ऐसी कीर्तन र्मयादा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 06:04 AM2020-02-23T06:04:00+5:302020-02-23T06:05:08+5:30

वैज्ञानिक व अवैज्ञानिक काय  हे कीर्तनकारांनीही जाणले पाहिजे.  संत तुकारामांनी वेदांचीही चिकित्सा केली.  ती परंपरा आज पुढे जात आहे का?  धर्म की धर्मापलीकडे याचा शोध  कीर्तनकारांनाही घ्यावा लागेल. अन्यथा  इंदोरीकर महाराजांभोवती जो वाद उद्भवला  तसे प्रसंग टाळता येणार नाहीत. संत एकनाथांनी कीर्तनाची  आचारसंहिता घालून दिलेली आहे.  कीर्तनात विज्ञान सांगायचे की अशास्रीय दृष्टांत  हे कीर्तनकारांनी ठरवायला हवे. 

What to say in Kirtan? - science or exemplification? that should be decided.. | ऐसी कीर्तन र्मयादा..

ऐसी कीर्तन र्मयादा..

googlenewsNext
ठळक मुद्देअध्यात्मातील सिद्धांत तपासून सोपे करून सांगणार्‍या कीर्तनकारांची राज्याला गरज आहे. इंदोरीकर यापुढे त्या दिशेने गेले तर इतिहास घडेल. कर्मकांडात अडकून पडले तर पुन्हा वादात सापडण्याचा धोका आहे.

