आगीची भिंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 06:02 AM2020-01-19T06:02:00+5:302020-01-19T06:05:04+5:30

गेली एकोणवीस वर्षं मी ज्या देशात राहातो, त्या ऑस्ट्रेलियाला  दोनेकशे फूट उंच आगीच्या जळत्या भिंतीने वेढून टाकलं आहे. जिभल्या चाटत पुढे पुढे सरकणार्‍या या भिंतीनं वाटेत येईल ते गिळून टाकण्याचा सपाटा लावला आहे..

Wall of fire.. Bushfire in Australia | आगीची भिंत

आगीची भिंत

googlenewsNext
ठळक मुद्देजिभा चाटत पुढे पुढे सरकणारी, पन्नास किलोमीटर लांब आगीची भिंत..

- निनाद कट्यारे (मेलबर्न)

ऑस्ट्रेलियाच्या वणव्यातून वाचलेल्या लोकांच्या कहाण्या हळुहळु समोर येत आहेत. इतका भयंकर वणवा येईल, असे कुणाला वाटले नव्हते.
साधारणपणे ऑस्ट्रेलियामध्ये आग आणि अग्निशमनाचे महत्त्व सर्वांना व्यवस्थितपणे ठाऊक असते. अनेकदा उन्हाळ्यात आगी लागतात. आपले घर आगीपासून जपण्यासाठी अनेक लोक घर सोडून सुरक्षित आसरा घेत नाहीत. कारण अंतरे खूप आहेत. आणि काही लोकांना घर वाचवणे महत्त्वाचे वाटते.
सुट्टीवर असलेला शेन्टोन नावाचा पोलीस आगी लागल्या म्हणून सार्सफिल्ड नावाच्या अगदी लहान गावात घरीच राहिला. हे गाव जंगलाने वेढलेले आहे. बाकी सर्वांना मात्र त्याने सुरक्षित ठिकाणी पाठवले. घर या आगीतून वाचवायचे म्हणून तो थांबून राहिला. आगीतून घर कसे वाचवायचे याचा त्याने तपशीलवार विचार करून ठेवला होता. त्यानुसार तो काम करत होता. घराला असलेल्या टाक्यांमध्ये पावसाचे साठवलेले पाणी होते आणि ते तो पाइपने खेचून घेत होता. सर्वत्र पाणी मारत राहिला. पण या वेळी अग्निचे तांडव रौद्र होते. आधी त्याच्या घरावर जळत्या ठिणग्यांचा पाऊस पडला. यामुळे त्याच्या सभोवती अनेक ठिकाणी आगी लागल्या. या आगी विझवण्याची त्याने पराकाष्ठा केली. पण विजेच्या तारा वितळून वीजप्रवाह खंडित झाला. त्याबरोबर साठवलेले पाणी पुरवणारी मोटरही बंद पडली. आता आगीपासून वाचायला काही साधनच उरले नाही. तरीही त्याने टॉवेल्स आणि घोंगडी वापरून आग विझवण्याचा प्रय} केला. शेवटी तो हरला. सोसाट्याचा अतिउष्ण आणि कोरडा वारा सर्वत्र ठिणग्या आणि आगीचा पाऊस पाडत होता. त्याने आपल्यापासून दूर पाहिले तर आगीचा प्रलय दिसत होता. त्याने घर सोडण्याचा निर्णय घेतला. पण आता धोका वाढला. गाडी काढली आणि त्या आगीतून सुटण्यासाठी जायला लागला. रस्त्यात सलग असे आगीचे थैमान आठ किलोमीटर्सपर्यंत तो पाहात आला. त्याच्या दोन्ही बाजूंनी शंभर फुटांच्या आगीच्या भिंती जळत होत्या. या आगीची धग लागून रस्ताही इतका गरम झाला होता की, गाडीचे टायर्सही वितळू लागले होते; पण तो कसाबसा सुरक्षित ठिकाणी पोहोचला. टीव्हीवर त्याचा अनुभव सांगताना तो म्हणाला की, आता मी कधीच घर वाचवण्याच्या विचारातही पडणार नाही. जीव वाचला हेच खूप झाले.
