महाविकास आघाडीचे काय होणार? दिल हैं छोटासा, मोटी सी आशा...

By अतुल कुलकर्णी | Published: January 29, 2023 12:58 PM2023-01-29T12:58:51+5:302023-01-29T13:00:26+5:30

Mahavikas Aghadi: नुकताच एक सर्व्हे आला आहे. जर आत्ता लोकसभा निवडणूक झाली, तर तुम्हाला घवघवीत यश मिळेल, असा दावा त्यात केला गेला आहे. असे सर्व्हे निवडणुकीच्या तोंडावर किती टिकतात, किती आपटतात, हे आपल्याला माहिती आहेच. कोणत्या सर्वेक्षणाचा किती व कसा फायदा करून घ्यायचा, हे तुमच्याशिवाय कोणाला जास्त कळेल?

What will happen to Mahavikas Aghadi? Dil Hain Chotasa, Motti Si Asha... | महाविकास आघाडीचे काय होणार? दिल हैं छोटासा, मोटी सी आशा...

महाविकास आघाडीचे काय होणार? दिल हैं छोटासा, मोटी सी आशा...

googlenewsNext

-अतुल कुलकर्णी
(संपादक, मुंबई)
महाविकास आघाडीच्या नेत्यांनो,
नमस्कार.
नुकताच एक सर्व्हे आला आहे. जर आत्ता लोकसभा निवडणूक झाली, तर तुम्हाला घवघवीत यश मिळेल, असा दावा त्यात केला गेला आहे. असे सर्व्हे निवडणुकीच्या तोंडावर किती टिकतात, किती आपटतात, हे आपल्याला माहिती आहेच. कोणत्या सर्वेक्षणाचा किती व कसा फायदा करून घ्यायचा, हे तुमच्याशिवाय कोणाला जास्त कळेल? या सर्व्हेने तुम्हाला उभारी दिली असेल. आपल्याला जास्तीतजास्त जागा मिळतील, असं वाटून तुम्ही नियोजनही सुरू केलं असेल. तुम्ही प्रत्येक जण ‘मला हीच जागा पाहिजे’, असे म्हणून भांडू लागाल आणि त्या भांडणातच तुमची महाविकास आघाडी निवडणुकीला सामोरे जाण्याआधीच मोडून जाईल, असा डाव तर यामागे नाही ना, याची खात्री करून घ्या. ज्या दिवशी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची बैठक झाली, दोघांनी एकत्र निवडणूक लढवायचं ठरवलं. तेव्हापासून महाविकास आघाडीत कुरबुरी सुरू झाल्या आहेत. प्रकाश आंबेडकरांनी शरद पवार यांच्याविषयी काही विधान केले. त्यावर राष्ट्रवादीतून कोणी काही बोलण्याआधीच, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना, ‘काहीही बोलू नका’, असा सल्ला दिला. खरं तर हा सल्ला राष्ट्रवादीमधून अपेक्षित होता. शरद पवार यांच्याविषयी बोलल्यानंतर संजय राऊत ज्या तडफेने प्रत्युत्तर देतात, तेवढ्या तातडीने उद्धव ठाकरे यांच्यावर झालेल्या आरोपांचे राऊत यांच्याकडून खुलासे येतात का, असा सवाल शिंदे गटाच्या आमदारांनी केला आहे. 
भीमशक्ती - शिवशक्ती एकत्र आली, तर राज्यातले राजकीय गणित बदलू शकते. काही मुस्लीम नेत्यांनी थेट मातोश्री गाठत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याचा आक्षेप त्यांनी मातोश्रीवर घेतल्याचं वृत्त आहे. भाजपशी लढू शकणारे नेते म्हणून मुस्लीम समाजामध्ये उद्धव ठाकरे यांच्याविषयी अचानक आस्था वाढू लागली आहे, शिवाय शिंदे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जेवढं बोलतील, तेवढी उद्धव ठाकरे यांच्याविषयीची सहानुभूती वाढत जाईल. अशा सगळ्या गोष्टी एकत्र आल्या, तर त्यातून निकाल काय लागेल, हे सांगण्यासाठी