चीनच्या बाजारात फिरताना...
By admin | Published: October 28, 2016 04:42 PM2016-10-28T16:42:30+5:302016-10-28T17:17:00+5:30
भारतीयच नव्हे, तर दक्षिण आशियाई देशांमधील असंख्य व्यापारी चिनी उत्पादकांना पाचेक हजारांच्या संख्येने वस्तूंच्या आॅर्डर्स देतात.
- टेकचंद सोनवणे
भारतीयच नव्हे, तर दक्षिण आशियाई देशांमधील असंख्य व्यापारी
चिनी उत्पादकांना पाचेक हजारांच्या संख्येने वस्तूंच्या आॅर्डर्स देतात.
कोणताही उत्पादक पाच हजार म्हणजे पाच हजारच वस्तू बनवत नाही.
तो बनवतो साडेपाच वा सहा हजार.
काही डिफेक्ट राहिल्यास पाच हजारांचा आकडा पूर्ण व्हावा म्हणून.
मग त्यात कधी हजार वस्तू उरतात, तर कधी पाचशे.
पुन्हा या वस्तूंची बाजारपेठ म्हणजे आशियाई देश.
स्वस्त दराने याच वस्तू त्याच देशात नव्याने दिसतात.
त्यात चिनी लायटिंग असते, आकाशदिवे असतात,
एलईडी दिवे असतात, कपडे, जीन्स,
दैनंदिन वापरात लागणाऱ्या
प्लॅस्टिकच्या वस्तू, स्वयंपाकघरातील वस्तू असतात.
त्याच देशात एका वर्गासाठी उत्तम, तर दुसऱ्या वर्गासाठी
दुय्यम उत्पादने चीनचीच असतात. - त्यातला एक भारत!
फेब्रुवारीपासून चीनच्या जवळजवळ वीसेक शहरांमध्ये मुक्कामी प्रवास झाला. युवु, शेनजेन, शांघाय, गाँगझू, हाँगझूपासून ते थेट तिबेटपर्यंतची बाजारपेठ चिनी दुभाषा व वाटाड्यासमवेत मुक्तपणे मनसोक्त पालथी घातली. शहराशहरांमध्ये मुख्य रस्ते लालभडक गोल प्लॅस्टिक भोपळ्याच्या आकाराच्या आकाशकंदिलांनी उजळून निघाले होते. स्प्रिंग फेस्टिव्हलमध्ये अशा असंख्य आकाशदिव्यांनी अवघा चीन तेजोमय होतो. चीनच्या रस्त्यारस्त्यांवर असलेला हा आकाशकंदील गुणवत्ता कपातीनंतर तुमच्या-आमच्या भारतीय घरांच्या अंगणात प्रकाशमान होतो. आकाशकंदील, पणत्या, लायटिंग, फटाके आॅगस्ट-सप्टेंबरअखेर भारतीय बाजारपेठेचे गल्लीबोळ काबीज करतात. त्याची रेलचेल गणेशोत्सवादरम्यानच बाजारात सुरू झालेली असते.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी याच आकाशकंदिलाच्या प्रकाशात लक्ष्मी घरोघरी येणार. त्याबरोबर फटाके, लायटिंग, काहींच्या घरी तर लक्ष्मीची मूर्तीदेखील ‘मेड इन चायना’ असेल. चायना मेड वस्तूंवर बहिष्कार घालण्यासाठी कितीही मेसेजेस सध्या फिरत असले तरीही, भारतीय बाजारपेठेची ही अपरिहार्यता आहे. आणि जागतिकीकरणाचीदेखील. सव्वाशे कोटींच्या बाजारपेठाला लागणारी उत्सवी सामग्री पुरवणे ना भारताला स्वत:च्या जिवावर शक्य होणार, ना चीनला. अपरिहार्य आर्थिक गरजेतून भारतीय बाजारपेठेमुळे चीनमध्ये उत्पादनांची स्वतंत्र बाजारपेठ निर्माण झाली. याच बाजारपेठेने तुम्हा-आम्हा सर्वांचे उत्सव आता व्यापले आहेत.
