माणुसकीची भिंत
By admin | Published: November 11, 2016 05:55 PM2016-11-11T17:55:15+5:302016-11-12T15:02:47+5:30
येथे कोणी तरी मागण्यासाठी येतो अन् कोणी तरी देण्यासाठी. दाता कोण आहे ते याचकाला माहित नाही. आपण देतो ते कुणाला देतो; हेच माहीत नसल्याने दात्याला दातृत्वाचा अहंकार नाही.
- राजेश शेगोकार
येथे कोणी तरी मागण्यासाठी येतो अन् कोणी तरी देण्यासाठी.
दाता कोण आहे ते याचकाला माहित नाही.
आपण देतो ते कुणाला देतो; हेच माहीत नसल्याने
दात्याला दातृत्वाचा अहंकार नाही.
अन् याचक असला तरी त्याच्या चेहऱ्यावर आर्जव नाही...
... हे सारे फार सुंदर आहे,
आणि ते आपल्या शहरांशहरांमध्ये घडू लागले आहे!!
अकोल्यात दिवाळीचा आदला दिवस... बाजारात पाय ठेवायला जागा नाही, चिक्कार गर्दी उसळलेली! या गर्दीतून वाट काढत थोडा मोकळा रस्ता मिळावा म्हणून मुख्य रस्ता सोडून देत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गावरून पुढे निघालो, तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीजवळ भली मोठी रांग दिसली. एरवी या कार्यालयाजवळ मोर्चाची, धरणे आंदोलनाचीच गर्दी बघायची सवय! ही शिस्तीतली रांग कसली? - म्हणून उत्सुकतेने पुढे झालो, तर समोर आलेलं चित्र मोठं विलक्षण होतं.
रांगेत गरीब, कनिष्ठ मध्यमवर्गातील लोकांचा भरणा. रांगेत महिला होत्या, वृद्ध होते, लहानगेही होते. कुणी लेकुरवाळी स्त्री होती, नातवाचा आधार घेत उभी असलेली ज्येष्ठ मंडळीही होती. या सर्वांना त्यांच्या आवडीचे कपडे दिले जात होते. ते दुकान नव्हते, कुणाचेही घर, स्टॉल, हातगाडी असे काहीच नव्हते; तर ती होती फक्त एक भिंत! या भिंतीलाच एक रॅक केलेली होती अन् त्या रॅकमध्ये जुनेच परंतु स्वच्छ धुतलेले, इस्त्री केलेले कपडे रचून ठेवलेले होते. साड्या होत्या, लुगडी होती, पॅण्ट- शर्टपासून तर जाकिटापर्यंत अन् झबल्यांपासून मिडी शॉर्टपर्यंत सारेच काही तिथे होते.
दोन सामाजिक कार्यकर्ते आलेल्या प्रत्येकाला त्याच्या पेहरावानुसार कपड्यांचा गठ्ठा दाखवत होते. जो तो आपापल्या आवडीचे, मापाचे कपडे निवडून आनंदात जात होते. दाता कोण आहे माहीत नाही, फुकट मिळते आहे म्हणून गरजेपेक्षा जास्त मागण्याची याचकाला हाव नाही, दाताच नसल्याने दातृत्वाचा अहंकार नाही अन् याचक असला तरी त्याच्या चेहऱ्यावर आर्जव नाही... केवळ माझीही काळजी घेणारे कोणीतरी आहे अशी आशावादाची डोळ्यात चमक...!
- हे सारे चित्र ज्या भिंतीमुळे समोर आले ती भिंत केवळ दगड-मातीची कशी राहील? ज्या भिंतीने जातीपातीचेही अडसर जमीनदोस्त केले, ती भिंत दगड-मातीची राहिलीच नाही; तर ती ठरली ‘माणुसकीची भिंत’.
