आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या चमकदार कामगिरीचं रहस्य- ‘साई’ची संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 06:00 AM2018-09-09T06:00:00+5:302018-09-09T06:00:00+5:30

क्रीडाक्षेत्राला सध्या बरे दिवस येताहेत, खेळ आणि खेळाडूंसाठी निधी वाढतो आहे. वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी होते आहे. जाणकार प्रशिक्षकांना सन्मानाने बोलवले जाते आहे. खेळाडूंचे मनोबल वाढते आहे. हे बदलते वातावरणच मैदानांवरचे चित्रही बदलू पाहतेय.

What is the secret of India's Satisfactory performance in Asian Games?- Sai Sanjeevanee | आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या चमकदार कामगिरीचं रहस्य- ‘साई’ची संजीवनी

आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या चमकदार कामगिरीचं रहस्य- ‘साई’ची संजीवनी

Next
ठळक मुद्देखेलो इंडिया- भारताचं क्रीडा धोरण बदलताना दिसतंय, नेमकं काय होतंय मैदानात? भारताची पदकांची भूक त्यानं वाढेल?. प्रत्यक्ष मैदानावरचा हा लेखाजोखा.

-शिवाजी गोरे

खेळाडूंच्या जिद्दीला प्रशासकीय आणि संघटनांच्या पातळीवर बळ मिळाले तर ते विक्रमी कामगिरी करू शकतात, याचा वस्तुपाठ आशियाई क्रीडा स्पर्धांनी घालून दिला आहे. या स्पर्धांनी पदकांच्या बाबत तर इतिहास घडविलाच; परंतु खेळाडूंची कामगिरीही उंचावली.

आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळविणारे कोण आहेत? अगदी रिक्षाचालकाच्या मुलीपासून ते शेतकरी कुटुंबातील मुलांपर्यंत. त्यांच्या घरात खेळाची परंपरा नव्हती. सध्या आधुनिक युगासाठी आवश्यक त्या खेळाच्या सुविधा नव्हत्या, तरीही त्यांनी हे यश मिळवले.

या खेळाडूंना घरातून प्रोत्साहन मिळाले तरी त्यांच्या कुटुंबीयांची आवश्यक त्या सुविधा पुरविण्याची ऐपत नव्हती. तरीही ते कामगिरी उंचावू शकले. याचे नेमके कारण शोधायला गेल्यावर समोर प्रकर्षाने पुढे येते ते ‘साई’चे नाव. भारतीय क्रीडा प्राधिकरण म्हणजे साई.

अँथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आणि माजी ऑलिम्पियन अदिल सुमारीवाला म्हणतात, अँथलेटिक्स महासंघाने केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या सहकार्याने गेल्या दोन वर्षांपासून खेळाडूंच्या परदेशी मार्गदर्शक, परदेशातील प्रशिक्षण शिबिरे, त्यांना हवे असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा साहित्य यासाठी दिलेले आर्थिक साह्यामुळे एवढे मोठे यश आमचे खेळाडू संपादन करू शकले.

पण गेल्या अनेक वर्षांपासून साई काम करीत असताना हा बदल अचानक घडला कसा, हादेखील प्रश्न आहे. त्यातून प्रकर्षाने नाव पुढे येते ते केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांचे. 

देशाचा क्रीडामंत्री हा माजी ऑलिम्पियन किंवा आंतरराष्ट्रीय खेळाडू असला तर काय होऊ शकते हे भारतीय संघाने जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 15 सुवर्ण, 24 रौप्य, 29 कांस्य अशी एकूण 68 पदके जिंकून दाखवून दिले आहे.

याचे सर्व श्रेय गेली दोन ते तीन वर्ष खेळाडूंनी घेतलेले कष्ट विविध देशांमध्ये जाऊन आंतरराष्ट्रीय मार्गदर्शकांच्या देखरेखीखाली केलेले सराव यालाच जाते; पण दुसरीकडे आपल्या या खेळाडूंच्या मागे खंबीरपणे उभे असलेले केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांचाही तितकाच सहभाग आहे. जोडीला भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साई) पदाधिकारी, भारतीय ऑलिम्पिक महासंघ, विविध क्रीडा महासंघाचे पदाधिकारी गेली दोन ते तीन वर्ष मेहनत घेताहेत.

भारतात आणि भारताबाहेरील सराव शिबिरांचे आयोजन, त्यासाठी विविध क्रीडा महासंघांना आणि भारतीय ऑलिम्पिक महासंघाला दिलेला कोट्यवधी रुपयांचा निधी, याचाही परिणाम दिसू लागलाय. त्यामुळेच खेळाडू आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली देशात आणि परदेशातही सराव करू शकले.

त्यांचा सर्व खर्च केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने (साई अंतर्गत) भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या वतीने विविध खेळांच्या क्रीडा महासंघांना दिला.

ज्या महासंघांनी गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल आणि जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी सराव आणि सराव सामन्यांच्या नियोजनाचे प्रस्ताव दिले होते ते मंजूर तर झालेच; पण त्यासाठी भरभरून निधीही दिला गेला.
खेळाडूच क्रीडा खात्याचा मंत्रीही असला तर त्याचा परिणाम दिसतोच. राज्यवर्धनसिंह राठोड यांनी केंद्रीय क्रीडा मंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या तिसर्‍याच दिवशी ते नवी दिल्ली येथील नेहरू स्टेडिअममधील साईच्या कार्यालयात सकाळी हजर होते. साईचे अधिकारीसुद्धा त्यावेळी कार्यालयात आले नव्हते.