**
शॉन मॅक्डॉनेल आणि त्याची मुलगी इंडिया हेपण घर वाचवायला म्हणून थांबले होते. हे गुंगेराह नावाच्या इवल्याशा गावात राहतात. गावातले बहुतेक लोक गाव सोडून सुरक्षित ठिकाणी निघून गेले होते. शॉनने आपल्या बायकोला आणि दोन लहान मुलींना ऑबरेस्ट नावाच्या गावाला सुरक्षित असेल म्हणून पाठवून दिले. गुंगेराह हे गाव संपूर्ण जंगलाने वेढलेले आहे. जसे पेटलेले आगीचे लोळ गावाकडे येऊ लागले तसे शॉन आणि त्याच्या मुलीने घर वाचवण्याचे खूप प्रय} केले; पण आगीचा वेग इतका होता की त्यापुढे त्यांचे काहीही चालले नाही. त्यांनी कसेबसे स्वत:ला वाचवले.
आता त्यांच्या शेतावर फक्त एक पत्र्याची शेड उरली आहे; त्यात ते दोघे जीव मुठीत धरून राहात आहेत. अजूनही जंगल आणि गाव धुमसते आहे.
हीच आग पुढे ऑबरेस्ट गावाकडे सरकली. शॉनने आपली बायको आणि मुलीला या गावात पाठवले होते. शॉनला आता वाटते आहे की, ऑबरेस्टला जाऊन इतरांना मदत करावी. परंतु तो आणि त्याची मुलगी इंडिया या दोघांनाही आता गुंगेराहमधून बाहेर पडता येत नाहीये. कारण सर्व रस्ते बंद आहेत. रस्त्यांवर भले मोठे धुमसणारे वृक्ष पडले आहेत.
**
ग्रॅहम क्लार्क अग्निशामक दलाचा रिटायर्ड जवान आहे. तो टेरेस नावाच्या अगदी लहानशा गावात राहतो. हे गाव ऑबरेस्ट आणि मल्लकुट्टाच्या मध्ये पडते. त्याने त्याच्या डोळ्यासमोर गावातली सगळी घरे जळून जात असताना पाहिली. पण चमत्कार झाल्यासारखे त्याचे आणि त्याच्या शेजार्‍याचे घर वाचले. तो म्हणतो की, मी आजवर कधीही अशा स्वरूपाची आग पाहिली नाही. आता गावात काहीच शिल्लक राहिले नाही. इतरांशी संपर्क  होईपयर्ंत ग्रॅहमने पाच दिवस जवळच्या झर्‍याचे पाणी पिऊन दिवस काढले.
**
दक्षिण ऑस्ट्रेलियातील कांगारू बेटावरची आगही भयंकर होती. येथे सिमोन या बाईची आर्ट गॅलरी होती. सर्व पंचक्रोशीत ही आर्ट गॅलरी प्रख्यात होती. येथे अनेक प्रकारची चित्रे आणि कुंभारकामाचे नमुने असतात. आग लागल्यावर आपले घर आणि ही आर्ट गॅलरी सोडून तिने इतरत्र आसरा घेतला. ती सुरक्षित राहिली; पण आर्ट गॅलरी जळून गेली. येथली आग आणि त्याचे तापमान इतके होते की, कुंभार कामाची काही भांडी भट्टीत घालायची होती, ती तशीच सोडली होती. ही भांडी भट्टीत न घालताच निव्वळ आगीच्या धगीनेच तयार होऊन गेली.
अशा मातीच्या कुंभांशिवाय बाकी सर्व मौल्यवान चित्रे मात्र जळून गेली. आता सगळ्याची परत सुरुवात करण्याशिवाय गत्यंतर नाही.
