लग्नाचा इव्हेण्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 03:38 PM2018-05-28T15:38:36+5:302018-05-28T15:40:15+5:30

लग्न ही अतिशय खासगी आणि कौटुंबिक बाब, पण त्याचे आज राजकीयीकरण होत आहे. लोकांची मानसिकताही अशी की, पुढाऱ्यांनी गावासाठी काही केले नाही, पिण्याचे पाणी पुरवले नाही, तरुणांना नोकऱ्या मिळवून दिल्या नाहीत तरी चालेल; पण आमच्या लग्नांना, कुटुंबातील अंत्यविधी, दहाव्याला मात्र तुम्ही आले पाहिजे.. नेतेही मग काम करण्यापेक्षा विवाह, अंत्यविधीला गर्दी करू लागले !

Wedding event! | लग्नाचा इव्हेण्ट!

लग्नाचा इव्हेण्ट!

Next

- हेरंब कुलकर्णी (herambkulkarni1971@gmail.com)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात एक किस्सा सांगितला. निमित्त होते अतुल कुलकर्णी यांच्या ‘बिनचेहऱ्याची माणसं’ या पुस्तकाचे प्रकाशन..
एका कार्यकर्त्याचा किस्सा त्यांनी सांगितला. वडिलांचा मृत्यू झाल्यावर प्रेत घरात असताना अंत्यविधीला तुम्ही आलेच पाहिजे, असा हट्ट त्याने धरला..
हे ऐकताना काहीसे धक्कादायक वाटले; पण लग्न आणि मृत्यू या कौटुंबिक असणाºया बाबी आज राजकीय होत आहेत. या बाबी आज प्रतिष्ठा मोजण्याच्या फूटपट्टी ठरत आहेत.. सामाजिक प्रतिष्ठा त्यावर मोजली जात असल्याने सर्वसामान्य लोकांची त्यात फरफट होत आहे. एकीकडे होणारे राजकीयीकरण आणि दुसरीकडे संपत्तीचे प्रदर्शन यात हे कौटुंबिक समारंभ सापडल्याने त्यातील भावनांचा बाजार सुरू झाला आहे.
शहरी भागात लग्न हा इव्हेण्ट होऊन आता बरीच वर्षे लोटली; पण ग्रामीण भागात या समारंभाचे खासगी आणि कौटुंबिक स्वरूप अजून टिकून होते. ज्या गावात लग्न होणार असायचे त्या गावातील लोक ते लग्न आपले मानायचे. अनेकदा तर शेतात घर असेल तर शेतात घरासमोर मांडव टाकून ते लग्न होत होते..
साधासाच मांडव. त्यातून आत येणारे ऊन. तिथेच खड्डे खंदून केलेल्या चुली, साधा स्वयंपाक. मिरवणुकीपुरता आणलेला ताशा आणि पिपाणी. टॉवेल-टोपीचे आहेर. इतके साधे लग्न असायचे..
पण गेल्या पाच वर्षात ग्रामीण भागातील लग्न हा जणू राजकीय इव्हेण्ट झाला.. विशेषत: नोकरी करणारे नवरदेव वाढल्यापासून चांगले लग्न करून देण्याच्या मागण्या होऊ लागल्या. त्यामुळे तालुक्याच्या गावी मंगल कार्यालयात लग्नं होऊ लागली. शहरासारखी लॉन्स, कारंजे असलेली मंगल कार्यालयेही तालुक्याच्या गावाबाहेर रांगेने झालीत. तिथे लग्न केले तरच तुमचे गावातील स्थान दखलपात्र अशी स्थिती असल्याने कर्ज काढून खेड्यातील लोक आज तालुक्याच्या गावी येऊन लग्न करू लागलेत..
तिथे एकदा आले की त्या खेळाचे सगळे नियम पाळावे लागतात. त्यातील अनेक सुविधा कार्यालयच पैसे घेऊन पुरवते.. नवरीचा मेकअप करणारी ब्यूटिशियन, शूटिंग व फोटोसाठी ड्रोन कॅमेरा, इथपासून ते संगीत मंगलाष्टके म्हणायला खास नाशिक , पुणे अशा ठिकाणांहून आलेला आॅर्केस्ट्रा हे सारे मुलीच्या बापाला परवडण्याचा प्रश्नच नाही... ते अपरिहार्य आहे.
