क्या खोया, क्या पाया, कौन जाने?
By admin | Published: September 26, 2015 02:19 PM2015-09-26T14:19:35+5:302015-09-26T14:19:35+5:30
संपल्या शाही पर्वण्या. आपापली बोचकी गुंडाळून आल्या मार्गानं साधू परत गेले. उत्सव साजरा झाला, उत्साह सरला, कुंभ रिता झाला.
Next
- मेघना ढोके
संपल्या शाही पर्वण्या. आपापली बोचकी गुंडाळून आल्या मार्गानं साधू परत गेले. उत्सव साजरा झाला, उत्साह सरला, कुंभ रिता झाला.
आता या कुंभात कुणी काय कमावलं, काय गमावलंचे टिपिकल हिशेब मांडले जातील, गोदाकाठी किती पाण्याची नासाडी झाली या चर्चेच्या लाटा फुटतील.
पण त्याला अर्थ नाही. कारण जे गाव वसलं होतं ते आता उठलं. आता गोदाकाठी ही ‘वस्ती’ पुन्हा बारा वर्षानीच वसणार आणि मधली अकरा-साडेअकरा वर्षे या कुंभाचा कुणाला आठवही येणार नाही.
एवढंच कशाला, अजूनही ‘सिंहस्थ’ तसा संपलेला नाही. 11 ऑगस्ट 2क्16 र्पयत गुरू सिंह राशीतच असेल. म्हणजे कुंभकाळ अजून सुमारे 11 महिने सुरूच राहणार आहे.
सध्या सरलंय ते फक्त साधू समाजाचं नाशिक-त्र्यंबकक्षेत्री सुरू असलेलं सामूहिक सेलिब्रेशन!
या सेलिब्रेशनच्या निमित्तानं नाशिक आणि त्र्यंबकक्षेत्री ‘साधू समाजात’ फिरताना, त्यांच्या जगातल्या लहानसहान गोष्टी समजून घेताना एक गोष्ट यंदा मात्र प्रकर्षानं जाणवली, जी मागच्या सिंहस्थाच्या तुलनेत वेगळी वाटली.
वेगळी आणि जरा जटिलही!
मागच्या कुंभात साधूंचा थाटमाट, मानपान, तोराबिरा, संताप, व्यवस्थेला नाक घासायला लावणं, स्वत:चाच हेका मिरवणं हे सारं तर होतंच; पण साधू समाजाचं ऐश्वर्य, त्यातला रुबाब, झगमगाट, हंडय़ा-झुंबरं, जाडजूड मखमली कारपेटं, चांदीच्या तबकात ढिगानं पडलेला सुकामेवा आणि साधूंच्या ऐसपैस निवांत गप्पा हे सर्रास दिसायचं.
भाव-भक्ती, आत्मा-परमात्मा, प्रकृती-स्वीकृती याबद्दल ठरावीक गोष्टीची टेपच ते सुरुवातीला लावत हे खरंय; पण नंतर मनमोकळं बोलत, निवांत दिसत. त्यांच्या बोलण्यात दुस:या साधूंविषयी दिसलाच तर उघड राग दिसे; पण हेवा, मत्सर, असूया फारशी दिसली नाही. आपल्या ‘स्पर्धक’ साधूंविषयी मीडियाला ‘एक्सक्लुसिव्ह’ माहिती देण्याचा आटापिटा कुणी केला नाही!
हा सिंहस्थ मात्र अजब होता. साधुग्रामातल्या खालसा-आखाडय़ांमधला तो ‘निवांत’पणाच हरवल्यासारखा वाटला. साधू ‘रिलॅक्स्ड’ नव्हते, उलट कसली तरी जद्दोजहद करत असल्यासारखे अस्वस्थ आणि कमालीचे असुरक्षित भासत होते. महंतांच्या रिक्त असलेल्या जागा आणि मनमुखी साधूंचं अमाप वर्चस्व, त्यांच्या वैभवानं साधू समाजावर आलेला झाकोळ ही दोन कारणं तर होतीच; पण त्यापलीकडेही साधू समाजाला आपापसात काहीतरी डाचत होतं?
ते नेमकं काय?
