कोपर्डी का घडले
By admin | Published: July 30, 2016 02:42 PM2016-07-30T14:42:34+5:302016-07-30T14:42:34+5:30
जगण्यासाठी खेडी सुरक्षित असतात, हा भ्रमाचा भोपळा कोपर्डी येथील घटनेने (पुन्हा एकवार) फोडला. खेड्यांमध्येही आता किती दहशत आहे, माणसे बोलायला घाबरतात हे कोपर्डीत दिसले. इतर गावातले चित्रही वेगळे नाही. गावांचा सामाजिक दबाव व एकी संपली, आदराची स्थाने लुप्त झाली, चावडीचा दरारा गेला, दारूचा अड्डाच चावडीवर आला. मटक्याची टपरी, अवैध दारू, जुगाराचे अड्डे हे गावांचे नवे चित्र आहे. बेदरकार हिंसेची हिंमत येते आहे ती या बदलांमधूनच...
- सुधीर लंके
कोपर्डीत पीडित व आरोपी यांची जात शोधण्याचा प्रयत्न झाला. कोणाला कोपर्डीत येऊ द्यायचे व कोणाला रोखायचे, असा जातीचा हिशेबही जुळवला गेला. बलात्काराच्या घटनेनंतर कोपर्डीत दिसणारी गर्दी आता हळूहळू पांगायला लागली आहे. राजकारणही हळूहळू शमेल. माणसे आता विसराळू झाली आहेत. मेमरी कार्डांचा हा जमाना. त्यामुळे एखादी घटना मेंदूत साठवून ठेवण्याची गरज उरलेली नाही. हळूहळू ही घटनाही विस्मरणात जाईल. पण, एक प्रश्न कायम राहील, कोपर्डीत हे का घडले? कोपर्डीच नाही कुठल्याही खेड्यात अत्याचार व गुन्हेगार कोठून जन्मायला लागले? याची उत्तरे आता खेड्यांना, राज्यकर्त्यांना व संघटनांनाही शोधावी लागतील. अशा आरोपींना रोखण्यासाठी सरकार कितपत भूमिका बजावेल याबाबत साशंकता आहे. ‘मुलींना आम्ही कराटेचे प्रशिक्षण देऊ, कुटुंबाला शस्त्र परवाना देऊ’ असे मुख्यमंत्री म्हणाले.
पण, त्यांच्यावर हल्लाच होणार नाही, अशी परिस्थिती आपण का तयार करू शकत नाही?