खोक्यात रुपया टाकून फोन करायचो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 06:01 AM2021-07-18T06:01:00+5:302021-07-18T06:05:01+5:30

अविनाश इतका मोठा होईल, देशाचं, गावाचं नाव गाजवेल असं कधी वाटलंच नव्हतं. पण तो इतकी मेहनत घेतो, की ते पाहून आजही आमच्या डोळ्यांत पाणी येतं.

We used to call Avinash from public coinbox.. | खोक्यात रुपया टाकून फोन करायचो..

खोक्यात रुपया टाकून फोन करायचो..

googlenewsNext
ठळक मुद्देअविनाशने कधीच कशाविषयी हट्ट धरला नाही. बारावीपर्यंत त्याच्याजवळ मोबाईलही नव्हता. आमच्याकडेही नव्हता. नंतर त्याला एक साधा मोबाईल घेऊन दिला. आम्ही त्याला बाहेरून, खोक्यात एक रुपया टाकून फोन करायचो.

वैशाली व मुकुंद साबळे, मांडवा (ता. आष्टी, जि. बीड)

(अविनाशचे साबळेचे पालक)

आम्ही साधी माणसं. घरची परिस्थिती बेताची आहे. दोन-तीन एकर हलकी शेती आहे. शेतात राबतो. कष्ट करूनही काही उरत नाही. त्यामुळे आमची स्वप्नं साधीच होती. दोन वेळचं पोट भरणं हीच गरज जास्त होती. अविनाशलाही गरिबीची जाणीव होती. ‘आधी काही कामधाम कर, आईबापाला हातभार लाव’ असं आम्हाला त्याला कधी सांगावं लागलं नाही. आर्मीत जावं हे त्याचं स्वप्न होतं. त्यामुळे मेहनत घेऊन तो आधी आर्मीत भरती झाला. पळायचं त्याला कधीच काही वाटलं नाही. लहानपणापासून त्याला पळायची सवय आहे. अविनाशची शाळाही घरापासून दूर होती. सायकल वगैरे घेण्याइतके पैसे आमच्याकडे नव्हते. त्यामुळे अविनाश अगदी, दुसरी-तिसरीपासून पायीच शाळेत जात होता. कधी चालत, कधी पळत, पण नुसतं पळून अविनाश इतका मोठा होईल, देशाचं, गावाचं नाव गाजवेल असं कधी वाटलंच नव्हतं. पण तो इतकी मेहनत घेतो, की ते पाहून आजही आमच्या डोळ्यांत पाणी येतं. थोडंसंच जेवतो आणि नुसता व्यायाम करतो, पळतो. आणखी जोरात पळता यावं म्हणून त्यानं १३ किलो वजन कमी केलं होतं. लै बारीक झाला होता, पण अविनाश सांगायचा, तुम्ही काळजी करू नका, उपाशी राहिल्यामुळे मी बारीक झालेलो नाही. मी रोज व्यवस्थित जेवण घेतो. आता मी आणखी जोरात पळेन बघा..

अविनाशने कधीच कशाविषयी हट्ट धरला नाही. बारावीपर्यंत त्याच्याजवळ मोबाईलही नव्हता. आमच्याकडेही नव्हता. नंतर त्याला एक साधा मोबाईल घेऊन दिला. आम्ही त्याला बाहेरून, खोक्यात एक रुपया टाकून फोन करायचो.

अविनाश पहिल्यापासून अभ्यासातही खूप हुशार होता. शाळेत असताना ७ पानांचा ‘क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद’ यांचा धडा त्याला तोंडपाठ होता. त्याचा स्वभाव खूप शांत आहे. त्याची कोणतीही मागणी नसायची. त्याने मोबाईल, चांगले कपडे हवे असा कधीच हट्ट केला नाही. ऑलिम्पिकमध्ये अविनाश देशासाठी खेळेल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. तो देशासाठी पदक जिंकेल असा विश्वास वाटतो.

शब्दांकन - जयंत कुलकर्णी (औरंगाबाद, लोकमत)

कॅप्शन- अविनाशचे आई-वडील

Web Title: We used to call Avinash from public coinbox..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.