विनोबा भावे- अध्यात्म ते विज्ञान..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 06:05 AM2020-09-06T06:05:00+5:302020-09-06T06:05:00+5:30
विनोबांची भूमिका तत्त्वज्ञाची जशी होती, तशीच शास्रज्ञाचीसुद्धा. भारतीय तत्त्वज्ञान आणि अध्यात्माचा सूक्ष्म, सोपा अर्थ विनोबांनी सांगितला. वेदांचा आणि उपनिषदांचाही विज्ञाननिष्ठ अर्थ त्यांनी लावला. सामान्यांची प्रतिभा आणि लोकव्यवहार लक्षात घेऊन गीतेचे अंतरंग त्यांनी उलगडून दाखवले. आधुनिक विचारांची कास धरून अध्यात्मवाद आणि समाजवाद यांचा समन्वयही त्यांनी साधला.
- डॉ. रामचंद्र देखणे
आचार्य विनोबाजी भावे हे नाव उच्चारताच डोळ्यांसमोर उभे राहते ती विनोबांची गीताई, त्यांची गीता प्रवचने, भूदान चळवळ, सर्वोदय, म. गांधी तत्त्वदर्शन, वेद-उपनिषदांचे भाष्य, परंधाम-पवनार आर्शम, संतसाहित्याचे व्यासंगी चिंतन, वैज्ञानिक भूमिकेतून भारतीय तत्त्वज्ञानाची मांडणी आणि त्यातून आधुनिक ऋषी म्हणून साकारलेले एक तपस्वी व्यक्तिमत्त्व. ज्ञानदेवांनी म्हटल्याप्रमाणे-
ज्ञानगंगे जे नाहाले ।
पूर्णता जेऊनि धाले ।
जे शांतीसी आले ।
पालव नवे ।
ज्ञानगंगेत न्हाऊन ज्यांना खर्या अर्थाने पूर्णत्व प्राप्त व्हावे, सखोल चिंतनातून तसेच त्याच्या अपरोक्षानुभूतीतून ज्यांच्या जीवनाला शांतीची नवी पालवी फुटावी आणि या नवविचारांच्या पालवीने विस्तारलेल्या, बहरलेल्या वृक्षाखाली तत्त्वचिंतकांनी, अभ्यासकांनी, संशोधकांनी, उपासकांनी निश्चिंतपणे विसावा घ्यावा, असा सर्वार्थाने बहरलेला ज्ञानवृक्ष म्हणजे विनोबाजी.
विनोबांइतका भारतीय तत्त्वज्ञानाचा आणि अध्यात्माचा सूक्ष्म आणि सोपा अर्थ कुणी सांगितला नसेल. वेदांचा आणि उपनिषदांचा एवढा विज्ञाननिष्ठ अर्थ कुणी लावला नसेल. सत्याग्रह, चळवळ आणि कर्मयोगाला एवढे सिद्धान्त कुणी मांडले नसेल. संतांच्या वैश्विकतेला एवढय़ा उत्तुंगतेने कुणी पाहिले नसेल. सामान्यांची प्रतिभा आणि लोकव्यवहार लक्षात घेऊन गीतेचे अंतरंग कोणी उलगडून दाखविले नसेल. आधुनिक विचारांची कास धरून अध्यात्मवाद आणि समाजवाद यांचा समन्वय कुणी साधला नसेल. र्शमशक्तीचे वेगवेगळे प्रयोग करून र्शमनिष्ठेला ज्ञाननिष्ठेची प्रतिष्ठा कुणी दिली नसेल. म्हणूनच तत्त्वज्ञानाला जीवनदर्शनाची जोड देत जीवनदर्शी आधुनिक ऋषी म्हणूनच विनोबांना गौरवावे लागेल. आचार्य अत्रे यांनी ‘मराठी माणसे मराठी मने’ या पुस्तकात विनोबांवर लिहिताना म्हटले आहे की, आद्य शंकराचार्यांनंतर एवढा बुद्धिमान आणि विचारी पुरुष भारतात झालेला नाही. गीतामाऊलीचा हा लाडका पुत्र, साम्ययोगाचा हा महान उद्गाता आणि भूदान-यज्ञाचा हा द्रष्टा महर्षी भारताला काही अपघाताने लाभला नाही. भारतीय ऋषिर्शेष्ठांच्या आणि साधुसंतांच्या तपश्चर्येला आणि पुण्याईला आलेले ते पवित्र फळ आहे.’ भारतीय तत्त्वज्ञानाचा अत्यंत सखोल, सर्वस्पर्शी, सर्वांना उमगणारा आणि अत्यंत सोपा अर्थ जर कुणी मांडला असेल तर तो फक्त विनोबांनी.
