..अब क्या करनेका?
By Admin | Published: March 12, 2016 03:27 PM2016-03-12T15:27:36+5:302016-03-12T15:27:36+5:30
घर चालवायला पैसा, त्यासाठी काम हवे म्हणून मुंबईची वाट धरलेल्या कितीतरी तरुण मुली दहा-बारा वर्षापूर्वी एका छमछमत्या रंगील्या जगात ओढल्या गेल्या. एका रात्रीत हजारोंची कमाई करून देणारे डान्स बार्स! चैन, चटक आणि चंगळ या नादात सारे सुटले, जगणो आणि भानही!
- स्नेहा मोरे मनीषा म्हात्रे
घर चालवायला पैसा, त्यासाठी काम हवे म्हणून मुंबईची वाट धरलेल्या कितीतरी तरुण मुली दहा-बारा वर्षापूर्वी एका छमछमत्या रंगील्या जगात ओढल्या गेल्या. एका रात्रीत हजारोंची कमाई करून देणारे डान्स बार्स! चैन, चटक आणि चंगळ या नादात सारे सुटले, जगणो आणि भानही! 2005 साली संस्कार, संस्कृती आणि नैतिकतेच्या मुद्दय़ावरून डान्स बारवर बंदी आली आणि या बारडान्सर्सचे
आयुष्य वा:यावर उधळले गेले. कुठे होत्या या मुली गेल्या दहा वर्षात?
- त्यांच्यातल्या काहींना भेटून शोधलेले हे तुकडे!
आधीचे दारिद्रय़, कुचंबणा. मग अचानक वावटळ यावी तशी शरीरभर उधळलेली कचकडय़ाची समृद्धी आणि अखेरीस उद्ध्वस्तता! - डान्सबारच्या दारांवर पुन्हा टकटक होऊ लागलेली असताना महाराष्ट्रातील एका (अ) सांस्कृतिक दशकाचे नाटक.
रेश्मा
रेश्मा मूळची मध्य प्रदेशातल्या ग्वालियरची. लहानपणापासून नाचण्याची आवड होती. अनेकदा टीव्हीवरील गाण्यांवर ठुमका देत असताना वडिलांचा मार पडला. बडे होके बारमें नाचने का है क्या? - ही बोलणी तर रोजचीच. त्यात परिस्थिती हलाखीची. त्यामुळे शाळा दुसरीतच सुटली. कोवळे हात आईवडिलांसोबत मजुरी करण्यात गुंतले. वयाच्या 15 व्या वर्षी वडिलांपाठोपाठ आईच्या मायेचा पदरही निसटला. घरात एकटय़ा असलेल्या रेश्मावर अनेकांची वाईट नजर पडली. त्यातून सुटण्याचा मार्ग दिसला : मुंबई.
मुंबईत डान्सर म्हणून काम करणा:या तीन मैत्रिणींचे तिला पहिल्यापासून कुतूहल होते. त्यांच्या आधाराने रेश्मा मुंबईत आली तेव्हा 15 वर्षाची होती. मुंबईच्या चंदेरी भावविश्वात रमण्यापूर्वीच चहुबाजूंनी हातात दारूचे प्याले घेतलेले वास्तव तिच्याभोवती उभे राहिले. सोबत ताल धरणा:या मैत्रिणी म्हणाल्या, ‘जितना ज्यादा ठुमका लगायेंगी. उतना कमायेंगी’.
हळूहळू सगळे उमगले तोवर ती डान्सबारच्या जगात पोचली होती. आपल्याला हवी होती ती नाचण्याची संधी ‘ही’ नव्हे, हे कळून आता उपयोग नव्हता. तिने जमवून घेतले आणि बघता बघता तिला ती सेक्सी ओळख मिळाली : बार डान्सर!
