पाऊले चालती कैवल्याची वाट.
By admin | Published: December 19, 2015 04:03 PM2015-12-19T16:03:39+5:302015-12-19T16:03:39+5:30
तीर्थयात्रंच्या निमित्तानं एकसंध मराठी संस्कृती घडली. भक्तिगीतं-भजनं म्हणत, सहप्रवाशांची सुखदु:खं वाटून घेत, मिळेल ते कदान्न खाऊन ईश्वरचिंतनात गुंगून चालता चालता परमात्म्याच्या सान्निध्याचा आनंद घेणं हे तीर्थयात्रेचं मुख्य उद्दिष्ट झालं. वाटेत कुणी ना कुणी समानधर्मी मिळे आणि प्रवास अधिक सुखाचा होई..
Next
>- डॉ. उज्ज्वला दळवी
निर्धाराने, उत्कंठेने, उत्साहाने त्याने अनवाणी पाऊल घराबाहेर टाकलं.
गेल्या वर्षभरात त्याने सगळी देणी फेडून, चुकल्यामाकल्याची माफी मागून घर-शेतजमीन-दागदागिन्यांची निरवानिरव केली होती. आता मुलांनातवंडांवर संसार सोपवून निश्चिंत, नि:संग, निर्भर होऊन तो तीर्थयात्रेला निघाला होता. दूरचा पल्ला, वर्ष-सहामासांची अज्ञात परमुलखातली अवघड पायपीट, सोबतीला जवळचं कुणीही नाही हे त्याने गृहीतच धरलं होतं. कदाचित उतारवयामुळे, अनपेक्षित आजारामुळे तीर्थक्षेत्रपर्यंत पोचणंही जमलं नाही, तीर्थयात्रेतच इहलोकीची यात्र संपली तर तेही तो भाग्य म्हणून स्वीकारणार होता.’
हे वर्णन हिंदुस्तान-युरोप-जपान-आफ्रिका अशा कुठल्याही ठिकाणच्या यात्रेकरूचं असू शकतं. तीर्थयात्रेबद्दलची मानवी ओढ स्थल-काल-धर्माच्या पलीकडची आहे.
हिंदूंचं धर्मक्षेत्र जलाशयाजवळ असे म्हणून त्याला तीर्थक्षेत्र म्हणत. पण अमरनाथची गुंफा पर्वतावर आहे. रोमन देवळं डोंगरमाथ्यावर होती. ख्रिस्ती आणि बौद्ध धर्माची अनेक क्षेत्रं डोंगरात खोदलेल्या गुहांत आहेत. चौथ्या शतकात रोमन सम्राज्ञी हेलेनाने ख्रिस्ताचा क्रूस शोधून जेरुसलेमची लांब पल्ल्याची यात्र सुरू केली. आठव्या शतकापासून हाजची वाळवंटी यात्र सुरू झाली. इस्लामी हल्ल्यांच्या भयाने चौदाव्या शतकातल्या, इथियोपियाच्या लालिबेला राजाने अकरा चर्चेसचं ािस्ती धर्मक्षेत्र तर कातळात खोदलं. परधर्मी हल्ले टाळण्यासाठी त्या चर्चेसना जोडणारी वाट नरकासारख्या अंधा:या बोगद्यांतून जाते. डेल्फीला-ऑलिम्पसला भरणा:या ग्रीक यात्र, प्राचीन सीरियातली अतार्गातिसची यात्र किंवा पेरूच्या वाळवंटात काहुआचीला सापडलेली दोन हजार वर्षांपूर्वीच्या यात्रवाटांची नक्षी यांचा सध्याच्या कुठल्याही धर्माशी काही संबंध नव्हता. पण त्याही यात्रच होत्या.
तीर्थयात्रेच्या उगमाबद्दल मानववंश शास्त्रज्ञांचे काही अंदाज आहेत. मृतदेहावरचे संस्कार फार जुने, नीअँडर्थलांपासूनचे. वाडवडलांच्या अंत्यसंस्काराच्या जागेला वर्षातून एकदा भेट देणं शोधी-पारधी जमातीच्या सततच्या भटकंतीतला स्वल्पविराम झाला असावा. जमात वाढून तिच्या अनेक शाखा झाल्यावर त्या पवित्र जागी चारपाच वर्षांतून एकदा पूर्ण जमातीचा एकत्रित मेळावा भरणं सुरू झालं असावं. त्या यात्रंमध्ये तांत्रिकांचा, कर्मकांडाचा पगडा असे. अंगात येणं, भानामती, चेटूक वगैरे चाले. जनावर किंवा माणूसही बळी द्यायची प्रथा असे. सिंघभूमच्या रांकिणीदेवीच्या यात्रेतली नरबळींची प्रथा तर ब्रिटिशांनी थांबवेपर्यंत चालू होती! स्वत:ला जखमा करून घेणं, रक्त सांडणं वगैरे अघोरी देहदंड त्या ठिकाणी सदैव जागृत असणा:या शक्तीला संतुष्ट करतात अशी भावना असे.