शहरातून लग्न पाहून आलेले मुलगा-मुलगी विविध मागण्या करतात. लग्नापूर्वीचे प्री-वेडिंग फोटोसेशन आता सुरू झाले. त्यासाठी खूप खर्च केला जातो. शहरातील पाहुण्यांना, मुलाच्या कार्यालयात आपली ‘गावठी’ पत्रिका कशी चालेल? - मग इंग्रजीतून किंवा महागडी पत्रिका छापली जाते..
यावर एक प्रश्न हमखास विचारला जातो. आम्हाला एकच मुलगी आहे. आमची आर्थिक स्थिती चांगली आहे. मग आम्ही आम्हाला पाहिजे तसे लग्न केले तर तुमचे काय बिघडते? प्रश्न वरवर योग्य वाटतो; पण यातून त्या जातीतील, त्या गावातील गरीब कुटुंबावर जो तणाव निर्माण होतो त्यातून ते अधिक कर्जबाजारी होतात हा परिणाम जास्त भीषण असतो.
लग्न खर्चामुळे होणारे कर्ज आणि त्यातून आत्महत्या होतात.. हाही शेतकरी आत्महत्येच्या अभ्यासाचा एक निष्कर्ष आहे. काही ठिकाणी तर वडिलांना लग्नाचा खर्च झेपणार नाही म्हणून उपवर मुलींनी आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत... समाजातील किंवा आपल्या जातीतील प्रतिष्ठित लोक जसे वागतात त्याचे अनुकरण त्या जातीतील गरीब माणसे करत असतात. महागडी लग्नं सुरू झाल्यावर गरिबांना परवडेल किंवा नाही याचा विचार न करता शेतात मांडव टाकून लग्न करणे एकदम गरीब असल्याचे लक्षण ठरले आणि कर्ज काढून मोठ्या लग्नाच्या वाटेवर गरीबही येऊ लागले. मग वाजंत्री, डीजे, भारीतल्या लग्नपत्रिका.. हे सगळे करावेच लागते..
या मोठ्या लग्नांचा हा सगळ्यात भीषण परिणाम आहे की तो अनुकरणाच्या सक्तीतून तुम्हाला नाइलाजाने पुन्हा पुन्हा गरिबीत ढकलतो.. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मी मध्यंतरी फिरलो. विविध आदिवासी गरीब गावातील लोकही या लग्नखर्चाचे बळी आहेत. विवेक पंडित यांनी जो सालगडीचा प्रश्न पुढे आणला त्यातले अनेक सालगडी हे लग्नातील कर्जामुळे सालगडी झालेले होते... त्यामुळे त्यांना ‘लग्नगडी’ म्हटले जात होते.. अजूनही ही प्रथा सुरू आहे.. परंपरेविरु द्ध बंड करण्याचे धाडस सर्वांमध्ये नसते. त्यामुळे गरीब माणसे परवडत नसले तरी कर्ज काढून अनुकरण करत राहातात. त्यांची यातून सुटका करण्यासाठी समाजातील श्रीमंतांनी खर्च कमी करावा. हा त्यातील सामाजिक मुद्दा आहे.. लग्नखर्च कमी झाले तर मुलींच्या जन्माचे स्वागत करण्याचे प्रमाण वाढेल.
लग्न आणि मृत्यूचे राजकीयीकरण होणे फार गंभीर आहे. राजकीय पुढारी रोज किमान ८ लग्नांना उपस्थित राहतात... सकाळपासून लग्नांना भेटी देत देत फिरत राहतात.. मान्यवर लोक लग्नाला यावेत म्हणून वधुपिते आणि वरपिते कासावीस होतात..
लोकांची मानसिकता अशी झाली आहे की, एकवेळ तुम्ही आमच्या गावाचा रस्ता केला नाही तरी चालेल, पिण्याचे पाणी दिले नाही तरी चालेल, गावातील तरु ण मुलांना नोकरी दिली नाही तरी चालेल, फक्त आमच्या लग्नांना तुम्ही आले पाहिजे, आमच्या कुटुंबातील अंत्यविधी, दहाव्याला तुम्ही आले पाहिजे.. तरच आम्ही तुम्हाला आमचे नेते मानू.. त्यामुळे सर्वपक्षीय राजकारणी हे शिकले की कामे करण्याची आता गरज नाही, फक्त लग्न आणि दहावे आपण करत राहिलो तरी सहज निवडून येऊ आणि त्यामुळे लग्नांना नेत्यांची गर्दी होऊ लागली!