प्रस्तुतचे वर्ष हे विनोबाजींच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीचे वर्ष आहे. 11 सप्टेंबर 1895 हा विनोबांचा जन्मदिवस. पूर्ण नाव विनायक नरहर भावे. मूळ गाव कोकणातील कुलाबा जिल्ह्यातील एक लहानसे खेडे ‘गागोदे’. विनोबा हे लहानपणापासूनच मातृभक्त. विनोबांची आई शनिमाहात्म्य, भक्तिमार्गप्रदीप वगैरे पोथ्या वाचीत असे. गीता वाचावी असे तिला फार वाटे; पण ती होती संस्कृतमध्ये. ‘मला बिचारीला संस्कृत गीता कशी समजणार?’, असे जेव्हा ती म्हणाली, तेव्हा त्यांनी मराठीतील काही गीतेचे उपलब्ध अनुवाद आणून आईला दिले; पण तिचे समाधान झाले नाही. ती म्हणाली, ‘हे घेऊन मी काय करू.. विन्या, मला गीतेचा अर्थ तूच समजावून सांग रे.. तूच का नाही मला समजेल अशा सोप्या मराठीत गीता लिहीत?’ आईची इच्छा आणि प्रेरणा मिळाली आणि विनोबांनी मराठीमध्ये समश्लोकी आणि जशी संस्कृत गीता आहे तशीच सोप्या मराठीत गीता लिहिली. तीच मराठीतील सर्वमान्य झालेली ‘गीताई’ होय. विनोबा हे गीतेचे सखोल अभ्यासक, तत्त्वचिंतक होते. विनोबांनीच म्हटले आहे, ‘मी बहुतेक धर्मग्रंथांचा अभ्यास केला; पण त्या सर्व ग्रंथांपेक्षा मला गीतेत काही विलक्षण स्फूर्ती आणि पूर्णत्व आढळून आले. आईशी बोलताना मला आणि माझ्याशी बोलताना आईला जी आत्मीयता मिळे, ती गीतेपाशी मला लाभली. आईप्रमाणे गीतेशी मी बोलतो आणि गीता माझ्याशी बोलते. आई या शब्दातला सर्व भाव मी गीतेच्या ठिकाणी पाहतो.’ म्हणूनच जशी व्यासांनी संस्कृतमध्ये गीता लिहावी तशीच आणि तितक्याच मितुल्या शब्दांत विनोबांनी जी प्राकृतात गीता लिहिली, तिलाही ‘गीताई’ असे नाव दिले. भगवद्गीता आणि गीताई हे दोन्ही इतके सारखे आहेत, याचे उदाहरण द्यायचे झाले तर गीतेच्या दुसर्या अध्यायातील स्थितप्रज्ञ लक्षण पहा. मूळ गीतेतील 54 वा श्लोक-
अर्जुन उवाच : स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव..
त्यावरचा गीताईचा श्लोक-
अर्जुन म्हणाला - स्थिरावला समाधीत स्थित-प्रज्ञ कसा असे
कृष्णा सांग कसा बोले कसा राहे फिरे कसा।
हे सारे पाहिल्यावर लक्षात येते की, व्यासांच्या प्रतिभेतील प्रत्येक शब्द, त्याचा अर्थ, व्याप्ती आणि परिणाम, जसाच्या तसा ‘गीताई’मध्ये उमटला आहे. व्यासांची मूळ संस्कृतगीता विनोबांच्या गीताईने प्राकृत झाली आणि विनोबा हेच एका अर्थाने प्राकृतगीतेचे प्रज्ञावंत व्यास ठरले. ही गीताई गायला इतकी सोपी आहे, की शाळाशाळांमधून, गांधीजींच्या आर्शमांमधून एवढेच नव्हे, तर कारागृहातूनसुद्धा गीताईचा ध्वनी उमटू लागला. गीताईचे सामूहिक पाठ होऊ लागले.
