वॉकिंग मेडिटेशन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 06:01 AM2021-08-22T06:01:00+5:302021-08-22T06:05:01+5:30
ध्यान, योगसाधना आपल्याला माहीत आहे. आपल्यापैकी अनेकजण करतातही; पण चालता चालता ध्यान करायचं.. हे ऐकलंय कधी?ध्यानधारणेचा हा एक आगळा-वेगळा प्रकार आहे.
- लोकमत न्यूज नेटवर्क
अनेकजण ध्यान आणि व्यायाम हे दोन वेगवेगळे प्रकार मानतात. पण ध्यानधारणा हादेखील व्यायामाचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. तीस मिनिटं जर आपण शारीरिक आरोग्यासाठी व्यायाम केला, तर किमान पंधरा मिनिटं तरी ध्यानधारणेला द्यावीत, असा व्यायामाचा नियम आहे. ध्यान करायचं म्हटलं की ते डोळे मिटून, एका जागी, विशिष्ट आसनात बसून करायचं असतं हेच आपल्या डोळ्यासमोर येतं. पण चालता चालताही ध्यान करता येतं असं म्हटलं तर यावर विश्वास बसेल? या प्रकाराला शास्रीय आधार असून, त्याचे शरीर-मनासाठी विशिष्ट फायदेही आहेत.
कॅलिफोर्निया विश्वविद्यालयाच्या ‘द ग्रेटर गुड सायन्स सेंटर’च्या म्हणण्यानुसार ‘कबाट झिन’च्या ‘माइंडफुलनेस बेस्ड स्ट्रेस रिडक्शन’ या मेथडमधे वॉकिंग मेडिटेशन ही थेरेपी आहे. या प्रक्रियेत अगदी हळुवार, मंद गतीनं चालायचं असतं. यात चालण्याच्या प्रक्रियेवर बारकाईनं लक्ष केंद्रित केलं जातं. जसं की चालता चालता वळणं, चालताना पावलं उचलणं, जमिनीवर पावलं ठेवणं, चालताना शरीराला पुढे नेणं या गोष्टींकडे अगदी सजगतेनं बघितलं जातं. खरं तर आपण रोज उठल्यापासून झोपेपर्यंत घरात, घराबाहेर चालत असतो; पण त्या चालण्याकडे आपलं अजिबात लक्ष नसतं. आपण तेव्हा चालण्याप्रति अजिबात सजग नसतो. वॉकिंग मेडिटेशन ही अगदी याच्या उलट प्रक्रिया आहे.
कसं करतात वॉकिंग मेडिटेशन?
1. वॉकिंग मेडिटेशन करण्यासाठी सर्वात आधी शांत जागा निवडावी. असा रस्ता निवडावा जिथे शांतता असेल. रहदारी नसेल. कोणीही आपल्या या वॉकिंग मेडिटेशनमध्ये व्यत्यय आणणार नाही आणि १० ते १५ पावलं आपण सरळ चालू शकू अशी जागा असावी.
2. सर्वात आधी दीर्घ श्वास घ्यावा आणि अगदी हळूहळू १० - १५ पावलं चालावीत.
3. १०-१५ पावलं चालल्यानंतर जेवढं शक्य आहे तेवढा खोलवर अर्थात दीर्घ श्वास घ्यावा.
4. नंतर मागे वळून जिथून चालायला सुरुवात केली तिथे त्याचं मंद गतीनं चालत यावं.
5. मूळ जागी परत आल्यानंतर पुन्हा जेवढा शक्य आहे तेवढा दीर्घ श्वास घ्यावा.
6. वॉकिंग मेडिटेशन करताना प्रत्येक पाऊल हळुवार टाकावं. दीर्घ श्वसन करतानाही हळुवार करावं. आपण जे करतो आहोत त्याचा खोलात अनुभव घ्यावा. मग ते पाऊल टाकणं असो, वळणं असो, श्वास आत घेणं, बाहेर टाकणं असो. प्रत्येक प्रक्रियेचा अनुभव घ्यायला हवा.
7. या सर्व प्रक्रियेत मनात येणारे विचार येऊ द्यावे आणि जाऊ द्यावे.
8. अशा प्रकारे वॉकिंग मेडिटेशन १०-१५ मिनिटं करावं.
वॉकिंग मेडिटेशन करून काय मिळतं?
1. शरीर शांत होतं. शरीर आणि मनाला आराम मिळतो.
2. एकाग्रता वाढते.
3. शरीराचा समतोल अर्थात बॅलन्स ठेवता येतो.
4. प्रत्येक क्रियेवर लक्ष केंद्रित केल्यानं शरीराप्रति सजगता निर्माण होते.
5. पाचन क्रिया सुधारते. चयापचय व्यवस्थित होतं.
6. शरीर आणि मनाला ऊर्जा प्राप्त होते.
7. मनावरचा तणाव निवळतो.