बीजिंगमधील क्षिचांग जिल्ह्यात (म्हणजे परिसरात. इथले शहर जिल्हानिहाय विभागलेले असते) तिएनी मार्केट आहे. चार मजली. प्रत्येक मजला एकेका वस्तूनी व्यापलेला. लहान मुलांचे कपडे, पुरुषांचे कपडे, महिलांचे कपडे, खेळणी, आकाशकंदील-दिवे-मेणबत्त्या-पर्स-काच/प्लॅस्टिकच्या शोभेच्या वस्तू. इथे दिसणारी प्रत्येक नवी वस्तू सहा महिन्यांनी सणासुदीच्याच नव्हे, तर एरवीदेखील पुण्याच्या तुळशीबागेत हमखास मिळू शकते.
मखमली दिसणारा साधासा कागद. गर्द लाल रंगाचा. त्याचे भुलवणाऱ्या आकाराचे असंख्य तुकडे. असे पंचवीसेक तुकडे एकत्र केले की मग सुरेख आकाशकंदील तयार होतो. आपल्याकडे पूर्वीच्या काळी घरोघरी आकाशकंदील तयार केला जायचा तस्साच. फक्त अधिक आकर्षक. तुकडे जुळवले की मग साधारण पाचशे स्क्वेअर फुटाच्या घराच्या दरवाजाला जातिवंत शोभा आणेल असा हा आकाशकंदील. त्याचे उत्पादन मूल्य असते दोन युआन. म्हणजे वीस भारतीय रुपये. हा आकाशकंदील भारतीय बाजारपेठेत शिरता शिरता दीडशे रुपयांचा होतो. बरं हा आकाशकंदील वाहून नेण्यात गैरसोय नाही. कागदच असल्याने पुस्तकासारखी घडी होते. शिवाय तकलादू प्लॅस्टिकचे आकाशकंदीलही असतात. हा माल वाहून नेणे सोयीचे असते. म्हणून भारतीय व्यापाऱ्यांची त्यास पसंती. हे आकाशदिवे हे चीनचे पारंपरिक संस्कृतिवैभव. त्यांनी त्याला दिवाळी सणाच्या निमित्ताने भारतीय बाजारपेठेत आणले नि आपला दिवाळी सण चीनमय झाला.
बीजिंगमध्ये भारतीय व्यावसायिक येतात. तिएनी मार्केटमध्ये वस्तू पसंत करतात. शेकडा किंवा हजारांच्या पटीत आॅर्डर देतात. साधारण महिनाभरात भारतात इच्छित स्थळी माल हजर! गुणवत्ता म्हणाल तर या बाजारात नक्की मिळेल. पण त्यासाठी मग जास्तीचे पैसे मोजण्याची तयारी हवी. जशी आपल्या देशाची बाजारपेठ तशी गुणवत्ता. हे मार्केट सकाळी सात वाजता सुरू होते आणि साडेसहाला बंद. दरम्यान कोट्यवधींची उलाढाल. पादत्राणे, लेडीज पर्स, बॅग्ज यांचे तर हजारो प्रकार. कुणी होलसेल, तर कुणी रिटेल खरेदी करणारा.
माझा चिनी मित्र लि सिचावो म्हणतो- ‘‘भारतीयच नव्हे, तर दक्षिण आशियाई देशांमधील असंख्य व्यापारी चिनी उत्पादकांना पाचेक हजारांच्या संख्येने वस्तूंच्या आॅर्डर्स देतात. कोणताही उत्पादक पाच हजार म्हणजे पाच हजारच वस्तू बनवत नाही. तो बनवतो साडेपाच वा सहा हजार. काही डिफेक्ट राहिल्यास पाच हजारांचा आकडा पूर्ण व्हावा म्हणून. मग त्यात कधी हजार वस्तू उरतात, तर कधी पाचशे. पुन्हा या वस्तूंची बाजारपेठ म्हणजे आशियाई देश. स्वस्त दराने याच वस्तू त्याच देशात नव्याने दिसतात. त्यात चिनी लायटिंग असते, त्यात आकाशदिवे असतात, एलईडी दिवे असतात, कपडे, जीन्स, दैनंदिन वापरात लागणाऱ्या प्लॅस्टिकच्या वस्तू, स्वयंपाकरघरातील वस्तू असतात. त्याच देशात एका वर्गासाठी उत्तम, तर दुसऱ्या वर्गासाठी दुय्यम उत्पादने चीनचीच असतात. भारत आमच्यासाठी महत्त्वाचा आहे तो त्यासाठीच.’’
- पुरानी दिल्ली, चाँदनी चौक, लाल किल्ल्यापासून ते अवघ्या दिल्लीभर भरणाऱ्या साप्ताहिक बाजारांमध्ये ‘सस्ते का माल रस्ते पे’ च्या छोट्याश्या पाटीसह रस्त्यावर विकला जाणारा हाच तो (स्वस्तातला) चिनी माल.
