खास मित्राला युरोप टूर गिफ्ट करायचीय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 10:12 AM2022-06-19T10:12:38+5:302022-06-19T10:13:36+5:30

मुलगी ही बापाच्या मनाचा हळवा कोपरा असते. तर वडील हे मुलीचं सर्वस्व असतं. जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. त्यानिमित्त अभिनेत्री रुमानी खरे हिने तिचे वडील कवी संदीप खरे यांच्यासोबत असलेलं नातं उलगडलं आहे.

Want to gift a Europe tour to a special friend? | खास मित्राला युरोप टूर गिफ्ट करायचीय

खास मित्राला युरोप टूर गिफ्ट करायचीय

Next

- रुमानी खरे, मालिका अभिनेत्री
 सुरुवातीपासूनच 'मम्माज गर्ल' ऐवजी 'डॅडीज गर्ल' आहे. आई चोवीस तास माझ्यासोबत असायची. बाबा खूप कमीच असायचा. त्यामुळे शिस्त लावण्याचं काम आईकडे होते. बाबा मित्रासारखा वागायचा. काही खाऊ हवा असेल, शाळेतून सुट्टी हवी असेल किंवा मस्का मारायचा असेल तर मी नेहमी बाबाकडे जायचे.
आई-बाबा दोघेही त्यांच्या त्यांच्या परीने मुलांवर चांगले संस्कार करत असतात आणि तुम्हाला जितकं चांगलं आयुष्य देता येईल त्यासाठी प्रयत्न करतात. आई चांगलं खाऊ घालते तर बाबा कुठे तरी फिरायला घेऊन जाईल आणि गोष्टी सांगेल, किंवा काही तरी चांगलं चांगलं वाचून दाखवेल. माझ्याकडे बाबा खूप वेळ घरी नसायचा पण त्यामुळे तो जेव्हा केव्हा घरी असायचा तेव्हा पूर्ण वेळ मला द्यायचा. एकदा तर पहाटे आम्ही गोव्याचा प्लान केला आणि दुपारपर्यंत गोव्याला निघूनसुद्धा गेलो होतो.
चांगले मार्क्स, चांगले टक्के मिळवण्यासाठी काही मुलांवर दबाव टाकला जातो. माझ्या बाबतीत हे कधीच झालं नाही. ९० टक्के मिळायला हवेत असं प्रेशर कधीच नव्हतं. बाबा रिझल्ट पाहून कधी चिडला नाही. आईने प्रेशराईज नाही केलं. तू जे काही करशील ते मनापासून कर, त्यातून तुला आनंद मिळायला हवा, इतकंच त्यांचं म्हणणं. पास झाले तरी ते ओके असतात.
बाबा खूप शांतपणे सगळ्या गोष्टी करतो. आधी मला प्रश्न पडायचा की, बाबा का एवढा प्रसिद्ध आहे? तो तर इतरांच्या बाबांसारखा नॉर्मल वागतो, बोलतो. काहीतरी काम असेल तर तो बाहेर जाऊन यायचा, प्रयोग करायचा. घरी आपल्यावर माझा अभ्यास घ्यायचा. खूप नॉर्मल रुटीन असायचं घरी. नंतर हळूहळू लक्षात येत गेलं. बाबा खूप कमी माझ्यावर चिडला किंवा रागवला आहे. सतत चिडचिड करणाऱ्यापैकी तो नाही. हो, पण जेव्हा चिडतो तेव्हा फार चिडतो.
मला आठवतेय कितीही उशीर झाला तरी बाबा येणार, छान पापी घेणार आणि मी आलोय हं, हे सांगणार. थोडा वेळ थोपटणार. मी जागी असेन तर गप्पा मारायला येणार. प्रयोगादरम्यानचे किस्से सांगणार. त्यामुळे दमलेल्या बाबाची कहाणी हे गाणं कायम जवळचं वाटतं आणि इमोशनल करतं. अजूनही ते गाणं ऐकायचं मी टाळतं. बाबा माझा खूप जवळचा मित्र आहे. मी त्याच्याकडे जाऊन मोकळेपणे बोलू शकते. अगदी कोणत्याही विषयावर.
माझ्या या 'खास मित्रा'ला युरोप टूर गिफ्ट म्हणून द्यायची इच्छा आहे. बाबाला फिरायला खूप आवडतं आणि युरोप तर त्याला फार आवडतो. आम्ही खूप वर्षांपूर्वी युरोप टूर केली होती पण त्याला जेवढा वेळा हवा होता तेवढा मिळाला नव्हता. त्यामुळे त्याला एक युरोप टूर गिफ्ट द्यायची आहे. तेही महिनाभरासाठी! 
    शब्दांकन - गीतांजली आंब्रे

Web Title: Want to gift a Europe tour to a special friend?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.