तुम्ही म्हणाल, अशी कोणती भिंत असते का? माणुसकी ही तर भावना! ती व्यक्त होते, प्रकट होते; पण निर्जीव वस्तूंसारखी दाखविता येते का? पण तुम्ही जर अकोला, नागपूर आणि कोल्हापुरात चक्कर मारलीत, तर तुम्हाला ही ‘माणुसकीची भिंत’ पाहायलाही मिळेल, अनुभवायलाही मिळेल, इतकेच नव्हे तर तुमच्या संवेदना जागृत असतील तर ती तुमच्याशी संवादही साधेल. ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर उभ्या राहिलेल्या या भिंतींनी हजारो लोकांची दिवाळी आनंदात तर साजरी केलीच; पण ज्यांना समाजासाठी काहीतरी वेगळे करावे असे मनोमन वाटत असते; मात्र मदत करण्याची ही भावना बऱ्याचदा मनातच राहते अशा अनेकांनाही ‘काहीतरी करायचे तर आहे, पण काय?’ - या प्रश्नाच्या उत्तराची एक दिशाही दाखवली.
काय आहे ही भिंत? तसे पाहिले तर अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संरक्षक भिंतीचा एक भाग. एरवी त्या भिंतीवर मोर्चा, निदर्शने किंवा गेला बजार, एखाद्या उत्पादक कंपनीची जाहिरात रंगविलेली असायची. या भिंतीचा आधार घेऊन कोणी उपोषणाचा मंडप ठोकायचे, आंदोलन करायचे व संध्याकाळ झाली, की हीच भिंत पुन्हा ‘ओकीबोकी’ उभी राहायची. आता मात्र चित्र पालटले आहे. आता ही भिंत एखाा मंदिरासारखी झाली आहे. येथे कोणी
तरी मागण्यासाठी येतो अन् कोणी तरी देण्यासाठी. जो मागण्यासाठी येतो त्याच्या डोळ्यात याचकाचे भाव नसतात, तर हे माझ्याचसाठी आहे असा विश्वास असतो. जो देण्यासाठी येतो, तो कुणासाठी देत आहे हे त्याला माहीत नसते. त्यामुळे दातृत्वाचा अहंकार त्याच्या ठायी येत नाही. खरेतर तो देतो तरी काय? घरातील जुने कपडे अन् झालेच तर वापरात नसलेली चप्पल, बूट, मुलांची खेळणी. एरवी दिवाळीच्या पूर्वी घर साफ करताना अशा वस्तू थेट भंगारात जातात. कपड्यांची होळी होते, नाही तर कुणी भेटलाच तर त्याला दिले जातात. माणुसकीच्या भिंतींमुळे मात्र या वस्तूंचे मोलच बदलले. माणुसकीच्या भिंतीवर ठेवलेल्या या सर्व वस्तू अवघ्या काही क्षणात कुणाच्या तरी मालकीच्या होतात अन् त्याच्या आयुष्यात आनंद पसरविण्याचे काम करतात.
कल्पना अगदी साधी : जे नको असेल ते द्या, जे हवे ते न्या!!
जो ‘देणारा’ असेल, त्याने जास्तीच्या, वापरात नसलेल्या वस्तू या भिंतीशी आणून ठेवायच्या.. जो ‘घेणारा’ असेल, त्याने इथून जे हवे ते उचलून न्यायचे!!
मुळात ही संकल्पना इराणची. हा उपक्रम सध्या ‘वॉल आॅफ काइंडनेस’ या नावाने जगभर प्रचंड लोकप्रिय झाला आहे. भारतात राजस्थानमधील भिलवाडा येथे एका दांपत्याने हा उपक्रम सुरू केला. यासंदर्भातील माहिती अकोल्यातील भन्नाट व कल्पक अशा अरविंद देठे यांना फेब्रुवारी महिन्यात मिळाली.. आणि अकोल्यातले काम सुरू झाले.
