वारी.. एक आनंदयात्रा.
By admin | Published: June 21, 2015 12:40 PM2015-06-21T12:40:32+5:302015-06-21T12:40:32+5:30
महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाची वारीशी जुळलेली नाळ आंतरिक आहे. अनेक कवी, साहित्यिकांनीही आपापल्या रचनांतून वारीशी स्वत:ला जोडून घेतलं आहे.
Next
>संदेश भंडारे
महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाची वारीशी जुळलेली नाळ आंतरिक आहे. अनेक कवी, साहित्यिकांनीही आपापल्या रचनांतून वारीशी स्वत:ला जोडून घेतलं आहे. अपवाद वगळता दृश्य माध्यमातील कलाकार मात्र या आत्मिक अनुभूतीपासून अद्याप दूरच आहेत. त्यासाठीच भक्ती-कलेचा हा अनोखा मेळा..
-------------------
साल 2001.
आषाढी एकादशीचा दिवस.
चंद्रभागेच्या काठावर एक कुटुंब सकाळी स्नान करीत होतं.
एक वयोवृद्ध गृहस्थ, त्याची पत्नी व मुलगा, मुलगी अथवा सून अशी या प्रसंगातील चार पात्रे.
त्या वृद्ध गृहस्थाला त्याची पत्नी व मुलगी चंद्रभागेत स्नान घालत आहेत. अंगावर पाणी पडत असताना ती व्यक्ती शांत चित्ताने डोळे मिटून समाधान पावली आहे, कृतार्थ झाली आहे..
- हा प्रसंग मी विसरू शकलो नाही.
पुंडलिकाने जशी आपल्या आई-वडिलांना वारी करविली व चंद्रभागेत स्नान घातले. वारीमध्ये वारकरीही आपल्या आईवडिलांची अशीच सेवा करताना दिसतात.
वारीतला हा क्षण मला महत्त्वाचा वाटला. त्यात या वडीलधा:या व्यक्तीबद्दलची आत्मीयता दिसते. एवढंच नाही, त्या प्रसंगातून वारकरी समाजाची मानसिकताही दिसते.
पुढे त्या व्यक्तीची भेट झाली तेव्हा वेगळीच गोष्ट समोर आली.
स्नान घालणारी ती माणसं त्यांच्या कुटुंबातील नव्हतीच. एवढंच नाही, ते त्यांच्या ओळखीचेदेखील नव्हते, ना ते एका ¨दडीतील होते. वडीलधारी व्यक्ती एकटीच स्नान करताना पाहून त्यांनी ती आपल्याच कुटुंबातील असे समजून त्या सर्वानी त्यांना स्नान घातलं.
लाखो वारक:यांमधून कुणीतरी सात वर्षापूर्वी काढलेल्या छायाचित्रतील वारक:याला ओळखलं व त्याची प्रत्यक्ष भेट झाली हे एक आश्चर्य पचवतो ना पचवतो तोर्पयत मला हा दुसरा धक्का बसला.
रक्ताचं नातं नसतानाही वडीलधा:या व्यक्तीला आपले वडील समजून स्नान घालणं. या माहितीमुळे मी टिपलेला हा प्रसंग आता एका वेगळ्याच पातळीवर पोचला.
या प्रसंगामुळे मला पायी वारी करण्याची प्रेरणा मिळाली. या प्रेरणोने मला आजतागायत वारीशी जोडून ठेवले आहे. वारीच्या प्रवासात अशी अनेक माणसं भेटतात, अनेक प्रसंग घडतात. मन भरून येतं.
आठशे वर्षाची परंपरा असलेला वारकरी संप्रदाय लोकाश्रयानेच मोठा झालेला आहे. त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आज आषाढी वारीला पंढरपूरमध्ये दहा ते बारा लाख वारकरी जमतात. त्यातील सहा ते सात लाख वारकरी दोन-अडीचशे किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पायी चालत पंढरपूरला पोचतात.
देहूवरून निघणारी तुकाराम महाराजांची व आळंदीवरून निघणारी ज्ञानेश्वर महाराजांची या दोन महत्त्वाच्या पालख्या. त्याचबरोबर त्र्यंबकेश्वरहून निवृत्तिनाथ महाराज, सासवडवरून सोपान महाराज, मेहूणवरून मुक्ताई, पैठणवरून एकनाथ महाराज. अशा अनेक पालख्या आषाढीयात्रेत वाखरीला एकत्र येऊन पंढरपूरला पोचतात.
शेतकरी, कष्टकरी, भटक्यांमध्ये गोंधळी, भराडी, वासुदेव, डोंबारी, दलित, आदिवासी अशा बहुजनांचा या आनंदयात्रेत सहभाग असतो.
भक्ती-शांतीची स्थापना, समानता अथवा उच-नीच असा भेद करणार नाही हा विचार वारकरी संप्रदायाने मांडला. वारीने अनेक संवेदनशील कवी, साहित्यिक, कलाकार, चित्रपट दिग्दर्शकांनाही प्रभावित केलं आहे. दि. बा. मोकाशी या पत्रकार-साहित्यिकाचं ‘पालखी’ हे पुस्तक, मानववंशशात्रज्ञ इरावती कर्वे यांचं ’वाटचाल’ हे वारीवरील प्रत्यक्ष अनुभवावर आधारित अंतर्मुख करणारे लिखाण, तुकारामांचे अभंग इंग्रजीत भाषांतरित करणारे कवी दिलीप चित्रे यांचं ‘पुन्हा तुकाराम’, तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक सदानंद मोरे यांचं ‘तुकाराम दर्शन’. या सा:या साहित्यकृती ‘वारी’ परंपरेचे वर्तमान काळातील महत्त्व अधोरेखित करतात. मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक गुंथर सॉंन्थायमर यांचा ’वारी’ हा लघुपटही एक वेगळाच दृष्टिकोन मांडतो.