- सुधीर लंके

ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी कीर्तनात लिंगनिदानाबाबत केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले आहे. हा वाद निर्माण झाल्यानंतर सोशल मीडियावर गुरुचरित्राचा सदतिसावा अध्याय व्हायरल झाला आहे. या अध्यायात कोणत्या दिवशी स्रीसोबत संग केला म्हणजे मुलगा, मुलगी जन्मेल याचा संदर्भ आहे. ‘हा घ्या पुरावा’, असे इंदोरीकर यांच्या सर्मथकांचे म्हणणे आहे.
पोटात गर्भ कोणत्या बाजूला असला म्हणजे कोणत्या लिंगाचे बाळ जन्माला येईल असाही दुसरा संदर्भ इंदोरीकरांनी त्यांच्या एका कीर्तनात दिल्याचा आक्षेप आहे. पुरुषांच्या तुलनेत स्री लिंग गुणोत्तराचे प्रमाण कमी झाल्याने देशात गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंगनिदानतंत्र प्रतिबंध कायद्याची (पीसीपीएनडीटी) कडक अंमलबजावणी सुरू आहे. या कायद्यानुसार गर्भधारणा होण्यापूर्वी अथवा नंतरही लिंगनिदान होईल, अशी कुठलीही चाचणी अथवा जाहिरात करता येत नाही. इंदोरीकर यांचा जो व्हिडीओ व्हायरल झाला, त्यात ते लिंगनिदानाचे तंत्र सांगताना दिसतात.
इंदोरीकर यांच्याबद्दल एवढा एकमेव आक्षेप नाही. अंधर्शद्धा निर्मूलन समितीच्या अँड. रंजना गवांदे, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी इंदोरीकरांबद्दल तक्रार केली आहे. इंदोरीकर लिंगनिदानाबाबत बोललेच. पण, महिलांबद्दलही ते अत्यंत अनादाराने बोलतात असा या सर्वांचा आक्षेप आहे. ‘चप्प्पल कितीही भारी असली म्हणून गळ्यात घालतो का? बायको आहे ती, तिने मापात रहावे’, ‘मुलीचा मोबाइल काढला तर पन्नास टक्के लफडे कमी होतील’, ‘80 टक्के मुली आता मोबाइलवरच लग्न जमवतात’, ‘मुलींचे थोबाड फोडले पाहिजे’ ही इंदोरीकरांची वक्तव्ये तक्रारदारांनी समोर आणली आहेत. आणि त्याबद्दल सातत्याने ते टीकेच्या तोंडी राहिलेले आहेत.
इंदोरीकर यांची ही सगळी वक्तव्ये खरी असतील तर ती आक्षेपार्ह अशीच आहेत. या वक्तव्यातून लिंगनिवडीस प्रतिबंध करणार्‍या कायद्याचा भंग तर होतोच. पण, स्री-पुरुष समतेच्या तत्त्वालाही तडा जातो. या सर्व वादानंतर इंदोरीकर यांनी प्रसिद्धीपत्रक काढून ‘आपल्या वक्तव्यांमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. माझ्यावरील प्रेम असेच ठेवा’, अशी भावना व्यक्त केली आहे. दुसरीकडे ‘लिंगनिदानाबाबत आपण असे काहीही बोललेलो नाही’, असा खुलासा अहमदनगरच्या जिल्हा शल्य चिकित्सकांकडे सादर केला आहे. इंदोरीकर यांच्या या वक्तव्याबाबत पुरावा नसल्याने आम्ही कारवाई करू शकत नाही, असे शल्य चिकित्सकांनीही स्पष्ट केले आहे.
हल्ली या अशा एकांगी विधानांनी खळबळ उडवून चर्चेत राहण्याचे वेडच जणू काहींना जडलेले आहे. इंदोरीकर हे त्याचे एक उदाहरण. या आधी बालाजी तांबे आणि संभाजी भिडे आदीही लिंगनिदानाबाबतच्या बेजबाबदार वक्तव्यांनी, लिखाणांनी वादात सापडले होतेच. 
स्रियांबाबत उलटसुलट विधाने करून संस्कृतिरक्षणाचा आव आणणे हे तर हल्ली बाबा-बुवांचे राष्ट्रीय कार्यच होऊन बसले आहे की काय, असा उद्वेग वाटावा एवढी परिस्थिती बिघडली आहे. रजस्वला अवस्थेत स्रीने अन्न शिजवले तर तिला पुढला जन्म कुठल्या प्राण्याचा येतो याची गणिते घालून वाट्टेल ती बडबड करण्याने बातम्यांच्या मुख्य मथळ्यांमध्ये झळकणारे दाढीधारी बाबा अगदी काल-परवाचेच. पुरोगामी महाराष्ट्रात तर काही महिला प्रवचनकारदेखील महिलांनाच दोष देताना दिसतात. अपर्णा रामतीर्थंकर या