लोकही असे की कोणाच्या लग्नाला किती नेते आले यावरून त्याची सामाजिक, राजकीय प्रतिष्ठा जोखू लागले.. आजच्या वेगवान जगण्यात प्रत्येकजण आपली प्रतिमा शोधतो आहे, ओळख शोधतो आहे, ती ओळख प्रतिष्ठा त्याला या नेत्यांच्या गर्दीतून मिळते. तेव्हा लग्नांना गर्दी जमवायची आणि नेते आणून आपली प्रतिष्ठा वाढवायची हा खेळ सुरू झाला आहे. यातून भान विसरले जाते. मृतदेह घरात असताना स्वत:च अंत्ययात्रेच्या पोस्ट टाकतात, फोन करतात. दहाव्याला गर्दी जमावी म्हणून लग्नपत्रिकेसारख्या गावोगाव फिरून पत्रिका वाटल्या जातात. श्रद्धांजली वाहायला कोण नेते आले यावरून त्या दु:खाची प्रतिष्ठा वाढते...!
लग्नात तर पत्रिकेत सर्वपक्षीय नावे टाकली जातात. मी एकदा एका पत्रिकेत २८१ नावे मोजली होती आता ते उच्चांक मोडले जातात.. काहीजण तर वेगवेगळ्या नावांच्या वेगवेगळ्या पत्रिका काढून नेत्यांना चकवतात... सर्वात कहर असतो तो सत्कार आणि भाषणांचा. वरपिता, वधूपिता लग्नाचे निमंत्रण द्यायला आपल्या घरी येतात तेव्हा असे भावनिक होतात की आपण जर त्या लग्नाला गेलो नाही तर जणू ते लग्नच होणार नाही... म्हणून आपण जातो; पण तिथे गेल्यावर लक्षात येते की आपण फक्त गर्दी वाढवायला हवे आहोत.. ते भलत्याच मान्यवरांची वाट बघत असतात..
काहींना आपल्या शेजारून उठवून फेटे बांधले जातात. माइकवरून विशिष्ट लोक आल्यावर स्वागत केले जाते.. अशावेळी इतरांना काय वाटेल याचा विचार केला जात नाही.. नेत्यांना फेटे बांधले जातात आणि त्यांचे आशीर्वादरूपी भाषणे होतात. जणू बाकीचे शाप द्यायला आले आहेत !!! कधी कधी तर मध्येच नेते आले तर मंगलाष्टके थांबवून भाषणे होतात... यातून विकासाचे राजकारण न होता केवळ लोकानुरंजन सुरू झाले..
महाराष्ट्रात एक काळ असा होता की व्यक्तिगत कामे घेऊन लोक गेले की नेते चिडायचे आणि गावाचे काम घेऊन या म्हणायचे. शंकरराव चव्हाण, बी. जे. खताळ यांची यामुळे लोकांना भीती वाटायची.. आता दुसरे टोक गाठले आहे. आमच्या गावाचे काम करू नका; पण आमच्या व्यक्तिगत कार्यक्र मांना या म्हणजे आम्ही तुम्हाला मते देऊ..
समाजातील व्यक्तिवाद वाढला आहे याचा हा परिणाम आहे. याचा फटका विकासाला बसतो आहे.. विकासासाठी प्रयत्न करा हे दडपण नकळत कमी होते आहे. प्रत्येक गावातील विशिष्ट प्रतिष्ठित सांभाळले की झाले अशी नेत्यांची मानसिकता झाली आहे...
तेव्हा लग्न आणि मृत्यू हे सार्वजनिक कार्यक्र म न होता केवळ जवळचे नातेवाइक व स्नेही यांच्यापुरतेच ते मर्यादित राहायला हवे. त्यासाठी लग्नातील, दहाव्यातील राजकीय नेत्यांचे महात्म्य कमी करायला हवे. सत्कार आणि आशीर्वाद थांबवायला हवेत.. हे थांबले की पुढारी तिकडे फिरकणे आपोआप बंद होतील..
गरिबांची लग्नातील कर्जातून सुटका करायची असेल तर सामुदायिक विवाह चळवळ रुजायला हवी.. या विवाहांना प्रतिष्ठा देण्यासाठी ऐपत असलेल्या वर्गाने आणि राजकीय व्यक्तींनी आपल्या कुटुंबातील मुलामुलींची लग्नेही सामुदायिक लग्नातच करायला हवीत तरच ही चळवळ महाराष्ट्रात रुजेल..

(लेखक शिक्षण अभ्यासक आणि कार्यकर्ते आहेत.)
 

Web Title: Wedding event!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.