पुरोगामी विचारधारा हा वारीचा मूळ आत्मा आहे. तरीही जातिभेद विसरून चंद्रभागेच्या तीरावर उभा राहिलेला हा जनसमूह माणसांच्या मनातील जातीपातींचे गडकोट उद्ध्वस्त करण्याइतका अजून प्रभावी ठरलेला नाही.
जातिव्यवस्थेचे व आता नव्याने आलेल्या आर्थिक व सामाजिक असमानतेचे विष नव्याने पसरत चाललेले आहे याची खंत वाटते.
आपल्या आजूबाजूला घडणा:या सामाजिक व सांस्कृतिक घडामोडींचा परिणाम प्रत्येक कलाकारावर होतो. कलाकाराचं अभिव्यक्त होणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. कलाकाराचं हे समाजाकडे पाहणं एखाद्या इतिहासतज्ज्ञ, समाजशाज्ञ, मानववंश-शास्त्रज्ञापेक्षा वेगळं असतं म्हणूनच ते महत्त्वाचं मानलं जातं.
मानवी मनाचे भाव टिपण्यास माणसाकडे दोन गोष्टी असतात. एक शब्द आणि दुसरं चित्र. अव्यक्ताचं काही रूप शब्दात मांडलं जातं, पण अव्यक्ताला व्यक्त केलं तरी व्यक्त होतं ते सर्व आपल्याला समजतंच असं नाही. ते अधांतरीच राहतं. व्यक्ताचं अव्यक्त पुन्हा मांडण्यासाठी चित्र हेच माध्यम महत्त्वाचं मानलं जातं. दरवर्षी आषाढी वारीच्या काळात समस्त महाराष्ट्रात पावसाच्या सरींबरोबर एक वेगळंच चैतन्य निर्माण होतं. त्याचं सारं श्रेय संतकवींचं आणि त्यांच्या रचना मौखिक परंपरेतून जपणा:या वारक:यांचं; ज्यांनी ही समतेची, सेवेची, ज्ञानाची व भक्तिरसाची ज्योत तेवत ठेवत समाजात आत्मभान जागृत केलं.
सर्वसामान्यांबरोबरच कलावंतांनीही या वारीची अनुभूती घेताना ती आणखी पुढे नेण्याची गरज आहे.
वारी : आनंदयात्र
महाराष्ट्रातील लोकांच्या तनमनात ठसलेल्या आषाढी वारीसाठी ठिकठिकाणाहून दिंडय़ा निघतील. चारही बाजूंनी पुन्हा भक्तिरसाचा महापूर येईल.
8 जुलैपासून देहूमधून व 9 जुलैपासून आळंदीमधूून वारक:यांच्या दिंडय़ा पंढरपूरच्या दिशेने पायी प्रवासाला निघतील.
संस्मरणीय असा हा भक्तीचा मेळा एका अनावर ओढीनं पांडुरंगाच्या भेटीला निघेल.
त्यानिमित्त पुण्यात 16 ते 19 जुलै 2क्15 दरम्यान बालगंधर्व कलादालनातही चित्रंचा आणि प्रतिमांचा मेळा भरणार आहे. त्याचं शीर्षक-
वारी : आनंदयात्र
सुमारे पंधरा ते वीस कलाकार आपापली तैलचित्रे, छायाचित्रे, शिल्पाकृती, मांडणीशिल्पे या मेळ्यात मांडतील. कलाकारांच्या या वारीत भारुड असेल, व्याख्यानं होतील, त्याबरोबरच कविसंमेलनही. अरुण कोल्हटकर व दिलीप चित्रे यांच्या वारी परंपरेवरील कवितांचे वाचन करताना कवी आपल्याही काही कविता सादर करतील.
अजय कांडर व श्रीधर नांदेडकर, रवि कोरडे, सुजाता महाजन, शर्मिष्ठा भोसले, अंजली कुलकर्णी, नारायण लाळे, नितीन केळकर आदि कवी या संमेलनात सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्रातील कष्टकरी वर्ग व बुद्धिजीवी वर्गाला वारीनं कायमचं जोडून ठेवलं आहे. त्यानिमित्तानं दृश्य माध्यमातील कलावंतांनीही एकत्र यावं, आपल्या माध्यमातून व्यक्त होताना ‘वारीची’ अनुभूती घ्यावी. कलावंतांच्या नजरेतून दिसणारी ही वारी आणि त्यातून निर्माण झालेल्या कलाकृती. एकरूप होऊन पुन्हा त्यांना समाजाकडे घेऊन जावं ही यामागची मुख्य भूमिका..
(लेखक ख्यातनाम छायाचित्रकार असून त्यांचे ‘वारी : एक आनंदयात्र हे छायाचित्र-
संकलन सुप्रसिध्द आहे)