सुप्रसिद्ध बाईंच्या मते तर बाईने आपले उंबरठय़ाआतच राहावे आणि आपला गृहिणीधर्म निभवावा. बाई बाहेर पडली म्हणूनच संसार मोडू लागले आहेत, असे या बाई खुलेआम सांगतात आणि टाळ्या घेतात. म्हणजे ही अशी भाषणे करत गावोगाव फिरायला या बाई स्वत: घराबाहेर पडल्या तर ते सत्कर्म, आणि सामान्य बाई नोकरी-व्यवसायाला घराबाहेर पडली; तर तो मात्र संस्कृतिभंग असा हा उलटा न्याय आहे! स्रियांना उद्देशून त्या म्हणतात, ‘काय यांच्या साड्या आणि काय यांचं नटणं ! यांचे कट बघून स्कूटी अडवून बदडावं वाटतं.’
दोष एकट्या इंदोरीकरांचा नाही, आत्ता ते या वादाच्या केंद्रस्थानी आहेत, एवढेच! इंदोरीकरांची ‘केस’ थोडी वेगळी आहे, हे मात्र खरे!
अहमदनगर जिल्ह्यातील इंदोरी (ता. अकोले) हे इंदोरीकर यांचे मूळ गाव. या गावामुळेच त्यांना इंदोरीकर म्हणतात. त्यांना कीर्तन परंपरेचा वारसा नाही. त्यांना कीर्तनात कुणी गुरुही नाही. ते विज्ञानाचे पदवीधर आहेत. काही काळ त्यांनी विनाअनुदान तत्त्वावर शिक्षक म्हणून काम केले. 1995 ते 2000 या काळात त्यांना अकोल्यात पायी फिरताना अनेकांनी पाहिले आहे. त्यांनी आपल्या शैलीने कीर्तन फुलविले. 2000 साली त्यांची कीर्तनाची एक कॅसेट निघाली व ते नावारूपाला आले. ‘मी शेतकर्‍याचा मुलगा आहे. खापराच्या पाटीवर शिकलो’, असे ते जाहीरपणे कीर्तनातच सांगतात. आज ते राज्यातील सर्वात लोकप्रिय कीर्तनकार आहेत. लाखांचा जनसमुदाय जमा करण्याची क्षमता त्यांच्या कीर्तनात आहे. अनेक गावांना इंदोरीकर कीर्तनासाठी हवे असतात; पण त्यांच्या तारखा मिळत नाहीत. 
देवर्षी नारद हे आद्य कीर्तनकार म्हणून ओळखले जातात, तर वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाचा पाया नामदेवांनी घातला. महाराष्ट्रात वारकरी कीर्तन, नारदीय, रामदासी, गाणपत्य, शाक्त, राष्ट्रीय, चटई (पथकीर्तन) असे कीर्तनाचे विविध प्रकार आहेत. यात इंदोरीकर हे वारकरी कीर्तन करतात. वारकरी कीर्तन कसे असावे, त्यात कोणत्या संतांच्या अभंग-ओव्या वापरता येतील याचे काही नियम आहेत. मात्र इंदोरीकर हे आपल्या कीर्तनात अगदी ‘मेरे वतन के लोगो’ गाताना दिसतात. ‘मुन्नी बदनाम हुई’सारख्या गाण्यांचा संदर्भ देतात. संत साहित्याचे अभ्यासक अभय टिळक यांच्या मते, ‘वारकरी संप्रदायात निवृत्तिनाथ ते निळोबा ही जी परंपरा आहे, त्या परंपरेतील संतांचेच अभंग किंवा ओव्या प्रमाण म्हणून कीर्तनात देता येतात. त्यात कबीर, मीराबाई, सूरदास व र्शीगोंद्याचे संत महंमदबाबा यांचाही विचार उद्धृत केला जातो. कारण त्यांची शिकवण भागवत धर्माशी एकरूप आहे. मात्र आता अनेक कीर्तनकार कविता, पोवाडे असे अनेक संदर्भ वापरतात. ते कीर्तन परंपरेत बसत नाही!’
इंदोरीकरांनी कीर्तनाची आपली स्वत:ची शैली तयार केली आहे. ती लोकांना भावते. विनोद, विडंबन, उपहास या सर्व शैली ते कीर्तनात वापरताना दिसतात. त्यांची निरीक्षणशक्ती जबरदस्त आहे. उदाहरणे अस्सल ग्रामीण व प्रचलित असतात. पारावर लोक जी निरीक्षणे नोंदवत असतात किंवा बायका नळावर पाणी भरताना जे बोलतात, ते इंदोरीकर अचूकपणे कीर्तनात छेडतात. ‘देवयानी’ मालिकेत काय चालले आहे हेदेखील त्यांना ठाऊक असते. मध्येच इंग्रजी वाक्ये पेरतात. कीर्तन फुलवण्यासाठी ते हे सर्व फंडे वापरतात. अर्थात त्यांची ही भाषा लोकांना आपली वाटते. जवळची वाटते. महिलांबाबत ते जसे कठोर बोलतात तसे मुले व पुरुषांचीही झाडाझडती घेतात. ‘दारू पिणार्‍या मुलाला