माणूस नदीकाठी, शेतीभातीत स्थिरावला आणि मनातल्या अमूर्त कर्तुमकर्तुम शक्तीला माणसाने मूर्तरूप दिलं. महत्त्वाच्या गावांत शक्तिमान देवांची मोठी मंदिरं बांधली गेली. यात्रंचीही पठडी ठरली. यात्रेपूर्वीची निरवानिरव, घरातून पाऊल बाहेर पडल्यापासून मद्य, मांसाहार, शारीरिक सुखं यांचा त्याग आणि पायीपायी, शक्यतो अनवाणीच वाटचाल हे त्या प्रवासाचे अलिखित नियम झाले. रक्तपात-देहदंड यांची जागा केस कापणं किंवा एखादा आवडता खाद्यपदार्थ वज्र्य करणं अशासारख्या त्यागाने घेतली. भक्तिगीतं-भजनं-श्लोक म्हणणं, अनेकभाषी-वेषी-देशी सहप्रवाशांशी मिळून-मिसळून, त्यांची सुखदु:खं वाटून घेणं, मिळेल ते कदान्न खाऊन मिळेल त्या फरशी-फळकुटावर निजणं, ईश्वरचिंतनात गुंगून चालता चालता परमात्म्याच्या सान्निध्याचा आनंद घेणं हे तीर्थयात्रेचं मुख्य उद्दिष्ट झालं. वाटेत कुणी ना कुणी समानधर्मी मिळे आणि प्रवास अधिक सुखाचा होई. हे जगात अनेक ठिकाणी घडलं. पण कित्येक ठिकाणी संपत्ती-भाषा-जात वगैरेंच्या पार जाऊन एकसंध मनोवृत्ती बनली. पंढरीचे वारकरी सगळे एकजीव झाले. हजयात्रेला जाणारे लोक कुठल्याही देशाचे असले तरी ते इस्लामने बांधले गेले. सारनाथ-कौशांबी-बोधगयेला येणारे चिनी, जपानी, श्रीलंकन सगळे बौद्ध म्हणून जिवलग ठरले. देश-सीमा-भाषांच्या पलीकडली नाती जुळली.
अकराव्या शतकातले
युरोपियन यात्रेकरू
यात्रेकरू ओळखता यावे म्हणून त्यांचा पोशाखही कानटोपी, सदरा, जपमाळ अशासारखा ठरावीक असे. कनवटीला मोजकेच पैसे, हाती रोटी-लोटी-काठी आणि धडुत्याचा एक जोड इतकंच सामान जवळ असे. वाटेत धर्मशाळा, खाणावळी वगैरेंत फुकटात-स्वस्तात जेवण मिळावं ही अपेक्षा असे. कित्येकदा राज्यकत्र्याकडून तसा आदेशही असे. पण वास्तवात काही वेगळंच घडे. एजेरिया नावाच्या चौथ्या शतकातल्या यात्रेकरणीने तिच्या रोम ते जेरूसलेम यात्रेची रोजनिशी नोंदून ठेवली आहे. तिच्यावरून कळतं की युरोपमधल्या कडाक्याच्या थंडीतही यात्रेकरूंच्या नशिबी निजायला जमिनीवरची पथारी आणि खायला पिठाची कांजीच असे. त्याशिवाय लोभी पुजारी आणि उर्मट, गर्विष्ठ क्षेत्रवासीही सतावत. वाटेतल्या इटली-सिसिली वगैरेंमध्ये भूकंपाचाही त्रस असे. त्या यात्र यशस्वीरीत्या पार पडल्या की यात्रेकरूंना एखाद्या स्वस्त धातूचं पदक मिळे. ते टोपीत खोचून मिरवलं जाई. दीडशे वर्षांपूर्वीच्या काशिप्रकाश या पुस्तकात काशीयात्रेतलेही अनेक त्रस सांगितले आहेत आणि शिडी-बुडी-सांड-रांड या काशीतल्या धोक्यांचीही सूचना दिली आहे. काशीला जाणारे कापडीही कानटोपी-काठी-लोटीवाले असत. शिवाय त्यांच्या चेह:यावरच्या भक्तिभावानेही ते वेगळे ओळखता येत.
