जाणीव घडवणारे दशक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 06:00 AM2019-08-25T06:00:00+5:302019-08-25T06:00:07+5:30
वाचणारी आणि ऐकणारी पिढी नष्ट होऊन पाहणारी पिढी जन्माला आली आहे, याची जाणीव मला होत गेली तेव्हा मला या दोन काळाच्या मध्ये उभ्या असलेल्या नव्वदीच्या दशकाविषयी जाणीवपूर्वक लिहिलेले लेख संकलित करावेसे वाटू लागले. वेळोवेळी लिहिलेल्या लेखांना ललितनिबंधाचा आकार देऊन एकत्न करावेत, अशी कल्पना आकारास आली. काही मोजकी प्रवासवर्णने आणि व्यक्तिचित्नांचा समावेश करून हे पुस्तक तयार झाले.
- सचिन कुंडकलर
प्रत्येक माणूस एका दशकामुळे घडवला जातो, ओळखला जातो. ते दशक त्या माणसाचे पोषण करते आणि काही काळाने तेच दशक त्या माणसाची र्मयादा बनते. त्याची जाणीव जुनी बनवते.
सातत्याने आपण, आपल्यासोबतच्या वस्तू आणि साधने जुनी होत जाण्याचा अनुभव नव्वदीच्या दशकात जाणते झालेल्या प्रत्येकाला आला. त्या दशकात जाणते झालेल्या तरु ण पिढीने फार मोठे तांत्रिक, आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन पाहिले. त्यामुळे त्या पिढीचा वर्तमानकाळ सातत्याने रोचक राहिला. मी त्या पिढीचा प्रतिनिधी आहे.
नव्वदीच्या दशकात जाणते होणे म्हणजे नव्वदीच्या दशकात लैंगिक जाणिवा आणि आयुष्याची स्वप्ने जिवंत होऊन प्रखर होणे. नव्वदीच्या दशकात जन्मलेल्या पिढीविषयी मी बोलत नाही. अँनालॉग काळातून डिजिटल काळात आणि मानसिकतेत प्रवेश केलेल्या तरुण पिढीविषयी मी बोलतो आहे. म्हणजे र्शीदेवी की माधुरी हा तुमच्या शाळा-कॉलेजात भांडायचा विषय असेल तर मी नक्कीच तुमच्याविषयी बोलत आहे.
गेल्या अनेक वर्षांत हे अनेक प्रकारचे लेख लिहिताना माझ्या मनावर आधीच्या पिढय़ांचा सांस्कृतिक धाक होता आणि तो ह्या लिखाणाच्या प्रक्रि येत कमी झाला हे मला या लिखाणाने मिळवून दिलेले फार मोठे फलित आहे. तो कसला धाक होता त्याची जाणीव या पुस्तकाच्या प्रवासात उमटलेली दिसेल. महाराष्ट्रात राहून लिहिणार्या, नाटक करणार्या, गाणार्या किंवा अगदी कार चालवणार्या मुला-मुलींवर सतत जुन्या संदर्भांचा आणि आठवणींचा धाक असतो. तुम्ही कधीच काहीही ओरिजिनल करू शकत नाही. ‘सगळे करून झाले आहे आणि तुम्ही उशिरा जन्मलेले अभागी आहात’, असे पूर्वी दिग्गज नावाची माणसे जी फक्त महाराष्ट्र आणि बंगालमध्येच जन्मतात, ती सतत आम्हाला म्हणत असत. मी साधी कार शिकायचे स्वप्न पाहायचो तेव्हा माझ्या ओळखीच्या जुन्या साहित्यगुंगीत रममाण झालेल्या एक बाई मला, ‘सुनीताबाई देशपांडे कार कशा चालवायच्या’ हे सांगत बसायच्या. त्याचे मी कसे आणि कुठे लोणचे घालू हे मला कळत नसे. मी लहानाचा मोठा होताना आणि उमेदवारी करताना अतिशय तुच्छतावादी; पण सोनेरी सांस्कृतिक वातावरण असलेल्या पुण्यात वाढलो. एखाद्या जुन्या गढीत, तळघरातल्या अंधारात गेल्या तीन पिढय़ातील बायकांच्या पैठण्या, उंची अत्तरे आणि जुनी रेशमी वस्रे ठेवलेली लाकडी पेटी असावी असे ते शहर होते.
‘कयामत से कयामत तक’ या सिनेमाने आम्हाला वयाने मोठी माणसे मूर्ख असू शकतात याचा साक्षात्कार करून दिला. साध्या मराठी मध्यमवर्गीय घरात जन्मलेली मुले-मुली होतो आम्ही. आमचे आईवडील साहित्य, समाजकारण, संगीत, राजकारण यापासून फार दूर होते. या काळात आमच्या जाणिवा सिनेमाने, चित्नपटातील संगीताने, आम्हाला वापरायला मिळालेल्या अनेकविध तांत्रिक उपकरणांनी आणि इंटरनेटने मिळवून दिलेल्या अर्मयाद खासगीपणाने आकारास आल्या. माझे मानसिक आणि भावनिक पालनपोषण लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी सुरू केले. आनंद-मिलिंद, जतीन-ललित यांनी मला माझा आतला आत्मविश्वासपूर्ण ताल दिला. ए.आर. रेहमानने माझी मुंज लावून दिली.