घराबाहेर काढा व दुसरा मुलगा जन्माला घालण्याची तयारी ठेवा’ इतके टोकाचे ते बोलतात. वीस वर्षाच्या दारूड्या मुलाच्या चितेला अग्नी देताना साठ वर्षाच्या बापाला काय वाटत असेल, असे भावनिक उदाहरण यावेळी ते देतात. त्यांचे हे बोलणे लोकांना टोचते, भावते व लोकांपर्यंत पोहोचतेही. लोक हशा, टाळ्या देतात. अंधर्शद्धा झुगारणारी काही पुरोगामी उदाहरणेही ते देतात. ‘लोक देवाच्या नावाखाली दहा हजाराचा बोकड कापतात. मात्र देवाला खूर वाहतात. खूर का वाहतात, तर हा अवयव शिजत नाही. तो शिजला असता तर देवाला यांनी वासावरच मारले असते’ - असे सरळ सांगतात. कर्ज काढून मुलींची लग्ने करू नका, दारू पिऊ नका असा सल्ला ते शेतकर्‍यांना देतात. शिकून बेकार न फिरता व्यवसाय करा. पंक्चरचे का होईना दुकान टाका, असे तरुणांना बजावतात. महिला-मुलींवर ते ताशेरे ओढतात; पण ‘आपली मुलगी सुखी  झाली, तीच आपली र्शीमंती’, असे प्रत्येक बाप मानतो असे सांगून मुलीचे महत्त्वही ते विशद करतात. कीर्तनकार निघाले पैसे कमवायला आणि तुम्ही लागले जमिनी विकायला हे सांगताना ते स्वत:सह संप्रदायावरही टीका करतात. त्यामुळे इंदोरीकर ना धड पूर्ण प्रतिगामी आहेत ना पुरोगामी. ते मधलेच रसायन आहे. दोन्ही विचारांचे मिर्शण त्यांच्या कीर्तनात दिसते. त्यांच्या कीर्तनात अंधर्शद्धा दिसते तसे प्रबोधनही आहे. त्यांचा काहीसा गोंधळ झालेला दिसतो. यात पुढील काळात त्यांना स्पष्टता आणावी लागेल. शैली योग्य असली तरी काय बोलायचे व काय बोलायचे नाही हे त्यांना ठरवावे लागेल.
वैज्ञानिक दृष्टिकोनाबाबत आपल्या समाजाची पुरातन काळापासून उपासमार झालेली आहे. पोथ्या, पुराणे आपल्याकडे शतप्रतिशत खरी मानली जातात. वेदांचा चुकीचा अर्थ लावून वेद लोकांसमोर मांडले गेले. त्यामुळे तुकाराम महाराजांनी संत परंपरेत महाराष्ट्राचा कान पकडून नीतिमत्तेचा पाढा गिरविला. ‘वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी वहावा भार माथा’ असे त्यांनी वैदिक धर्माभिमान्यांना ठणकावले. तुकारामांची ही भूमिका किती कीर्तनकारांनी आत्मसात केली आहे असा प्रश्न आहे. ‘ब्रrा सत्य जगद् मिथ्या’ हे शंकराचार्यांचे मत आपल्या संतांनी स्वीकारलेले नाही. संतांनी वेद, पुराणे यांना ठिकठिकाणी आव्हान दिले. वारकरी संप्रदायाने या बाबी जाणून घेतल्या तर इंदोरीकरांभोवती जो वाद उद्भवला तो उद्भवणार नाही. धर्म, अध्यात्म आणि विज्ञान या कसोटीत आजच्या काळाला काय आवश्यक आहे ते वारकरी संप्रदायाने जाणले पाहिजे. महाराष्ट्रात गाडगेमहाजांसारखे प्रबोधनकार अभावानेच घडले. अध्यात्मातील सिद्धांत तपासून सोपे करून सांगणार्‍या कीर्तनकारांची राज्याला गरज आहे. इंदोरीकर यापुढे त्या दिशेने गेले तर इतिहास घडेल. कर्मकांडात अडकून पडले तर पुन्हा वादात सापडण्याचा धोका आहे.
यानिमित्ताने उद्भवलेल्या वादात जी शिवराळ भाषा सुरू आहे तीही थांबायला हवी. तृप्ती देसाई यांच्याबद्दल इंदोरीकर यांचे सर्मथक सोशल मीडियात जे लिहित आहेत ते चुकीचे आहे. तसेच देसाई याही इंदोरीकर यांना काळे फासण्याची जी गर्जना करत आहेत व कायदा हातात घेऊ पाहत आहेत तेही सर्मथनीय नाही. देसाई याही कायद्यापेक्षा मोठय़ा नाहीत.   
sudhir.lanke@lokmat.com
(आवृत्तीप्रमुख, लोकमत, अहमदनगर)

Web Title: What to say in Kirtan? - science or exemplification? that should be decided..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.