सुरुवातीला या शब्दांचा साधा अर्थही तिला माहीत नव्हता. पण इतरांसाठी संस्कृतिहननाची वाट असणारा हा नादान मार्गच तिच्या एकटय़ा दुनियेचा आधार होता. अनेकदा बारवर छापे पडले. तेव्हा मदतीसाठी येणारा पोलीसही बार मालकांनाच मिळालेला दिसला. गावातल्या विकृतीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी स्वप्नांची शिदोरी घेऊन तिने मुंबई गाठली होती, मात्र इथे तर स्वप्न म्हणजे काय हेच ती विसरून गेली. डान्स बारच्या झगमगत्या छमछममध्ये तिने स्वत:ला हरवून घेतले. दिवसाला हजारोंची उधळण होती. त्यामुळे तिच्या अपेक्षाही वाढत गेल्या. त्यानंतर मागे बघायचे नाही असे ठरवले. त्या वेगळ्या जगाची धुंदी होतीच. ती कशी सुटणार त्या मोहातून?
दरम्यान तिला प्रेमाचा भास झाला. आणि ते प्रेम फक्त शरीरावरच आहे, हे कळून लगोलगचा स्वप्नभंगही!
अशात डान्स बारवरील बंदीने तिचे आयुष्य पुन्हा विस्कटले. रेश्मा पुन्हा रस्त्यावर आली. रोजची मिळकत बंद झाल्यावर मैत्रिणींनी घराबाहेर काढले.
- पुन्हा परतीची वाट धरण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता. पण घरी परतलेल्या रेश्माला गावाने बोचून खाल्ले. ती ‘तिकडे’ होती, ही माहिती असलेला जो-तो अपेक्षा धरून. नोकरीचा प्रयत्न करावा, तर दुसरी पास मुलीला कोण भीक घालणार? कोणी उभे केले नाही. त्यात जास्तीच्या पैशांची सवय झालेली. चैनीची चटक. धुणीभांडी करून घर चालवणो जमायला ती आता जुन्या सिनेमातली नायिका राहिली नव्हती. आईवडिलांची लाडली एका पाय घसरलेल्या चंदेरी दुनियेतील चांदणी झाली होती.
सहा महिने गावी राहिल्यानंतर ती पुन्हा मुंबईत दाखल झाली. आता ती फक्त डान्स बार गर्ल राहिली नव्हती. एकतर बारवर बंदी आलेली. त्यामुळे जुन्या बार मालकाच्या ओळखीने लपून छपून काम मिळवण्यावाचून पर्याय नव्हता. सगळेच बेकायदेशीर, त्यामुळे त्या ‘सुरक्षे’ची किंमतही भक्कम. या लपाछपीला वैतागलेल्या रेश्माला शेवटी शरीरविक्रयाच्या बेलगाम दुनियेने जवळ केले.
ऐशारामाचे जगणो चालू ठेवणो हीच एक गरज होऊन बसली होती. अनेकांसोबत झोपणो, त्यांच्या घाणोरडय़ा शिव्या ऐकणो आणि लपून छपून डान्स बारमध्ये आपल्या छमछमने सर्वाना मोहित करणो हाच तिचा दिनक्रम झाला.
कधी कधी रात्रीचे हे जग नकोसे वाटे, पण पर्याय नव्हता आणि पुन्हा मागे जायचे तर रस्ते कधीचे बंद झालेले.
चूक झाली, पण ती माङया एकटीची कशी? - असा आता रेश्माचा प्रश्न आहे. जेव्हा शिकायचे होते तेव्हा घरच्यांनी कामात जुंपले. घरात नृत्याचा छंद जोपासत असताना वडिलांकडून लाथाबुक्क्यांचा मार पडला. दोघांनीही साथ सोडली तेव्हा समाजाच्या विकृतीचा सामना करावा लागला. शेवटी अपरिहार्यतेच्या जबरदस्तीपोटी कुणाचा बळी ठरण्यापेक्षा आपण स्वत:च या जगात का उडी मारू नये, असा हिशेब मांडला.
बारमध्ये डान्स करणो चुकीचे नव्हते. मात्र बंदीमुळे डान्स बारमधली नाचरी वाट वेश्याव्यवसायाकडे कधी घेऊन गेली, हे कळलेही नाही.
आता ते उमगते आहे, पण त्याचा उपयोग काय? इतरांप्रमाणो आपलेही घर-संसार असावा असे नेहमी वाटते. पण तिथवर जाणारी पायाखालची वाट हरवलीच आहे आता. लग्न न करण्याचा निर्णय परिस्थितीनेच तिच्या पुढय़ात टाकला.
