आमरा एई देशेते थाकबो..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 06:01 AM2021-05-09T06:01:00+5:302021-05-09T06:05:01+5:30
‘आम्ही कुठेही जाणार नाही. आम्ही याच देशात राहू !- सत्ताधीशांना आव्हान देणाऱ्या एका बंगाली गाण्याची गोष्ट!
- अतुल कुलकर्णी
बंगाल, पंजाब आणि महाराष्ट्र ही तीन बंडखोर राज्ये म्हणून ओळखली गेली. स्वातंत्र्यपूर्व काळात लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल हे तीन स्वातंत्र्यसेनानी लाल-बाल-पाल या नावाने ओळखले जात. लाला लजपत राय यांनी पंजाबमध्ये ‘पंजाब केसरी’ काढला, तर लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात ‘केसरी’ काढला. बंगालमध्ये वाङ्मयीन चळवळीने स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी जोर धरला.. ‘आनंदमठ’ ही बंकिमचंद्र चटर्जी यांची कादंबरी बंगालमध्येच लिहिली गेली.
स्वातंत्र्याच्या लढ्यात राजकारणाबरोबरच साहित्यिक, विचारवंतांचा सक्रिय सहभाग हे या तीन राज्यांचे ठळक वेगळेपण आहे. ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्धचा तीव्र स्वर या राज्यांतल्या साहित्यामधून उठला आणि त्यातून राजकीय चळवळीला बळ मिळून पुढे ब्रिटिश सत्तेपुढे मोठे आव्हान उभे राहिले.
हा संदर्भ गाठीशी ठेवून पाहिले तर बंगाल, पंजाब आणि महाराष्ट्र या तीनही राज्यांत सध्या भाजपविरोधी सरकारे आहेत. ही सरकारे सध्या त्यांच्या त्यांच्या वकुबाप्रमाणे केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांना आव्हान देण्याचे काम करीत आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार होऊ नये म्हणून भाजपने प्रचंड ताकद लावली होती. तरीही भाजपविरोधी सरकार सत्तेत आले. पंजाबमध्ये काँग्रेसने गड राखून ठेवला आहे... आता बंगालचा निकाल हे या विरोधाचे ताजे उदाहरण!
या मांडणीचे कारण आहे एक गाणे. बंगालमध्ये निवडणूक प्रचाराचा ज्वर शिगेला पोहोचलेला असताना राज्यातील तरुण आणि ज्येष्ठ कलाकारांनी एकत्र येऊन २४ मार्च रोजी एक गाणे यूट्युबवर अपलोड केले. महिन्याभरात ते दहा लाखांहून अधिक प्रेक्षकांपर्यंत गेले. हल्ली निवडणुकांमध्ये साहित्यिक, विचारवंत, कलावंत फारसा सक्रिय सहभाग घेताना दिसत नाहीत. मात्र बंगालच्या निवडणुकीत कलावंतांनी एकत्र येत ठोस भूमिका घेऊन हे गाणे तयार केले. हा कोण्या एका पक्षाचा प्रचार नव्हे. त्या गाण्यातून पश्चिम बंगालचे जनमानस व्यक्त करण्याचा प्रयत्न झाला, ही सध्याच्या वातावरणात एक महत्त्वाची घटना आहे. भाजपच्या बलदंड यंत्रणेला नमवून ममता बॅनर्जी यांनी मिळवलेला विजय हा केवळ त्यांच्या संघर्षाची कथा सांगत नाही, तर त्या गाण्यातून जे व्यक्त झाले ते पश्चिम बंगालचे जनमानसही या विजयाचे मोठे कारण आहे.
बारा गायकांनी गायलेले हे गाणे अनिर्बन भट्टाचार्य यांनी लिहिलेले आहे. त्याचा थोडक्यात आशय असा-
“इतिहास तुम्हाला इतिहास गाडून, पुसून टाकायचा आहे. तुम्ही मठ्ठ निर्बुद्धतेचे समर्थन करता. तुमची भक्ती रक्तलांच्छित आहे. तुम्हाला कुणाबद्दलही प्रेम, जिव्हाळा नाही. संसर्गजन्य महामारीप्रमाणे तुम्ही द्वेष आणि मत्सर पसरवत आहात. तुम्ही माझ्या सहनशीलतेचा अंत पाहत आहात. जी आता संपत आली आहे. आमचं भलं कशात आहे हे आम्हाला चांगलं समजतं, आणि तोच निर्णय आम्ही घेणार आहोत. आम्ही कुठेही जाणार नाही, आम्ही आमच्या मातृभूमीतच राहणार आहोत.”
