नूलमध्ये घुमतोय... नारी शक्तीचा जागर...! सुधारवाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:55 AM2018-11-18T00:55:06+5:302018-11-18T00:56:48+5:30

कोणत्याही शुभकार्यात विधवांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही. हे पाहून अस्वस्थ झालेल्या नूलच्या दिलीप व विद्या सूर्यवंशी या दाम्पत्याने आपल्या आईसह आजूबाजूच्या विधवांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्याचा नवा पायंडा पाडला आहे.

 Wandering in Nool ... Woman power jagar ...! Improvements | नूलमध्ये घुमतोय... नारी शक्तीचा जागर...! सुधारवाटा

नूलमध्ये घुमतोय... नारी शक्तीचा जागर...! सुधारवाटा

Next

राम मगदूम
कोणत्याही शुभकार्यात विधवांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही. हे पाहून अस्वस्थ झालेल्या नूलच्या दिलीप व विद्या सूर्यवंशी या दाम्पत्याने आपल्या आईसह आजूबाजूच्या विधवांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्याचा नवा पायंडा पाडला आहे. जाती-पातीच्या पलीकडे जात सर्व समाजातील महिलांना त्यांनी यात स्थान दिले आहे.

कोणत्याही शुभकार्याचा मान सुवासिनींनाच. हजारो वर्षांपासून सगळीकडे चालत आलेली ही परंपरा. मात्र, त्याला छेद देण्याचा प्रयत्न छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथील एका दलित कुटुंबातील तरुण दाम्पत्याने केला आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनाला गावातील सर्व समाजातील विधवा आया-बहिणींना आपुलकीने बोलावून त्यांच्या हस्ते पूजाविधी पार पाडत अज्ञानाच्या अंधकारातून आलेल्या चुकीच्या रूढी-परंपरा मोडीत काढण्याचा कृतिशील प्रयत्न या दाम्पत्याने जाणीवपूर्वक हाती घेतला आहे. त्यामुळे स्वातंत्र्यसैनिकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘नूल’ गावी समतेचा जागर नव्याने सुरू झाला आहे. नारी समतेच्या जनजागराचा झेंडा हिमतीने आपल्या खांद्यावर घेतलेल्या या दाम्पत्याचे नाव आहे दिलीप मारुती सूर्यवंशी आणि विद्या दिलीप सूर्यवंशी.

२००८ मध्ये दिलीपचे वडील मारुती यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या आई लक्ष्मीबाई या कुठल्याही धार्मिक कार्यात पुढे व्हायला कचरायला लागल्या. विधवा झाल्यामुळे आजूबाजूच्या बायकांनीही त्यांना शुभकार्यात बोलवायचे बंद केले. नेमकी हीच गोष्ट दिलीप आणि विद्या यांच्या मनाला बोचायची. त्यामुळे त्यांनी यापुढे आपल्या घरातील कोणतेही शुभकार्य आईच्या हस्ते करण्याचा निर्णय घेतला.

अगदी कोणतीही नवीन वस्तू घरात आणली तरी तिची पूजा आईच्या हस्तेच करायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांची अडाणी माउली पार आनंदून जायची. तिच्या चेहºयावरील आनंद आजूबाजूच्या विधवा आया-बहिणींच्या चेहºयावरही पाहायला मिळावा म्हणूनच त्यांनी दिवाळी-पाडव्यातील श्री लक्ष्मीपूजन विधवा महिलांच्या हस्ते करण्याचा उपक्रम जाणीवपूर्वक चार वर्षांपूर्वी सुरू केला.

२०१४ मधील दिवाळीत त्यांनी प्रथमच आपल्या घरातील लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम विधवांच्या हस्ते केला. पती-पत्नी दोघांनीही जोडीने घरोघरी जाऊन विधवा भगिनींना पूजेसाठी आमंत्रण दिले. अगदी पूजा मांडण्यापासून देवीच्या आरतीपर्यंत सर्व विधी करण्याचा मान त्यांनाच दिला. त्यानंतर खण-नारळांनी त्यांची ओटी भरली. त्यावेळी त्यांचा आनंद गगनात मावला नाही. सुवासिनी असताना मिळणारा मान पुन्हा मिळाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला. त्यांच्या बोलक्या भाव-भावनांनी दिलीप आणि विद्या यांच्या पुरोगामी उपक्रमाला आणखी बळ मिळाले. तेव्हापासून गेली चार वर्षे हा उपक्रम अखंडित सुरू आहे.

पहिल्या वर्षीच्या लक्ष्मीपूजनाला केवळ १५ विधवा आल्या होत्या. त्यानंतर वर्षागणिक ही संख्या वाढत गेली. यंदाच्या लक्ष्मीपूजनाला तब्बल ४५ विधवा भगिनी उपस्थित होत्या. दलित कुटुंबातील या उपक्रमातमराठा, लिंगायत, वडर, कोरवी, हरिजन व मातंग या समाजातील महिलाही आवर्जून सहभागी होतात. या उपक्रमाचे हे वेगळे वैशिष्ट्य आहे.

विधवांच्या हस्ते लक्ष्मीपूजन...! लक्ष्मीपूजनानंतर आरती करताना नूल येथील विधवा आया-बहिणी. दुसºया छायाचित्रात कार्यक्रमास उपस्थित महिला.


२००८ मध्ये गोव्यात प्राथमिक शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेल्या दिलीपच्या वडिलांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यानंतर वडिलांचे श्राद्धदेखील ते अभिनव पद्धतीने घालतात. श्राद्धाच्या दिवशी घरी केवळ फोटोपूजन करतात आणि अनावश्यक खर्चाला फाटा देऊन समाजातील निराधार, गोर-गरीब महिलांना साडी वाटप, गरजू-होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश आणि शैक्षणिक साहित्य वाटप, गरीब रुग्णांना औषधोपचारासाठी आर्थिक मदत असे उपक्रम राबवितात.

दहा वर्षांपूर्वी त्यांना अर्धांगवायू झाला होता, तर दोन वर्षांपूर्वी दिलीपच्या पत्नी विद्या यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्यानंतर उपचारासाठी त्यांना वारंवार कोल्हापूरला जावे लागे. त्यासाठी कर्ज काढून सेकंडहॅण्ड मारुती गाडी घेतली. वेळेवर उपचारामुळे पत्नीचा कर्करोग पूर्ण बरा झाला. त्यामुळे दिलीप हे उपचारासाठी गडहिंग्लज, संकेश्वरला जाणाऱ्या रुग्णांना रात्री-अपरात्रीदेखील आपल्या वाहनाने मोफत दवाखान्यात पोहोचवितात.

Web Title:  Wandering in Nool ... Woman power jagar ...! Improvements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.