रेश्मा सध्या मुलुंडला एका चाळीत भाडय़ाच्या खोलीत राहते. आता जगासमोर येण्याची तिची इच्छा उरलेली नाही.
रुखूटुकू जिंदगी सुरू असताना आता पुन्हा डान्स बार सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण रेश्मासाठी तीही वेळ आता गेली आहे. वय उलटले आहे. शिवाय आता बेलगाम आयुष्याची इतकी सवय झाल्यावर नियम-अटींमध्ये कोण बांधून घेणार?
फरिदा
याच्या तिस:या वर्षी वडिलांचे निधन झाले. सावत्र वडिलांचा हात धरत ती शाळेची पायरी चढली. पाचवीत असताना आई शेजारी राहणा:या परपुरुषासोबत निघून गेली. अशात वयात येत असताना सावत्र वडिलांच्या वासनेची बळी ठरणार तोच ती घर सोडून बाहेर पडली. 14 वर्षाची असताना बार डान्सर मैत्रिणीचा तिने आधार घेतला. याच मैत्रीच्या वाटेवर तिने डान्समध्ये ताल धरला. रोजच्या रोज मिळत असलेल्या कमाईतून मैत्रिणीकडून तीनशे रुपये हाती पडत होते. मात्र तेही तिच्यासाठी खूप होते. त्यानंतर डान्स बारच्या वातावरणाची तिला जाणीव झाली. वर्षभरातच मैत्रिणीची साथ सोडून पैशांच्या हौसेपोटी तिने स्वतंत्र डान्स बारमध्ये नाचण्याचा निर्णय घेतला. ओळखीने बार बदलला. दिवसाला हजारोंच्या नोटा तिच्या हाती पडायला लागल्या. यातूनच तिची लाइफस्टाइल बदलली. पुन्हा भूतकाळात न जाण्याचे ठरवित तिने यातच स्वत:ला हरवून घेतले होते. दरम्यान, दहा वर्षापूर्वी डान्स बारवरील बंदीमुळे ती थांबली. पुढे काय? - असा प्रश्न आ वासून उभा असताना सुरुवातीचे काही दिवस जमा केलेल्या पैशांवर उदरनिर्वाह केला. घरी गेली तरी सावत्र बाप स्वीकारणार नाही, तर पैशांच्या मोहापायी मैत्रिणीलाही सोडले. अशात तिने यातून बाहेर पडून नवीन आयुष्य जगण्याचे ठरवले. त्यासाठी काकांचा आधार घेतला. काकानेही मायेने जवळ केले. दरम्यानच्या काळात तिचा विवाह ठरला. तिनेही लग्नाचे स्वप्न रंगवले. साखरपुडय़ाच्या आदल्या दिवशीच ती बार गर्ल असल्याची माहिती सासरच्या मंडळींना समजल्याने साखरपुडा मोडण्यात आला. मात्र स्वत:ची ओळख सांगून लग्नाच्या बेडीत अडकणो शक्य नव्हते. अशा रीतीने तब्बल तीन मागण्या मोडल्या. अखेर चौथ्यांदा जुळलेल्या लग्नावेळी तिने आपल्या भूतकाळाची माहिती मुलाला दिली. मात्र सुरुवातीला तिला समजून घेण्याचे सोंग आणणा:या मुलाने तिला जवळ केले. तिच्या मनात प्रेमाची भाषा रुजवली. दरम्यान, मनाबरोबर शरीरानेही ते एकत्र आले. मात्र लग्नाच्या बेडीत अडकण्याचे स्वप्न दाखवून अखेर कुटुंबीय नकार देत असल्याचे कारण सांगून तोही निघून गेला. स्वत:ला बदलण्यासाठी घेतलेला पुढाकार समाजाने नाकारला. काकांनी बदनामीच्या भीतीने तिला घराबाहेर काढले.
अशात सारे मार्ग बंद झाल्याने तिने वेश्याव्यवसायात प्रवेश केला. त्यामुळे डान्स बारवरील बंदी उठली, तरी आयुष्याची बंद झालेली घडी कोण उठवणार?
डान्स बारगर्लपासून सुरू केलेला प्रवास कॉलगर्लपर्यंत येऊन ठेपेल असे तिला वाटले नव्हते.