राजकीय पंडितांची गरज नाही. भाजपचे नेते ही गोष्ट ओळखून आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांत ठाकरेंविषयी सहानुभूती निर्माण होईल, असं कोणतंही विधान ते करताना दिसत नाहीत. येत्या काळात महाविकास आघाडीत कशी बिघाडी होईल, याचे आराखडे आखले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात वाद निर्माण करणे सुरू झाल्याची माहिती आहे. येत्या काळात तुम्ही तिघे किती मन लावून भांडता, याच्यावर भाजपचं यश अवलंबून आहे.
राष्ट्रवादीमधील एक गट भाजपमध्ये जाण्यासाठी उत्सुक आहे. शपथविधीसाठी सूट-बुटाचं माप अजित पवारांचं घ्यायचं की जयंत पाटलांचं, एवढाच काय तो प्रश्न आहे, असेही भाजप नेते खासगीत सांगत आहेत. पक्ष कसा नसावा, तो कसा चालवू नये, याचे मूर्तिमंत उदाहरण महाराष्ट्र काँग्रेसने घालून दिलं आहे. विदर्भातील काँग्रेसचा एक गट फडणवीसांच्या संपर्कात आहे, तर अन्य काही नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. प्रत्येकाला आपला मतदारसंघ शाबूत ठेवायचा आहे. आधी मतदारसंघ... नंतर स्वतःची आमदारकी... आणि वेळ मिळाला तर पक्ष... असं धोरण काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये कायम असतं. त्यातही या दोन पक्षांतले काही नेते त्या-त्या मतदारसंघांचे सुभेदार आहेत. काही नेत्यांना आपण निवडणुकीच्या काळात पाच-दहा कोटी खर्च केले की, आरामात निवडून येतो, असा ठाम विश्वास आहे. या गोष्टी लोकांना दिसत नाहीत, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तो गोड गैरसमज आहे. त्यामुळेच मतदारांनी वेगळे पर्याय मिळू शकतात का? हे शोधण्याचा प्रयत्न केला, तर महाविकास आघाडी कुठे गेली, हे शोधत राहावे लागेल.
‘उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेविषयीची सहानभूती कशी व कधी कमी होणार?’ हा एकमेव मिलियन डॉलर क्वेश्चन सध्या भाजपमध्ये आहे. त्यावरील लसीचं संशोधन भाजपच्या थिंक टँकमध्ये सुरू आहे. ज्या क्षणी ती लस दिल्लीतून मान्य होईल, त्या क्षणी सहानुभूतीवरचं व्हॅक्सिनेशन जोरात सुरू होईल. त्यासाठी महापालिकेतील टॅब खरेदी, कॅगचा रिपोर्ट, कोविड काळातील व्यवहार अशा पुस्तकांतून संशोधन सुरू आहे. त्यातच तुम्हा तिघांची भांडणं सुरू झाली की, लोक तुम्हालाही वैतागतील. भाजपला मतदान न करणारा वर्ग मतदानाला गेला नाही तरी चालेल, असे डावपेच जर कोणी आखले, तर महाविकास आघाडी गेली कुठे? हे शोधण्यासाठी वेगळे सर्व्हे घ्यावे लागतील. त्यामुळे तुम्ही सगळ्या नेत्यांनी एका बंद खोलीत स्वतःला कोंडून घ्यावे. काय भांडायचं ते भांडून घ्यावं. बाहेर येताना एक दिलानं, एक चेहऱ्यानं समोर या, तरच त्याचा काहीतरी लाभ होईल. अन्यथा ‘तिघांचे भांडण चौथ्याचा लाभ’, ही नव्या जमान्याची म्हण वापरात येईल. आपण सगळे सूज्ञ आहात... रामराम.
तुमचाच, बाबूराव

Web Title: What will happen to Mahavikas Aghadi? Dil Hain Chotasa, Motti Si Asha...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.