देठे हे ‘भारत एक कदम’ ही संस्था चालवतात. त्यांच्या संस्थेने यापूर्वी रेडिमेड शौचालयगृह, एक रुपयात शुद्ध पाणी, स्मार्ट इंडिया म्हणून पाणीपुरीपासून तर भेलगाडीपर्यंतच्या विविध कमी भांडवलातील व्यवसायासाठी साहित्य निर्मिती असे अनेक उपक्रम राबविले आहेत. ते प्रत्येक उपक्रमात लोकसहभाग घेतात. माणुसकीची भिंत उभारताना त्यांनी अनेक संस्थांना सहकार्याचे आवाहन केले. २० आॅक्टोबर रोजी ही माणुसकीची भिंत अकोल्यात उभी राहिली अन् पहिल्याच दिवशी माणुसकीच्या भिंतीकडे शेकडो सुहृदयी दानशूरांचे पाय वळले.
पहिल्या दिवशी कपडे देणाऱ्यांची संख्या २० होती, तर घेणाऱ्यांची संख्या ७० होती; मात्र यामध्ये कोणीही रिकाम्या हाती परत गेला नाही. सर्वांना स्वच्छ धुतलेले, इस्त्री केलेले कपडे मिळाले. दुसऱ्या दिवसापासून देणारे व घेणाऱ्यांची एकच गर्दी उसळली. हा उपक्रम लोकांना इतका भावला की, देणाऱ्यांचा ओघ थांबला नाही आणि घेणाऱ्यांची तक्रारही आली नाही. रस्त्यावर संसार मांडणाऱ्या भटक्यांपासून तर अतिशय गरिबीत जगत असलेल्या लोकांपर्यंत प्रत्येक जण सहकुटुंब या भिंतीपाशी आला अन् आपल्या गरजेपुरते कपडे घेऊन गेला. फुकट मिळते म्हणून कोणीही पाहिजे त्यापेक्षा जास्त कपडे नेले नाहीत, हे विशेष!!
येथे दोन सामाजिक कार्यकर्ते चोवीस तास हजर असतात. देणाऱ्यांच्या नावाची नोंद होते आणि घेणाऱ्यांनाही नाव विचारून त्याला कपडे दिले जातात. कोणी नाव सांगितले नाही तर जबरदस्ती नसते. त्याला कपडे देत आहोत म्हणून उपकार करतो अशी भावना येता कामा नये, याची दक्षता घेण्यात आल्याने ही माणुसकीची भिंत खऱ्या अर्थाने संवेदनशील झाली आहे.
गेल्या पंधरा दिवसात दीड हजारावर लोकांनी कपडे व साहित्य दिले, तर घेणाऱ्यांची संख्याही दोन हजारांच्या घरात आहे. २८ आॅक्टोबर या दिवाळीच्या आदल्या दिवशी येथे देणारे व घेणारे यांची रांग लावावी लागली, एवढी गर्दी होती. यावरून माणुसकीच्या अशा भिंतींची समाजात किती गरज आहे, हे अधोरेखित होते.
‘भारत एक कदम’चे संचालक अरविंद देठे सांगतात, ‘खरंतर या देशात कोणीच अन्न, वस्त्र, निवाऱ्यापासून वंचित राहू नये; पण आर्थिक विषमतेच्या दरीमुळे तसे होत नाही. त्यामुळे आपल्या जवळ जे आहे ते देऊन इतरांची गरज भागविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला तर वंचितांना आनंद देता येईल. माणुसकीची ही भिंत दिवाळीसाठी सुरू केली; मात्र या भिंतीवर माणुसकी शोधायला आलेल्यांची संख्या पाहता या भिंतीची गरज असल्याचे स्पष्ट झाले. येणाऱ्या काळात सर्वांच्या मदतीने अकोल्यात अशी भिंतच नाही तर मॉल उभारण्याचा मानस आहे. ज्याला गरज आहे तो याचक म्हणून नव्हे तर हक्काने आला पाहिजे, यासाठीच हा खटाटोप करणार आहोत.’