शोधणं जरा अवघड होतं. कारण साधू बोलत नसत. जरा नाजूक विषय काढला, जरा या अशांत वातावरणाविषयी विचारलं की एकदम बॅकफुटवर तरी जात, नाहीतर मग तसलं काही नाहीच म्हणत ‘डीनायल मोड’वर तरी येत! एका बडय़ा आखाडय़ाच्या महंतांनी तर सांगितलंही की, ‘ऐसा कुछ नहीं बेटा, आप संसारी हो गयी हो, आप अंदरसे अशांत हो, इसलिए आपकी नजर को सब अशांत लगता है.’
आपलं ‘संसारी’पण मान्य करून हा विषय संपवता आला असता तर सोपं झालं असतं, पण ते तसं नव्हतं हेच खरं! कारण पत्रकारांना आपण काहीतरी विशेष माहिती देतोय अशा सुरात येणारे फोन आणि व्हॉट्सअॅप मेसेजेस काही वेगळंच सांगत होते.
खालसात पडेल ते काम करणा:या तरुण साधूंना मी विचारत होते, आपने संन्यास लिया है? गंडा बांधा है? रकम उठायी है? शपथ ली है?
पंचविशीच्या आतबाहेरचे हे साधू, फारफार तर गंडा बांधून गंडाधारी शिष्य होण्यार्पयतच पोहचले होते. म्हणजे काय तर साधू होण्याच्या प्रक्रियेचेही टप्पे असतात. कुणी फक्त मी ब्रrाचर्य पाळून संसारापासून लांब राहीन एवढीच गुरूसमोर शपथ घेतो, कुणी विशिष्ट रीतीनं शपथ घेत, गुरूनं तबकात ठेवलेली काही रक्कम उचलतो, म्हणजेच जबाबदारी घेत साधू होण्याचा पुढचा टप्पा गाठतो. कुणी त्यापुढे जाऊन गुरूकडून गंडा बांधून घेत त्यांचा गंडाधारी शिष्य होतो. कुणी कुणी तर कृपापात्र शिष्य म्हणजेच फेवरिट चेलाही होतो.
गंडाधारी शिष्य कधीही संसाराकडे मागे वळू शकतात. वाटलंच तर संसारी समाजात परत येऊ शकतात. परतीची वाट या टप्प्यार्पयत खुली असते.त्यानंतरचा टप्पा संन्यास. एकदा संन्यास घेतला की साधूंना माघारी फिरता येत नाही. स्वत:चा श्रद्धविधी करून, स्वत:ला विसरून काहीजण फक्त ‘साधू’ होतात.
मागच्या सिंहस्थात संन्यास घेऊ इच्छिणा:या, त्या उंबरठय़ावर उभ्या साधूंची संख्या जास्त होती. अनेक तरुण साधू सांगत की, गुरुआ™ोची वाट पाहतोय, ती झाली की संन्यास, आता परत जाणार नाही!
यंदा तसं नव्हतं. अनेकजण गंडा बांधण्याच्या टप्प्यावर थांबलेलेच भेटले.
‘वापस जाओगे कभी?’
असं विचारलं तर एखादा तरुण साधू बेधडक म्हणो की, ‘अभी सोच रहे है? साधुता सिर्फ बर्तन चमकाने में और रसोई बनाने में तो नहीं है? कुछ और है जो पाना चाहते है?’
ते ‘कुछ और?’ म्हणजे काय असेल यांच्या डोक्यात, असं जेव्हा शोधायचा खूप प्रयत्न केला तेव्हा जाणवलं की, फार कमी तरुण साधू असे आहेत की, ज्यांना साधू समाजाच्या सिस्टिममधेही साधुता आणि विरक्ती सापडत नव्हती. म्हणून ते रेस्टलेस झालेले होते. त्यांना खरंच काहीतरी स्वत:पलीकडचं शोधायचं होतं. मात्र असे फार थोडे, पण बाकीचे?
बाकी अनेकांच्या लक्षात यायला लागलं होतं अवतीभोवतीचं साधूंचं चमकतं, चमचमतं ग्लॅमरवालं जग! मनमुखी साधूंची आलिशान लाइफस्टाईल, त्यांच्या पायाशी लोटांगण घालणारा आशाळभूत जनपरिवार! हे सारं आपल्याला कधी आणि कसं मिळेल याची तगमग काही तरुण साधूंच्या बोलण्यात स्पष्ट जाणवते. उघड कुणी काही बोलत नाही, मान्यही करत नाही. पण एखादा तरुण साधू म्हणतोच, ‘पाच साल से आश्रममें पानीही ढो रहा हूं, और इस कुंभ में पहली बार गुरुजी साथ तो लाए पर कोठारी बना दिए. मै तो महंत बननेसे रहा!’