मला गेल्या काही वर्षांत आपण आउटडेटेड होत जात आहोत याची फार चांगली जाणीव झाली आणि त्यामुळे माझ्यातला आळस दूर होत गेला. 2000 सालच्या आसपास जन्मलेली आणि आता विशीत असलेली संपूर्ण पिढी आपल्याला असा रट्टा वारंवार देते. तो मिळणे हे फार चांगले आहे. तो रट्टा मिळाल्याने मी भानावर आलो आणि नवे संगीत आणि नवी दृश्यकला बारकाईने पहायला आणि ऐकायला लागलो. वाचणारी आणि ऐकणारी पिढी नष्ट होऊन पाहणारी पिढी जन्माला आली आहे, याची जाणीव मला होत गेली तेव्हा मला या दोन काळाच्या मध्ये उभ्या असलेल्या नव्वदीच्या दशकाविषयी जाणीवपूर्वक लिहिलेले लेख संकलित करावेत असे वाटू लागले.
या पुस्तकाचा प्रवास आखून झाला नाही. प्रणव सखदेव आणि मी एकेदिवशी बोलत असताना गेल्या वीस वर्षांत मी वेगवेगळ्या वेळी लिहिलेले लेख पुन्हा वाचून, पुन्हा नव्या दृष्टीने लिहून त्याला ललितनिबंधाचा आकार देऊन एकत्न करावेत अशी कल्पना तयार झाली. रोहन प्रकाशनाच्या सर्व टीमने पन्नासेक लेख वाचून त्यातले पंचवीस निवडक लेख माझ्याकडे पुनर्लिखाणासाठी पाठवले. गेली एक-दीड वर्ष या पुस्तकाच्या स्वरूपावर आणि त्यातील मजकुरावर बारकाईने काम करणे चालू आहे.
कुमार केतकर, विद्या बाळ, र्शीकांत बोजेवार, गिरीश कुबेर, रवींद्र पाथरे तसेच अपर्णा वेलणकर या विविध संपादकांनी गेल्या अनेक वर्षांत माझ्याकडून नियतकालिकात आणि वृत्तपत्नांमध्ये लिहिण्यासाठी लिहून घेतलेले लेख या पुस्तकात नव्या स्वरूपात आहेत. लिहून घेताना यावर उल्लेख केलेल्या सर्व संपादकांनी मला संपूर्ण स्वातंत्र्य आणि विचारांचा निर्भय अवकाश दिला होता. त्यामुळे मला वृत्तपत्नांसाठी लिहिताना नेहमीच आनंद झाला; पण हे पुस्तक तयार होताना मला वृत्तपत्नातील लेखांना असतो तो आकार आणि वेग तसाच ठेवू द्यायचा नव्हता. अनेक लेख तात्कालिक होते ते आम्ही बाद केले. आणि ज्यांना ललितलेखाचा आकृतिबंध देता येईल, असे लेख निवडून त्यावर काम केले. या लेखांशिवाय या पुस्तकात मी स्वतंत्नपणे लिहिलेली मोजकी आणि महत्त्वाची प्रवासवर्णने आणि मला महत्त्वाची वाटणारी व्यक्तिचित्ने आहेत.
माणूस जगातून किंवा आपल्या आयुष्यातून गेला की तो कायमचा आणि संपूर्ण पुसून जायचा तो काळ होता. इंटरनेटमुळे आता कुणीच कधीही पुसले जाऊ शकत नाही. आजच्या काळात नात्याचा आणि अनुभवाचा अंत होण्याची प्रक्रि या ही संपूर्ण बदललेली आहे. ती प्रक्रि या बदललेली असल्याने स्मृतीची आंदोलने आणि महत्त्व यांनी नवे स्वरूप धारण केले आहे. नॉस्टॅल्जिया, स्मरणरंजन ही क्रि या नव्या पिढीच्या मेंदूत घडणे बंद होत आले आहे. ते चांगले किंवा वाईट असे काहीही नाही; पण हा बदल फार मोठा आणि दूरगामी आहे. पुढील पिढीचा मेंदू सतत पर्यायातून निवडायचे काम करण्यात व्यग्र असतो. माझा मेंदू खूप पर्याय असलेली कोणतीही स्थिती टाळून माहितीच्या आणि सवयीच्या अनुभवाकडे जातो. डिजिटायझेशनमुळे शारीरिक आणि वैचारिक उत्क्र ांती होत असलेल्या या आकर्षक काळात मला काही महत्त्वाचे असे अनुभव लिहून, काही काळाने त्यावर पुन्हा प्रक्रिया करून त्याला आकार देत राहण्याचे हे काम फार ऊर्जा देत आहे.
नाइण्टिन नाइण्टी - सचिन कुंडलकर
रोहन प्रकाशन
kundalkar@gmail.com
(लेखक ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक आहेत.)