**
अशा कितीतरी कहाण्या. अग्निप्रलयाच्या. अंगावर शहारे आणणार्‍या. ऑस्ट्रेलियातल्या तुलनेने (अजून तरी) सुरक्षित भागात राहाणारे माझ्यासारखे लोक हे सारे वाचून, पाहून, अनुभवून अक्षरश: थिजून गेले आहेत. आम्ही राहतो त्या देखण्या देशाची अक्षरश: भट्टी झाली आहे आणि किती नुकसान झाले हे मोजायलासुद्धा कुणाला वेळ नाही, भान नाही अशी भयावह अवस्था आहे.
सध्या ऑस्ट्रेलियामध्ये भडकलेल्या या अभूतपूर्व वणव्यात सुमारे 1,86,000 चौरस किलोमीटर जंगल आणि चार्‍याची राने जळून खाक झाली. याशिवाय सुमारे 14,000 घरे या आगीच्या भीषण तांडवात जळून नष्ट झाली. या वणव्यात आजवर अंदाजे 29 जण ठार झाले आहेत. अंदाजे, लिहिण्याचे कारण म्हणजे अनेकजण अजून बेपत्ता आहेत. एकाक्षणी सुमारे एक लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले. या आगीत अक्षरश: गावेच्या गावे राख होऊन गेली. माणसे जळाली. प्राण्यांची राख झाली.
ऑस्ट्रेलियामध्ये आगी लागणे नवीन नाही. येथील पूर्व किनारपट्टीच्या भागात अप्रतिम दाट जंगल आहे. शिवाय गवताळ कुरणे आहेत. तेथे उन्हाळ्यात अनेकदा लहान-मोठय़ा आगी लागतात. काही वेळा विजा पडूनही आगी लागतात. या वेळेची आग तशीच लागली असावी, अशी शक्यता आहे. त्यात न्यू साउथवेल्स राज्यात प्रदीर्घ काळापासून भयंकर दुष्काळ पडला आहे. पाऊस न झाल्याने कोरडेपणा अतिशय वाढला आहे. दुष्काळी वातावरणात अनेक झाडे कोरडी पडली आहेत, वठून गेली आहेत. अर्थातच जंगलातील वाळलेली लाकडे, वाळलेले गवत यांचा एकत्रित परिणाम होऊन आगीला चालना मिळाली आणि अजूनही मिळते आहे.
व्हिक्टोरिया राज्यात साधारण 21 नोव्हेंबर रोजी, वीज पडल्याने पूर्व गिप्पस्लँडमध्ये आग लागली. ही आग अतिशय वेगात पसरत गेली आणि येथील संरक्षित जंगल पेटले. सुरुवातीला बकन आणि दक्षिण बकन या छोट्या गावांना धोका तयार झाला. मग सनी पॉइंटच्या समुदायांना धोका तयार झाला. 20 डिसेंबरच्या रात्री, मार्थावले-बारमाउथ स्पर येथेही आगीचा विस्तार झाला. अशा अवस्थेत अत्यंत गरम आणि कोरडे वारे वाहू लागले. हे वारे आगीच्या ठिणग्या वाहून नेऊ लागले. यामुळे अक्षरश: वार्‍याच्या वेगाने आग पसरू लागली.
पाहता पाहता आगीने पन्नास किलोमीटरच्या विशाल भिंतीचे रूप घेतले. ही भिंत इंधन मिळेल तशी काही ठिकाणी दोनशे फुटांपेक्षा उंच होत गेली आणि वेगाने जे समोर येईल ते जाळीत सुटली. आजवरचा हा सर्वात भीषण वणवा तयार झाला. या आगीच्या वेगापुढे सर्व प्रय} हतबल झाले. ऑस्ट्रेलियामध्ये घरे लाकडाची असतात. त्यामुळे आगीच्या कचाट्यात आलेली घरे भराभर जळून गेली. फक्त घरावर घातलेले वेडेवाकडे झालेले पत्रे तेवढे शिल्लक राहिले आहेत. अनेक लोकांना बेघर व्हावे लागले.