- देठेकाकांच्या या कामाला अकोल्यातल्या अनेक संस्थांनी, व्यक्तींनी मोठ्या उत्साहाने हातभार लावला आहे. हे लोण राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही पोहचले आहे. जळगावमध्येही माणुसकीची भिंत उभी राहिली आहे. ‘नेकी कर और दरियॉँ में डाल’ हा हिंदी मुहावरा सर्वांनाच माहिती आहे. पण ‘नेकी कर, दिवार पर टांग’ हा नवा मुहावरा या माणुसकीच्या भिंतीने समाजाला दिला आहे.
सगळे जगच म्हणे हल्ली ग्लोबल ‘व्हिलेज’ झाले. हाकेच्या अंतरावर सारे देश आले, असे वाटू लागले. फोर-जीच्या पुढे सारे जी-जी करीत मुजरा करू लागले. खेड्यापाड्यातही आॅनलाइन नावाचा व्यापारी घराघरात घुसला आहे.. बुद्धिमत्ता व कल्पकतेच्या जोरावर या जगाचा कोणीही व्हर्च्युअल सम्राट होऊ शकतो, असे सारे चित्र असताना दुसरीकडे जाती-पातीच्या अस्मिता पक्क्या होत आहेत. धर्माच्या, जातीपातीच्या अगदी पोटजातींच्याही भिंती उभ्या राहत आहेत. पक्क्या होत आहेत. दोन व्यक्ती, दोन देश, दोन समाज यांच्यामध्ये दृश्य किंवा अदृश्य स्वरूपात उभी राहिलेली कोणतीही भिंत संबंध, संवाद तोडण्याचे काम करते.
- याला खणखणीत अपवाद म्हणजे ही ‘माणुसकीची भिंत’!!!
माणसांच्या सुख-दु:खाला जोडणाऱ्या अशा अनेकानेक भिंती सर्वत्र उभ्या राहोत.
नागपूर
राजेश दुरुगकर हे भारत पेट्रोलियममधून अधिकारी पदावरून निवृत्त झालेले नागपूरकर. अमेरिकेच्या एका प्रवासात त्यांना एका भिंतीवर कपडे अडकवलेले आढळले. उत्सुकतेपोटी त्यांनी हे कपडे कशासाठी लटकविले आहेत, याची विचारणा केली. त्यावर त्यांना हे कपडे गोरगरीब नागरिकांसाठी ठेवण्यात आल्याचे कळले. भारतातील दारिद्र्य आणि गरजूंसाठी हा उपक्रम राबविण्याचा विचार त्यांच्या मनात आला आणि लगेचच त्यांनी आपल्या मनातील विचार कृतीत उतरवून माणुसकीची भिंत उभी केली.
हा उपक्रम अॅक्शन ग्रुपच्या माध्यमातून नागपुरातल्या शंकरनगर चौकात सुरू झाला आहे. या चौकातील भिंतीवर ४० खिळे ठोकले आहेत. लोकांनी पहिल्याच दिवशी जवळपास ५०० कपडे या माणुसकीच्या भिंतीवर आणून लावले. नागपुरातील सर्व भागातील गरिबांना कपडे मिळावेत, यासाठी हा उपक्रम लवकरच बजाजनगर, सदर, सीताबर्डी, लॉ कॉलेज चौक येथे सुरू करणार आहेत.
