नवी ओळख..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 06:02 AM2019-05-26T06:02:00+5:302019-05-26T06:05:04+5:30

नंदुरबार जिल्ह्यातील बलदाने नावाचं  राजपूत समाजाचं गाव. इथल्या बायकांचा पदर कायम  डोक्यावर असला, तरी त्या रूढीबद्ध नाहीत.  पुरुषांनाही स्रियांच्या कामांचं अप्रूप.  चूल आणि मूल सांभाळून त्या पंख पसरताहेत.  गेल्या वर्षी वॉटरकपसाठी या गावातून फक्त पुरुषच ट्रेनिंग घ्यायला आले होते. मात्न जलसंधारणाचा विषय समजून घेण्यासाठी यंदा गावातून सहा महिला हट्टाने ट्रेनिंगला आल्या !.

The village Baldane, fighting with drought | नवी ओळख..

नवी ओळख..

Next
ठळक मुद्देपरंपरा जपत स्वत:चं अर्धं आकाश मिळवणारं गाव

- नम्रता भिंगार्डे

‘राजपूत समाजाचं गाव आहे. इथल्या बायका कायम डोक्यावर पदर घेऊन असतात. गेल्या वर्षी वॉटरकपसाठी या गावातून फक्त पुरुषच ट्रेनिंग घ्यायला आले होते. यंदा मात्न गावातून सहा महिलांचा ग्रुप ट्रेनिंग घ्यायला आला.’
नंदुरबारमधल्या बलदाने गावाशी माझी झालेली ही पहिली तोंडओळख.
राजपूत समाज, राजपूत स्रियांवरची बंधनं, पदरात राहण्याची सक्ती, कमी वयात प्रसंगी शिक्षण थांबून लागणारी लग्नं वगैरे अनेक गृहीतकं  मनात घेऊन मी बलदानेमध्ये पोहोचले. गावाच्या मधोमध असलेल्या घराच्या दारातून वाकून आत गेले आणि स्वयंपाकघरातून डोक्यावर पदर घेतलेल्या आशादेवी राजपूत ‘अरं, आम्ही कधीची वाट बघत होतो’ म्हणत सामोर्‍या आल्या. पुढच्या काही मिनिटांतच आशादेवींचं मोकळं ढाकळं हसणं आणि गावांमध्ये क्वचितच ऐकू येणार्‍या मोठय़ा आवाजाचं बोलणं यामुळे माझ्या मनातली राजपूत समाजाविषयी आणि खासकरून राजपूत स्रियांविषयीची गृहीतकं  धडाधड कोसळायला लागली.
‘माझं लग्न ठरलं तेव्हा मी बारावीत होते, तर कोमलसिंह इंदूरमध्ये एम.एस्सी. करत होते. लग्न होऊन मी 70 जणांच्या एकत्न कुटुंबात आले. पदरात राहणं, कुटुंबाचं करणं हे सगळं तर ओघाने आलंच. लग्न ठरल्यानंतर माझ्या वडिलांनी मला कधी शिक म्हणून आग्रह केला नाही; पण कोमलसिंग यांनी मला शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं. घरात अभ्यास करायचा आणि परीक्षा आली की चुलत सासरे मला त्यांच्याकडे घेऊन जायचे. असं करत मी शिकत गेले.’
घराच्या दारात टाकलेल्या बाजेवर बसलेल्या आशादेवी डोक्यावरचा पदर सावरत धबधब्यासारख्या बोलत होत्या. 
एम.ए., बी.एड. झालेल्या आशादेवी आणि जिओलॉजीमध्ये एम.एस्सी. केलेले कोमलसिंह राजपूत हे दोघेही बलदाने गावात शेती करतात. तशी त्यांची केवळ अडीच एकर जमीन आहे मात्न त्या दोघांनी अनेक शेतीपूरक प्रयोगांची जोड देत उत्पन्नाचे विविध स्रोत जोखाळले आहेत. आशादेवी गावात बचतगट चालवतात.
गावातल्या सर्व स्रियांचा सहभाग घेऊन त्या त्यांना एकेक गोष्ट शिकवतात. गावात नवीन लग्न होऊन आलेली बहू असो की सासूच्या वयाच्या बायका; सगळ्यांसाठी आशादेवी आदर्श आहेत. टप्प्याटप्प्यानं आशादेवींनी हे स्थान मिळवलंय. गावात महिलांचा बचतगट स्थापन करायचा होता तेव्हाचा अनुभव आशादेवी सांगत होत्या.