जसं संसारी समाजातल्या आजच्या पंचविशीच्या मुलांना पैसा-प्रतिष्ठा-ग्लॅमरची घाई दिसते, आपल्या अवतीभोवतीची शो-ऑफ करणारी माणसंच पुढे जातात अशी भावना असते, तशीच साधू समाजातली ही पंचविशीची पिढीही आता घाईत आहे. त्यातल्या अनेकांना जन्मभर ज्येष्ठ साधूंची जटासेवा, आश्रमात गोसेवा, रसोईसेवा नी सफाईसेवा देण्यात काही रस नाही.
आपण साधू झालो, संसार सोडला आता साधू समाजाचे जे फायदे, जे ग्लॅमर अवतीभोवती दिसतंय ते चटकन मिळालं तर बरं, अशी एक होड त्यांच्याही जिवाला लागलेली दिसते.
हे सारं ऐकलं, पाहिलं की,
असे कसे साधू? हे कसले साधू?
असं म्हणत लगेच त्यांच्यावर प्रश्नचिन्ह आपण लावू शकतो. ते मनात येणं साहजिकच आहे. पण तसं केलं तर ‘साधू’ झालेली ही माणसं कशी कळावीत?
म्हणून माङयापुरतं तरी मी सोपं करून घेतलं की, साधू नावाच्या एका समाजात, एका व्यवस्थेत जगायला आलेली ही आपल्याच समाजातली माणसं आहेत. ती एकदम विरक्त, अति महान कशी असतील?
त्यांची म्हणूनही काही प्रोसेस असेल, ती जमल्यास समजून घ्यावी!
आणि त्या प्रयत्नात यंदा लक्षात आलं की एकीकडे अवतीभोवतीच्या ग्लॅमरचा मोह आणि दुसरीकडे जिवाला खाणारं एकाकीपण, नैराश्य, औदासिन्य. खरंतर अनेकजण हेच सारं नको म्हणून घरातून पळत सुटलेले. पूर्वी सोपं होतं. गुरूवर श्रद्धा, हातात जपमाळ आणि आखाडय़ातल्या इतर साधूंचा आधार या गोष्टींवर एकाकीपण सरायचं. निदान मागे तरी पडायचं. आता आपल्या गुरूवर अशी श्रद्धा ठेववत नाही (कारण तो गुरू नेमका कसाय हे तरुण साधूंना दिसतंच) आणि जप, कष्टाचं काम यात मन रमत नाही. एकाकीपण साथ आणि पाठ दोन्ही सोडत नाही.
या सिंहस्थात प्रशासनानं शरीरावर इलाज करणारे अनेक डॉक्टर्स नेमले. खरंतर मानसोपचारतज्ज्ञ किंवा मनोविकारतज्ज्ञांचीही एखादी टीम असती तर अनेक दबलेल्या भावनांना वाट तरी मिळाली असती. मात्र ज्या मूळ समाजातच मनाच्या आजारांकडे दुर्लक्ष तिथं साधू समाजात असं काही बोलण्या-करण्याचं धारिष्टय़ सध्याच्या काळात कोण दाखवणार?
पैसा-प्रतिष्ठा-अस्तित्वाचे प्रश्न, अकाली मिळणारं किंवा न मिळणारं मीडिया अटेन्शन, ग्लॅमर, साधू समाजातलं मोठेपण, पैशावर ठरणारी पत या सा:यात हा समाज पहिल्यांदाच फार अशांत आणि अस्थिर झालेला दिसला.
जसं एखाद्या मध्यमवर्गीय घरात सारं खाऊनपिऊन सुखी असतं, पण चार भिंतीत खदखद असते, नात्यात दुरावे नी अबोले असतात आणि घरात गेलं की काहीतरी अजब घुसमट जाणवते, वरवर सारं उत्तम आहे असं घरातले दाखवत असले तरीही, असंच चित्र अनेक खालशांतही जाणवलंच.