ही चिनी बाजारपेठ अलिबाबाची गुहा आहे. युवु ही आद्य गुहा. हे एक शहर आहे. भव्य बाजारपेठ म्हणा हवं तर. लोकसंख्या नि क्षेत्रफळाच्या तुलनेत युवु हे शहर भारतातला सर्वात पॉवरफुल लोकसभा मतदारसंघ वाराणसीइतके, पण विकसित. काय आहे युवु शहरात? ७५ हजार दुकाने. बहुरंगी नि बहुढंगी वस्तूंची. हे एकटे शहर जगातल्या प्रत्येक देशाशी व्यवसायाने बांधले आहे. जगभर साजऱ्या होणाऱ्या नाताळ सणात दिल्या-घेतल्या जाणाऱ्या सत्तर टक्के भेटवस्तू याच शहरातल्या. या शहराचा ९९ टक्के उद्योग निर्यातीवर अवलंबून आहे. भारत हा या शहराचा सर्वात मोठा व्यावसायिक भागीदार असलेला देश. युवुशी व्यापार करणाऱ्या पहिल्या दहांमध्ये आठ देश आशिया खंडातले.
दररोज या शहरात हजारो भारतीय व्यापारी येतात. वस्तू पसंत करतात. येथे खरेदी केलेली तीन युआनची (तीस रुपयांची) वस्तू भारतीय बाजारपेठेत उत्सवी नफ्यानुसार विकली जाते. आपल्या भाषेत सांगायचे तर चीनची दिवाळीच! ही दिवाळी काही चीनच्या स्वयंउत्पादनांची नाही; ती त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या बाजारपेठेची. परदेशात पाठवल्या जाणाऱ्या सर्वच वस्तू युवुमध्ये बनत नाहीत. चीनच्या अन्य भागात व जगभरात बनलेल्या वस्तू तुम्हाला एकाच शहरात बघायला मिळू शकतील असे हे शहर आहे. म्हणून अलिबाबाची गुहा. मोठी गंमत म्हणजे युवुमध्ये विमानतळ नाही. पण जगातील सर्वात मोठी १३०० किलोमीटर लांबीची कार्गो रेल्वे आहे. पार अगदी रशिया, पोलंड, कझाकिस्तान, बेलारूस, पोलंड, जर्मनी, फ्रान्स आणि स्पेनपर्यंत जाता येईल अशी. दरवर्षी १.६ मिलिअन पार्सले येथून जगभरात धाडली जातात. म्हणजे आजच्या दिवाळी सणाला तुमच्या-आमच्या घरी (चुकून) आणलेला मेड इन चायनाचा आकाशकंदील, मेणाचा दिवा, विद्युत दीपमाळ युवुतूनच आली असण्याची शक्यता प्रचंडच!
चीनच्या बाजारपेठेचे हे गणित. त्यावर सध्या भारतीय नागरिकांच्या रोषाचे सावट आहे. अर्थात, तेही सकारणच!
भारताच्या एनएसजी प्रवेशापासून ते पाकधार्जिण्या धोरणामुळे चीनविषयी भारतात स्वाभाविक चीड निर्माण झाली. त्यात काही दिवसांपूर्वी चीनचे सरकारी वृत्तपत्र - ग्लोबल टाइम्समध्ये एक लेख छापून आला. त्या लेखाच्या शेवटी भारतीय व्यवस्था (सरकार) नुसती भुंकते - असे काहीबाही लिहिले होते. आपल्या प्रसारमाध्यमांनी या लेखाची बातमी केली. पण त्यात, संबंधित लेख एका भारतीयानेच लिहिल्याचा उल्लेख नव्हता. त्यानिमित्ताने मग चिनी वस्तूंवर बहिष्काराच्या पोस्ट समाजमाध्यमांमधून फिरू लागल्या नि आपला ‘मिडलक्लास नॅशनॅलिझम’ सुखावला. आंतरराष्ट्रीय राजकारणात अर्थव्यवहार हाच मुख्य धागा असतो. भारत स्वयंपूर्ण झाला की मग अशा पोस्ट फिरवण्याची काही आवश्यकताच उरणार नाही. आता चीनचेच घ्या. जेव्हा पाहावे तेव्हा अमेरिकेशी खेटतो चीन. पण आय-फोन वापरकर्त्यांची सर्वाधिक संख्या चीनमध्ये आहे. बरं आपण चिनी मालावर सबंध बहिष्कार टाकला नि तो शंभर टक्के यशस्वी केला तरी चीनच्या निर्यातीत त्यामुळे केवळ २.३६ टक्के फरक पडणार. कारण त्यांच्या एकूण निर्यातीत आपला वाटा तेवढाच आहे.
