वेब सीरिजची मुसंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 08:34 PM2019-01-12T20:34:13+5:302019-01-12T20:36:36+5:30
-डॉ. शिवाजी जाधव अनेक तरुणांनी त्याच त्या सासू -सुना धाटणीच्या मालिकांना टाटा करून नव्या डिजिटल माध्यमांतील वेबसिरीजला आपलेसे केले ...
-डॉ. शिवाजी जाधव
अनेक तरुणांनी त्याच त्या सासू -सुना धाटणीच्या मालिकांना टाटा करून नव्या डिजिटल माध्यमांतील वेबसिरीजला आपलेसे केले आहे. आप्तसंबंध, नातेसंबंध, विवाहबाह्य संबंध, कुरघोड्या डाव-प्रतिडाव, कटकपट, छळ अशा चाकोरीत अडकलेल्या टीव्ही वाहिन्यांना देशातील सर्वांत प्रभावी असलेल्या तरुण प्रेक्षकवर्गाची नस लक्षात आली नाही. ती उणीव वेब सीरिजने भरून काढली आहे.
तरुणांचा अंदाज घेऊन त्यांना गुंतवून ठेवण्यात इलेक्ट्रॉनिक माध्यमांना तितके यश न आल्याने किंवा या माध्यमाच्या काही मर्यादा असल्याने तरुणांनी आपल्या आकांक्षा व्यक्त करण्यास समर्थ असणाऱ्या डिजिटल माध्यमांना पसंती दिली आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांत विशेषत: टीव्ही या लोकप्रिय माध्यमांतील मालिकांपुरता विचार केल्यास नावीन्याचा अभाव आणि तरुणांना वजा करण्याची झालेली नकळत चूक टीव्हीच्या अंगलट आली आहे.
वेब सीरिज म्हणजे डिजिटल माध्यमाद्वारे प्रसारित होणाºया मालिका. इंटरनेट किंवा वेब टीव्हीच्या माध्यमातून पाहता येणाºया डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅब्लेटस् किंवा स्मार्टफोनवर किंबहुना टीव्हीवरही त्या सहज उपलब्ध आहेत. या मालिका दहा मिनिटांपासून चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांपर्यंत आहेत. एक ते चार वा पाच भागात त्याची विभागणी असते. प्रत्येक भाग स्वतंत्र कथानक घेऊन येतो. त्यामुळे तो आणखी रोचक होतो. इंग्रजीसह हिंदी आणि अलीकडे मराठीसह अन्य स्थानिक भाषांतही यावर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. लाखोंच्या संख्येने या मालिकांना आॅनलाईन दर्शक मिळत आहेत. प्रेक्षकांचे आकडे पाहून चित्रपट निर्माते हादरून जावेत, अशी स्थिती आहे म्हणून ‘यशराज’सारख्या बॅनरला या क्षेत्राकडे येण्याचा मोह आवरता आला नाही.
‘द व्हायरल फिव्हर’, ‘टीव्हीएफ’, ‘आॅल इंडिया बकचोद’, ‘एआयबी’, ‘डाईस मीडिया’, ‘फिल्टर कॉपी’, ‘अमेझॉन प्राईम व्हिडिओ’, ‘हॉट स्टार’, ‘सोनी लाईव्ह’, ‘ह्युट’, ‘नेटफ्लिक्स’, ‘यू ट्युब’ अशा कितीतरी प्लॅटफॉर्मद्वारे वेब सीरिज तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनल्या आहेत. ‘टीव्हीएफ’च्या ‘परमनंट रुममेट’ने भारतात धुमाकूळ घातला. त्यानंतर वेब सीरिज निर्मितीचा धडाका सुरू झाला. अनेक मोठे प्लेअर त्यात उतरले. त्यातून तरुणांना ताजा कंटेन्ट मिळू लागला. टीव्ही आणि चित्रपटांच्या मर्यादा वेब सीरिजने हेरल्या आणि तगडा कंटेन्ट देऊन तरुणाईला लुभावले. कधीही आणि कुठेही पाहण्याची सोय असल्याने तरुणवर्ग याकडे आकर्षिला गेला.
चित्रपटासारखी अडीच किंवा तीन तास एकाच जागी बसण्याची सक्ती नाही. दहा मिनिट ते अर्धा तासात खेळ खल्लास होतो. एवढ्या कमी वेळातही चित्रपटापेक्षा जास्त थ्रील! टीव्हीवरील मालिकांचे पन्नास-शंभर अगदी पाणी ओतून पातळ केलेले दोनशे भाग पाहण्यासाठी प्रचंड पेशन्स ठेवायची गरज नाही. दोन-पाच भागात काम तमाम! त्यातूनही अनेक प्रेक्षक वेब सीरिजकडे ओढले गेले.
मालिका किंवा चित्रपट तयार झाल्यानंतर त्याला सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीतून जावे लागते. त्यामुळे अनेकवेळा मूळ कथेला मुरड घालावी लागते. वेब सीरिजचे वैशिष्ट्य म्हणजे ते सेन्सॉरच्या कात्रीच्या बाहेर आहेत. त्यामुळे तेथे मुक्त, मनसोक्त आणि कधी-कधी सुमार दर्जाची सैल अभिव्यक्ती होते. सेक्स आणि शिव्यांचा भडिमारही असतो. तथापि, तरुणवर्गाची स्पंदनं अचूक टिपण्यात या माध्यमाला यश आले आहे. त्यातील पात्रंही अगदी टवटवीत आणि आपल्या अवती-भोवती वावरत असलेल्या लोकांसारखी असतात. आपसूकच ती तरुणाईला आपलीशी वाटतात. त्या पात्रांच जगणं, वागणं, बोलणं, वर्तन व्यवहार तरुणांच्या परिचयाचा असतो. त्यामुळे तरुणाई त्या पात्रांमध्ये स्वत:ला पाहते.
त्या पात्रांचे संवादही मिरवण्याचे विषय झाले आहेत. ‘बॅक्ड ’ वेब सीरिजमधील ‘ब्रो ट्रस्ट मी’ हा संवाद कमालीचा लोकप्रिय झाला आहे. या डायलॉगचे टी-शर्ट बाजारात विक्रीला आले आहेत. वेब सीरिजची भाषाही संमिश्र असते. अवती-भोवती बोलली जाणारी, पाहणाºया प्रत्येकाला त्यात आपलं अस्तित्व, भवताल दिसतो. परिणामी, तो त्यात रमतो. आपलं विश्व तो त्यात शोधत राहतो.
वेब सीरिजने टीव्हीसारख्या माध्यमांसमोर आव्हान तर उभे केलंच आहे; पण चित्रपटांसाठीही ती धोक्याची घंटा मानली जात आहे. भारतात अजून इंटरनेटचा विस्तार पुरेशा प्रमाणात झालेला नाही. निमशहरी आणि बराचसा ग्रामीण भाग इंटरनेटच्या परिघापासून दूर आहे. इंटरनेटची पोहोच वाढून ते जसजसे स्वस्त होत जाईल, तसतसा वेब सीरिजचा बोलबाला वाढणार आहे. त्याची जाणीव झाल्याने अनेक बडे कलाकार वेब सीरिजमध्ये काम करण्यास उत्सुक आहेत. मालिका आणि चित्रपट निर्माते या क्षेत्रात उतरत आहेत. या सर्व घुसळणीतून तरुणांसाठी मोकळं-ढाकळं तरीही उपकारक असे काहीतरी बाहेर येईल, अशी अपेक्षा करूया!
(लेखक माध्यमांचे अभ्यासक आहेत)