‘2013ला बचतगट स्थापन केला तेव्हा गावात चर्चा झाली. असे बरेच बचतगट आले आणि गेले, या काय करणार वगैरे.’ पहिल्या वर्षी आम्ही बचतगटाने आयसीआयसीआय बँकेतून 60,000 रु पयाचं कर्ज घेतलं. त्यातून कोणी शेळी घेतली तर कोणी कोंबड्या.. त्यातून उत्पन्न वाढलं. शिलकीतले पैसे गोळा करत कर्जही वेळेत फिटलं. आम्हा महिलांमध्ये आत्मविश्वास आला की स्री असलो, कमी शिकलेलो असलो तरी आपण कर्ज घेऊ शकतो आणि ते फेडूही शकतो.’ 
आशादेवींच्या सोबत बसलेल्या इतर मुली मन लावून ऐकत होत्या.
‘नंतरचं कर्ज आम्ही एक लाख रुपयांचं घेतलं. प्रत्येक महिलेला दहा हजार रुपये आले. जून-जुलैचा सीझन होता. आम्हाला युरिया खताची कमी जाणवत होती. आम्ही विचार केला की, ‘बांधावर खत’ या योजनेअंतर्गत आपण जर या पैशाचं खत मागवलं तर?. निर्णय झाला. ज्या दिवशी महिलांनी मागवलेला खतांचा ट्रक गावात आला आणि गावातल्या शेतक र्‍यांना बाहेर 350 रुपयांनी मिळणारी खताची एक बॅग आम्ही नफा कमवून 330 रुपयांना विकली, तेव्हा गावातल्या पुरुषांना बचतगट आणि आम्हा महिलांच्या क्षमता मान्यच कराव्या लागल्या. मग काय महिलामध्ये एक वेगळंच वारं भरलं. आत्मविश्वासाचं !’
तेव्हापासून बलदानेच्या बचतगटाच्या सदस्यांनी मागे वळून पाहिलं नाही. आशादेवींच्या मार्गदर्शनाखाली विविध योजना, ट्रेनिंग्स, वर्कशॉप, कृषी प्रदर्शन असं सगळीकडे येणं-जाणं सुरू झालं. आशादेवींच्या या धडाडीत, त्या घेत असलेल्या प्रत्येक निर्णयात एक हसरा, शांत चेहरा कायम सावलीसारखा सोबत राहिला.. पती कोमलसिंह राजपूत!
‘आम्ही दोघांनी जळगावला राहून नोकरी शोधण्याचा खूप प्रयत्न केला. पण म्हणावी तशी नोकरी मिळाली नाही. 2008मध्ये आम्ही पुन्हा गावी आलो. शेती हा एकमेव पर्याय होता आमच्यापुढे. पण आता असं वाटतंय की त्यावेळी आम्हाला नोकरी मिळाली नाही हे खूप बरं झालं. कारण नोकरी करत असतो तर एकच एक करत बसलो असतो. आता शेतीमुळे आम्ही सतत प्रयोग करत राहतो. फायदे, तोटे, आनंद, टेन्शन, कुटुंबाचा सहवास, काटकसरीचं जगणं असं परिपूर्ण आयुष्य आहे आमचं!’
कोमलसिंह त्यांच्या या सुखी आयुष्याचं सगळं र्शेय त्यांच्या बायकोला देतात. ‘पुरुषांकडून आजवर अनेक चुका झाल्या. त्यातली सगळ्यात महत्त्वाची चूक म्हणजे स्रीला त्यातल्या त्यात बायकोला कोणत्याही निर्णयांचे सल्ले विचारणं तर सोडाच; पण त्यांना गृहीत धरून पुरुष निर्णय घेत राहिले. शेतीविषयक फायदे-तोटे बायकोसोबत शेअर करत राहिलो तर मानसिक ताण कमी येतो हा माझा स्वत:चा अनुभव आहे. आशादेवीच्या योग्य निर्णयांमुळे आम्हाला अनेकदा फायदा झाला आहे. एक उदाहरण सांगतो. तुम्हाला माहितीच आहे दरवर्षी पाऊस कमी कमी होत चालला आहे. मागच्या वर्षी हिने शेळीपालन करण्याचा हट्ट धरला. सुरुवातीला पुरुषी खाक्यात ‘मला आवडत नाही’ म्हणून मी थेट नकार दिला. मग तिने तिच्या पद्धतीने मला समजावलं आणि एका शेळीपासून आम्ही सुरुवात केली आज 56 शेळ्या झाल्या आहेत. यंदा पाणी नाही त्यामुळे शेतीत काम नाही; पण आम्ही रिकामं बसलेलो नाही. पाणीटंचाई, बी-बियाणांमध्ये फसगत अशा सगळ्या कारणांमुळे शेतकरी म्हणून जगणं कठीण झालंय. अशा परिस्थितीत या शेळ्यांनीच आम्हाला उत्पन्नाचा आधार दिला. मी हे कधीच करू शकलो नसतो. तिच्यामुळेच हे शक्य झालं.’ कोमलसिंह यांच्या बोलण्यात आशादेवींबद्दलचा आदर स्पष्ट होता.
