टेनिस एल्बोने हादरवले होते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 06:02 AM2021-07-18T06:02:00+5:302021-07-18T06:05:05+5:30

साधारण तीन वर्षांपूर्वीची गोष्ट. राहीला टेनिस एल्बो झाला होता. या दुखापतीमुळे आम्ही सारेच चिंतेत होतो. पण बस झालं आता, खेळणं सोडून करिअरकडे लक्ष दे, असं आम्ही कधीही तिला सांगितलं नाही. या दुखण्यामुळे राहीपण काहीशी निराश झाली होती, पण आपल्या चेहऱ्यावर तिनं ते कधीच दिसू दिलं नाही.

We were shocked by Rahi's tennis elbow. | टेनिस एल्बोने हादरवले होते..

टेनिस एल्बोने हादरवले होते..

Next
ठळक मुद्देराहीला वाचनाचीही प्रचंड आवड आहे. त्यामुळे ती एकतर आपल्या शूटिंगच्या सरावात असते, नाहीतर काहीतरी वाचत असते. ऑलिम्पिकमध्ये ती नक्कीच चांगली कामगिरी करेल असा आम्हाला विश्वास आहे.

प्रभा व जीवन सरनोबत (कोल्हापूर)

(राहीचे पालक)

साधारण तीन वर्षांपूर्वीची गोष्ट. राहीला टेनिस एल्बो झाला होता. या दुखापतीमुळे आम्ही सारेच चिंतेत होतो. पण बस झालं आता, खेळणं सोडून करिअरकडे लक्ष दे, असं आम्ही कधीही तिला सांगितलं नाही. या दुखण्यामुळे राहीपण काहीशी निराश झाली होती, पण आपल्या चेहऱ्यावर तिनं ते कधीच दिसू दिलं नाही. तिचा स्वभाव मुळातच शांत आहे, पण ती प्रचंड जिद्दी आहे. एखादी गोष्ट तिनं मनाशी ठरवली की ती केल्याशिवाय ती राहत नाही.

राहीला नेमबाजीची आवड लागली ती शाळेत असताना. शाळेत तिनं एनसीसी जॉइन केलं. तिथे नेमबाजीचं काही प्रशिक्षण तिला मिळालं आणि ती नेमबाजीच्या प्रेमातच पडली. ही गोष्ट २००५ची. राही त्यावेळी राजारामपुरीतील उषाराजे हायस्कूलमध्ये आठवीत शिकत होती. एनसीसीत नेमबाजीची ओळख झाल्यानंतर त्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यावं असं तिच्या डोक्यात घुसलं. त्यासाठी तिनं आमच्याकडे हट्ट सुरू केला. शूटिंग शिकण्यासाठी येथील दुधाळी रेंजवर मला ॲडमिशन घेऊन द्या असा लकडाच तिनं आमच्याकडे लावला. आधी तुझी दहावी तर होऊ दे, मग तुला नेमबाजी प्रशिक्षणाला घालू या असं आम्ही सांगितलं. पण तोपर्यंतही थांबायची तिची तयारी नव्हती.

पुढे मे महिन्याच्या सुट्टीत दुधाळी शूटिंग रेंजवर नेमबाजी प्रशिक्षणाचा कॅम्प सुरू झाला. यात तिनं रायफल नेमबाजीत चांगलीच चुणूक दाखवली. एन.सी.सी.च्या नेमबाजी स्पर्धेत राज्य, विभाग आणि दिल्लीतल्या स्पर्धाही तिनं गाजवल्या. तिच्याबरोबर असणाऱ्या इतर मैत्रिणी टाइमपास म्हणून एन.सी.सी. त आल्या होत्या. राही मात्र, सिरियसली कॅम्प प्रशिक्षण करीत होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही.

दहावी झाल्यानंतर राज्य पातळीवर २५ मीटर पिस्तूल प्रकारात तिनं रौप्य पदकाची कमाई केली. त्यानंतर राज्य, राष्ट्रीय स्पर्धांत तिनं पदकांचा सपाटाच लावला. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांतही तिनं अव्वल कामगिरी केली. घरात असताना ती कधीही आमच्याशी किंवा तिच्या भावंडांबरोबर नेमबाजीविषयी चर्चा करीत नाही. आता ऑलिम्पिकमध्ये तिची निवड झाली, आमच्यासह अख्ख्या देशाला तिचा अभिमान वाटला, पण बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवण्यावर तिचा भर असतो. राहीला वाचनाचीही प्रचंड आवड आहे. त्यामुळे ती एकतर आपल्या शूटिंगच्या सरावात असते, नाहीतर काहीतरी वाचत असते. ऑलिम्पिकमध्ये ती नक्कीच चांगली कामगिरी करेल असा आम्हाला विश्वास आहे.

शब्दांकन - सचिन भोसले (कोल्हापूर, लोकमत)

कॅप्शन-राहीसह तिचे कुटुंबीय.

Web Title: We were shocked by Rahi's tennis elbow.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.