कृतार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 06:00 AM2019-07-28T06:00:01+5:302019-07-28T06:00:07+5:30

निर्मलाबाई पुरंदरे. देवाने त्यांना भरभरून दिले.  रंग, रूप, आवाज, कीर्तिवंत पती, यशवंत भाऊ,  कर्तबगार मुले, दीर्घ आयुष्य. त्यांनीही या आयुष्याचे सोने केले. जी जी स्वयंसेवी कामे  हाती घेतली ती पूर्णत्वास नेली.  स्थापन केलेल्या विविध संस्था चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ सांभाळल्या, वाढवल्या.  दीर्घकाळ, परिपूर्ण आणि लोकोपयोगी  यशस्वी वाटचालीचा हा प्रवास आता थांबला आहे.

Vinayak Patil introduces the great work of late Nirmalabai Purandare | कृतार्थ

कृतार्थ

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यार्थी सहाय्यक समितीची त्यावेळी बाल्यावस्था होती. त्यातील एक प्रमुख निर्मलाबाई. कल्पना मूर्त स्वरूपात आणण्यासाठी स्वत:पासून लगेच सुरुवात करत..

- विनायक पाटील

1967 साली ‘साप्ताहिक माणूस’चे संपादक र्शी.ग. माजगावकर यांनी र्शी कैलास ते सिंधुसागर ही एक पदयात्रा काढली होती. औरंगाबाद ते मुंबई या यात्रेतील मी एक. निर्मला पुरंदरे कधी कधी येत. त्यामुळे निर्मलाबाईंची माझी ओळख झाली. बावन्न वर्षांपूर्वी. निर्मलाबाई माजगावकरांच्या भगिनी.
माझे पुण्याला त्याकाळी बर्‍यापैकी जाणे-येणे होते. मुळात पुणे आवडायचेच.
‘माणूस’चे कार्यालय होते, सदाशिव पेठेत नागनाथ पाराजवळ, मळेकर पटवर्धनांच्या वाड्यात. ऐसपैस मोठ्ठा वाडा, त्याच्या दिवाणखान्यात कोपर्‍यात एक टेबल, समोर बर्‍याच खुर्च्या, माजगावकर त्या टेबलाशी बसत, गप्पांचा छान फड जमत असे.
वि.ग. कानेटकर, दि.बा. मोकाशी, रंगा मराठे, अरुण साधू वगैरे वगैरे.. मी पुण्यात असलो की गप्पा छाटायला जाई. दुपारचे जेवण र्शी.गं.च्या घरी. तेव्हा ते नव्या पेठेत रहात असत. पुरंदर्‍यांकडेही जाई. दौर्‍यावर नसले तर बाबासाहेबांचीही भेट होई. खूप ऐकायला मिळे. पुरंदरे रहात होते बा.रा. पोरे यांच्या चाळीत. तीही सदाशिव पेठच. तिसर्‍या मजल्यावर. वर जाण्यासाठी डुगडुगता लाकडी जिना. नवीन येणार्‍याला भीती वाटायची.
बा.रा. पोर्‍यांच्या चाळीचा जिना चढून वर गेले की तीन खोल्यांचा पुरंदरेंचा किल्ला. किल्लेदार निर्मला पुरंदरे. बाबासाहेब कुठेतरी मोहिमेवर. किल्ल्यात सैनिक माधुरी, अमृत आणि प्रसाद. घर नेहमी चकाचक आणि जागते. त्यांना स्वच्छता आवडे; वैयक्तिक आणि घराची. सकाळी सगळे उठले की गाद्या गुंडाळीत आणि पांघरूणाच्या घड्या करून भिंतीशी एकावर एक रचून ठेवीत. घरात वारंवार झाडू फिरवत. विशेषत: स्वयंपाकघरात. अगदी मेथीची काडी जरी पडलेली दिसली तरी उचलत नसत, झाडू फिरवत.
या घराला पाहुण्यांचा कंटाळा नाही. बाबासाहेबांमुळे सगळा महाराष्ट्र मित्र. येणार्‍यांचे स्वागत, चहापाणी तसेच थोडेसे बोलावेही लागेच. निर्मलाबाई घरकाम करीत असतानाच बोलत. अगदी स्वयंपाक करीत असल्या तरी. शिवाय सैनिकांना आदेश. ‘प्रसाद शाळेत जायची वेळ झाली. जिजी (माधुरी) क्लासला जातांना केतकरांकडे हा निरोप दे. अमृत अरे एकदा तरी वेळेवर अंघोळ कर.’ वगैरे वगैरे. 
विद्यार्थी सहाय्यक समितीची त्यावेळी बाल्यावस्था होती. अच्युतराव आपटे यांनी ही संस्था स्थापन केली. त्यातील एक प्रमुख निर्मलाबाई. खेड्यापाड्यातून गरजू मुलं शिक्षणासाठी पुण्याला येतात., त्यांची राहायची सोय नसते. ऐपतही नसते. त्यांच्यासाठी आधी देणग्या जमविणे, मग जमीन, नंतर इमारत. असा क्रम नाही. कल्पना मूर्त स्वरूपात आणण्यासाठी सुरुवात स्वत:पासून लगेच सुरुवात. 
