फायद्याच्या सरकारी योजना कोणत्या? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 01:20 PM2023-01-29T13:20:16+5:302023-01-29T13:20:45+5:30
Government Schemes: केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी अनेक सामाजिक सुरक्षा योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. आपल्या फायद्याच्या योजना नेमक्या कोणत्या ते पाहू...
- चंद्रकांत दडस, उपसंपादक
केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी अनेक सामाजिक सुरक्षा योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. आपल्या फायद्याच्या योजना नेमक्या कोणत्या ते पाहू...
प्रधानमंत्री वय वंदना योजना
प्रधानमंत्री वय वंदना योजना ही ज्येष्ठ गुंतवणूकदारांसाठी आहे. विमा कंपनी एलआयसी आणि केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी ही योजना ६० वर्षे ओलांडलेल्या नागरिकांसाठी आहे. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मासिक पेन्शनची हमी मिळते. या योजनेवर व्याज दरवर्षी ७.४० टक्के निश्चित करण्यात आले आहे. जर पती- पत्नी दोघांनी या योजनेत प्रत्येकी १५ लाख रुपये गुंतवले, तर त्यांना निश्चित व्याजदराने ३० लाख रुपयांवर वर्षाला २ लाख २२ हजार रुपये व्याज मिळेल. या आधारावर दरमहा १८ हजार ५०० रुपयांची मासिक पेन्शन त्यांना मिळेल. योजनेची सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे १० वर्षांनंतर गुंतवणूकदाराला गुंतवणूकीची संपूर्ण रक्कम परत मिळते.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा
भारत सरकारची सामान्य लोकांना जीवन संरक्षण देण्यासाठी ही एक उत्तम योजना आहे. तुम्ही वर्षाला फक्त ४३६ रुपये भरून ही योजना घेऊ शकता. ही योजना विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला २ लाखांपर्यंतची आर्थिक मदत देते. ही पॉलिसी खरेदी करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची वैद्यकीय चाचणी घेण्याची आवश्यकता नाही. पॉलिसीच्या संमतीपत्रात काही विशेष आजार असल्यास उल्लेख करावा लागेल. या पॉलिसीचे दरवर्षी नूतनीकरण करणे आवश्यक आहे. पॉलिसी खरेदी करण्याचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ५५ वर्षे निश्चित केले आहे. जर तुम्ही ही पॉलिसी घेण्याचे ठरवले असेल, तर तुमचे बँक खाते असणे आवश्यक आहे. तुमचे बँक खाते आधारशी जोडलेले असावे.
अटल पेन्शन योजना
अटल पेन्शन योजना ही एक सामाजिक सुरक्षा योजना आहे जी असंघटित क्षेत्रातील कामगारांचे भविष्य सुरक्षित करते. या योजनेंतर्गत, वयाच्या ६० वर्षांनंतर, सदस्याला महिन्याला १ हजार ते ५ हजार रुपये पेन्शन दिली जाते. पेन्शनची रक्कम या योजनेत जमा केलेल्या रकमेवर अवलंबून असते. सदस्याचा मृत्यू झाल्यास, योजनेतील नॉमिनी असलेली व्यक्ती जमा केलेल्या रकमेवर किंवा पेन्शनच्या रकमेवर दावा करण्यास पात्र आहे.