मराठी अस्मिता: भाषिक, साहित्यिक की…
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2021 05:33 PM2021-12-05T17:33:24+5:302021-12-05T17:35:02+5:30
साहित्य आणि भाषा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत याचं भान हरपतं यातूनच आपण भाषेवद्दल कितपत सजग आणि गंभीर असतो हे दिसून येतं.
- चिन्मय धारुरकर
दरवर्षी वाजतगाजत साहित्य संमेलन साजरं होतं. संमेलनावरचा अवाढव्य खर्च, त्यामधील राजकारण, त्याभोवतीचे वाद याचा मराठी भाषेशी नेमका काय संबंध आहे? संमेलनाला इतकं वलय का प्राप्त झालं आहे हे समजून घेताना काही मुद्द्यांचा विचार मुळातून करावा लागतो.
भाषेचं क्षेत्र साहित्याहून विस्तृत व व्यापक आहे. त्या व्यापक पटावर साहित्य हा भाषेचा एक विशेष वापर ठरतो. तरीही साहित्य संमेलन म्हणजे मराठी भाषेविषयीचं काहीतरी असतं असा सरसकट समज होऊन बसला आहे. साहित्य म्हणजेच ‘भाषा’ हे समीकरण समाजात रूढ आहे. साहित्य आणि भाषा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत याचं भान हरपतं यातूनच आपण भाषेवद्दल कितपत सजग आणि गंभीर असतो हे दिसून येतं. विद्यापीठांमध्येही हे भान विरळाच. राज्यभरात विद्यापीठांमधील कथित मराठी भाषा विभाग हे खरंतर मराठी साहित्य विभाग आहेत. तिथं भाषेविषयी संशोधन करणारे अपवादात्मक. त्यामुळे भाषा-अध्ययन म्हणजे साहित्याचा अभ्यास नव्हे, त्यासाठी वेगळ्या स्वरूपाचे प्रयत्न लागतील. साहित्यातून भाषेची अभिवृद्धी होते हे एका मर्यादित अर्थानेच खरं आहे. भाषेचा संसार हा साहित्याच्या संसाराहून अधिक व्यापक आणि वेगळा असतो. हे भान नसल्यानेच मराठी साहित्याच्या जत्रेतच जाता जाता भाषेचा उदो उदोही केला जातो.
पण मुळात साहित्य-सम्मेलनाचा हा जो विराट उत्सव केला जातो तो का आणि त्याच्यापाठीशी इतकं राजकारण उभं राहतं ते का हे प्रश्न आहेत. कारण वर पाहिलं तसं भाषेबद्दलचा आपला आग्रह आणि भान हे दोन्ही अगदी बेताचेच आहेत मग साहित्याचा एवढा मोठा उत्सव का आणि कशासाठी? हे प्रश्न साहित्याचे किंवा भाषेचे नसून सामाजिकतेचे, समाजशास्त्रीय प्रश्न आहेत आणि याचं एक उत्तर आहे – मराठी समाजात बोकाळलेली पोकळ उत्सवप्रियता. गणेश उत्सवातून जी उत्सवप्रियतेची पायरी गाठली जाते त्याहून वेगळी काही या साहित्यजत्रेतून घडताना दिसत नाही. मराठी साहित्यात घडणारे प्रयोग, त्यातली प्रयोगशीलता, त्यातले नवे प्रवाह, त्यातली बंडखोरी या वा अशा प्रकारे या अभिरुचीला दिशा देण्याचं, त्यावर मार्मिक भाष्य करण्याचं सामर्थ्य साहित्यसम्मेलन गमावून बसलं आहे. याचं कारण साहित्य सम्मेलनाचं झालेलं पुरेपूर राजकीयीकरण.
हे का घडलं असावं तर - एकेकाळी मराठी साहित्याने त्याच्या प्रयोगशीलतेतून एक चांगलं सांस्कृतिक भांडवल उभं केलं. यावर आपला हक्क सांगितला की आयताच आपला रूबाब वाढतो आणि मराठीपणाचे खरे शिलेदार आपणच हे म्हणवून घेता येतं. साहित्यसम्मेलनागणीक मराठी साहित्यसम्मेलनांनी मराठी समाजाच्या कोतेपणाचं दर्शन गेल्या दशकभरात घडवलं आहे. मग त्यात आनंद यादवांच्यावेळेस विना अध्यक्षांचं झालेलं सम्मेलन असो, नयनतारा सेहगलांना झालेला विरोध असो किंवा अलीकडेच अमराठी आणि मराठी साहित्याशी थेट संबंध नसलेल्या व्यक्तींनी प्रमुख अतिथिपद भूषवावं की नाही यावर उमटलेल्या प्रतिक्रिया असोत अशा एक ना अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे ती सम्मेलनं चालू द्या तिकडे, आम्ही आमची अभिरुची आणि प्रामाणिक साहित्यप्रेम आमचं आमचं जोपासतो – असंच साहित्यरसिक आणि साहित्याचे अभ्यासक म्हणत आहेत. मराठीपणाच्या समावेशक, पुरोगामी, प्रयोगशील साहित्यावकाशाशी या साहित्यसम्मेलनांचा काही एक संबंध नाही हे वाटणंही आता जुनं झालं आहे. आंधळी उत्सवप्रियता असल्याशिवाय हे साध्य होणं अवघड आहे, मराठी साहित्य जत्रेच्या वार्षिक उपक्रमाला हे साध्य झालेलं आहेच.