तेव्हापासून आजतागायत या दोघांनी एक पायंडा पाडला आहे. कोणी कोणत्याही ट्रेनिंगला गेलं की त्याने येऊन घरातल्या सगळ्यांना त्याविषयी इत्थंभूत माहिती द्यायची. या दोघांमध्ये सतत होणारा संवाद आणि एकमेकांविषयी असलेला विश्वास हा त्यांच्यातल्या नात्याइतकाच घट्ट आहे. गेल्या काही वर्षांपासून आशादेवी महिला बचतगटाच्या सदस्यांना घेऊन कधी जैविक शेतीच्या ट्रेनिंगला तर कधी कृषी केंद्राच्या कार्यक्र मांना हजेरी लावत आहेत. बलदाने गावातल्या पदरात राहणार्‍या स्रिया आशादेवींमुळे गावाची वेस ओलांडून तीन चार दिवस दुसर्‍या गावात जाऊन शेतीविषयी अधिक काहीतरी शिकत आहेत. शाळेतलं शिक्षण संपल्यानंतर लगेच लग्नाच्या बंधनात अडकलेल्या या सर्व तरु ण मुली यानिमित्ताने पुन्हा एकदा शिक्षणाच्या वाटेवर गेल्या आहेत. आशादेवींच्या भाषेत सांगायचं तर, ‘सातबार्‍यावर आमची नावं नाहीत; पण ती शेती आमची आहे ही भावना तर आहे. त्यामुळे मी माझ्या शेतीसाठी काहीतरी वेगळं शिकतेय. काहीतरी वेगळं करू शकतेय, ही जाणीव त्यांच्यात यावी यासाठी ट्रेनिंग्सना महिलांनी जाणं फार गरजेचं आहे.’
पानी फाउण्डेशनच्या पाणलोट विकासाच्या ट्रेनिंगबाबत जेव्हा नंदुरबारचे तालुका समन्वयक गावात गेले तेव्हा आशादेवींनी त्यात पुढाकार घेतला. गेल्या वर्षी गावातल्या पुरुषांनी ट्रेनिंग घेतलं; पण यावर्षी आम्ही महिलाच जाणार हा निर्धार करूनच आशादेवींसह सहा जणी प्रशिक्षण घ्यायला आल्या.   
प्रशिक्षणाला आलेला एकजण म्हणाला, ‘अहो ताई मी माझ्या बायकोला शिकवलं तर ती पळून जाईल.’ त्याचं हे बोलणं ऐकून मला आश्चर्यच वाटलं. असा कसा विचार करतात हे लोकं? 
सगळ्यांच्या मध्ये बसलेली गोड चेहर्‍याची शीतल पाटील बोलली. सासर्‍याच्या मृत्यूनंतर खर्‍या अर्थाने शीतल बचतगटामध्ये सहभागी होऊ शकली. तेव्हापासून मीटिंग्स, ट्रेनिंग्स असं काहीही तिने चुकवलेलं नाही. ट्रेनिंग्सविषयी ती भरभरून बोलते. ‘ट्रेनिंगच्या निमित्ताने गावाबाहेर चार दिवस राहतो. घर, मुलं, स्वयंपाक यांच्यापेक्षा वेगळं काहीतरी करतो. काहीतरी नवं शिकतो. इतर गावांतल्या बायकांना भेटतो, त्यांच्याविषयी जाणून घेतो, मला स्वत:साठी वेळ मिळतो. त्यामुळे ट्रेनिंगवरून परत येताना मला सासरी येत असल्यासारखं वाटतं.’
बलदाने गावातल्या या राजपूत स्रियांनी पदराची परंपरा सांभाळत स्वत:चं अर्ध आकाश मिळवलंय. आशादेवी आणि कोमलसिंह यांच्यात असलेल्या समजूतदारपणाचा, विश्वासाचा आणि संवादाचा परिणाम अप्रत्यक्षरीत्या त्यांच्या आसपास असलेल्या नव्या जोडप्यांवरही पडतोय. या सगळ्यांची भेट घेतल्यानंतर बलदाने गावाची एक नवी ओळख मला झाली..
namrata@paanifoundation.in
(लेखिका पानी फाउण्डेशनच्या सोशल मीडिया मॅनेजर आहेत.)

Web Title: The village Baldane, fighting with drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.