आपले स्वदेशी मोबाइल तंत्रज्ञान बाजारात स्पर्धा करू शकण्याइतपत उत्तम नाही. ही जागा चिनी बनावटीच्या स्वस्त परंतु भारतीय तंत्रज्ञानाच्या तुलनेत सरस अशा इलेक्ट्रॉनिक उत्पादनांनी घेतली आहे. शाओमी हा मोबाइलचा ब्रँड त्यातलाच एक. गेल्या वर्षभरात भारत-चीनदरम्यान सर्वाधिक तणाव निर्माण झाला. उलट भारतात १ ते ४ आॅक्टोबरदरम्यान शाओमी मोबाइलची एक मिलिअन इतकी विक्र मी विक्र ी झाली. चीननंतर सर्वाधिक हॅण्डसेट भारतात विकले गेले. भारतातल्या टॉप तीस शहरांमध्ये शाओमी तिसऱ्या क्र मांकाचा मोबाइल ब्रँड आहे. बाजारात एकूण खप आहे ८.४ टक्के. शिवाय ही कंपनी म्हणते, तीन ते पाच वर्षात आमचा खप सर्वाधिक असेल. शाओमी कंपनीचे कुठेही आउटलेट नाही. त्यामुळे हा फोन स्वस्त. स्वस्त कारण चीनची देशांतर्गत गरज.
मी स्वत: प्रवास केलेल्या चीनच्या पंचवीसेक शहरांमध्ये इलेक्ट्रॉनिक मार्केट स्वतंत्र असल्याचे जाणवले. अवघा मॉलच. पाच-सहा मजली. ज्यात जगभरातले तंत्रज्ञान सामावलेले असते. पार अगदी रोबोटपासून ते ड्रोनपर्यंत. आपल्याकडे लहान मुले पतंग उडवतात, त्यापेक्षा कमी वयात चिनी मुले ड्रोन कंट्रोल करतात. देशांतर्गत गरज असल्याने भरसमाट उत्पादन - उत्पादनमूल्य कमी - पर्यायाने विक्र ीमूल्य कमी. सरतेशेवटी बाजार ताब्यात. एकदा का बाजारपेठ ताब्यात आली की मग पुन्हा भरसमाट उत्पादन. हे खास चिनी चक्र आहे. सर्वच देशांचे सुरक्षिततेला प्राधान्य असते. म्हणून चीनने या क्षेत्रात शिरकाव केला. हाईकविजन हे सीसीटीव्ही उत्पादक कंपनीचे नाव. गुणवत्ता उत्तम राखल्याने सर्वच प्रमुख देशांशी या कंपनीचा व्यापार आहे. ही जगातील सर्वात मोठी सीसीटीव्ही कंपनी. आपली लक्ष्मी सुरक्षित असलेल्या बँकेच्या एटीएममध्येही याच हाईकविजनचे सुरक्षा कॅमेरे असतात.
- आता हे का जाणून घ्यायचे?
कारण मुदलात आपण चीनला ओळखतच नाही. हा शेजारी देश समजून घेण्याचाही आपण प्रयत्न केला नाही. चीननेदेखील तशी संधी दिली नाही. त्यामुळे आपले उत्सवी राष्ट्रप्रेम फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅपवरून ओसंडून वाहू लागते. अजून एक दुर्लक्षित बाब. चीनचे यू-ट्यूब असलेल्या ८ङ्म४‘४.ूङ्म वर पार अगदी ‘अर्धसत्य’ पासून ते ‘रूस्तम’पर्यंत प्रत्येक सिनेमा असतो. अस्मादिकांनी तर कबाली, रूस्तम, मदारी, सुल्तान, मोहंजोदारो प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या तीन-चार दिवसात बीजिंगमध्ये पाहिले आहेत. यू-ट्यूबवर तरी जाहिरात चार-पाच सेकंदानंतर स्किप करता येते. ८ङ्म४‘४.ूङ्मे वर एक ते दीड मिनिटांची चिनी जाहिरात पूर्ण पाहावीच लागते. सिनेमे भारतीय, पण जाहिरात चिनी उत्पादनांची. तीदेखील चिनी लोकांसाठीच. आपले मात्र कधीच याकडे अर्थकारणाच्या दृष्टीने लक्ष जात नाही.