आधुनिक मराठी समाजात भाषा आणि साहित्य या दोन्हीबाबतची सजगता बेताचीच आहे. त्यातही साहित्याचा नंबर वरचा लागेल आणि मग लागलाच तर भाषेचा. साठच्या दशकातील दलित साहित्य आणि लघु-अनियतकालिकांच्या चळवळीमुळे मराठी साहित्यात आधुनिकतेचे, प्रयोगशीलतेचे वारे वाहिले आणि त्यातून इतर भारतीय प्रदेशांतील साहित्यसंस्कृती प्रेरित झाल्या. हे नावीन्य जसं साहित्यात उमटलं तसं साहित्यिक-भाषा, साहित्याची साहित्यिकता यामाध्यमातून साहित्यिकभाषेची अभिरुची बदलली. हे जेव्हा मराठी साहित्यविश्वात घडत होतं तेव्हा तमिळनाडूत विसंस्कृतीकरणाचे, द्रविडीकरणाचे भाषिक-क्रांतीचे वारे पेरियारांच्या नेतृत्वाखाली वाहत होते. थोडक्यात मराठीविश्वात साहित्य ढवळून निघत होतं तर तमिळ नाडूत भाषा. इथे हे लक्षात घ्यायला हवं की भारतातील प्रत्येक प्रादेशिकतेत – एथ्निसिटीत (मराठीत आपण रेस आणि एथ्निसिटी या दोन्ही इंग्रजी शब्दांसाठी वंश हाच शब्द वापरतो, त्यामुळे गल्लत होऊ नये म्हणून एथ्निसिटी वापरत आहे) – तिचे व्यवच्छेदक गुणविशेष काय आहेत, ती अस्मिता कशाच्या आधारावर उभी राहते हे पाहणं उद्बोधक ठरतं. मराठीच्या तुलनेत बंगाली किंवा तमिळ या प्रामुख्याने भाषिक अस्मिता आहेत आणि त्यांचे इतर सांस्कृतिक आयाम (साहित्य, खाद्यपदार्थ, संगीत इत्यादी) भाषेच्या नंतर येतात. मराठी, गुजराती, ओडिया, पंजाबी, मल्याळम यांच्या घडणीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी प्रामुख्याने त्यांची अस्मिता अधोरेखित करताना पुढे सरसावतात आणि भाषा मागाहून आपली ओळख सांगते. तमिळ माणसाच्या एथ्निक अस्मितेमध्ये आपल्या तमिळमोऴीशी (तमिळ-भाषेशी) एक घट्ट असं भावनिक नातं प्राधान्याने येतं तर एखादा मल्याळी हा आधी आपली बांधिलकी भूप्रदेशाशी सांगतो मग बरंच नंतर भाषेशी. त्यामुळेच तमिळनाडूत हिन्दीविरोधाचा जसा जहाल इतिहास आहे तसा केरळमध्ये नाही. केरळमध्ये लोकांना हिंदी येत जरी नसलं तरी त्यांना ती यावी असं वाटतं आणि मोठ्या अप्रूपाने ते हिंदीकडे बघतात. मग मराठीजनांच्या बाबतीत आपली एथ्निक अस्मिता सांगताना प्राधान्याने कोणत्या गोष्टी येतात तर – शिवाजी, विट्ठल आणि गणपती! साहित्य आणि भाषा यांचा नंबर कधी लागतो हे सांगणं सोपं नसलं तरी पहिल्या काहींमध्ये लागत नाही, हे नक्की.
महाराष्ट्रात साहित्यसम्मेलन आणि भाषा या दोन्हीचंही राजकारण झालेलं आहे, होत आहे. यातून काही गटांना आपणच कसे मराठी-संस्कृतीचे खरे पाईक, शिलेदार आहोत हे दाखवायला ही दोन सोपी माध्यमं झालेली आहेत. मुळात याबद्दल समाजात जागरूकता आणि एकूण भान थोडकं त्यामुळे कोणी अभिनिवेशाने म्हणत असेल तर तो खरंच म्हणत असेल असं एखाद्या जनसामान्याला वाटावं अशी तर आपली परिस्थिती. वर म्हंटल्याप्रमाणे जाणकार आणि दर्दी ‘आच्छा आलं का सम्मेलन आणि झालं का सम्मेलन’ इतपतंच उत्साह दाखवत त्याबाबतीत उदासीन झालेले आहेत. साहित्यसम्मेलन हेच एक कर्मकांड झालेलं आणि त्याकडून आता कसलीच आशा राहिलेली नाही. या कर्मकांडाचा एक हुकमी भाग म्हणजे बेळगाव प्रश्नावर ठराव संमत करणं, हा. कोणाचा कशाला विरोध असेल याला, पण हे करायचं. का तर त्यातून आपली अस्मिता कशी तीक्ष्ण आहे, आपल्याला भाषा-प्रदेशाची कशी कळकळ आहे हे फार काही न करता सहज दाखवता येतं म्हणून. मुळात आजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात भाषा, साहित्य यांच्या वापरावर, या आंतरजालीय व्यासपीठांवर भाषेचा विस्तार करण्याबद्दल ऊहापोह व्हायला हवा पण अजूनही ‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ याच्या भूप्रादेशिक अर्थातच रमलेले इतिहासाकडेच डोळे लावून बसलेले आहेत. मराठीचा आधुनिक वर्तमानकाळ हा तिच्या वापराच्या विस्तारासाठी अनुकूल आहे. ज्ञानभाषा म्हणून सिद्ध होण्यासाठी भाषांतरं, परिभाषा-निर्मिती, कोशनिर्मिती अशी आव्हानं समोर असताना इतिहासाकडे डोळे लावून बसणारे अभिजात दर्जा पदरी पाडून घेण्यातच धन्यता मानत अहेत - याला उथळ सांस्कृतिक राष्ट्रवाद यापलीकडे काही म्हणवत नाही.