पहिले तीन विद्यार्थी संस्थापकांच्या घरी ठेवून घेतले. एक अच्युतराव आपट्यांकडे. एक त्यावेळचे एस.पी.कॉलेजचे प्राचार्य मालेगावकर यांच्याकडे आणि तिसरा पुरंदरेंच्या घरी. संस्था सुरू. शुभस्य शीघ्रम. काही वेळ ‘माणूस’साठी देत. काही लिखाण करीत. वैयक्तिक आणि संस्थेचा पत्रव्यवहार त्या तेथूनच करीत. अक्षर टपोरे, सुवाच्य. दिलीपराव माजगावकर हे त्यांचे सहकारी संपादक. कधीतरी त्या त्यांना हाक मारीत, ‘दिल्या, अरे हे असे असे करायला पाहिजे’. सगळ्या क्षेत्रातील आपली मते सांगत. दिल्याला संपादन क्षेत्रातले काही कळत नाही हा दृढ विश्वास. 
पुणेभर प्रवास रिक्षाने, पायी. महाराष्ट्रभर प्रवास एस.टी.ने. खेडोपाडी, मिळेल त्या वाहनाने. संस्थांची मुंबईतील कामे थडाणी नावाचे आरएसएसचे एक स्वयंसेवक यांच्या स्कूटरवर मागे बसून करीत. ‘वनस्थळी’ संस्थेच्या कामाकरिता दुर्गम खेड्यापाड्यांत जात. तिथेच रहात व तिथल्याच होऊन जात. वनस्थळीशी बांधलेल्या मुली, बाया त्यांचे गावात आगमन झाले की ताई ताई करीत त्यांच्या भोवती जमत. काही खेड्यात मी त्यांचेबरोबर फिरलो आहे. आता या संस्थेचे काम महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यात असून, सहाशेपेक्षा अधिक कायमस्वरूपी लोक काम करतात.
एकदा कामानिमित्त निफाड तालुक्यात आल्या होत्या. मुक्कामाला. कुंदेवाडी येथील आमच्या घरी मुक्कामाला राहिल्या. दिवस उन्हाळ्याचे होते. आम्ही सर्व पाटील कुटुंबीय उन्हाळ्यात अंगणात झोपायचो. उकाडा व्हायचा नाही आणि चांदण्या विनामूल्य मोजायला मिळत. निर्मलाबाईंची पथारीही अंगणातच लावली. सगळेजण अंगणातच गप्पा मारू लागलो. मी माझ्या आईला म्हणालो, ‘बाई, निर्मलाबाईंचा आवाज छान आहे.’ आईने आग्रह केला काहीतरी गा. त्यांनी विचारले, काय गाऊ? आई म्हणाली, माउलीचे ‘पैलतोगे काऊ’ म्हणा. निर्मलाबाई सावरून बसल्या आणि पैलतोगे काऊ अभंग गाऊ लागल्या. मंद वार्‍याच्या झुळुका, वर निरभ्र आकाश. ज्ञानोबा माउलीचे शब्द पुरंदर्‍यांच्या गोड आवाजात. मजा आया. गोड गळ्याच्या धनी होत्या.
तीन विद्यार्थ्यांपासून सुरुवात केलेल्या विद्यार्थी सहाय्यक समितीच्या विद्यार्थ्यांची संख्या आता तीन हजार आहे, पुण्यात मुला-मुलींसाठी चार अद्ययावत होस्टेल्स आहेत.
फ्रान्स मित्रमंडळाच्या वतीने आत्तापर्यंत सांस्कृतिक देवाण-घेवाण या कार्यक्रमाअंतर्गत जवळ जवळ पाचशे भारतीय फ्रान्सला जाऊन त्यांच्या जीवनशैलीची ओळख करून आले आहेत. तसेच एक हजारापेक्षा अधिक फ्रेन्च नागरिक भारतात येऊन गेले आहेत. त्या स्वत:ही एक वर्ष फ्रान्समध्ये फ्रेंच भाषा शिकून आल्या. जी जी स्वयंसेवी कामे हातात घेतली ती पूर्णत्वास नेली. चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ संस्था स्थापन केल्या, सांभाळल्या, वाढवल्या. हा कालखंड प्रचंड आहे. दीर्घकाळ, सातत्यपूर्ण यशस्वी वाटचालीचा आहे. हा प्रवास आता थांबला आहे.
देवाने त्यांना भरभरून दिले. रंग दिला, रूप दिले, आवाज दिला. कीर्तिवंत पती दिला, यशवंत भाऊ दिले, कर्तबगार मुलं दिली, दीर्घ आयुष्य दिले. एका दीर्घायुषी, परिपूर्ण आणि लोकोपयोगी कृतार्थ चतुरस्र प्रवासाचं हे थांबणे आहे.

vinayakpatilnsk@gmail.com
(साहित्य, कला आणि शेतीसह अनेक विषयांची सखोल जाण असलेले लेखक महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आहेत.)

Web Title: Vinayak Patil introduces the great work of late Nirmalabai Purandare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.