एकूण संकटाचे स्वरूप पाहून न्यू साउथवेल्स राज्यात आणीबाणी लागू केली गेली. व्हिक्टोरिया राज्यात राज्यस्तरीय अग्निसंकट जाहीर केले गेले. यामुळे सार्वजनिक रस्ते आणि पाण्याचे स्रोत यावर सरकारला संपूर्ण ताबा मिळाला. तसेच लोकांना सक्तीने हलवण्याचे अधिकार मिळाले. लोक आगीत सापडू नयेत म्हणून अनेक रस्ते बंद केले गेले आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी अमेरिकेतून आणि न्यूझीलंड येथून आगीचे बंब आणि अग्निशामक दल बोलावले गेले आहेत. याशिवाय पाणी फवारू शकतील, अशी विमाने आणि हेलिकॉप्टर्सही सदैव काम करत आहेत. तथापि धूर आणि पाण्याची उपलब्धता यामुळे त्यांच्या कामाला र्मयादा येत आहेत.
नाताळच्या सुटीसाठी म्हणून अनेक लोक कुटुंबासहीत मल्लाकुटा तसेच लेक एन्ट्रन्स या निसर्गरम्य गावात गेले होते. सुरेख जंगले आणि निळाशार समुद्रकिनारा यामुळे येथे पर्यटकांची रीघ असते. एरवी सुमारे पाच ते सात हजाराची लोकवस्ती असलेल्या या लहान लहान गावात तीस ते चाळीस हजार लोक सुट्यांसाठी आले होते. नाताळच्या दरम्यान अगदी किनार्‍यावरील शहरात वणव्याची भीती वाटत नव्हती. पण शेवटी आग पसरत पसरत मल्लाकुटा गावाला लागली. हे गाव समुद्रकिनार्‍यावर; पण जंगलाने वेढलेले आहे. अगतिक झालेले गावातील लोक आपले सर्वकाही सोडून समुद्रकिनार्‍यावर धावले. गावावर धुराचे भयावह आवरण तयार झाले. भरदिवसा अंधार पडला आणि त्या अंधारात आगीचा नारंगी रंग सर्वांच्या जिवाला भिववू लागला.
आगीमुळे एडनसारख्या अनेक लहान गावांचे संपर्क  तुटले. आता मेलबर्नकडे परतणेही अवघड झाले. या गावातला अन्नाचा, औषधांचा, पाण्याचा साठा संपू लागला. सुपर मार्केट्स पूर्ण रिकामे झाले. हीच स्थिती इतर अनेक लहान गावांत झाली.
आगीमध्ये मोबाइलचे टॉवर वितळून गेले. यामुळे संपर्कही संपला. मग गावागावांत संपर्कासाठी हेलिकॉप्टरमार्फत उपग्रह दूरध्वनी टाकले गेले. शेवटी पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियाचे नौदल बोलावण्याची परवानगी घेऊन नौदल पाठवले आणि लोकांची सुटका केली. जे लोक रस्त्याने जाऊ शकले, त्यांच्यासाठी बेन्स्डेल या गावात तळ बनवले गेले आहेत. येथे अनेक बेघर लोकांनी आसरा घेतला आहे.
भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट म्हणजे या बेघर लोकांना अन्न पुरवण्यासाठी शीख स्वयंसेवक संघाने अत्यंत वेगाने कार्यवाही सुरू केली. त्यांनी मेलबर्न येथून अन्नपुरवठा सुरू केला. मग तेथील एका भारतीय उपाहारगृहाने आपली जागाच स्वयंसेवक संघाला दिली. त्यांनी भेदरलेल्या आणि भुकेल्या लोकांना अन्न पुरवले. तसेच त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांसाठी अन्नपुरवठा केला. हिंदू स्वयंसेवक संघाने पैसे जमा करणे सुरू केले. त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांनी इतर स्वयंसेवी संस्थांशी समन्वय साधून कार्य सुरू केले आहे. याशिवाय अनेक लोकांनी फंड रेझिंग सुरू केले. अनेक खेळाडू आणि सेलिब्रिटीजनेही यासाठी मोठा हातभार लावला आहे.
