सर्वनामात काय आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 02:40 PM2021-03-23T14:40:42+5:302021-03-23T14:41:44+5:30

 जेण्डर प्रोनाऊन्स यासंदर्भात सध्या मोठी चर्चा आहे. लैंगिक ओळखीसंदर्भात हा नवा मानवी प्रश्न आहे.

What's matter pronouns? | सर्वनामात काय आहे?

सर्वनामात काय आहे?

Next

-डॉ. गौतम पंगू

काही महिन्यांपूर्वी आम्हांला कंपनीच्या एच आर मधल्या एका वरिष्ठ अधिकारी स्त्रीची इ-मेल आली होती. त्यात तिनं लिहिलं होतं ‘ मी आजपासून माझ्या कंपनी प्रोफाइलमध्ये आणि इ-मेल सिग्नेचरमध्ये माझ्या ‘जेंडर प्रोनाउन्स’चा समावेश करणार आहे. कंपनीत काम करणारे जे ट्रान्सजेंडर (ज्यांची जन्मतः मिळालेली आणि आत्ताची लैंगिक ओळख यात फरक आहे असे) सहकारी आणि स्वतःच्या लैंगिक परिचयाबद्दल प्रचलित निकष न मानणारे सहकारी आहेत त्यांना आपल्याबद्दल भेदभाव होतोय असं वाटू नये म्हणून मी हे पाऊल उचलत आहे. तुम्हीही तुमची ओळख सांगणारी ‘जेंडर प्रोनाउन्स’ वापरावीत असं मी आवाहन करते.’ तोवर एलजीबीटीक्यू लोकांच्या समस्या, त्यांच्याविरुद्ध होणारा भेदभाव, त्यांचे हक्क याबद्दलची राजकीय आणि सामाजिक चर्चा वाचली होती. ‘बाथरूम बिल’ला म्हणजे ट्रान्सजेंडर लोकांनी सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांसाठीची रेस्टरूम्स वापरायची की पुरुषांसाठीची हे ठरवणाऱ्या कायद्यावरुन माजलेलं वादंग ऐकलं होतं, पण ‘ जेंडर प्रोनाउन्स’ ही संकल्पना नवीन होती आणि ती वापरत जा असं आवाहन एका खाजगी कंपनीच्या व्यवस्थापनानं थेट कर्मचाऱ्यांना करावं हेही थोडं वेगळं वाटलं होतं! ‘प्रोनाऊन किंवा सर्वनाम म्हणजे नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द ही लहानपणी व्याकरणात शिकलेली व्याख्या. ‘तो, त्याला, त्याचं' ही पुल्लिंगी आणि ‘ती, तिला, तिचं ’ ही स्त्रीलिंगी सर्वनामं. पुरुषाबद्दल बोलताना पुल्लिंगी आणि स्त्रीबद्दल बोलताना स्त्रीलिंगी सर्वनामं वापरायची. सोपंय की! मग आता ही ‘जेंडर प्रोनाउन्स’ म्हणजे काय वेगळी भानगड आहे?

 

