तुमची पहिली आठवण कोणती? आहे लक्षात?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 07:56 AM2023-01-26T07:56:18+5:302023-01-26T07:56:34+5:30

तुमची सर्वात जुनी आठवण कोणती? पहिली-दुसरीतली? की त्याच्याही आधीची? बालवाडीच्या वयाची?  

What is your first memory Remember | तुमची पहिली आठवण कोणती? आहे लक्षात?

तुमची पहिली आठवण कोणती? आहे लक्षात?

googlenewsNext

तुमची सर्वात जुनी आठवण कोणती? पहिली-दुसरीतली? की त्याच्याही आधीची? बालवाडीच्या वयाची?  की मग चौथी-पाचवीतली? जरा उशिराची?.. 
आधी वाटेल की पाचवीतली आठवण माझी सगळ्यात पहिली आठवण आहे. तीच पहिली आठवण असं समजून आपण तिथेच थांबू. पण शोधत राहिलं तर सापडेल, की नाही, मला धाकटी बहीण झाली, तेव्हा बाबांचं बोट धरून मी आईला भेटायला आले होते. तेव्हा मी किती वर्षांची होते? आमच्यातलं अंतर साडेचार वर्षांचं. म्हणजे माझी पाहिली आठवण साडेचार वर्षांच्या वयाची आहे. ती आठवण, तिथला हॉस्पिटलमधला वास हे सगळं आठवतं. 

मग असाच कधीतरी चुकून आठवतो, बालवाडीचा वर्ग. मुलांचा गोंधळ आणि त्यात हरवलेले आपण. कधीतरी आठवतं, कशासाठी तरी खूप केलेला हट्ट आणि बसलेला फटका. रडूच रडू आणि भोकाड.  पण तेव्हा वय किती होतं? किती असेल बरं? नाही आठवत. काहीच संदर्भ  नाही मिळत. चला, जाऊदे. असं झालं की सोडून द्यायचं.  जास्त त्रास करून घ्यायचा नाही.. 

खरं सांगायचं तर याच वयाच्या आसपास कितीतरी दिवस होते, किती  माणसांचा सहवास, कितीतरी प्रसंग घडले असतील. ते सगळे दिवस आणि त्या सगळ्या घटना कुठे गेल्या? आपण आपल्याच आयुष्यात घडलेल्या प्रत्येक आणि प्रत्येक प्रसंगाचे साक्षीदार असतो. मग ते सगळं का नाही आठवत? त्यातल्या बऱ्याचशा घटना, प्रसंग आपण विसरून का जातो?

अशा आपल्या लहानपणीच्या आठवणी एकदा खणायला पाहिजेत.  काय लक्षात राहिलं आहे, ते आठवायचं. गंमत म्हणून करायचं. निदान एकदा तरी आठवणींचा खजिना शोधला पाहिजे. 

आपली सर्वात जुनी आठवण कोणती? तीच आठवण एवढी घट्ट का राहिली असेल, याचा शोध घ्यायचा आणि मग हळूहळू  या स्मरणरंजनातून बाहेर पडायचं. जुन्या कपड्यांना ऊन देऊन पुन्हा जागच्या जागी घडी करून ठेवतात, तसं. कारण रोजच्या जगण्यात या आठवणींची काहीच गरज नाही. पण आपली स्मरणशक्ती कितपत शाबूत आहे, हे एकदा तरी बघायला हवं. यातून आपल्याला आपलीच नव्यानं ओळख होईल. अनेक गोष्टी स्मृतीच्या कप्प्यातून बाहेर येतील.

Web Title: What is your first memory Remember

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.