हे सारं एका बडय़ा खालशाच्या महंतांशी बोललेच. ते अत्यंत तटस्थपणो आपल्याच समाजाकडे पाहत, सा:यात असून सा:यात नसल्यासारखेच होते.
त्यांना विचारलं, ही जी विचित्र अशांत हुसहुस साधू समाजात जाणवते ती खरीच आहे का?
ते म्हणाले, ‘संग्रहालयातले वाघ-सिंह पाहावेत तसे लोक आम्हाला ‘पाहायला’ येताहेत. आणि त्यांना वाटतं जंगलातल्या वाघसिंहांसारखंच आम्ही रुबाबदार दिसावं? तसं कसं होईल? आम्ही आमच्याच पिंज:यात अडकले आहोत. पैसा आणि प्रतिष्ठा या दोन्ही गोष्टींची चटक एक आभासी ‘इगो’ देते आणि त्या इगोच्या जोरावर तुम्ही एकटेपण टाळून जगू लागता. आमच्या समाजात तरी काय वेगळं होतंय.
होईल तरी कसं? आम्हीसुद्धा याच मातीतलं दाणापाणी खातोय ना!’
हे ऐकून वाटलं ते त्या समाजाचं वागणं योग्य ठरवत नव्हते, फक्त असहाय्यपणो पाहत होते साधू समाजातल्याही बदलत्या वृत्ती-प्रवृत्तीकडे! अशा अनेक प्रवृत्ती, अनेक वृत्ती आणि अनेक माणसं दाखवणारा हा कुंभ-उत्सव.
कधी त्या सा:याचा त्रस झाला, कधी धक्के बसले आणि कधी चीड-किळसही आलीच.
पण तरीही एक नक्की की, स्वत:ला साधू म्हणवत असली तरी जी जमली होती ती सारी माणसंच होती. ती खरी-खोटी असतात. खरंखोटं जगतात आणि सुटायचं म्हटलं तरी गुरफटतच जातात.
कुंभातली डुबकीही त्या पाशातून सोडवत नाही..
कुणालाच. कधीच!
ही कसली गर्दी?
नाशिक-त्र्यंबकच्या साधुग्रामात ‘पथारी’ जन्तेची केवढी गर्दी.
कुठून कुठून लोक आले. गरीब, डोक्यावर बोचकं घेऊन.
आखाडय़ात ‘पंगती’ धरून रोज जेवले. लेकरंबाळं घेऊन आले.
साधुग्रामात साधूंपेक्षा भिका:यांचीच संख्या जास्त अशी टीकाही झाली. ती खोटी नव्हतीच.
पण त्या गर्दीकडे पाहून काय वाटलं, असा प्रश्न उरतोच.
कोण होती ही माणसं?
अशी काही ज्यांना आजही कुंभाची फुकट सहल हे पर्यटन वाटतं.
नाशिकच्या गोदाकाठी उघडय़ावर झोपणा:या आयाबायांना ‘त्यांच्या’ जुनाट विचारांच्या गावांपेक्षा असं उघडय़ावरचं आयुष्य चार घटका उत्साह देतं, सुरक्षित वाटतं. एकेकटय़ा बायांचे लोंढे येतात, मुक्त जगतात, हसतात, खिदळतात. आयतं जेवतात. रोजच्या स्वयंपाकाची, कामाची आणि घरातल्यांच्या कटकटींची झंझट नसते.
मुख्य म्हणजे हा कुंभ त्यांना खरंच पर्यटनातून दिसणारं जग आणि चार घटकांची मौज देतो.
आता ते तसं होत असताना ही गरीब -भुकेकंगाल जन्ता नागरी-विकसित समाजाला ‘कशीशीच’ वाटत असेल तर तो दोष त्या जन्तेचा कसा?
जो समोर दिसतोय तो आपल्याच समाजाचा एक चेहरा आहे, ते वास्तव आहे, हे मान्य करायलाच हवं.
ते करताना त्रस होत असेल तर आपल्या विकासाच्या कल्पना एकदा ताडून-तपासून पाहायला हव्यात.
(समाप्त)
(लेखिका ‘लोकमत’मध्ये मुख्य उपसंपादक आहेत)
meghana.dhoke@lokmat.com