चंद्रपूर
येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. डी. सिंह यांच्या संकल्पनेतून जुन्या कपड्यांची बँक जिल्हा बँकेने तयार केली. ‘संवेदना उपक्रम’ असे या कार्यक्रमाचे नामकरण करून जिल्हा परिषद, पंचायत समिती या कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या घरातील छोट्या मुलांचे कपडे, महिला-पुरुष यांचे परिधान करण्यायोग्य कपडे गोळा करण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वत: घरचे कपडे आणून या बँकेत जमा केले. याला जिल्हा परिषदेमधील कर्मचाऱ्यांनीसुद्धा चांगला प्रतिसाद दिला असून, पहिल्याच दिवशी भरपूर प्रमाणात चांगल्या दर्जाचे कपडे गोळा झाले. चंद्रपुरातील स्वामीकृपा बहुद्देशीय संस्थेच्या सहकार्याने जिल्हा परिषदेच्या आवारात २७ आॅक्टोबरपासून कपडे वितरणाचे स्टॉल लागले. या स्टॉलवरून गोरगरीब गरजूंना कपडे वितरित केले गेले.
सुरुवात झाली इराणमध्ये...
मुळात ही संकल्पना इराणची. इराणमध्ये बेघरांची संख्या खूप मोठी आहे. राजधानी तेहरानमध्येच हजारो लोकांकडे घरे नाहीत. अशा वेळी येथे पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीत या बेघरांसोबतच ज्यांची गरम कपडे घेण्याची क्षमता नाही अशा अनेकांना थंडीत कुडकुडत राहण्यापलीकडे दुसरा मार्ग नव्हता. यामधील काही लोक दुसऱ्याकडे कपडे मागून आपली गरज तात्पुरते भागवत. पण हे सगळ्यांनाच मानवत नाही. अनेक गरजवंतांना संकोचापोटी कुणापुढे हात पसरावा वाटत नाही. ते कष्ट सहन करतात, त्रास सहन करतात परंतु याचक होत नाहीत. अशा लोकांच्या वेदना समाजापर्यंत पोहचत नाहीत. इराणच्या उत्तरपूर्व भागातील मशाद या शहरातील एका व्यक्तीला मात्र ही वेदना जाणवली अन् त्याला ‘माणुसकी’ सापडली. त्याने त्याच्या घरासमोरच्या भिंतीवर काही खिळे ठोकले. त्या खिळ्यांना गरम कपडे टांगले. या भिंतीवर तीन साधे शब्द लिहिले. त्याचा (हिंदीतला) अर्थ होता नेकी की दीवार.. तुम्हाला गरज नसेल तर या कपड्यांकडे पाहू नका, पण गरज असेल तर घेऊन जा !
- या वाक्याने मोठा परिणाम समाजात झाला अन् पाहता पाहता इराणच्या गावागावांत अशा नेकी की दीवार उभ्या राहिल्या. आता केवळ कपडेच नाही, तर चप्पल, बूट, पुस्तके, घरातील वस्तू या ‘दीवार’जवळ ठेवल्या जातात. गरजवंत त्या भिंतीजवळ येऊन हवी ती वस्तू घेऊन जातो. गरजवंतांची गरज भागते अन् जो ठेवून जातो त्याला नकळतपणे आशीर्वादाचे व सत्कर्माचे फळ मिळते. हा उपक्रम सध्या ‘वॉल आॅफ काइंडनेस’ या नावाने जगभर प्रचंड लोकप्रिय झाला आहे.
कोल्हापूर
या दिलदार शहरातल्या सीपीआर चौकातली ही माणुसकीची भिंत! येथील प्रसाद पाटील यांनी या भिंतीची संकल्पना ‘व्हॉट्सअॅप’वरील एका ग्रुपवर मांडली. आमदार सतेज पाटील यांनी पुढाकार घेत अशी भिंत सुरू करण्यास प्रोत्साहन दिले. मुस्लीम बोर्डिंग हाउसचे चेअरमन गनी आजरेकर यांनी लगेचच या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. समाजातील विविध मान्यवर व्यक्तींनी पाठिंबा दर्शविला व दोनच दिवसांत हा उपक्रम सुरू झाला. ‘नको असेल ते द्या... हवे असेल ते घेऊन जा’ अशी थीम असलेल्या या उपक्रमाला कोल्हापूरकर अतीव उत्साहाने पाठिंबा/सहभाग देत आहेत.