**
याचवेळी दक्षिण ऑस्ट्रेलिया राज्यातील अतिशय निसर्गरम्य अशा कांगारू बेटालाही आग लागली. ही अतिशय भीषण होती. या बेटावर कोआला, कांगारू आणि कोकॅटू या प्राण्यांचे मोठे अस्तित्व होते. त्यातले अनेक प्राणी आगीच्या तांडवात जळून गेले. एक सर्जन आणि त्यांचे पायलट वडील येथे सुट्टीवर आले होते. तेही आगीतून सुटण्याची धडपड करत होते. परंतु त्यांच्या जाण्याच्या रस्त्यावर आगीने रौद्र स्वरूप धारण केले आणि त्यांच्यापुढील सर्व रस्ता व्यापला. आजूबाजूच्या आगीमुळे गाडीचे तापमान अति वाढल्याने गाडी बंद पडली. धुरामुळे गुदमरून वडील गाडीतच मृत्यू पावले. सर्जन मुलगा आगीतून निसटण्यासाठी पळत त्या आगीच्या भिंतीत घुसला. पण त्यालाही भडकलेल्या वणव्याने जाळून टाकले. अग्निरक्षक दलाला नंतर त्यांचे जळालेले अवशेष मिळाले. यासारख्या अनेक हृदयद्रावक प्रसंगांना आज ऑस्ट्रेलिया सामोरा जातो आहे.
काही लोकांनी घराचा विमा काढला होता. या वणव्यात सगळे खाक होऊन गेलेल्यांना काही भरपाई मिळेल. हे होण्यासाठी किमान चार महिन्यांचा काळ लागेल. तोवर कुठे रहायचे आणि काय करायचे, असा मोठा प्रश्न अनेक लोकांसमोर आज उभा आहे.  ज्यांचा विमा नव्हता त्यांना तर अजून मोठे प्रश्न भेडसावत आहेत.
आगीने झालेली हानी इतकीच नाही. या आगीत सुमारे पाच अब्ज प्राणी मरण पावले असावेत, असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. मधमाश्या आणि इतर लहान कीटक किती मेले असतील याचा तर अंदाजही लावणे शक्य नाही. निसर्गाची ही हानी कधीही भरून न येणारी आहे.
**
गेला महिनाभर जळत असलेला हा वणवा आजही जळतोच आहे. आता निसर्गाने जोरदार पाऊस पाडला किंवा जंगलच संपले तरच हे थांबेल असे दिसते. या अग्नितांडवाने तयार झालेला धूर तीन दिवसांनी मेलबर्न येथे पोहोचला. आता येथील हवेची परिस्थिती अतिशय वाईट आहे. सर्व शहरात धूर साठला आहे. धुरामुळे कॅनबेरा शहरात तर जगातील सर्वात वाईट हवा आहे, असे घोषित केले गेले आहे.
आणि ही या उन्हाळ्याची सुरुवात आहे. अजून सगळा उन्हाळा जायचा आहे.
पारंपरिकरीत्या ऑस्ट्रेलियाचे आदिवासी वेळोवेळी आगी लावत असत. त्यांचे आगी लावण्याचे, निसर्गाच्या चक्राशी जोडलेले एक वेळापत्रक होते. त्यावर आधारित सण आणि उत्सव होते. लहान लहान आगी लावत राहिल्याने प्रचंड मोठे आगीचे वणवे पेटण्यासाठी इंधन साठत नव्हते. पण हे सर्व मागे पडले. मानव प्रगती करतो आहे; पण त्याची नक्की किंमत कोण आणि कशी मोजतो आहे हा प्रश्नच आहे.