माझे काही पुण्यातील मित्र चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणाऱ्या पोस्ट मला व्हॉट्सअॅपवर पाठवित आहेत, तर दुसरीकडे आगामी महापालिका निवडणुकीतील इच्छुक उमेदवार मतदारांना देण्यासाठी चिनी भेटवस्तू (हजारांच्या पटीत) स्वस्त मिळतील का, म्हणून विचारणा करीत आहेत. अशी एक दुर्लभ व्हॉट्सअॅपीय अवस्था अनुभवता आली. चीनची ही बाजारपेठ अभ्यासकांच्या आवाक्याबाहेर आहे. कारण चीनची मूठ झाकण्याची सवय. त्यातून खरे अर्थकारण समजण्याची शक्यता जरा कमीच असते. आकडेवारीबद्दल कुणी काहीही म्हणो, पण ही ड्रॅगनची गुहा अत्यंत खोल आणि गुंतागुंतीची आहे. भव्य आहे. त्यात प्रत्येक वस्तू मिळते. आफ्रिकन देशांमध्ये तर रेल्वेदेखील चीनच्या मदतीने सुरू होतेय. आशियाई बाजारपेठेनंतर चीनची नजर आहे ती या देशांवर. त्या देशांच्या आर्थिक क्षमतेनुसार तेथेही अशीच चिनी उत्पादने दिसतील. त्यांचाही सण मग ‘मेड इन चायना’ शिवाय साजरा होणार नाही.
दिवाळी सणाच्या निमित्ताने आपणही सुज्ञ व्हावे, एवढेच बीजिंगमधून आज सांगावेसे वाटते. स्वयंपूर्ण गुणवत्ता विकसनाशिवाय पर्याय नाही. स्वदेशी तंत्रज्ञान गुणवत्ता असेल तरच टिकेल. भारताने अमेरिकेला उत्तमोत्तम आयटीतज्ज्ञ दिले; पण दिपवून टाकेल असे आयटीशी संबंधित उत्पादन आपण देऊ शकलो नाही, ही खंत या बहिष्काराच्या गोंगाटात आपल्या मनात उमटलीच पाहिजे. त्याचे स्मरण प्रत्येक दिवाळी सणाला नित्यनूतन व्हावे.
युवु चीनची ‘दिवाळी’च!
चीनमधले एकटे युवु शहर घ्या. ७५ हजार दुकाने. बहुरंगी नि बहुढंगी वस्तूंची. हे एकटे शहर जगातल्या प्रत्येक देशाशी व्यवसायाने बांधले आहे. जगभर साजऱ्या होणाऱ्या नाताळ सणात दिल्या-घेतल्या जाणाऱ्या सत्तर टक्के भेटवस्तू याच शहरातल्या. या शहराचा ९९ टक्के उद्योग निर्यातीवर अवलंबून आहे. भारत हा या शहराचा सर्वात मोठा व्यावसायिक भागीदार असलेला देश. दररोज या शहरात हजारो भारतीय व्यापारी येतात. वस्तू पसंत करतात. कुवतीप्रमाणे-गरजेप्रमाणे आॅर्डर देतात. गणपतीच्या मूर्तीपासून ते सजावटीच्या सामानापर्यंत हजारो प्रकार. ज्या आकारात आवडेल त्या आकारात, जितक्या रकमेत परवडेल तितक्या रकमेत. युवुहून शांघाय तीन तासांच्या अंतरावर. तेथून जलवाहतुकीमार्गे कोलकाता ते हवाईमार्गे मुंबईहून भारतभर या वस्तू पोहोचतात. येथे खरेदी केलेली तीन युआनची (तीस रुपयांची) वस्तू भारतीय बाजारपेठेत उत्सवी नफ्यानुसार विकली जाते. या शहराच्या उपमहापौरांशी मोकळ्या गप्पा मारता आल्या. भारताविषयी त्यांना विलक्षण (व्यावसायिक) ममत्व आहे. क्षियांन ताओ त्यांचे नाव. ते म्हणतात- ‘‘२०१५ साली आम्ही १८ मिलिअन डॉलर्सचा माल एकट्या भारताला एक्स्पोर्ट केला. २०१४ च्या तुलनेत ही वाढ ६९ टक्क्यांची होती.’’ आपल्या भाषेत सांगायचे तर चीनची दिवाळीच!