यात्रेकरूंना दक्षिणापथाचा किंवा इटली-सिसिलीच्या रोमरस्त्यांचा लाभ घेता आला. यात्रेकरूंमुळे त्या रस्त्यांवर नवी दुकानं आली, ती वाढून बाजारपेठा झाल्या, रस्त्यांची आणि पर्यायाने तिथल्या गावांचीही भरभराट झाली. ऑलिम्पिक खेळांची सुरुवातही ऑलिम्पियाच्या यात्रेमुळेच झाली. तसा फायदा वाढवायची शक्कल धर्मश्रेष्ठींना सुचली. एकाच धर्मपीठाच्या पाच, सात, अकरा देवस्थानांची एकत्रित यात्र अधिक पुण्यदायी असल्याची हवा झाली. मग गावागावांत, विविध धर्मांत नफ्यासाठी चुरस सुरू झाली. यात्रेकरूंची उत्तम सोय करणा:या गावांबद्दल त्यांच्या शेजारच्या गावांनी भलभलत्या अफवा पसरवल्या.
तीर्थयात्रेमागचा उद्देश धार्मिकच असे असं नाही. तीर्थक्षेत्रंना आणि यात्रेकरूंना राज्यकत्र्याकडून मिळणा:या मदतीमागेही वेगवेगळे हेतू असत. त्यामधून धनप्राप्ती, राजकारण, हेरगिरी- टेहळणी हेही साधायचं असे. वारकरी पंथाच्या श्रेष्ठ नेत्यांनी तर भक्तिमार्गाच्या साह्याने आणि यात्रेच्या निमित्ताने पूर्ण समाजाला एकत्र आणलं, एकसंध मराठी संस्कृती घडवली. सध्याही अनेकजण चारधाम, अष्टविनायक यात्र करतात. प्रवास आरामदायी असतो. क्षेत्रं ‘करणं’ महत्त्वाचं असतं. जुन्या तीर्थयात्रेत क्षेत्रपेक्षा तिथवरचा प्रवास अधिक महत्त्वाचा असे. वारीबरोबर चालताना सतत भेटणारा विठू पंढरपुरी पोचताना दिसेनासा होतो हे इरावतीबाईंनी अलीकडेही अनुभवलं. कित्येकदा यात्रेसाठी ठरावीक तीर्थक्षेत्र नसेच. नुसतं खडतर प्रवासात अनोळखी मुलखाशी, परक्या लोकांशी, समाजाच्या इतर स्तरांतल्या माणसांशी जुळवून घेणं, त्यांच्या कहाण्या, विचार ऐकून, समजून घेणं आणि भगवंताला समजून घेण्याच्या ओढीने मार्गस्थ राहणं हेच ध्येय असे. त्यातूनच कधीतरी त्या निर्गुण रूपाची भेट होई. ख:या मानवतेचं, धर्माचं आकलन होई. जगाकडे पाहायची दृष्टी, पूर्ण व्यक्तिमत्त्वच बदलून जाई. ते कधी, कसं काही ठरलेलं नसे.
तीर्थयात्र पुरी करायला घरी परतून संसाराच्या चाकोरीत पुन्हा पाऊल ठेवणं गरजेचं असे. पण बदललेल्या व्यक्तिमत्त्वाचा पाय चाकोरीत रुतत नसे. तृप्त, सन्मानित अस्तित्व संसारातल्या उलाढालींकडे अलिप्तपणो पाही. तिथून पुढे घर सोडलं नाही तरी परमात्म्यासोबतची यात्र आयुष्यभर चालतच राही.
पेशाने वैद्यकीय डॉक्टर असलेल्या लेखिका गेली तीस वर्षे सौदी अरेबिया आणि त्याआधी इंग्लंडमध्ये
वास्तव्याला होत्या. ‘जेनेटिक्स कशाशी खातात?’ आणि ‘सोन्याच्या धुराचे ठसके’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘मानवाचा प्रवास’ हा गेली दोन दशके त्यांच्या वाचनाचा, संशोधनाचा विषय आहे.)
ujjwalahd9@gmail.com