आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या चमकदार कामगिरीचं रहस्य- सांगत आहेत अॅथलेटिक्स प्रशिक्षक विजेंद्रसिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 06:45 AM2018-09-09T06:45:12+5:302018-09-09T06:45:12+5:30

पैसा नसल्यामुळे खेळाडूंना आपला खेळच सोडावा लागला किंवा क्षमता असूनही त्या वाटेलाच ते जाऊ शकले नाहीत, अशा घटना आता घडणार नाहीत.

What is the secret of India's Satisfactory performance in Asian Games?- Shares Athletic Coach Vijendrasing | आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या चमकदार कामगिरीचं रहस्य- सांगत आहेत अॅथलेटिक्स प्रशिक्षक विजेंद्रसिंग

आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या चमकदार कामगिरीचं रहस्य- सांगत आहेत अॅथलेटिक्स प्रशिक्षक विजेंद्रसिंग

Next
ठळक मुद्देखेलो इंडिया- भारताचं क्रीडा धोरण बदलताना दिसतंय, नेमकं काय होतंय मैदानात? भारताची पदकांची भूक त्यानं वाढेल?. प्रत्यक्ष मैदानावरचा हा लेखाजोखा.


-विजेंद्रसिंग

खेळात आता प्रोफेशनॅलिझम येऊ लागला आहे. वातावरण बदलतं आहे. खेळाडू आणि लोकांमध्येही खेळाबद्दलचा अवेअरनेस वाढतो आहे.

पैसा नसल्यामुळे खेळाडूंना आपला खेळच सोडावा लागला किंवा क्षमता असूनही त्या वाटेलाच ते जाऊ शकले नाहीत, अशा अनेक घटना यापूर्वी आपण पाहिल्या आहेत; पण आता त्याला ब-याच प्रमाणात छेद बसतो आहे. खेळाडूंना त्यांच्या ऐन उमेदीत आणि कारकीर्द भरात येण्याच्या आधीच पैसा मिळू लागला आहे. त्यांना शासकीय आणि विविध कंपन्यांमध्येही चांगल्या पगाराच्या नोकर्‍या मिळू लागल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यापुढच्या अडचणी ब-याच प्रमाणात कमी होताहेत. ग्रामीण आणि आदिवासी भागातील खेळाडू त्यामुळे मोठय़ा प्रमाणात पुढे येताहेत.
गरीब घरातल्या मुलांसाठी आपलं आयुष्य सेटल होणं ही बाब सर्वाधिक महत्त्वाची असते. खेळात प्रगती दाखवली तर आयुष्याला वेगळं वळण मिळण्याची शाश्वती असल्याचं चित्र त्यांना डोळ्यांसमोर दिसत असल्यानं तेही झटून मेहनत करतात. 

केंद्र सरकार तर खेळाडूंसाठी निधी उपलब्ध करून देतंच आहे; पण विविध राज्य सरकारेही खेळाडूंवर भरपूर पैसे खर्च करताहेत. एवढंच नाही, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजयी खेळाडूंसाठीही ते मुक्त हस्ताने आपल्या थैल्या खोलताहेत, सरकारी नोकरी सन्मानानं देऊ करताहेत. नुकत्याच झालेल्या आशियाई स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंनाही त्या त्या राज्य सरकारांनी रोख रकमेच्या इनामांनी सन्मानित केलं. त्यात कोटी कोटींचेही आकडे होते. खेळावर त्याचा निश्चितच सकारात्मक परिणाम होतोय.

खेळाचं वातावरण वाढवायचं, खेळाला प्रोत्साहन आणि पैसा मिळवून द्यायचा, तर केवळ सरकार पुरे पडणार नाही हे तर खरंच आहे; पण आता सरकारबरोबर खासगी कंपन्या, धनाढय़ लोकही खेळासाठी पुढे येताहेत. कंपन्यांचा दोन टक्के सीएसआर निधीही खेळासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो आहे.

परदेशांत खेळ आणि खेळाडूंवर जितका पैसा खर्च केला जातो, त्यांच्यावर जितकी मेहनत घेतली जाते, त्या तुलनेत आपल्याकडचा निधी कमी असला तरी आता खूपच फरक पडला आहे, पडतो आहे.

वेगवेगळ्या खासगी अकादमीही निष्ठेनं खेळाडूंवर मेहनत घेताहेत. गोपीचंद अकॅडमी, नाशिकची कविता राऊत अकॅडमी. ही त्याची काही उदाहरणं.

ज्या खेळाडूंकडून आंतरराष्ट्रीय पदकांची अपेक्षा आहे, त्यांच्यासाठीही भरपूर पैसा सुरुवातीपासूनच दिला जातोय. सुरुवातीच्या याच टप्प्यावर खेळाडूंना पैशाची नितांत आवश्यकता असते, कारण त्यांच्यापुढे अडचणींचा डोंगरही मोठा असतो. नेमक्या गरजेच्या वेळी खेळाडूंना पैसा मिळत असल्यामुळे खेळाची त्यांची उमेदही वाढते.

‘खेलो इंडिया’सारख्या आणि इतरही योजनांमुळे देशाच्या कानाकोपर्‍यातून होतकरू खेळाडू हुडकले आणि घडवले जाताहेत.

खेळाडूंच्या पैशाला इतर कुठल्याही वाटा फुटू नयेत यासाठी केंद्र सरकारतर्फे थेट त्यांच्या बँक खात्यात पैसा जमा केला जातोय. याच योजनेतून नाशिकच्या संजीवनी जाधवसारख्या खेळाडूंच्या बँक खात्यात दरमहा पन्नास हजार रुपये जमा केले जातात.

अशा प्रकारे खेळाडूंना उत्तेजन मिळत असेल तर त्याचा फायदा होणारच आणि त्याचे सकारात्मक परिणामही निश्चितच पाहायला मिळतील.

(आदिवासी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नेणारे ‘साई’चे नाशिक येथील अँथलेटिक्स प्रशिक्षक)

 

Web Title: What is the secret of India's Satisfactory performance in Asian Games?- Shares Athletic Coach Vijendrasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.