-तर अलीकडच्या काळात माणसाचा स्वतःच्या ‘जेंडर आयडेंटिटीकडं बघायचा दृष्टिकोन खूप व्यापक झालाय. ‘स्त्री’ आणि ‘पुरुष ’ हे जेंडरचं ‘बायनरी ’ वर्गीकरण मोडीत निघालंय. ट्रान्सजेंडर हा एक प्रकार झाला, पण त्याबरोबरच ‘जेंडरक्लिअर ’ (म्हणजे जे स्वतःला कुठल्याच जेंडरचे समजत नाहीत किंवा दोन्ही जेंडरचे समजतात ), ‘जेंडरफ्लुइड ’ (म्हणजे ज्यांची लैंगिक ओळख वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी असू शकते), ‘अजेंडर ’ असे ‘जेंडर आयडेंटिटी ’ चे नवनवीन पैलू अस्तित्वात आलेत. ‘बायोलॉजिकल सेक्स ’ आणि ‘जेंडर आयडेंटिटी ’ मध्ये फरक असू शकतो, आपण स्त्री आहोत, पुरुष आहोत, दोन्ही आहोत की दोन्ही नाही आहोत ही लैंगिक ओळख ठरवायचा अधिकार फक्त त्या व्यक्तीला आहे, आणि ही ओळख काळाप्रमाणं बदलू शकते हे विचारही रूढ होत चाललेत. त्यामुळं समाजात वावरताना हे वेगवेगळे पैलू स्वीकारणं, त्यांचा आदर करणं महत्त्वाचं झालंय. एखादी व्यक्ती नावावरून किंवा दिसण्यावरून एखाद्या जेंडरची वाटते म्हणून तिच्याबद्दल बोलताना त्या जेंडरची सर्वनामं (‘तो ’ आज येणार नाहीये, ‘तिला ’ फोन केला पाहिजे वगैरे) वापरणं म्हणजे त्या व्यक्तीची जेंडर आयडेंटिटी गृहीत धरल्यासारखं होतं. विशेषतः ट्रान्सजेंडर किंवा जेंडरक्लिअर व्यक्तींना ‘आपली लैंगिक ओळख नक्की काय आहे’ हे शोधायला आणि स्वीकारायला बराच संघर्ष करायला लागलेला असतो आणि जर त्यांच्याबद्दल बोलताना चुकीची सर्वनामं वापरली गेली तर ते त्यांचा संघर्ष झिडकारल्यासारखं होऊ शकतं, तो त्यांचा एक तऱ्हेचा मानसिक छळ ठरू शकतो! म्हणूनच अशा लोकांचा त्यांच्याबद्दल किंवा त्यांना उद्देशून बोलताना कुठली सर्वनामं वापरली जावीत हे ठरवण्याचा हक्क मान्य करणं ही सार्वजनिक ठिकाणी त्यांची ओळख स्वीकारण्यातली पहिली पायरी आहे. मग ती सर्वनामं ‘ही, हिम्, हिज्’ असतील, ‘ शी, हर, हर्स ’ असतील, किंवा ‘जेंडर न्यूट्रल’ ' दे, देम, देअर' असतील. पण ते गृहीत न धरता त्यांना विचारून घेतलं पाहिजे. या तीन शिवायही बाकी बरीच जेंडर प्रोनाउन्स आहेत आणि ती निवडायचा पूर्ण हक्क प्रत्येकाला आहे. म्हणूनच ज्यांची लैंगिक ओळख जन्मापासून कायम आहे अशा लोकांनीही आपली जेंडर प्रोनाउन्स आवर्जून इ-मेल सिग्नेचरमध्ये, बिझनेस कार्डसवर किंवा सार्वजनिक संभाषणात नोंदवावीत असं आवाहन सध्या केलं जातं आहे. उदाहरणार्थ, मी माझ्या नावापुढं कंसात ही, हिज, हिम असं लिहायचं. असं केल्यानं कुणालाच आपल्या लैंगिक ओळखीवरून भेदभाव होतोय असं वाटणार नाही आणि सर्वसमावेशक मनोवृत्ती वाढीला लागेल. अर्थात अजूनही या विचारधारेला अमेरिकेत भरपूर विरोध आहे. ‘माणसाला जन्मतः मिळालेली लैंगिक ओळखच खरी, बाकी सगळं झूट!’ असं मानणारे भरपूर लोक आहेत. त्यामुळं ट्रान्सजेंडर/जेंडरक्लिअर/जेंडरफ्लुइड लोकांना बऱ्याच द्वेषाला, हिंसेला सामोरं जावं लागलंय.

एकीकडं सध्याच्या डेमोक्रॅटिक बायडेन सरकारनं ट्रान्सजेंडर लोकांनी सैन्यात काम करण्यावरची बंदी उठवली आहे, रेचल लिव्हाइन या ट्रान्सजेंडर स्त्रीला आरोग्य खात्यातलं एक महत्वाचं पद देऊ केलं आहे. तर दुसरीकडं आपल्यासमोर ऑफिस असलेल्या डेमोक्रॅटिक काँग्रेसवूमनची वीस वर्षांची मुलगी ट्रान्सजेंडर आहे हे कळल्यावर तिला खिजवायला स्वतःच्या ऑफिसबाहेर ‘फक्त स्त्री आणि पुरुष हीच दोन लिंगं खरी बरं का!’ असा बोर्ड लावणाऱ्या विरोधी रिपब्लिकन पक्षाच्या वादग्रस्त संसद सदस्य मार्जोरी टेलर ग्रीनसारखी माणसंही राजकारणात आहेत! शेक्सपिअरनं ‘नावात काय आहे’ असं विचारलं होतं. तसंच ‘सर्वनामात काय आहे’ हा प्रश्न साधा वाटला तरी त्याचं उत्तर ‘बरंच काही! ’ असंच द्यावं लागेल.

gautam.pangu@gmail.com

Web Title: What's matter pronouns?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.