मात्र हेच सत्य आहे व ते स्वीकारण्याशिवाय पर्याय नसल्याचे फरिदाचे म्हणणो आहे.
हीना
छ नही रहा जिंदगी में, अब सिर्फ बची कुची जिंदगी काटनी है’ असं म्हणत ती गेली कैक र्वष मरणाची वाट पाहतेय. ती नाव सांगते हीना. खरं की खोटं, कोण जाणो? मध्य प्रदेशहून जवळपास 27 वर्षापूर्वी काम करायचं, मोठ्ठं नाव कमवायचं हे स्वप्न घेऊन तिने मुंबई गाठली. आणि मग मुंबईत आल्यावर फुटपाथवर राहण्याला पर्याय नव्हता. पोटापाण्यासाठी काम शोधायला सुरुवात केली. निदान एकवेळची भूक भागवता यावी म्हणून छोटी-छोटी कामं करायला सुरुवात केली. आणि आपण खूप काही मिळवलं असं वाटू लागलं.
त्यानंतर मग दिवसामागून दिवस चालले होते.
‘साला.. मुंबयै कम पैसो में जीने नहीं देती. दिन-रात जरुरते हद से ज्यादा बढती ही रहती है.’ - हे असलंच बोलते हीना. याच विचाराने दहा-अकरा वर्षापूर्वी पहिल्यांदा डान्स बारची पायरी चढली होती. तिथून आयुष्याला भिंगरीच लागली तिच्या. दिवस उजाडला की रात्रीची वाट पाहणं सुरू झालं.
हीनाने सुरुवातीला रे-रोडच्या एका डान्स बारमध्ये काम करायला सुरुवात केली. वय उमेदीचं होतं, त्यामुळे फार कमी वेळात चांगले पैसे मिळू लागले. मग चेंबूरमध्ये हक्काच्या चार भिंती, गाडी आणि पार्लर, हॉटेल्सचं खाणं-पिणं, मोबाइल्स, फॅशनेबल कपडे अशी चैन सुरू झाली.
ऐशारामात अक्षरश: स्वप्नवत सुरू असलेल्या हीनाच्या आयुष्याला डान्स बार बंदीच्या निर्णयामुळे ‘ब्रेक’ लागला. आणि सगळंच थांबलं. ‘जिनको डान्स बार से लेना देना नहीं था, उनको इससे कुछ फर्क नहीं पडा’ - ती सांगते. या इतरांसाठी एक सांस्कृतिक स्वच्छता झाली होती. पण हीनासारख्या असंख्य बारगल्र्सवर आकाश कोसळलं. डान्स बार बंदीनंतर कैक दिवस-महिने हा निर्णय पचविण्यात गेले. निराशेच्या गर्तेत बरीच व्यसनंही लागली. पण मग एका पॉइंटला हातातले पैसे संपल्याचं जाणवायला लागलं तेव्हा मग आता चोरी करावी, कोणाला तरी लुटावं असंही वाटून गेलं. पण अम्मीने केलेले थोडे जुने संस्कार शिल्लक होते. ‘खुद के पसीने की रोटी मेंही निंद मिलेगी’. वगैरे.
कुठेतरी छोटं-मोठं काम मिळावं म्हणून प्रयत्नही केले. पण ही बारगर्ल म्हणून ब:या, प्रतिष्ठेच्या कामासाठी कुणी हिच्यावर विश्वास टाकायला तयार होईना. त्यात चैनीत राहायची सवय झालेली. त्या चौकटीत कधीच स्वत:ला ‘मोल्ड’ करता आलं नाही. गाजावाजा करीत डान्स बार बंदीचा निर्णय अंमलात आल्यावरही छुप्या पद्धतीने डान्स बार सुरू असल्याचं माहीत होतं. ‘वहा अपना सिक्का चला के देखते है’ असं म्हणत हीना 5-6 डान्स बारमध्ये जाऊन आली. पण तिकडची परिस्थिती कठीण होती. कमी पैसे, कधीही पडणारी धाड आणि कामाचा कमी झालेला दर्जा यामुळे तो मार्ग नाकारला.