क्रीडामंत्री राठोड यांनी राष्ट्रकुल, आशियाई क्रीडा स्पर्धा आणि 2020चे टोकियो ऑलिम्पिक हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून नियोजन केले. भारतीय ऑलिम्पिक महासंघाला संलग्न आणि असंलग्न असलेले विविध क्रीडा महासंघ आणि नव्याने आशियाई क्रीडा स्पर्धेत समावेश झालेले खेळ यांचे  विभाजन करण्याचे त्यांनी ठरवले. या योजनेला नाव देण्यात आले ‘टॉप्स स्किम’ (टारगेट ऑलिम्पिक पोडियम स्किम). 

यासाठी एक उच्चस्तरीय समिती तयार करण्यात आली. केंद्रीय क्रीडा मंत्रालयातील उच्च पदस्थ अधिकारी, साईचे संचालक, भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे पदाधिकारी या समितीत आहेत. 

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये जे खेळ, जे खेळाडू भारताला पदके जिंकून देऊ शकतात आणि देत आहेत त्यांचा या योजनेत समावेश केला गेला आहे. प्रत्येक खेळ आणि खेळाडूला योग्य संधी मिळण्यासाठी प्रायोरिटी खेळ, नॉनप्रायोरिटी खेळ आणि नव्याने समावेश झालेले खेळ असे त्यांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.

अँथलेटिक्स, नेमबाजी, कुस्ती, मुष्टियुद्ध, हॉकी, बॅडमिंटन, लॉन टेनिस, वेटलिफ्टिंग ही आपली बलस्थाने. त्यांच्यावर अधिक भर देण्यात आला आहे. या खेळांच्या महासंघांनी राष्ट्रकुल, आशियाई क्रीडा स्पर्धा आणि 2020 टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीसाठी दिलेले प्रस्ताव तर मंजूर करण्यात आलेच; पण त्यांचा प्राधान्यक्रमही ठरवून देण्यात आला. प्रथम राष्ट्रकुल, आशियाई आणि त्यानंतर टोकियो ऑलिम्पिक! 

दुय्यम प्रकारात विभाजनामध्ये बास्केटबॉल, बिलियर्ड-स्नूकर, ब्रीज, बुद्धिबळ, सायकलिंग, हॅण्डबॉल, कबड्डी, ज्युडो, कयाकिंग-कनोईंग, रोइंग, सपेक-टकराव, सॉफ्टबॉल, बेसबॉल, स्क्वॉश, स्पेशल ऑलिम्पिक, जलतरण, टेबल-टेनिस या खेळांचा समावेश केला गेला.

राष्ट्रकुल स्पर्धेचे निकाल पाहिल्यानंतर रोइंग, टेबल टेनिस, सायकलिंग या खेळांना बढती देण्यात आली. आता हे खेळ प्रायोरिटी विभागात आले आहेत.

केंद्रीय मंत्रिपदाची धुरा सांभाळल्यानंतर दूरदृष्टी ठेवून हे सर्व नियोजन राज्यवर्धनसिंह राठोड यांनी केले आहे.
विविध खेळांसाठी काही समित्या स्थापन करण्यात आल्या. त्यात त्या त्या खेळातील द्रोणाचार्य, अर्जुन पुरस्कार विजेते, वरिष्ठ मार्गदर्शक, साईचे अधिकारी आणि भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या पदाधिकार्‍यांचाही समावेश केला गेला आहे.

 

खेळ, खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचे, तर एवढेच पुरेसे नाही, हेही लक्षात आल्याने विविध खेळांच्या खेळाडूंच्या तयारीचा तक्ता, त्यांची कामगिरी, त्यातली सुधारणा, त्यासाठी अजून काही आवश्यक आहे का याकडेही जातीने लक्ष दिले जात आहे. त्यासाठीही एक वेगळी समिती तयार केली गेली आहे.

देशाच्या क्रीडामंत्र्यांनीच असा पुढाकार घेतल्यामुळे देशातील विविध क्रीडा महासंघाच्या पदाधिका-यानीसुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यास सुरुवात केल्याचे सुखद चित्र दिसू लागले आहे.

पूर्वी ज्या गोष्टी होत नव्हत्या, त्याकडे आता प्राधान्याने लक्ष दिले जाऊ लागले आहे. विविध खेळांच्या महासंघांनी महत्त्वाच्या स्पर्धांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करून पदके जिंकणार्‍या खेळाडूंची सूची तयार करण्यास सुरुवात केली आहे.

टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्किम आणि अशा योजनांचे योग्य नियोजन केले तर काय होऊ शकते याचे दृश्य परिणाम गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल आणि र्जकाता आशियाई क्रीडा स्पर्धांच्या पदक तालिकेवरून दिसून आले.

सरकारही खेळ, खेळाडूंच्या प्रगतीसाठी जाणीवपूर्वक प्रय} करते आहे म्हटल्यावर खेळाडूसुद्धा आपल्या जिवाचे रान करताना दिसले आणि त्यांनी देशाला पदके मिळवून दिली. आपल्या कामगिरीच्या जोरावर त्यांनीही जगाला दाखवून दिले. हम भी कुछ कम नही. पण त्यांच्यातला आशावाद त्यामुळे प्रामुख्याने जागवला गेलाय.

इंडोनेशिया येथे झालेल्या यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा संपेपर्यंत जातीने ठाण मांडून तेथे बसले होते.

छोट्या छोट्या गोष्टीही खेळाडूंचे मनोबल वाढवते, हे शासनाच्या प्रयत्नातून आता दिसू लागले आहे. हळूहळू का होईना, त्याचा परिणाम दिसेलच.

(लेखक लोकमतच्या पुणे आवृत्तीत वरिष्ठ उपसंपादक आहेत.)

shivaji.gore@lokmat.com

 

Web Title: What is the secret of India's Satisfactory performance in Asian Games?- Sai Sanjeevanee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.