र्शीमद्भगवद्गीतेचे साधे, सोपे, रसाळ, तत्त्वस्पर्शी पण सर्वांना समजेल असे सुगम दर्शन घ्यायचे असेल, तर विनोबांची ‘गीता-प्रवचने’ हा आणखी एक ग्रंथ वाचायला हवा. या ग्रंथाच्या निर्मितीमागची कथा खूपच रंजक आहे. विनोबाजी 1932 मध्ये धुळ्याच्या कारागृहात असताना त्याच कारागृहात अनेक देशभक्त, विचारवंत, प्रतिभावंत हे विनोबांप्रमाणेच स्वातंत्र्यलढय़ात भाग घेतल्यामुळे शिक्षा भोगत होते. विनोबांच्या सहवासाने राजबंदी आनंदले आणि तुरुंगाचे सारे वातावरण बदलून गेले. विनोबांची प्रासादिक गीता ऐकून त्यांनी गीतेवर प्रवचने द्यावीत, असा सत्याग्रहींनी आग्रह धरला. कारागृहाच्या प्रमुख अधिकार्यांची परवानगी घेतली आणि धुळ्याच्या तुरुंगात 21 फेब्रुवारी ते 19 जून 1932 या कालावधीत प्रत्येक रविवारी एक याप्रमाणे अठरा रविवारी अठरा रसाळ आणि विद्वताप्रचुर पण भावस्पर्शी प्रवचने झाली. विनोबा सांगत होते, ‘गीतेचा आणि माझा संबंध तर्कापलीकडचा आहे. माझे शरीर आईच्या दुधावर पोसले; पण त्याहीपेक्षा माझे हृदय आणि बुद्धी यांचे पोषण गीतेच्या दुधावरच झाले आहे. जिव्हाळ्याचा जेथे संबंध असतो तेथे तर्कास वाव नसतो. तर्काला क्षणभर बाजूला ठेवून ‘र्शद्धा आणि प्रयोग’ या दोन पंखांनीच मी गीतेच्या समुद्रात यथाशक्ती भरार्या मारत असतो. अर्जुनविषाद, आत्मज्ञान आणि समत्वबुद्धी, कर्मयोग, साधना व विकर्म, योग आणि संन्यास, चित्तवृत्ती निरोध, मानवतेची राजविद्या, विभूतिचिंतन, विश्वरूपदर्शन, सगुण-निगरुण भक्ती, आत्मानात्मविवेक, गुणोत्कर्ष, पूर्णयोग, फलत्यागाची पूर्णता, ईश्वरप्रसाद या अठरा विषयांवरील अठरा प्रवचनांमध्ये सिद्धान्त आणि दृष्टांतासह गीता सोपी करून सांगत होते. भगवद्गीतेत अध्यात्मशास्त्र आणि समाजशास्त्र एकत्र विणलेले आहे, तर गीतेच्या समाजशास्त्रात गीतेचे अध्यात्म ओवले आहे. गीतेत वर्णिलेली दैवी संपत्ती हाच समाजशास्त्राचा किंवा लोकशास्त्राचा पाया आहे,’ असे गीतेविषयीचे वेगवेगळे चिंतन विनोबा मांडत होते आणि र्शोत्यांमध्ये बसलेले साने गुरुजी ते लिहून घेत होते. ग्रंथांनाही काही संस्कार आणि प्रासादिक स्पर्श धरून असतात. विनोबांच्या मुखातून बाहेर पडणार्या शब्दांना साने गुरुजींच्या लेखणीचा स्पर्श झाला आणि विनोबांच्या मुखातून साने गुरुजींच्या लेखणीतून प्रासादिकपणे उमटलेली गीतावाणी ही ‘गीता प्रवचने’ होऊन प्रकटली आणि महाराष्ट्र सारस्वताला एक अद्वितीय ग्रंथ लाभला.
