाबरून शासनाने ५ किलोमीटरऐवजी ३ किलोमीटरची चाचणी जाहीर केली आहे; पण ती पुढल्या भरतीपासून. जर या घेतल्या जात असणार्‍या चाचणीला काही शास्त्रीय पाया असेल, तर हा बदल का करण्यात येत आहे? आणि जर अंतर कमी करायचेच असले तर १६00 मीटर का नाही? आणि हिवाळ्यात भरती घेण्याचा निर्णयसुद्धा असाच घाईघाईने घेण्यात येत आहे. म्हणजे चौकशी होण्यापूर्वीच शासनाने आपण या भरतीमध्ये अक्षम्य अशा चुका केल्याचे कबूलच करून टाकल्याचे दिसते. पोलिसांची संख्या वाढवत जाऊन त्यांना कामच करू न देण्याची सध्याची पद्धत अवलंबिली जात राहिली तर समाजाला या पोलिसांचा फारसा उपयोग होणार नाही. समाज आणि पोलीस यांच्यातली दरी वाढतेच आहे आणि त्याचीही जबाबदारी संपूर्णपणे शासनाचीच आहे. 
(लेखक ज्येष्ठ क्रीडाप्रशिक्षक व सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

Web Title: The victim's government's neutrality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.