बाकी संपर्क तुटला, तेव्हा..
ऑस्ट्रेलियातील एबीसी रेडिओ ‘आग कोणत्या दिशेला सरकते आहे?’ यावर सदैव माहिती देण्याचा प्रय} करत होता. पण त्या वार्तांकनात कोणताही आक्रस्ताळेपणा नव्हता. अत्यंत शांतपणे आश्वासकपणे माहिती दिली जात होती. 
2. ज्या गावांची माहिती मिळत नव्हती त्याविषयी ‘सध्या धुरामुळे माहिती मिळत नाहीये’, असे स्पष्ट सांगितले जात होते. जशी माहिती मिळत होती ती दिली जात होती.
3. अग्निशामक दलाचे लोक कुठे आग पसरते आहे आणि तिचे स्वरूप कसे आहे, हे सतत कळवत होते. तसेच विमान आणि हेलिकॉप्टरचालकही माहिती देत होते. 
4. ही माहिती आणि हवामान खात्याकडून दिली जाणारी वार्‍याची दिशा व तापमान याची माहिती या सर्वांची योग्य ती सांगड घालून लोकांना सुटकेसाठी सुरक्षित जागा सांगितल्या जात होत्या. 
5. जे लोक तांडवातून वाचले त्यांच्या मुलाखती घेतल्या जात होत्या; पण त्याही संयत होत्या. इतर सर्व संपर्काची साधने तुटल्यावर हा रेडिओ हेच संपर्काचे साधन उरले होते. आणि ती कामगिरी या रेडिओने उत्तमरीत्या निभावली.
 

जिवावर बेतले, तरीही..
1. जेव्हा वणवा खूपच भडकला होता तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या त्या भागातील सुमारे एक लाख लोकांना परिसर सोडण्याचे आदेश सरकारने दिले. 
2. आगीमुळे अनेक रस्ते बंद होते. हा परिसर सोडण्यासाठी एकच प्रमुख रस्ता होता, तोही हायवे नव्हे. या रस्त्याने वाहनांची रीघ लागली. पण आगीच्या लोळात जळून जाण्याची शक्यता असतानाही, कुणीही वेड्यावाकड्या गाड्या घालून रस्ता जाम केला नाही. सर्वजण शिस्तीत एकामागे एक रांगेत गाड्या घेऊन चालले होते.
3. लोक अनेक ठिकाणी थांबत होते आणि अनेक लोक रांगेत येत होते, त्यामुळे या रहदारीचा वेग दिलेल्या वेगापेक्षा खूपच कमी होता. पण म्हणून हॉर्न वाजवले जात नव्हते. 
4. प्रत्येक रस्त्याला एक इर्मजन्सी लेन ठेवलेली असते. ही अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका आणि पोलिसांसाठी असते. आता आपत्कालीन परिस्थिती आहे आणि येथून निसटायचे आहे म्हणून या लेनमध्ये गाड्या घुसवल्या गेल्या नाहीत. 
5.  ठिकठिकाणी विविध कारणांनी वाहतुकीचे खोळंबे होत होते. तरीही लोक शांतपणे आपापल्या गाड्यात बसून वाट पाहत होते. अनेकदा पुढे रस्ते का बंद आहेत किंवा वाहतूक का थांबली आहे याविषयी काहीही माहिती मिळत नव्हती. तरीही लोक शांतपणे थांबून होते. जशी वाहतूक पुढे सरकेल तसे गाड्या पुढे घेत होते.
6. जिवावरचा प्रसंग आलेला असतानाही ही सामाजिक शिस्त अगदी नोंद घेण्यासारखी आहे.

ninad.katyare@gmail.com
(लेखक मेलबर्न येथील शासकीय आस्थापनेत आय.टी. व्यवस्थापक असून, गेली 

Web Title: Wall of fire.. Bushfire in Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.