बरीच र्वष तणावाखाली होती. दिवसा तर घरातून बाहेरही पडत नसे. स्वत:ची भीती वाटायला लागली होती. एक-दोनदा स्वत:ला संपवण्याचाही प्रयत्न केला, पण जमलं नाही. शेवटी कुठून कसं कोण जाणो, तिची ही अवस्था मध्य प्रदेशमध्ये राहणा:या कुटुंबाला कळली. अम्मी-अब्बा तडक मुंबईत आले. जबरदस्ती मध्य प्रदेशला नेलं. खूप विरोध केला त्यावेळी, पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
गावी गेल्यानंतर हीनाचं घराबाहेर पडणं बंद झालं. 6-7 महिने केवळ चार भिंतीत काढले. खाणं-पिणं सोडलं पण काही केल्या मरण येईना. सगळाच विस्कोट झालेला.
मनस्ताप सहन होईना म्हणून मग घरच्यांच्या नकळत जिद्दीने हीना पुन्हा मुंबईत आली. चेंबूरचं घर भाडय़ाने दिलं. त्या तुटपुंज्या भाडय़ावर गुजारा होतोय.
डान्स बार सुटला, आता मरण येईर्पयत ज्या घराच्या भाडय़ावर जीव जगवायचा, ते घरही डान्स बारमधल्या कमाईचंच आहे, हे मात्र हीना कृतज्ञपणो सांगते.
शाहिना
जाबच्या भटिंडामध्ये कित्येक एकर शेती असलेल्या सधन शेतक:याची मुलगी शाहिना. चित्रपटाच्या वेडाने मुंबईला पळून आली, त्यानंतर बारबाला बनली आणि रात्रीच्या मुंबईवर राज्य केलं. कित्येक प्रेमी मिळाले. अनेकांनी तिच्यावर आयुष्याची कमाई उधळली. पंजाबी बांधा, गोरा रंग आणि यामुळे अनेक जण तिच्या सहवासासाठी पागल होते. डान्स बारवर बंदी आली तेव्हा फिल्म इंडस्ट्रीमधल्या एका माणसाबरोबर ती सहजीवनाची स्वप्नं पाहत होती. - पण बारमागोमाग त्या स्वप्नाचेही दरवाजे एकाएकी बंद झाले. शाहिनाचा तोल ढळला. आजारपण ओढवलं. नाइलाज होता. ती घरी परत गेली, पण रमली नाही तिथे. मुंबईतल्या जगण्याची चव तिच्या जिभेवरून उतरायला तयार नव्हती ना!
एके दिवशी अचानक शाहिना पंजाबमधून गायब झाली आणि मुंबईत परत आली. एकेकाळी पैशांच्या राशीवर लोळण्याची सवय होती. तंगीचा सामना करता येईना. मग निराशेच्या आहारी जाऊन चो:यामा:या केल्या. अगदी शेजा:यांच्या मुलांचे बूट चोरण्यापासून दुधाच्या पिशव्याही चोरल्या. ..मग काहीतरी काम शोधायला सुरुवात केली. पण आजारपणामुळे काहीच शक्य होत नव्हतं. मग वडिलांकडून पैसे उधार घेऊन आजारपणाचं भागवलं. दीड-एक वर्ष त्यात गेलं. मग बापाने पैसे पाठवायला नकार दिला. मागोमाग घर तुटलं. काही पर्यायच उरला नाही तेव्हा गोवंडीतल्या छोटय़ा हॉटेलमध्ये वेटरचं काम स्वीकारलं. मग अगदी घरकाम, धुण्या-भांडय़ाची कामंही केली. शाहिना तशी स्वभावाने झुंजार. डान्स बार पीडित तरुणींसाठी चालविलेल्या चळवळीत ती आपसूकच ओढली गेली. मग समदु:खी मुली आणि महिलांशी ओळख झाल्यावर स्वत:चं दु:ख हलकं झाल्यासारखं वाटलं. - अजूनही ती चळवळीत काम करते आहे. डान्स बार बंदीबद्दलच्या उलटसुलट शक्यतांचा विषय काढला, तर आता तिला बोलावंसं वाटत नाही. ती म्हणते, अब क्या करनेका?(लेखिका लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक, वार्ताहर आहेत)