इराणी बन मस्का चालतो, चहा-चपाती का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 06:00 AM2021-08-01T06:00:00+5:302021-08-01T06:00:07+5:30
सकाळी चहाबरोबर चपाती खाणे हे ग्रामीण शहाणपण आहे. अनेक राज्यांत परंपरेप्रमाणे सहज, सोप्पे आणि पौष्टिक अन्न खाल्ले जाते; पण आजच्या मॅगी, पाव, बिस्किटे यांच्या माऱ्यासमोर आपण ते विसरलोय..
- शुभा प्रभू साटम
लहानपणी शहरात जरी राहत असलो तरीदेखील पिताश्री मनाने अस्सल कोकणी! चहा-चपाती किंवा आंबा चोखूनच खायचा, अशा ट्रेटमधून ते जाणवायचे. ‘गरिबाला परडवणारा पदार्थ आहे’ हे लॉजिक इथे मोठे.
आणि अनेकांसाठी ते खरे आहे. मोठे कुटुंब, कामावर जायची घाई आणि गरिबी.. त्यामुळे कडकडीत चहा आणि सोबत चपाती बुडवून खाल्ली की झाले! ब्रेड, बटर, पोहे, इडली, डोसे, आंबोळी हे क्वचित. आई-वडील गावठी आहेत असे वाटण्याचे जे वय असते, त्यात मी होते. त्यामुळे नाक मुरडून टिंगल करणे व्हायचे.
पुढे मात्र अनुभवांच्या कक्षा विस्तारल्या आणि बाबांची ट्रेडमार्क चहा-चपाती अनेक ठिकाणी खाल्ली जाते, हे आढळले. थोडीफार सामाजिक जाणीव होत होती आणि तेव्हा या जोडगोळीमागील आर्थिक/ सामाजिक गणित पटले.
चपाती किंवा भाकरी, नास्त्याला चहाबरोबर खाणे, हे ग्रामीण शहाणपण आहे. शिळ्या किंवा ताज्या चपात्या.. (आणि चपात्याच, पोळ्या खाणारा वर्ग हे कॉम्बिनेशन क्वचित वापरणारा) आणि चहा. पोटभर. इथे महाराष्ट्र सोडा.. पंजाब, हरियाणा, राजस्थान अशा ठिकाणी नेहेमी पराठे खाल्ले जात असतील, अशी समजूत असेल, तर ते चूक आहे. घरचे लोणी, लोणचे आणि भरभक्कम रोटी हाच खुराक असतो.
रोटी नसेल तर भाकरी. लांब का जाता? कोळी, आगरी समाज रात्रीची तांदूळ-भाकरी अनेकदा सकाळी न्याहारी म्हणून खातो.
गंमत अशी की याला नाक मुरडणारे मैद्याचा पाव, बिस्किटे आणि प्रीझरव्हेटिव्ह घातलेलं केचप सॉस याला फॅशन म्हणतात.
पारंपरिक आहार; मग तो कोणत्याही भागातील असो, त्यामागे एक शास्त्र असते, महत्त्वाचे म्हणजे तो स्वस्त असतो. कारण सर्व गोष्टी स्थानिक.
कोकणात तांदूळ, देशावर ज्वारी-बाजरी, उत्तर प्रदेश, पंजाब इथे गहू. ही अगदी साधी उदाहरणे. त्यातही कष्टकरी किंवा श्रमिक वर्गात घेतला जाणारा आहार सुटसुटीत आणि थोडक्यात. स्थानिक साहित्य आणि सोप्पी सुटसुटीत कृती; पण तरीही त्यातून मिळणारे पोषण उत्तम.
वरी किंवा नाचणी घ्या. दोन्ही धान्ये, गहू किंवा तांदूळ यांच्या तुलनेत स्वस्त; पण पोषणमूल्ये भरपूर. म्हणून आदिवासी वरीचा भात किंवा नाचणीची भाकरी खाताना आढळतील.
आणखी एक उदाहरण. ओरिसा, बंगाल, छत्तीसगढ या प्रदेशात भात रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी पाणी काढून खाल्ला जातो. हल्ली ज्याचा बोलबाला आहे त्या प्रोबायोटिक अन्नाचे देशी उदाहरण. इतका सुटसुटीत प्रकार दुसरा नसेल. कोकणातील लाल तांदळाची पेज, अटवल, देशावर होणारी ज्वारी, आंबील, बिहार, उत्तर प्रदेश येथील सत्तू, सर्व पदार्थ श्रमिक शेतकरी वर्गाचे खाणे. स्वस्त हा मुख्य मुद्दा, पोटभर आणि सोप्पे.
इथे भारतातील काही प्रदेशांचे उदाहरण दिले; पण पूर्ण देशात या वर्गाचे जेवण खाणे असेच आढळेल. पारंपरिक आणि ग्रामीण शहाणपण यालाच म्हणतात. जे आपण आजच्या मॅगी, पाव, बिस्किटे यांच्या माऱ्यासमोर विसरलोय.
हे रामायण सांगायचे कारण की पुण्यात एफ.सी. रोडवर चहा-चपाती देणारे ठिकाण चालू झाले आहे. कोरोनाने अनेक धडे दिले. त्यात आपली मुळे (going back to roots चे भाषांतर.) तपासून पाहणे वाढलेय आणि अकारण फुगलेली आयुष्यशैली, तिचे दुष्परिणाम दिसू लागलेत. कुठेतरी पूर्वजांचे आयुष्य धोरण पटू लागले आहे.
इराणी बन मस्का चालतो, आवडतो, मग चहा-चपाती का नाही?
(लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)
shubhaprabhusatam@gmail.com