विनोबांची भूमिका जशी एकीकडे तत्त्वज्ञाची आहे, तशीच दुसरीकडे शास्त्रज्ञाचीसुद्धा आहे. विज्ञानासंबंधीची त्यांची मते स्पष्ट आहेत. ते म्हणतात की, विज्ञान आणि तत्त्वज्ञान या दोघांत एक समान तत्त्व असे आहे की, दोघेही सत्याच्या शोधात गुंतलेले असतात. सत्य पूर्ण आहे यात शंका नाही. विज्ञान हे नीतिनिरपेक्ष असते. नैतिकही नसते आणि अनैतिकही नसते. विज्ञानाच्या ठिकाणी नम्रता असते, हे त्याचे वैशिष्ट्य आहे. वैज्ञानिकांची ही नम्रता आत्मज्ञानाचेही एक अनिवार्य लक्षण असायला हवे. ते अनेक वेळी तत्त्वज्ञांच्या व्यक्तित्वातून वैज्ञानिकाला शोधत असत. एकदा मी व्याख्यानासाठी विदर्भातील यवतमाळ येथे गेलो असताना तेथून 20-22 किमी अंतरावरील कळंब नावाच्या गावी एका गणपती मंदिरातील गणपतीच्या मूर्तीमागे हातात धागा घेऊन हात उंचावलेला एक ऋषींचा फोटो पाहिला आणि मला कुतूहल वाटले. ऋषींच्या हातात जपमाळ हवी, फार तर लेखणीचे मोरपीस हवे. या ऋषींच्या हातात धागा कसा? पण याचाही शोध मला विनोबांच्याच एका चिंतनातून गवसला. विनोबांच्या मते ते ऋषी म्हणजे ‘गृत्समद’ नावाचे ऋषी होत. त्याच्याविषयी सखोल अभ्यास करून ते मांडतात की, ‘हे ऋषी ब्रrाणस्पती सूक्त मंत्राचे द्रष्टे होते. गृत्समद हा ज्ञानी, भक्त, कवी, गणिती, विज्ञानवेत्ता, कृषिसंशोधक आणि वस्त्र विणकर क्षेत्रातील महान संशोधक होता. समुद्राच्या वाफेपासून पर्जन्य निर्माण होते, हे गृत्समदाने ऋग्वेदात (ऋ. 2.24.4) लिहून ठेवले आहे. गृत्समद हा विदर्भवासी होता. लांब धाग्याच्या कापसाचे बियाणे त्यानेच शोधून काढले. कापसाच्या धाग्याचा आणि त्यापासून कापडनिर्मितीचा शोधही त्यानेच लावला. विदर्भात आज कापसाचे पीक मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते; पण विदर्भात कापसाची पहिली लागवड त्यानेच केली. विणकाम करताना धागा तुटला जाई, तेव्हा तो देवाला विनंती करत असे की,
मा तंतुस छेदि वयत:।
धागा तुटू देऊ नको. धागा तुटणे म्हणजे माझा ध्यानयोग भंगणे होय. आणि हातमागाचा धोटा इकडून तिकडे जाता जाता त्याला ‘बे’चा पाढा सुचला.
आ द्वाभ्यां हरिभ्यामिन्द्र याहया
चतुर्भिरा षड्भिहरुयमान : । (ऋ- 2.18.4)
आणि इंद्राला बोलावताना त्याने, रथाला दोन, चार, सहा, आठ, दहा घोडे जोडून ये, असे आवाहन करता करता वरील ऋग्वेदातील सूक्तातून ‘बे’चा पाढाच रचला. ‘गृत्समद’सारख्या सूक्तद्रष्टा ऋषीमधील शास्त्रज्ञ किंवा वैज्ञानिक विनोबाच उभे करू शकतात, एवढी त्यांची अध्यात्माकडे पाहण्याची विज्ञानदृष्टी सूक्ष्म होती. गांधीजींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव त्यांच्यावर होता. गांधीजी प्रथम म्हणत की, ईश्वर सत्य आहे; परंतु नंतर मात्र ते अशा निष्कर्षाप्रत पोहोचले की सत्यच ईश्वर आहे आणि या सत्याचा शोध घेण्याचा अखंड जीवनयज्ञ विनोबांच्या रूपात उभा राहिला.
(लेखक संत साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत.)