...ही अशी भूमिका घेताना कवी म्हणतो, “तुमची भक्ती हे थोतांड आहे. सत्याची तुम्हाला जराही चाड नाही. सामाजिक न्याय, आर्थिक आणि राजकीय विचारांच्या अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, समान संधी, प्रत्येकाच्या व्यक्तिगत सन्मानाची हमी आणि देशाची एकता व अखंडता यावर विश्वास ठेवणारे आम्ही भारतीय आहोत. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक ही आमच्या जगण्याची प्रेरणा आहे. त्यामुळेच आम्ही संतप्त आहोत, पण घाबरलेलो नाही...” असे सांगत हे गाणे पुढे जात राहाते...
या गाण्याच्या शेवटी एक छोटी मुलगी “माझा भारताच्या घटनेवर विश्वास आहे” असे म्हणत येते... तिच्या हाती तिच्या आधीच्या पिढीचा तरुण तिरंगा देतो...
अत्यंत प्रभावी असे हे गाणे कोणावरही व्यक्तिगत टीका न करता उलगडत जाते. त्याला पूरक म्हणून वापरलेली छायाचित्रे, वर्तमानपत्रांची कात्रणे, पुस्तके अधिक प्रभावीपणे वास्तवाची जाणीव करून देतात. निवडणुका विकासाच्या मुद्द्यांवर व्हाव्यात की जाती-धर्माच्या मुद्द्यावर? - असाही एक प्रश्न हे गाणे उपस्थित करते.
हे गाणे पाहिल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीचा प्रचार झाला आणि अखेर निवडणुकीचा जो निकाल आला, त्या सगळ्याचा संदर्भ एकमेकांशी जोडण्यापासून तुम्ही स्वतःला रोखू शकत नाही.
सत्ताधारी शिरजोर होतात, तेव्हा पहिला विरोधाचा स्वर उमटतो तो लेखक-कवी-कलावंत यांच्या जगातून!
आजपर्यंतच्या इतिहासात विद्रोहाची पहिली ठिणगी टाकणारे साहित्यिक, विचारवंत, कवी, लेखक हे महत्त्वाची भूमिका बजावत आले आहेत... अनिर्बन भट्टाचार्य यांच्या गाण्याने अशाच एका कल्पनेला जन्म दिला आहे.
या एकाच गाण्यामुळे पश्चिम बंगालमध्ये ममतांना विजय मिळाला असे म्हणणे शुद्ध वेडेपणा ठरेल. पण, संतप्त हतबलतेला उत्तर शोधण्याचा एक मार्ग म्हणजे हे गाणे असे मात्र नक्कीच म्हणता येऊ शकेल. निवडणुकीच्या राजकारणात साहित्यिक, कवी यांचा सक्रिय सहभागही गेल्या कित्येक वर्षांत पहिल्यांदाच असा प्रखर-उघडपणे आला, हेही महत्त्वाचे!
कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा पद्धतीने साहित्यिक, कलावंत, विचारवंत, शास्त्रज्ञ यांनी त्यांच्या परीने बंगालमध्ये वातावरण बदलवण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी मदत केली!... ही ताकद भाजपच्या लक्षात आली नाही. किंबहुना अशी काही ताकद उभी राहू शकते हेच त्यांनी गृहीत धरले नव्हते. त्यांच्या पराभवाची जी काही अनेक कारणे असतील त्यात हा मोठा वर्ग दुर्लक्षित करणे हेदेखील एक कारण आहे.
देशभरातील लेखक, कलावंत, पत्रकार, साहित्यिक, खेळाडू, शास्त्रज्ञ यांना “या असल्या वातावरणात आपण काय करू शकतो?” म्हणून जो हताशपणा आला आहे, त्याला या गाण्याने उत्तर दिले आहे, हे नक्की!
(वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत)
atul.kulkarni@lokmat.com